धृतराष्ट्र म्हणाला
कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र I तेथे युद्धासाठी जमलेले एकत्र II पांडव आणि माझे पुत्र I करतात काय, सांग संजया II अ.१ ओ.१ II
संजय म्हणाला
पांडवांचे विशाल सैन्य पाहून I राजा दुर्योधन II आचार्यांजवळ जाऊन I असे म्हणाला, II अ.१ ओ.२ II
‘पांडुपुत्रांचे हे मोठे सैन्य I बघून घ्या आचार्य II द्रुपदपुत्र, तुमचा बुद्धिमान शिष्य, I त्याने रचलेले II अ.१ ओ.३ II
युद्धात येथे महाधनुर्धर I भीम आणि अर्जुन शूर II तसेच महारथी थोर I युयुधान, विराट, द्रुपद II अ.१ ओ. ४II
धृष्टकेतु आणि चेकितान I काशिराज वीर्यवान II पुरुजित्, कुंतिभोज वीर महान I तसाच शैब्य नरश्रेष्ठ II अ.१ ओ. ५II
युधामन्यू आणि विक्रांत | उत्तमौजा वीर्यवंत ||सौभद्र आणि द्रौपदीचे सुत | सारेच महारथी ||अ.१ ओ.६ ||
आता जे विशेष आमचे | नायक माझ्या सैन्याचे || ज्ञान करून देतो त्यांचे | तुम्हास हे द्विजोत्तम || अ. १ ओ.७ ||
भीष्म आणि स्वत: आपण | नेहमी जिंकणारे कृप आणि कर्ण || अश्वत्थामा, विकर्ण | तसाच सौमदत्ती || अ. १, ओ. ८ ||
आणखी आहेत पुष्कळ शूर | माझ्यासाठी जिवावर उदार || जाणती विविध शस्त्रांचा वापर | सारे निपुण युद्धात || अ. १, ओ. ९ ||
असे अमर्याद सैन्य आमचे | भीष्म करती रक्षण ज्याचे || मर्यादित परी हे सैन्य त्यांचे | रक्षिलेले भीमाने || अ.१, ओ.१०||
सर्व व्यूहद्वारस्थानी | नेमून दिलेल्या ठिकाणी राहूनी || करावे आपण सर्वांनी | भीष्मांचेच रक्षण’ || अ.१, ओ. ११||
मग कुरुवृद्ध प्रतापवान पितामहांनी | सिंहगर्जना करूनी || शंख फुंकूनी | आनंदित केले दुर्योधना || अ.१, ओ.१२ ||
तेव्हा शंख आणि भेरी | पणव, आनक, गोमुख अशी वाद्ये सारी || नाद करती भारी | एकदम वाजू लागता || अ.१ ओ.१३ ||
तेव्हा युक्त शुभ्र घोड्यांनी | रथात मोठ्या बैसुनी || करीती दिव्य शंखांचा ध्वनी | माधव आणि पांडव || अ.१, ओ.१४||
पांचजन्य हृषीकेशाने | देवदत्त धनंजयाने || पौंड्र भीमकर्मा वृकोदराने | शंख असे वाजविले || अ. १, ओ. १५II
अनंतविजय, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने | सुघोष नकुलाने || मणिपुष्पक सहदेवाने | शंख असे वाजविले || अ. १, ओ.१६II
काशिराज धनुर्धर-शिरोमणी | शिखंडी महारथी अग्रणी || ध्रुष्टद्युम्न आणि विराट नृमणी | अपराजित सात्यकी || अ.१, ओ. १७||
द्रुपदराजा आणि पुत्र द्रौपदीचे | सौभद्र, बाहू मोठे ज्याचे || सर्वांनी विविध शंखांचे | नाद केले महाराज || अ.१, ओ. १८||
तो घोष पडता कानी | धार्तराष्ट्रांची हृदये गेली विदीर्ण होऊनी || त्या नादाने गेले दुमदुमुनी| पृथ्वी आणि आकाश ||अ. १, ओ. १९||
धार्तराष्ट्रांस सिद्ध पाहून | रथावरी ज्याच्या शोभे हनुमान || तो पांडव धनुष्य उचलून | शस्त्रप्रहार करण्याआधी || अ. १, ओ.२०||
वाक्य असे हृषीकेशाला | हे राजा बोलला ||
अर्जुन म्हणाला
'हे अच्युता, आण रथ आपला || दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी || अ.१, ओ.२१II
मला आहे निरीक्षण करायचे | युद्धासाठी इच्छुकांचे || कुणाविरुद्ध मला लढायचे | या रणसंग्रामात || अ.१ ओ. २२||
मला आहे अवलोकन करायचे | युद्धास एकत्र आलेल्यांचे || धार्तराष्ट्राच्या दुर्बुद्धीचे I प्रिय इच्छिणाऱ्यांचे || अ. १, ओ. २३ ||
असे सांगता त्या क्षणास | गुडाकेशाने हृषीकेशास || हृषीकेशाने आणून त्या उत्तम रथास || हे भारता, दोन्ही सैन्यांमध्ये- || अ. १ ओ २४ ||
-सर्व राजांच्या, | समोर भीष्मद्रोणांच्या ||
श्रीभगवान म्हणाले
'समोर जमलेल्या या | कुरूंना पहा पार्था’ || अ. १, ओ. २५ ||
तेथे पार्थाने पाहिले | काका आणि आजोबा आपले || आचार्य, मामा, भाऊ उभे ठाकले | मुलां-नातवंडां-मित्रांसह || अ. १ ओ. २६ ||
सुहृद आणि श्वशुर | दोन्ही सैन्यांत समोर || बंधू सारे युद्धास तयार | पाहून तो कौंतेय || अ. १, ओ. २७II
होऊन फार करुणा-ग्रस्त | बोलला होऊन दु:खित ||
अर्जुन म्हणाला,
‘पाहून हे उपस्थित | युद्धासाठी स्वजन || अ.१, ओ. २८||
अवयव जातात गळून | तोंडास कोरड पडून || कापरे भरून | काटा येतो अंगावर || अ. १, ओ. २९||
गांडीव धनुष्य हातातून गळते | त्वचा सारी जळते || उभे न मला राहवते | भटकते माझे मन ||अ. १, ओ. ३० ||
लक्षणे सारी निश्चित | केशवा, विपरीत दिसतात || न दिसे काही हित | स्वजनांस युद्धात मारूनीया || अ.१, श्लो. ३१||
नको मला विजय | नकोत सुखे, नको राज्य || गोविंदा, कामाचे ते काय | राज्य किंवा जीवन || अ.१, ओ.३२||
ज्यांच्यासाठी इच्छा करायची | राज्य, भोग आणि सुखांची || त्यांची तयारी युद्धाची | प्राण आणि धन सोडून || अ.१, ओ.३३||
आचार्य, पुत्र, पितर | पितामह बरोबर || मामा, नातवंडे, श्वशुर | मेहुणे आणि इतर नातलग || अ. १, ओ. ३४ ||
मी न इच्छितो यांस मारण्याला | मधुसूदना, जरी गेलो मारला || किंवा दिले जरी त्रैलोक्याचे राज्य मला | काय कथा पृथ्वीची || अ.१, ओ. ३५ ||
मारून धार्तराष्ट्रांस | जनार्दना, सुख काय आम्हास || पापच येईल आश्रयास | या आततायांस मारिता || अ.१, ओ.३६ ||
न योग्य मारणे आम्ही त्यांना | स्वबांधवांना - धार्तराष्ट्रांना || कसे मारून स्वजनांना | व्हावे सुखी माधवा || अ. १, ओ. ३७ ||
लोभामुळे झाला यांचा | नाश बुद्धीचा || दिसे न दोष कुळक्षयाचा | आणि पाप मित्रद्रोहाचे || अ.१, ओ.३८||
मला न येई उमगून | कसे निवृत्त व्हावे या पापातून || स्पष्ट दिसत असून | कुलक्षयाचा दोष जनार्दना || अ.१, ओ. ३९||
नाश होता कुळाचा | -हास होतो सनातन कुळधर्माचा || बसे पगडा अधर्माचा | कुळावरी साऱ्या || अ.१, ओ. ४०||
कृष्णा, अधर्म माजता | कुलस्त्रिया जाती अध:पाता || वार्ष्णेया, स्त्रिया दूषित होता | वर्णसंकर होतसे ||अ.१, ओ.४१||
कुलनाशकांच्या कुळात संकर घडतो | तो नरकास कारण होतो ||पितरांचेही पतन घडवतो I पिंडोदकक्रियांचा लोप होता ||अ.१, ओ.४२||
वर्णसंकरकारक या | दोषांनी कुलनाशकांच्या || जाती लया | शाश्वत जातिधर्म, कुलधर्म || अ.१, ओ. ४३||
कुलधर्म लयास गेलेल्या | जनार्दना, अशा मनुष्यां || नरकात लागे राहावया | असे आम्ही ऐकतो || अ.१, ओ. ४४ ||
अरेरे, केवढ्या पापास | तयार झालो करावयास || मिळवण्या राज्यसुखास | उठलो स्वजन मारण्या || अ.१, ओ.४५||
मी न करताही प्रतीकार | हाती न धरताही हत्यार || धार्तराष्ट्र करतील माझा संहार | परवडेल ते मला’ ||अ.१, ओ. ४६||
अर्जुन असे रणात बोलून | गेला रथात बसून || धनुष्यबाण टाकून | शोकाकुल मनाने ||अ.१, ओ.४७||
अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'अर्जुनविषादयोग' नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved