Tuesday, February 24, 2026

जळकमळा सोडुनि जा बाळा

गुजरातमधील संतकवी प.पू. नरसी मेहता आपल्या परिचयाचे आहेत ते त्यांच्या 'वैष्णव जन तो तेणे कहिये' या भजनामुळे. पण नरसी मेहतांनी इतर लेखनही केले आहे. त्यांमध्ये एक आहे कालिया मर्दनावर लिहिलेले पद. पद अतिशय सोप्या भाषेत असून त्यात सहज पदलालित्य आहे. 

गुजराती समाजात हे पद फार लोकप्रिय असून ते प्रभातीया म्हणजे भूपाळी प्रकारात मोडते. श्रीकृष्णजन्माटष्मी वगैरे धार्मिक कार्यक्रमात हे भजन म्हणून गाइले जाते. गुजराती साहित्याची जाण असणारे माझे व्याही श्री. देवेंद्र पाटील यांनी मला या पदाचा परिचय करून दिला व अर्थाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांचा मी अतिशय आभारी आहे.

या रसाळ पदाचे मी  येथे मराठीत रूपांतर (अर्थ न बदलता व शक्यतो शब्दसाधर्म्य राखून)  केले आहे.

पदामधील प्रसंग असा आहे. कालिया मर्दनाचा निश्चय करून श्रीकृष्ण यमुनेच्या डोहात उतरला आहे. कालियाची नागपत्नी श्रीकृष्णाला पाहते  आणि   दोघांमध्ये  संवाद  सुरू होतो:-   

नागपत्नी:
जळकमळा सोडुनि जा बाळा
स्वामी माझे उठतिल आता
माथी माझ्या  बालकहत्या
येइल  त्यांनी तुला मारता || १ || जळकमळा ||

मार्ग विसरला कसा बालका
वैऱ्याने  का भ्रमविले तुला
समीप आला काळ  का तुझा
कशास येथे तू पोहचला ? || २ || जळकमळा ||

श्रीकृष्ण :
मार्ग विसरलो न  मी नागिणी
वैऱ्याने मज नसे भ्रमविले
मथुरेमध्ये द्यूत खेळता
शिर नागाचे मी गमाविले || ३ || जळकमळा ||

नागपत्नी:
रंग साजिरा रूप गोजिरे
दिससी कोमल  आणि कोवळा
किती अपत्ये  तव मातेला
असशील त्यांत तूच निराळा || ४ || जळकमळा ||

श्रीकृष्ण:
मम मातेला दोन अपत्ये
मी अति अवखळ  त्यांत धाकला
म्हणतात  मला कृष्णकन्हैया
बोलाव शीघ्र तू नागाला || ५ || जळकमळा ||

नागपत्नी:
सव्वा लाखाचा मम हार
आणि  साखळी गळ्यामधील
मम स्वामीला कळू न देता
दोन्हीही मी देते तुजला || ६ || जळकमळा ||

श्रीकृष्ण:
हार घेउनी करू काय मी
साखळी न मज पाडी मोहात
काम कसे करु मी चोराचे?
सांग नागिणी तुझ्या घरात || ७ || जळकमळ ||

पाय दाबुनी मिशी हलवुनी
नागीण जागवी नागाला,
'बलवान अहो, उठा पहा ना
दारी कोणी बालक आला' || ८ || जळकमळा ||

दोघे बलिष्ठ  भिडता झाला
कृष्णाकडून नाग पराजित
सहस्र फणांनी आणि फुणफुणे
मेघ गर्जतो जसा नभात  || ९ || जळकमळा ||

शोक नागिणी तेव्हा करिती,
'नागपतिस अमुच्या छळतील
मथुरा नगरीला नेऊनी
धडावेगळे शिर करतील' || १० || जळकमळा ||

कर जोडुनि कृष्णास  विनवती,
'सोडा अमुच्या प्रिय नाथाला
अपराध खरा आम्ही केला
ओळखिले नच भगवंताला ' || ११ || जळकमळ ||

थाळी भरुनी मोती त्यांनी
अर्पण करुनी मग कृष्णाला
नरसीच्या स्वामीपासूनी 
सोडविले निज नागपतीला || १२ || जळकमळ ||

रसग्रहण:
आपल्याला भागवतपुराणातील माहीत असलेले कालियामर्दन म्हणजे श्रीकृष्णाच्या पराक्रमाची कथा आहे. कालियाने यमुना नदीमध्ये उडवलेला हाहा:कार ही कथेची सुरुवात आहे. कालियाला  चढलेला आपल्या सामर्थ्याचा गर्व आणि श्रीकृष्णाने तितक्याच ताकदीने कालियाला दिलेली झुंज हा कथेचा मुख्य विषय आहे. बालपणीच श्रीकृष्णाच्या ठिकाणी ईश्वरी अवताराचे सामर्थ्य होते आणि ते  न जाणणाऱ्यांचे गर्वहरण कसे झाले  ते आपल्याला या कथेतून कळते.    

नरसी मेहतांनी मात्र त्यांच्या पदामध्ये  हा विषय वेगळ्या पद्धतीने कथन केला आहे. 

श्रीकृष्णाला यमुनेत येताना कालियानागाची पत्नी पाहते. श्रीकृष्णासारखे सुकुमार बालक तेथे आलेले पाहून तिचा वात्सल्यभाव जागृत होतो. श्रीकृष्णाची ती प्रेमाने चौकशी करते की तू रस्ता चुकला आहेस की तुला वैऱ्याने फसविले आहे. ती श्रीकृष्णाला विचारते की तुझ्या आईला अपत्ये किती आहेत, तू त्यातील निश्चित वेगळा असशील. अशा प्रकारे, तुला काही इजा झाली तर तुझ्या आईला दु:ख होईल हे ती कृष्णाच्या निदर्शनास आणून देते.

कालियासारख्या नागासमोर श्रीकृष्णाचा टिकाव लागणार नाही याची तिला काळजी वाटते.  श्रीकृष्णाने तेथून जावे म्हणून ती आपल्याकडील  सव्वा लाखाचा हार  आणि गळ्यातील  साखळी   श्रीकृष्णाला देऊ करते,  तेही पतीच्या नकळत. यांमध्ये निरागसता आहे, पतीच्या सामर्थ्याचा गर्व नाही.

तिच्या निरागसतेची श्रीकृष्णाला सुद्धा मौज वाटते आणि तो तिला गमतीचे उत्तर देतो की मी मथुरानगरीत  द्यूतामध्ये  नागाचे शिर गमावले आहे आणि ते नेण्यासाठी मी आलो आहे.  हेसुद्धा त्या भोळ्या नागपत्नीला खरे वाटते. कृष्ण हार आणि साखळी घेण्यास नकार देतो आणि कालियानागाला जागे करण्यास सांगतो.

नागपत्नीने  कालियाला उठवण्याच्या प्रसंगाचे  वर्णन सुद्धा गमतीशीर आहे. नागपत्नी पाय दाबून आणि मिशी पिळून कालिया नागाला उठविते.

कालियानागाने सहस्र फणांनी केलेल्या फूत्काराला नरसी मेहता  आकाशातील गजांच्या, म्हणजे मेघांच्या गर्जनेची, म्हणजे गडगडाटाची उपमा देतात. श्रीकृष्ण-कालियाच्या लढतीचे आणि श्रीकृष्णाने कालियावर मात कशी केली त्याचे नरसी मेहता वर्णन करीत नाहीत. कारण तो पदाचा विषय नाही.

कालियाचा पराभव झाल्यानंतर नागपत्नींना काळजी वाटू लागते की आता कालियानागाला मथुरेला नेऊन त्याचा छळ करतील आणि त्याचे शिर कापतील. नाग पाण्यात राहतात. त्यांना सहज उपलब्ध असणारी आणि मानवाला पसंत असणारी मौल्यवान गोष्ट म्हणजे मोती. त्यामुळे मोती दिल्यास श्रीकृष्ण आपल्या पतीला सोडेल, असा विचार करून त्या श्रीकृष्णाला थाळीभर मोती अर्पण करतात आणि कालियानागाची सुटका करतात. श्रीकृष्णाला वास्तविक मोत्यांची गरज नसते. 

पदाच्या शेवटी आपले नाव टाकतणे ही पूर्वीची पद्धत होती. त्याप्रमाणे नरसी मेहता आपले नाव टाकतात आणि श्रीकृष्ण त्यांचे नाथ असल्याचा नम्र उल्लेख करतात.

नागपत्नीचा श्रीकृष्णाबद्दल निरागस भाव तिला श्रीकृष्णाचे भगवत्स्वरूप समजणे हा या पदाचा मुख्य विषय आहे. नागपत्नी आपल्या पतीचा सुरुवातीला स्वामी म्हणून उल्लेख करते आणि शेवटी श्रीकृष्णाला स्वामी म्हणून संबोधते. कालिया आपला लौकिक दृष्ट्या स्वामी असला तरी श्रीकृष्ण चराचराचे स्वामी असल्याची तिला जाणीव होते. 

नरसी मेहता यांचा अल्प परिचय:
नरसी मेहता हे गुजराती भाषेचे  आद्य भक्तिकवी मानले जातात. त्यांच्याविषयी ऐतिहासिक माहिती कमी आहे. त्यामुळे त्यांचे चरित्र मुख्यत्वे लोककथा आणि भक्तिपर ग्रंथांच्या आधारे सांगितले जाते.

नरसी मेहतांचा  जन्म इ.स.१४१४ च्या सुमारास तळाजा, सौराष्ट्र, गुजरात येथे झाला. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे     त्यांचे लहानपण अतिशय कष्टात गेले. लहानपणी ते  बुद्धिमान किंवा हुशार नव्हते परंतु  मंद बुद्धीचे आणि खोडकर होते. त्यांच्या भावजयीकडून त्यांना चांगली वागणूक नव्हती. त्यामुळे ते कंटाळून आपल्या आजोळी जाण्यास निघाले. तेथे जाऊन त्यांनी गोपनाथाची (गोपाळकृष्णाची) निष्ठेने उपासना केली. त्यामुळे गोपनाथाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना रासलीलेचे दर्शन घडविले. तेव्हापासून नरसी मेहतांचे  जीवन पालटून गेले. ते श्रीकृष्णाचे भजन कीर्तन करू लागले.

श्रीकृष्णाचे दर्शन झाल्यानंतर ते जुनागढमधील आपल्या मूळ गावी परत गेले. नरसी मेहतांच्या भावाने त्यांचे मन संसारात रमावे म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांचे लग्नही लावून दिले. पण नरसी मेहतांनी आपले जीवन श्रीकृष्ण-भक्तीलाच वाहून घेतले होते. भक्तिपर ग्रंथांनुसार अडीअडचणीच्या वेळी श्रीकृष्णाने त्यांना मदत केली होती.

नरसी मेहतांनी विपुल साहित्य लिहिले. त्यामध्ये सुदामा चरित्र, शामळदासाचा विवाह, गोपीविरह, राससहस्रपदी, तत्त्वचिंतन, बाळलीला यांचा समावेश आहे. त्यांनी बरीच पदे आणि प्रभातीया (भूपाळ्या) सुद्धा लिहिल्या. नरसी मेहतांचे साहित्य गुजराती भाषेचा अनमोल ठेवा आहे. त्यांचे 'वैष्णव जन तो तेणे कहिये' हे पद  गांधीजींचे आवडते पद होते आणि गांधीजींच्या आश्रमात ते गाइले जात असे.

खऱ्या वैष्णवाने जात पात मानू नये या मताचा प्रसार त्यांनी केला. ते स्वतः दलित वस्त्यांमध्ये जाऊन भजन-कीर्तन करीत. 

अठराव्या शतकातील मराठी भाषेतील कवी महिपती यांनीही त्यांच्या 'भक्तविजय' आणि 'भक्तलीलामृत' या ग्रंथांमध्ये नरसी मेहतांविषयी कथा दिल्या आहेत.

नरसी मेहता इ.स. १४८१ मध्ये  वैकुंठवासी झाले.

मूळ  गुजराती प्रभातीया:

'જળકમળ છાંડી જાને બાળા,
સ્વામી અમારો જાગશે
જાગશે તને મારશે મને
બાળ હત્યા લાગશે … જળકમળ || ૧ ||

કહે રે બાળક તું મારગ ભૂલ્યો,
કે તારા વેરીએ વળાવીયો
નિશ્ચલ તારો કાળ ખૂટ્યો,
અહીંયા તે શીદ આવીઓ … જળકમળ || ૨ ||

નથી નાગણ હું મારગ ભૂલ્યો,
નથી મારા વેરીએ વળાવીયો,
મથુરા નગરીમાં જુગટુ રમતાં
નાગનું શીશ હું હારીઓ … જળકમળ || ૩ ||

રંગે રૂડો રૂપે પુરો
દિસંત કોડિલો કોડામણો,
તારી માતાએ કેટલા જનમ્યાં
તેમાં તું અળખામણો … જળકમળ || ૪ ||

મારી માતાએ બે જનમ્યાં
તેમાં હું નટવર નાનડો
જગાડ તારા નાગને
મારું નામ કૃષ્ણ કાનુડો … જળકમળ || ૫ ||

લાખ સવાનો મારો હાર આપું,
આપું હું તુજને દોરીયો,
એટલું મારા નાગથી છાનું
આપું તુજને ચોરીઓ … જળકમળ || ૬ ||

શું કરું નાગણ હાર તારો,
શું કરું તારો દોરીયો,
શાને કાજે નાગણ તારે
કરવી ઘરમાં ચોરીઓ …જળકમળ || ૭ ||

ચરણ ચાંપી મૂછ મરડી,
નાગણે નાગ જગાડિયો,
ઉઠોને બળવંત કોઇ,
બારણે બાળક આવીયો … જળકમળ || ૮ ||

બેઉ બળિયા બાથે વળગ્યાં,
કૃષ્ણે કાળીનાગ નાથિયો,
સહસ્ત્ર ફેણ ફુંફવે,
જેમ ગગન ગાજે હાથિયો … જળકમળ || ૯ ||

 નાગણ સૌ વિલાપ કરે જે,
નાગને બહુ દુ:ખ આપશે
મથુરા નગરીમાં લઇ જશે,
પછી નાગનું શીશ કાપશે … જળકમળ || ૧૦ ||

બેઉ કર જોડી વિનવે સ્વામી !
મુકો અમારા કંથને,
અમે અપરાધી કાંઇ ન સમજ્યાં,
ન ઓળખ્યાં ભગવંતને … જળકમળ || ૧૧ ||

થાળ ભરીને નાગણે સર્વે,
મોતીડે કૃષ્ણ વધાવિયો,
નરસૈંયાના નાથ પાસેથી,
નાગણે નાગ છોડાવીયો … જળકમળ || ૧૨ ||

पदाचा अर्थ:
नागपत्नी:
१. बाळा, हे जळकमळ (=यमुनेचे जळ हेच कमळ, अशी कल्पना) सोडून जा रे. आमचे स्वामी जागे होतील. जागे होतील आणि तुला मारतील. त्यामुळे बालहत्या माझ्यावर येईल (= मला बालहत्येचे पातक लागेल).

२. सांग रे बाळा, तू रस्ता विसरलास का? की तुझ्या वैऱ्याने तुला वळविले ?(=फसवून येथे आणले?) निश्चित तुझा काळ जवळ आला आहे. तू कशासाठी येथे आला आहेस?

श्रीकृष्ण:
३. हे नागिणी, न मी रस्ता चुकलो, न वैऱ्याने मला वळविले? मथुरा नगरीत जुगार खेळताना मी नागाचे शिर हारलो.

नागपत्नी:
४. तू रुबाबदार , रूपाने सुंदर, कोवळा आणि लडिवाळ  दिसतोस. तुझ्या आईला किती अपत्ये आहेत? तू त्यांच्यातील वेगळा असावास.

श्रीकृष्ण:
५.  माझ्या आईला दोन अपत्ये आहेत. त्यांमधील मी  अवखळ असा धाकटा आहे. माझं नाव कृष्णकन्हैया आहे. आता तुझ्या नागपतीला जागा कर.

नागपत्नी:
६. माझा सव्वा लाख (रुपये) किंमतीचा हार  आणि माझी  साखळी  मी तुला देते. माझ्या नागपतीपासून हे लपवून ठेवले आहेत. ते मी तुला त्याच्या नकळत देते.
(गुजरातमध्ये हार आणि साखळी एकत्र देण्याची पद्धत आहे, असे मला श्री. देवेंद्र यांनी सांगितले)

श्रीकृष्ण:
७. हे नागिणी, तुझ्या हाराचे मी काय करू? तुझी साखळी माझ्या काय कामाची? तुझ्या घरी मी कशासाठी चोरी करावी?

८.  (तेव्हा) पाय दाबून आणि मिशी ओढून नागिणीने नागाला जागे केले (आणि म्हणाली), ' उठा ना, दाराशी कोणी बलशाली बालक आला आहे.'

 ९.दोघे बलवान परस्परांना भिडले. पण कृष्णाने कालियानागाला चीत केले.  (तेव्हा) हजारो फणांनी तो नाग फुत्कार काढू लागला, जणू आकाशात गरजणारा  करणारा हत्ती (= म्हणजे मेघ).

१०. सर्व नागिणी विलाप करू लागल्या की
“नागाला  आता फार दुःख देतील.त्याला मथुरा नगरीत घेऊन जातील आणि मग त्याचे शिर छाटतील !”

११. दोन्ही हात जोडून त्या (कृष्णाला) विनवू लागल्या, “ हे स्वामी, आमच्या कंठाला (नागपतीला) सोडा. आम्ही अपराधी आहोत, कारण आम्ही काहीच समजलो नाही. भगवंताला (आम्ही) ओळखलेच नाही.”

१२. सर्व नागिणींनी मग कृष्णाला थाळी भरून मोती कृष्णाला अर्पण केले आणि नागिणींनी नरसीच्या नाथापासून आपल्या नागपतीला सोडविले.

शब्दार्थ:
२. શીદ= શા માટે कशासाठी (जुने गुजराती)

३. જુગટુ=जुगार

४. રૂડો (रूडो) – देखणा, रुबाबदार, तेजस्वी, मनमोहक
કોડીલો (कोडीलो) – कोवळा, लाडका, गोड निरागस
કોડામણો (कोडामणो) – लाडका, लाडाने वाढवलेला, जपलेला, प्रेमळ
અળખામણો (अळखामणो) – विलक्षण, वेगळाच, ओळखू न येण्याइतका अद्वितीय, निराळा

५. નટવર = नटांचा वर/श्रेष्ठ; येथे अर्थ — लीलामय, नृत्यकुशल (कृष्ण)
નાનડો = लहानसा, बाळरूपातील
કાનુડો = कान्हा/कान्हुडो (श्रीकृष्णाचे लाडके नाव)

६. લાખ સવાનો હાર → लाख मोलाचा हार (अत्यंत मौल्यवान दागिना)
દોરીયો → साखळी
નાગથી છાનું → नागापासून लपवलेले (कालियानागाच्या संदर्भात)
ચોરીઓ → चोरून देईन / गुपचूप अर्पण करीन

८. ચરણ ચાંપી → पायाने दाबून (हलवून)
મૂછ મરડી → मिशा पिळून (जागे करण्यासाठी जोरात हलवून)
નાગણે → नागिणीने
નાગ જગાડિયો → नागाला जागवले
બારણે → दाराशी
બાળક આવીયો → एक बालक आले आहे

९. બેઉ બળિયા → दोघेही बलवान (कृष्ण आणि काळियानाग)
બાથે વળગ્યાં → एकमेकांना भिडले / झुंजले
નાથિયો → जिंकले, वश केले, पराभूत केले
સહસ્ત્ર ફેણ → हजार फणे (नागाचे अनेक फण्यांचे रूप)
ફુંફવે → फुत्कार काढणे
હાથિયો → हत्ती
ગગન ગાજે → आकाश दणाणून टाकेल अशी गर्जना

१०. નાગણ સૌ → सर्व नागिणी
વિલાપ કરે → रडू लागल्या / शोक करू लागल्या
બહુ દુઃખ આપશે → फार त्रास देतील
મથુરા નગરીમાં લઇ જશે → मथुरा नगरीत घेऊन जातील
શીશ કાપશે → शिर छाटतील

११. બેઉ કર જોડી → दोन्ही हात जोडून
વિનવે સ્વામી → “स्वामी” म्हणून विनवू लागल्या
મુકો અમારા કંથને → आमच्या कंठाला/नागपतीला सोडा
કંથ = कंठ; येथे नागाचा फणा/गळा अभिप्रेत
અમે અપરાધી → आम्ही अपराधी आहोत
ન ઓળખ્યાં ભગવંતને → भगवंताला ओळखले नाही

© Dr Hemant Junnarkar
All rights reserved







China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...