Wednesday, August 6, 2025

आपली पृथ्वी आणि आपण


आपण अलिकडे हवामानातील बदल, पर्यावरणाचे रक्षण वगैरे विषयांबद्दल बरेच वाचतो आणि ऐकतो. पर्यावरणाचे रक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करणे अतिशय गरजेचे आहे. परंतु हे मुलांना कसे समजावून सांगणार, असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

मग येथे श्री. पारितोष तिरोडकर तुमच्या मदतीला आले आहेत त्यांचे नवीन पुस्तक घेऊन. त्याचे नाव आहे The world is melting-how to talk to kids about climate change. काय सांगतात लेखक, चला आपण पाहू या.

१. तुमच्या मुलाला (किंवा मुलीला) हवामानातील बदलाबद्दल काय वाटते?

तुमचा मुलगा सर्व गोष्टींचे निरीक्षण करीत असतो.  हवामानातील बदल त्याच्या लक्षात येतात आणि तो प्रश्न विचारतो, 'अलिकडे एवढे गरम का होते? अजून पाऊस कसा आला नाही ?' 

२. सोप्या शब्दांत हवामान बदलाचे स्पष्टीकरण द्या

तुमचा मुलगा प्रश्न विचारतो आहे, याचा अर्थ तो या विषयावर विचार करतो आहे.

तेव्हा सर्वांत प्रथम मुलाचा  प्रश्न नीट ऐकून घ्या. म्हणजे त्याला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल.

मुलाला हवामान बदलाचे संपूर्ण विज्ञान माहित असणे आवश्यक नाही.तुमच्या मुलाचे वय असेल त्याप्रमाणे मुलाला स्पष्टीकरण द्या. 

मुलाचे वय जर ३-६ वर्षे असेल तर त्याला छानदार गोष्टीमधून स्पष्ट करा.  

मुलाचे वय ७-१० वर्षे असेल तर त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याला हवामान बदल कशामुळे होतो आहे, ते स्पष्ट करून सांगा. 

११-१४ वर्षे वयाच्या मुलाला या विषयावर अधिक खोलात जाऊन हवामान बदलाचा सर्व जगावर काय परिणाम होतो आहे ते तुम्हाला सांगता येईल. 

हवामान बदल हे संकट म्हणून नव्हे तर काळजीचे कारण म्हणून स्पष्ट करा. तुमचे उत्तर परिपूर्ण असणे आवश्यक नाही.  जास्त स्पष्टीकरण देऊ नका किंवा भयानक आकडेवारी देऊ नका.

मुलाला उगीच घाबरवून सोडू नका. ' आता आपले काही खरे नाही,' अशा स्वरूपाचे उत्तर टाळा. 'या परिस्थितीतून मार्ग काढण्यास पुष्कळ लोक काम करीत आहेत. आपल्यालासुद्धा काम करता येईल,' असे सांगा.

मुलगा अधिक प्रश्न विचारीत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या.

आता मुलगा आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय करता येईल असे विचारत असेल तर त्याला तुम्ही साधे सोपे उपाय सुचवू शकता.

३. पर्यावरणपूरक सवयी  

घरात चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे कारण मुले जे पाहतात त्यांचे ते अनुकरण करतात. साध्या सवयी म्हणजे ब्रश करताना नळ बंद करणे, खोलीतून बाहेर पडताना लाईट बंद करणे. 

मुलाला आणखी मोठेपणा दिलात की जसे, ' तू आजपासून लाइट चेकर, तू वॉटर मॅनेजर', तर तो आणखी प्रोत्साहित होईल. तुम्ही घरी काही उपक्रम राबवू शकता, जसे, इको संडे किंवा पर्यावरणस्नेही रविवार, कचरामुक्त मंगळवार. यामुळे घरात पर्यावरणस्नेही वातावरण तयार होईल. 

आपल्याकडे होळी, गणेशोत्सव, दिवाळी असे अनेक सण आहेत. अशा सणाच्या प्रसंगी  पर्यावरणपूरक रंग, गणेशमूर्ती इत्यादींचा वापर करा. 

अन्नाचा अपव्यय कमी करा, कंपोस्ट बिन सुरू करा, दिवे, पंखे आणि वापरात नसलेली उपकरणे बंद करा.

मुलाच्या  आवडीनिवडी पाहून नेचर जर्नलिंग, इमोशन कार्ड अशा गोष्टी मुलाला शिकवू शकता.  

उपदेश करणे, त्रास देणे किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करणे या सर्वांमुळे क्वचितच बदल घडून येतो. याऐवजी तुमचे वर्तन तुम्ही आदर्श ठेवा. म्हणून जेव्हा मुले  तुमचा मुलगा तुम्हाला जुन्या पिशव्या पुन्हा वापरताना,  स्थानिक वनस्पती-आधारित अन्न निवडताना पाहील,  तेव्हा तो तुम्हाला आदर्श मानून  तुमच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करील. 

४. निसर्ग आणि प्राण्यांचा आदर  

जेव्हा  तुमचा मुलगा फूल न तोडता केवळ निरीक्षणात आनंद मानतो किंवा  भटक्या प्राण्याला न घाबरता मदत करतो, तेव्हा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या.   

५. मोठ्या समस्या

प्रदूषण, जंगलतोड यांसारख्या समस्या अधिक मोठ्या आहेत.  त्यामुळे मुलाने त्याविषयी प्रश्न विचारल्यास तुमचे स्पष्टीकरण सोपे ठेवा. यावरसुद्धा उपाय आहे हे त्यांना पटवून द्या.  

६. व्यस्त, डिजिटल जगातही मुलाला पर्यावरणावर  विश्वास ठेवण्यास शिकवा 

आजच्या जलद, गोंगाटाच्या, निरनिराळ्या स्क्रीन्सनी व्यापलेल्या जगात मुलाला पर्यावरणावर विश्वास ठेवणे कसे शक्य आहे? तर मग असे करा या डिजिटल माध्यमांचाच उपयोग पर्यावरणाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी करा.  उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही कारमध्ये असता तेव्हा तुम्ही पर्यावरणाविषयी पॉडकास्ट ऐकू शकता किंवा पर्यावरणाविषयी गप्पा मारू शकता. तुम्ही पर्यावरण या विषयावरील डॉक्युमेंटरीज पाहू शकता, गेम्स खेळू शकता.

७. कथा, चित्रपट या माध्यमांचा, त्यांतील नायकांचा उपयोग करा  

मुलांना हीरो वर्शिप आवडते. ते स्वत:ला एखाद्या हीरोच्या ठिकाणी मानून जगत असतात.‌आता कॉमिक्समधून, चित्रपटांतून असे बरेच क्लायमेट हीरोज किंवा वॉरियर्स लोकप्रिय करण्यात आले आहेत. पर्यावरण या विषयावर बरेच चित्रपट आहेत. तेव्हा मुलांना असे साहित्य वाचण्यास द्या किंवा असे चित्रपट पहा.

८. शाळा, मित्र, अशा समूहाचे महत्त्व 

तुमच्या मुलाचे जग घरीच थांबत नाही. ते शाळेच्या हॉलवे, खेळाचे मैदान, वाढदिवसाच्या पार्ट्या आणि व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये पसरते. शाळांमध्ये तुम्ही हरित प्रकल्पांना प्रोत्साहन देऊ शकता. पर्यावरणपूरक कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर मित्रांसोबत एकत्र येऊ शकता. वाढदिवसाच्या पार्ट्या अशा ठेवा की त्यातून कमीत कमी कचरा तयार होईल. 

९. माझा मुलगा ऐकत नाही , मी काय करू?
तुम्हाला असे वाटत असेल की माझा मुलगा ऐकत नाही, तर भावनिक दृष्ट्या त्याच्याशी अधिक संबंध प्रस्थापित करणे तुम्हाला जरुरीचे आहे. तुम्ही मुलासाठी अधिक वेळ द्या. तो ज्या गोष्टी करतो आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करा, म्हणजे अधिक करण्याविषयी तो प्रोत्साहित होईल.

१०. हवामान आशावाद:

हवामान आशावाद हा असा विश्वास आहे की गोष्टी गंभीर असल्या तरी, लोक फरक करू शकतात आणि करत आहेत. मुलांना ते देखील फरक करू शकतात हे शिकवणे. म्हणून, मुलांना काय प्रभावी आहे ते अधोरेखित करा, जसे की उर्जेच्या गरजांसाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, झाडे लावण्याबद्दल जागरूकता.

११. पृथ्वीचे रक्षण:

या सर्व विवेचनावरून तुमच्या लक्षात आले असेल की पृथ्वीचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे आणि केवळ अरिष्टातून पृथ्वी वाचवणे त्यासाठी पुरेसे नाही. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी परिपूर्ण प्रयत्नाची गरज नाही. अपूर्ण प्रयत्नसुद्धा आपला परिणाम साधतोच.  तुमच्या मुलाला कळू द्या की पृथ्वीच्या रक्षणासाठी तो जे  करतो आहे,  ते खूप काही आहे. तुमचा मुलगा पृथ्वीमध्ये  फरक घडवत आहे,  पृथ्वीचे घडवत आहे - प्रेमाने आणि आशेने. पृथ्वीला आपल्याकडून एवढीच अपेक्षा  आहे.

पुस्तकाविषयी:
असे हे पुस्तक आपल्याला पर्यावरण रक्षण या विषयावर बरेच काही सांगून जाते. लेखकाचा सारा भर परिपूर्णतेचा आग्रह धरण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर आहे. पुस्तकात जागोजागी समर्पक अशी उद्धरणे (quotations) आहेत. भाषा अतिशय सोपी आणि मनाला भिडणारी आहे. पुस्तकाचा आकार सुटसुटीत असून तुम्ही केव्हा पुस्तक वाचण्यास सुरुवात करता आणि केव्हा संपवता ते कळत नाही. पुस्तकातील प्रॅक्टिकल आणि अभिनव टिप्समुळे पुस्तकाला ॲक्टिव्हिटी  किंवा वर्क बुक सारखे स्वरूप आले आहे. पुस्तक प्रेरणादायी असून संग्रहात ठेवण्यायोग्य आणि भेट देण्यायोग्य आहे. पुस्तक पालकांना तसेच शिक्षकांना मुलांना पर्यावरणविषयक मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
पृष्ठसंख्या: ९२.
पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे.

लेखकाविषयी:

                  श्री. पारितोष तिरोडकर 

या पुस्तकाचे लेखक श्री. पारितोष तिरोडकर यांनी ऑस्ट्रेलियामधून फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.  

श्री. तिरोडकर यांना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यू के आणि भारत या देशांमध्ये  फायनान्स आणि ऑडिट या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा १२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.श्री. तिरोडकर यांनी टीडी बँक, रॉयल बँक ऑफ कॅनडा, यूबीएस, ड्यूश बँक आणि मॉर्गन स्टॅनली अशा नामांकित संस्थांसोबत काम केले आहे. 

पर्यावरण हा श्री. तिरोडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

डिस्क्लेमर: 
श्री. पारितोष तिरोडकर  यांनी लिहिलेल्या ' द वर्ल्ड इज मेल्टिंग-हाऊ टू टॉक टू किड्स अबाऊट क्लायमेट चेंज'  या पुस्तकावर लिहिलेली ही ब्लॉग पोस्ट  आहे. ब्लॉगचा लेखक  पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशकाकडे आहे. पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील आशयाची चर्चा केवळ शिक्षण आणि मनोरंजनासाठी आहे. 

-Blog post by Dr Hemant Junnarkar 
Blog post © Dr Hemant Junnarkar,
All rights reserved 



श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग

श्रीभगवान म्हणाले

आहे तो एक अव्यय पिंपळ | ज्याच्या शाखा खाली आणि वर मूळ || छंद हीच ज्याची पाने पुष्कळ | त्यास जो जाणतो, तो खरा जाणता || अ.१५, ओ.१||

विषयांनी पालवलेल्या, पोसलेल्या गुणांवर | शाखा त्याच्या पसरल्या खालीवर || मुळांचा झाला खाली विस्तार | कर्मापाठी बांधलेल्या मनुष्यलोकात- || अ.१५, ओ.२||

-उपलब्ध न होई या लोकात | त्याचे रूप, त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचा आदि-अंत. || छेदून असंगशस्त्राने मजबूत | हा दृढमूल पिंपळ- || अ.१५, ओ.३||

-पोहचावे त्या पदाप्रत | जेथे गेलेले न येती परत- || -त्या आद्य पुरुषापर्यंत, | ज्यापासून पुरातन प्रवृत्ती प्रसवली. || अ.१५, ओ.४||

जे आहेत आसक्ती, अभिमान आणि मोहापासून विरक्त | झाले इच्छांतून निवृत्त, सुख-दु:खांच्या द्वंद्वातून मुक्त || असती नित्य अध्यात्मात रत | ते ज्ञानी जातात त्या पदास || अ.१५, ओ.५||

सूर्य, चंद्र व अग्नीच्या तेजात | न होई जे  प्रकाशित || जेथे जाऊन न येती परत | ते माझे परम धाम || अ.१५, ओ.६||

जीवलोकातील जीवभूत | आहे माझाच अंश शाश्वत || परी तो होतो आकर्षित | प्रकृतिस्थित मनासहित सहा इंद्रियांस || अ.१५, ओ.७ ||

जीवभूत जेव्हा शरीर मिळवतो | किंवा शरीर सोडून जातो || तेव्हा मन आणि इंद्रियांस सोबत नेतो | जसा वायू गंधांस नेतो उगमापासून || अ.१५, ओ.८||

श्रोत्र, स्पर्शेंद्रिय आणि नयन | रसना, घ्राणेंद्रिय आणि मन || यांत करून अधिष्ठान | जीवभूत विषय उपभोगतो || अ.१५, ओ.९||

हा जीवभूत दिसत नाही मूढांना | तो दिसतो ज्ञानचक्षूंना || स्थितीत असताना, उपभोग घेताना | गुणांपाठी जाताना आणि शरीर सोडून जाताना || अ. १५, ओ.१०||

योगी प्रयत्नरत | पाहती अंतरातील जीवभूत ||नाही तो दिसत | आत्म्यास न जाणणाऱ्या बुद्धिहीनांस || अ.१५, ओ.११||

जे प्रकाशित करते जगत अखिल | ते तेज आदित्यातील || तसेच चंद्र आणि अग्नीतील | तेज माझेच जाण || अ.१५, ओ. १२||

भूमीत मी शिरून | माझ्या ओजाने करतो भूतांस धारण || औषधींचे करतो पोषण | होऊन सोम रसात्मक || अ.१५, ओ.१३||

मी वैश्वानर रूपात | प्राण्यांच्या देहात आश्रित ||प्राण आणि अपानाने युक्त | पचवितो चतुर्विध अन्नास || अ.१५, ओ.१४||

मी सर्वांच्या हृदयांत करतो वास | उपजवितो स्मृती, ज्ञान, विस्मृतीस || मी योग्य, वेदांनी जाणण्यास | वेदांचा कर्ता आणि वेद जाणणारा मीच || अ.१५, ओ.१५||

दोन पुरुष या लोकांत | त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात || सारी भूते क्षर आहेत | कूटस्थ आहे अक्षर || अ.१५, ओ.१६||

उत्तम पुरुष आहे याहून | जो ओळखला जातो परमात्मा म्हणून || त्रैलोक्यात शिरून करतो पोषण | तो अव्यय ईश्वर || अ.१५, ओ.१७||

अक्षरापलीकडे माझे स्थान | मी उत्तम अक्षराहून || मी ओळखला जातो पुरुषोत्तम म्हणून | लोकांत आणि वेदांत || अ.१५, ओ.१८||

मला जाणतो जो ज्ञानी | पुरुषोत्तम म्हणुनी || तो अनन्य होउनी | मला भजतो भारता || अ. १५, ओ.१९||

असे हे शास्त्र अतिगहन | अनघा, केले तुला कथन || ते जाणून बुद्धिमान | कृतकृत्त्य होवो भारता || अ.१५, ओ.२०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘पुरुषोत्तमयोग’ नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला

                 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved