Wednesday, May 15, 2024

आमच्या घरातील सेलिब्रिटी - स्व. नूतन वहिनी

 आमच्या घरातील सेलिब्रिटी - स्व. नूतन वहिनी 


आम्ही सर्वांनी, म्हणजे -आई, अण्णा, दादा (नितीन), सचिन, (बहीण शामा तेव्हा लग्न होऊन सासरी गेली होती ) नूतनवहिनीस प्रथम पाहिले, दर्शन हॉल, चिंचवड येथे 'नाथ हा माझा' या नाटकाच्या प्रयोगात. या नाटकात नूतन वहिनीने यशवंत दत्त या नटसम्राटाबरोबर सहजतेने काम केले होते. नंतर दादा म्हणाला की आपण नाटकात पाहिलेली मुलगी आमच्या कंपनीत (रॅपिकट कार्बाइडस लिमिटेड ) मध्ये जॉईन झाली आहे. तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की आमच्या परिवाराशी नूतनवहिनीचा ऋणानुबंध जळणार आहे.


नूतनवहिनी नूतन दांडेकरची नूतन जुन्नरकर होऊन आमच्या परिवाराची सदस्य झाली. प्रत्येक परिवारात काही समस्या असतात. पण नूतनवहिनीचा गुण मला आठवतो की परिवारातील समस्यांची तिने कधी बाहेर वाच्यता केली नाही. नूतनवहिनीचे बाबा फारच विनोदी स्वभावाचे होते. सहज बोलता बोलता ते विनोद करीत. वडील वास्तविक मुलीचे कट्टर अभिमानी असतात. पण ते विनोदात मुलीची पोल खोल करीत. एकदा सर्व जण जेवण करीत होते. नूतन वहिनी जेवण करीतच नव्हती. सारे जण तिला आग्रह करीत होते. बाबा म्हणाले, ' काळजी करू नका. तिने बनवतानाच खाऊन घेतले आहे.'

मला एक गोष्ट आठवते. आमचे आजी-आजोबा चिंचवडमध्ये राहत असत. आजोबा खूप आजारी होते. त्यांची दाढी वाढली होती. न्हाव्याकडे नेणे शक्य नव्हते. त्या वेळी नूतनवहिनीने त्यांची दाढी करून दिली. त्यानंतर आजोबांचा देहांत झाला. त्यांचा चेहरा स्वच्छ दिसत होता.




नंतर माझे लग्न झाले. माझ्या पत्नीचे वर्षाचे आणि नूतनवहिनींचे बहिणी-बहिणीसारखे संबंध होते. दर्शन हॉल मध्ये 'कुणीतरी आहे तिथं' नाटकाचा प्रयोग होता. दादा सतत ऑफीसच्या दौऱ्यावर असे. मी, वर्षा आणि नूतनवहिनीने नाटकाला जावयाचे ठरवले. नूतनवहिनीला पाहून कुणीतरी आम्हाला पहिल्या रांगेतील फ्री पास दिले. नूतनवहिनीने सांगितले की सारे मित्र मोहन जोशींना 'मोहन्या' म्हणत असत. तिने आम्हाला मोहन जोशींची ओळख करून दिली. आम्ही समोरासमोर मोहन जोशींशी गप्पा मारल्या. नूतन वहिनीला नाट्यवर्तुळात किती आदर आहे, ते आम्हाला त्या दिवशी कळले.

नंतर मला मुलगा झाला-अद्वैत. अद्वैतची नूतनवहिनी लाडकी काकी होती. तिला तो निरनिराळे पदार्थ बनवण्यास सांगत असे.




पुढे दादा ऑफीसच्या कामामुळे सहकुटुंब अहमदाबादला स्थलांतरित झाला. त्यामुळे आम्हालाही अहमदाबादला जाण्याचा योग्य आला. नूतनवहिनीचे शेजाऱयांशी तसेच प्रेमाचे संबंध होते. तिने गुजराती भाषा शिकून घेतली होती. त्यांचे शेजारी हर्षदाबेन यांच्या सासूबाई काठियावाडहून येत. त्यांच्याशी काठियावाडी गुजरातीमध्ये त्यांच्या घरचे बोलू शकत नसत. पण नूतनवहिनी बोलू शकत असे.

नंतर मी सहकुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालो. मी ऑफीसच्या कामासाठी सिंगापूरला असताना नूतनवहिनीचा देहांत झाल्याची आश्चर्यजनक आणि दु:ख द बातमी आली (३/७/२००६). बाबांचा गेल्या वर्षीच देहांत झाला होता (२००५). वर्षा ताबडतोब सिडनीहून दादाकडे राहण्यास गेली. दादा, जाई यांनी या प्रसंगास धीराने तोंड दिले. पुढीलच वर्षात आईंचा सुद्धा देहांत झाला (२००७). परलोकात भेटण्याचा त्यांचा संकेत असावा. दांडेकर घरातील आता कुणीच हयात नाही, पण त्यांचे प्रेम शिल्लक आहे.

माझी मावस वहिनी माधुरी एकदा म्हणाली की तिला स्वप्नात नूतन वहिनी तिच्या घरात दिसली होती. ती गाणे गुणगुणत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत होती. माधुरी म्हणाली की याचा अर्थ,'परलोकात ती आनंदात आहे.' परलोकाबद्दल आपल्याला माहिती नाही. परंतु औंधच्या घरातील भिंतीवरील नूतन वहिनीचा फोटो पाहिला की वाटते की ती अजूनही हसून स्वागत करते आहे. जाईने तिच्यातील वाचन, स्वयंपाक, सामान्य ज्ञान या सर्व गोष्ट उचलल्या आहेत. जावई पारितोष, नातू तक्ष यांना पाहून तिला खूप आनंद झाला असता. ती आम्हा सर्वांना आता भेटू शकत नसेल. परंतु तिची कृपा दृष्टी निश्चितच आहे.

प्रतिक्रिया:
फार पूर्वी गोरेगाव मध्ये आमच्याच बाजूला, पूर्वेला, सेंट थॉमस शाळेच्या पटांगणात महाराष्ट्र मंडळाची नाटके होती. त्यात राजसंन्यास हे सुद्धा नाटक होते आणि त्यात नूतनने काम केले होते. त्यावेळेस तिच्याबरोबर यशवंत दत्त आणि अश्विनी भावे, हे सुद्धा होते. गोरेगावच्या स्टेशन जवळ आम्हाला हे तिघेही भेटले आणि नूतनने आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. 
नाटकाचा प्रयोगही छान झाला. आमची पण वट वाढली होती. थँक्स नूतन.🙏😊

-मोहन तांबडे (नूतनचा मावसभाऊ)

@⁨Niteen Junnarkar⁩ give my best wishes to Hemat Junnerkar uncle for his blog writing. 🌺🍫🌹
st wishes to Hemat Junnerkar uncle for his blog writing. 🌺🍫🌹
कीर्ती (नूतनची भाची)









No comments:

Post a Comment