हसा आणि जगा
आज तुम्ही हसलात का? नाही? ही तुमची फार मोठी चूक आहे. कारण हसण्याचे फायदे तुम्हाला माहीत नाहीत.
आपणा सर्वांना हसणे अतिशय आवडते. परंतु हसण्यापाठीचे विज्ञान आपण जाणत नाही. ते जाणून घेणे अशासाठी आवश्यक आहे की हसण्याची सवय लावून आपण हसण्याचे फायदे जीवनात मिळवू शकतो. रॉस बेन मोशे यांचे 'द लाफ्टर इफेक्ट' हे पुस्तक ती गरज पूर्ण करते. परंतु लक्षात घ्या, हे विनोदी किस्से किंवा चुटकुल्यांचे पुस्तक नाही.
आता पुस्तकात काय आहे ते जाणून घेऊ या.
पुस्तकाची सुरुवात संक्षिप्त परिचयाने होते. यानंतर रॉस यांनी हसण्यामागील विज्ञान आणि हसण्याबाबत केलेला अभ्यास अकरा प्रकरणांमध्ये विशद केला आहे.
१. हसण्यालासुद्धा इतिहास आहे:
हसू नका. पण हसण्याला सुद्धा इतिहास आहे. प्रकरण १ मध्ये रॉस आपल्याला हसण्याचा संक्षिप्त इतिहास सांगतात. रॉस यांच्या मते हसण्याचा इतिहास खूप पुरातन आहे. बायबलसारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये धर्मासारखा गंभीर विषय असूनसुद्धा अधून मधून खुसखुशीत अभिप्राय आढळतात. प्राचीन इजिप्तचे फॅरो राजे आणि राण्या मनोरंजनासाठी पदरी विदूषक ठेवत असत, असे रॉस सांगतात.
२. हसलात तर जीवन फुलेल:
प्रकरण २ मध्ये रॉस स्पष्ट करतात की हसण्याचा हेतू केवळ जीवनात टिकाव धरणे हा नाही तर जीवन पुढे नेणे, फुलवणे आणि पोषित करणे हा आहे. आपण सारे जाणतो की लहान मुले अधिक हसतात आणि मोठे लोक कमी हसतात. आपणास, वयस्क लोकांना निरनिराळ्या प्रसंगांमध्ये हसण्यासाठी अधिकाधिक संधी शोधल्या पाहिजेत. रॉसच्या म्हणण्याप्रमाणे एखादा रोग ज्याप्रमाणे संसर्गाने पसरतो, त्याचप्रमाणे हसणेसुद्धा संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरते.
३. हसणे-सर्व रोगांवरील औषध:
प्रकरण ३ मध्ये रॉस आपल्याला सांगतात की हसणे हे सर्व रोगांवरील सर्वोत्तम औषध आहे. कारण हसणे सर्व प्रकारचा तणाव दूर करण्याचे काम करते. ते आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर चांगला परिणाम करते.
४. योग-आणि तोसुद्धा हसण्याचा
हसण्याविषयी एवढी सारी माहिती मिळाल्यानंतर रॉस आपल्याला एका नव्या संकल्पनेविषयी सांगतात, जिचं नाव आहे 'हास्य योग.' उघड आहे की या संकल्पनेचा जन्म पूर्वेकडे झाला आहे. हास्य योगामध्ये जाणून बुजून हास्य उत्पन्न करण्याच्या पद्धती अंमलात आणल्या जातात. एका संरचित सूत्राच्या माध्यमातून हसणे उत्तेजित केले जाते. यामध्ये टाळ्या वाजवणे आणि दीर्घ श्वास घेणे यांसारख्या तंत्रांचा वापर केला जातो. कृत्रिम हसणेसुद्धा नैसर्गिक हसण्याएवढे लाभदायक होऊ शकते. यातून या विचारास पुष्टी मिळते की हसणे, नैसर्गिक असो की कृत्रिम, आपल्यावर कल्याणकारी सकारात्मक प्रभाव पाडते.हास्य योग, शरीर, मन आणि आत्मा यांसाठी स्वास्थ्यकारक आहे. आपण जेव्हा कठीण परिस्थितीचा सामना करीत असतो, त्या वेळी याचा विशेष उपयोग होतो. रॉस सांगतात की वृद्धापकाळ सर्वांसाठी कठीण असतो, पण हसणे त्याची कठोरता कमी करण्यास मदत करते.
६. हसणे-आपला सिक्स्थ सेन्स
प्रकरण ५ मध्ये रॉस हसण्याविषयी आणखी एक अभिनव संकल्पना प्रस्तुत करतात. आपण जाणतो की आपली पाच ज्ञानेंद्रिये आणि त्यांच्याशी संबंधित अशा पाच संवेदना आहेत. परंतु रॉस मानतात की हसणे हे सहावे ज्ञानेंद्रिय आणि सहावी संवेदना आहे. हसणे हा एक गुंतागुंतीचा व्यवहार आहे, ज्यामध्ये संज्ञानात्मक आणि भावनात्मक प्रतिक्रियांचा समावेश होतो. जेव्हा एखाद्या उत्तेजनेची हसण्याच्या स्वरूपात जाणीव होते, तेव्हा ती एक सचेतन किंवा अचेतन प्रतिक्रिया सुरू करते. तिचा परिणाम म्हणून शारीरिक, संज्ञानात्मक आणि भावनात्मक प्रतिक्रिया होते, जिला आपण हसणे म्हणतो. अशा प्रकारे हसण्याची क्रिया सहज आहे आणि म्हणून आपण हसण्याला सहावी संवेदना म्हणू शकतो.
६. कसे वाढवावे हसणे
प्रकरण ६ मध्ये हसणे वाढवण्यासाठी किंवा उत्पन्न करण्यासाठी काय करता येईल याविषयी रॉस चर्चा करतात. यासाठी वर्ड प्ले किंवा शाब्दिक खेळ, बोर्ड गेम्स, ऑनलाइन गेम्स, चुटके, मजेशीर गोष्टी, शारीरिक खेळ इत्यादींची शिफारस रॉस करतात. रॉस सूचना करतात की आपण आपल्या काम करण्याच्या जागेचे एका खेळाच्या जागेमध्ये रूपांतर करू शकतो. रॉस स्पष्ट करतात की हसण्याच्या प्रभावामुळे शुष्क विषय सुद्धा मनोरंजक करता येतात.
७. हसा आणि तुमच्याबरोबर जग हसेल
आपण हे वचन नेहमी ऐकत आलो आहोत की 'हसा आणि सर्व जग तुमच्याबरोबर हसेल'. प्रकरण ७ मध्ये रॉस या वचनाचा पुनरुच्चार करतात. रॉसच्या मते हसणे केवळ आपल्या वैयक्तिक जीवनापुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या कामकाजाच्या वातावरणामध्येही झिरपते आणि आपल्या बोलण्याचालण्यावरही प्रभाव पाडते. एका हसतमुख मनुष्यास सर्वांकडून अधिक पसंती दिली जाते, इतकेच नव्हे तर असा मनुष्य अधिक विनम्र आणि अधिक प्रतिस्पर्धी आढळून येतो.
८.आभार माना
प्रकरण ८ मध्ये रॉस आभार मानण्याचे महत्त्व स्पष्ट करतात. त्या सांगतात की आभारप्रदर्शन हा केवळ उपचार असू नये तर प्रसन्नतापूर्ण असले पाहिजे. आभारप्रदर्शनाचा सकारात्मक परिणाम होतो आणि काळ्या ढगास असणाऱ्या रुपेरी कडेप्रमाणे आभारप्रदर्शनामुळे आपल्या विचारप्रक्रियेस मदत मिळते. आभारपत्रिका पाठवून, आभार व्यक्त करणारे पत्र किंवा संदेश पाठवून किंवा इतर प्रकारे आपण आभार व्यक्त करू शकतो.
९. करुणा करा-स्वत:वर
जीवनात स्वतःबद्दल सहवेदना किंवा आत्मकरुणा असणे फार महत्त्वाचे आहे. प्रकरण ९ मध्ये रॉस सांगतात की स्मितयुक्त आत्मकरुणेचे आरोग्यासाठी अनेक लाभ आहेत. सकारात्मकता, आशावाद, यांमुळे आनंदाची उच्च पातळी तर चिंता आणि काळजी यांची निम्न पातळी साधण्यास मदत होते.
बऱ्याच लोकांना दैनंदिनी लिहिण्याची सवय असते. प्रकरण १० मध्ये रॉस शिफारस करतात की ही सवय आनंदपूर्ण जर्नलिंगमध्ये बदलली जावी. रॉस असे मानतात की आनंदपूर्ण जर्नलिंग केवळ दैनंदिनी लिहिण्यापेक्षा वेगळे आहे. आनंदपूर्ण जर्नलिंगमध्ये हसण्याच्या प्रभावास लेखी शब्दांमध्ये ग्रथित केले जाते. यामुळे हसणे आणि हलकेफुलकेपणाच्या तांत्रिक मार्गांस मजबूत करण्याचे हे आणखी एक साधन आहे.
११. अखेरचे हसणे
११व्या प्रकरणात रॉस अखेरच्या हसण्याबद्दल बोलतात. रॉस सांगतात की हसण्याच्या प्रभावामुळे जगातील सर्व दुष्प्रवृत्तींवर विजय तर मिळवता येणार नाही, पण तो त्यास प्रेमाच्या अधिक जवळ नेईल आणि अधिक व्यापक समुदायामध्ये पसरेल.
पुस्तक पूर्ण झाल्यावर रॉस हसण्याच्या प्रभावास व्यवहारात आणण्यासाठी काही सूचना देतात. यांमध्ये काही पद्धती आणि तंत्रांचा समावेश आहे. यात मौजमस्ती करण्यास आणि एकत्र हसण्यास काही संधी निर्माण करण्याचा समावेश आहे. झोपते वेळी मजेदार कथा रचणे आणि आपल्या मुलांना त्यात सहभागी होण्यास सांगणे यांचा त्यांमध्ये समावेश आहे.
समीक्षा:
आपल्या मुद्द्यांच्या पुष्टीकरणासाठी रॉस यांनी ठिकठिकाणी केस स्टडीजचा समावेश केला आहे. पान ९१ वर एक उदाहरण दिले आहे ज्यामध्ये एका नाझी छळछावणीमध्ये कैद केलेल्या ज्यू कैद्यांनी आत्यंतिक छळ सहन करताना सुद्धा हसत राहून छळकर्त्यांना छळाचे आसुरी समाधान मिळू दिले नाही आणि अशा प्रकारे हसण्याच्या माध्यमातून छळकर्त्यांना पराभूत केले. हसण्याच्या माध्यमातून अत्याचारावरही विजय मिळवता येतो, हे या उदाहरणातून दिसून येते.
शब्दसंग्रह आणि संसाधनांसारख्या परिशिष्टांवरून पुस्तक लिहिण्यासाठी रॉस यांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते.
हसण्याचे विभिन्न पैलू जाणून घेण्यासाठी आणि आपले जीवन अधिक आनंदपूर्ण करण्यासाठी हे पुस्तक वाचण्यायोग्य आणि आपल्या संग्रहात ठेवण्यासारखे आहे.
पुस्तकाविषयी:
पुस्तकाचे नाव: The laughter effect-how to build joy, resilience and positivity in your lifeहे पुस्तक रॉस बेन-मोशे यांनी लिहिले असून नीरो प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
लेखिका-परिचय
लेखिका रॉस या स्वास्थ्य विशेषज्ञ आहेत.त्या अकादमीय शोधकर्त्या असून हसण्यामागील सकारात्मकता आणि त्यातून जीवनास येणारी लवचिकता ह्यातील त्या विशेषज्ञ आहेत.लेखिकेला एका मोठ्या शस्त्रक्रियेतून जावे लागले होते. त्या वेळी हसण्याच्या हितकारी परिणामामुळे तिला ठीक होण्यास मदत झाली.
डिस्क्लेमर:
'द लाफ्टर इफेक्ट - हाउ टू बिल्ड जॉय, रेझिलिअन्स ॲन्ड पॉझिटिव्हिटी इन युवर लाइफ' या पुस्तकाची ही संक्षिप्त समीक्षा आहे . हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे किंवा नाही याविषयी मला माहिती नाही.
ही केवळ समीक्षा आहे. समीक्षक पुस्तकावर कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करीत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशक यांच्याकडे आहेत. या समीक्षेतील पुस्तकाचे उल्लेख आणि पुस्तकातील विषयांची चर्चा, केवळ ज्ञान आणि मनोरंजन यांसाठी आहे.
Review by Dr Hemant Junnarkar
Dr Hemant Junnarkar © All rights reserved