Friday, August 1, 2025

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२-भक्तियोग

अर्जुन म्हणाला

याप्रमाणे जे भक्त तुला भजतात | होऊन सतत भक्तियुक्त || आणि जे भजतात अक्षर अव्यक्त | त्यांतील योगज्ञानी कोण || अ.१२, ओ.१ ||

श्रीभगवान म्हणाले

मन स्थिर करून माझ्यात | होऊन दिव्य श्रद्धेने युक्त || जे नित्य मला भजतात | ते सर्वांत योग्य वाटतात मला || अ.१२, ओ.२||

परंतु जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्ताची | सर्वत्रगम, अचिंत्याची || कूटस्थ, अचल, ध्रुवाची | करतात  उपासना- || अ.१२, ओ.३||

-इंद्रियांचे संयमन करून | सर्वत्र समबुद्धी ठेवून ||सर्व भूतांच्या हिताशी समरस होऊन | तेही मलाच मिळतात || अ. १२, ओ.४||

अव्यक्तात ज्यांची बुद्धी आसक्त | ते अधिक क्लेश भोगतात || देहवंतास अव्यक्त | कष्टाने प्राप्त होते || अ.११, ओ.५||

परंतु जे सर्व कर्मे मला अर्पितात | माझ्याशी परायण होतात || आणि माझे ध्यान करून उपासना करतात | अनन्य योगाने- || अ.१२, ओ.६||

-त्यांना मी त्वरित नेतो उद्धरून | मृत्युसंसारसागरातून | स्थिर केले मन | ज्यांनी माझ्यात || अ.१२, ओ. ७||

माझ्यात स्थिर कर मनास | माझ्यात नियुक्त कर बुद्वीस || त्यायोगे करशील वास | माझ्यात नि:संशय || अ.१२, ओ.८||

मन स्थिर करणे माझ्यात | जर नसेल शक्य होत || तर मला कर प्राप्त | अभ्यासयोगाने धनंजया || अ. १२, ओ.९||

अभ्यासही नसेल साधत | तर परायण हो कर्मात || सिद्धी करशील प्राप्त | कर्मे करून माझ्यासाठी || अ.१२, ओ.१०||

माझ्यासाठी कर्म करण्यास | जर असमर्थ असलास || तर त्याग सर्व कर्मांच्या फळास | आणि हो आत्मवान || अ.१२, ओ.११|| 

अभ्यासापेक्षा बरे ज्ञान | ज्ञानाहून चांगले ध्यान ||कर्मफलत्याग श्रेष्ठ ध्यानाहून | त्या त्यागातून मिळे शांती || अ. १२, ओ.१२||

जो द्वेष न करी सर्व भूतांचा | आहे कृपाळू मित्र त्यांचा || आहे निर्मम, स्पर्श न ज्यास अहंकाराचा | सुखदु:खांप्रति मानतो समभाव || अ.१२, ओ.१३||

जो संतुष्ट आहे, साधतो योग सतत | जो दृढनिश्चयी आहे, आत्म्यास करतो संयमित || जो मन आणि बुद्धीने आहे मला अर्पित | तो भक्त मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१४||

लोकांना जो उद्वेग न देतो | लोकांमुळे जो न उद्विग्न होतो || हर्ष, दु:ख, भय, उद्वेग यांपासून मुक्त तो | मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१५||

निरपेक्ष, दक्ष, शुचिर्भूत | उदासीन, होई न व्यथित || सर्व प्रयासांपासून मुक्त | असा भक्त मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१६||

ज्यास न होई हर्ष, जो न करी द्वेषास | नाही ज्यास इच्छा, न होई दु:ख ज्यास || त्यागिले ज्याने शुभ आणि अशुभास | तो भक्त मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१७||

शत्रू आणि मित्र ज्यास समान | त्याचप्रमाणे मान आणि अपमान || शीतता वा उष्णतामान | आणि संग ज्याने सोडिला || अ. १२, ओ.१८||

निंदा-स्तुति ज्यास समान, जो राखतो मौन | मिळेल त्यात मानतो समाधान || ज्याचे न घर, आहे स्थिरमती, भक्तिमान | तो नर प्रिय मला || अ.१२, ओ.१९||

हे धर्मामृत | सांगितल्याप्रमाणे आचरतात || ते श्रद्धावान, माझ्याशी परायण भक्त | अतिशय प्रिय मला || अ.१२, ओ.२०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘भक्तियोग ’ नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला.

                || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved