Sunday, May 12, 2024

रात्र काळी घागर काळी - रसग्रहण

रात्र काळी घागर काळी - रसग्रहण


-डॉ. हेमंत जुन्नरकर

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved




रात्र काळी घागर काळी 
यमुनाजळे ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय
मी काळी काचोळी काळी
कांस कांसिली ते काळी वो माय
एकली पाण्याला नव जाय साजणी
सवे पाठवा मूर्ति सावळी वो माय
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्णमूर्ति बहु  काळी वो माय

'रात्र काळी घागर काळी' हे विष्णुदास नामा यांचे वरील  गीत मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्या वेळी पहाटे रेडिओवर मंगल प्रभात हा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात हे गीत हमखास लागत असे आणि अंथरुणात पडल्या पडल्या हे गीत मी  ऐकत असे. 

आता हे गीत ऐकताना या गाण्याचे निरनिराळे पदर जाणवतात. या गीताच्या शेवटी विष्णुदास नाम्यांचे नाव येते. हे विष्णुदास नामा कुणी वेगळे आहेत की सर्वांस माहीत असलेले संत नामदेव, याबद्दल चर्चा होते. मला या विषयावर चर्चा करावयाची नाही. कारण माझा हेतू फक्त या गीताचे रसग्रहण आहे. 

हे गाणे एक उच्च दर्जाचे भक्तिगीत असून त्याची  दत्ताराम गाडे यांनी त्यास अतिशय साधी चाल दिली असून गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर यांनी संयुक्तपणे रांगड्या आवाजात गीत गाइले  आहे.

आता  गीताकडे वळू या. या  गीतात वापरलेल्या सर्व प्रतिमा काळ्या रंगातील आहेत, जशा - रात्र, घागर, यमुनाजळ, बुंथी (=आवरण, पडदा, आच्छादन), बिलवर (=एक प्रकारची काचेची बांगडी), गळा मोती एकावळी (=एकपदरी हार), काचोळी (=मागे बंद असलेली चोळी), कांस कासिली (=नेमलेले लुगडे, पातळ).

काळा रंग हा आपल्याला भीतिदायक वाटतो. परंतु साऱ्या विश्वाला व्यापून उरलेल्या अंधाराचा रंग काळाच आहे. विशिष्ट अंतरावर फिरणारे ताऱ्यांचे प्रकाशपुंज सोडले तर विश्वात सर्वत्र     निराकार अंधारच भरून  राहिला आहे‌.

याच अंधाराचा काळा रंग भगवान श्रीकृष्णांनी घेतला आहे. त्याच्या भूतलावरील प्रगटकाळी मध्यरात्र, कारागृह, पूर आलेला यमुनेचा प्रवाह असे सर्वत्र काळ्या रंगाचे साम्राज्य आहे. या  काळ्या रंगाचे चिंतन हे निराकार भगवान श्रीकृष्णांचे चिंतन.

गाण्यातील पुढील कल्पना म्हणजे गोपीचे एकलेपण.यमुनेवरून घागर भरून आणणे हे जीवात्म्यावरील भौतिक जबाबदारीचे प्रतीक. ही गोपी म्हणजे जीवात्मा. आपण सारे या जगात एकटेच येतो आणि  एकटेच जातो. या प्रवासात जमणारे गणगोत केवळ क्षणिक असतात, चिरंतन असतो तो काळा अंधार. पण या काळेपणास भिण्याचे कारण नाही , कारण सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी हाच काळा रंग धारण केला आहे हे नित्य चिंतनात असू द्या, म्हणजे तुमचा प्रवास,  एकाकी होणार नाही, तुमची भौतिक जबाबदारी सुसह्य होईल.

विष्णुदास नामा       गीताच्या अखेरीस सांगतात  की त्यांची स्वामिनी कृष्णमूर्ती 'बहु काळी' आहे. ही कृष्णमूर्ती   भगवान       श्रीकृष्णांचे     सगुणरूप. ही कृष्णमूर्ती  विष्णुदास नामा यांची स्वामिनी आहे, ती आपणा सर्वांची स्वामिनी आहे.

गीतातील अर्थाचे  वरील पदर मला जाणवणारे असे मी म्हणतो कारण विष्णुदास नामा यांना हे अर्थ अभिप्रेत आहेत , असे  नाही. उच्च आंतरिक पातळीवर   स्फुरलेल्या गीतांतून असेच बहुविध अर्थ जाणवतात. तेच त्या गीतांचे मोठेपण आहे.

 (टीप : या पोस्टमधील माहिती www.athavanitali-gani.com या संकेतस्थळावरून घेतली आहे)







No comments:

Post a Comment

Ni Hao Beijing , Ni Hao Shanghai

Ni Hao Beijing, Ni Hao Shanghai ----------------------------------------- Travelogue of a Journey through Beijing and Shanghai (22 May 2026 ...