Monday, August 4, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १३-क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

अर्जुन म्हणाला

काय आहे पुरुष आणि प्रकृती | क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ कोणास म्हणती || ज्ञान आणि ज्ञेयात फरक कसा करती | केशवा, हे जाणू इच्छितो || अ.१३, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

क्षेत्र म्हणती या शरीरास I आणि जो जाणतो क्षेत्रास II विद्वान त्यास I क्षेत्रज्ञ म्हणती कौंतेया II अ. १३, ओ.२II

क्षेत्रांचा संपूर्ण | मी क्षेत्रज्ञ आहे जाण || क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान | खरे ज्ञान भारता || अ.१३, ओ.३||

क्षेत्र, जे आणि जसे असते | ज्यातून जसे बदलते || तो कोण ज्याच्यामुळे प्रभावित होते | ते थोडक्यात सांगतो || अ.१३, ओ.४||

हे ज्ञान निरनिराळ्या छंदांतून | ब्रह्मसूत्रपदांतून ||निश्चित कार्यकारणभावांतून | विविध ऋषींनी गाइले || अ.१३, ओ.५||

पंचमहाभूते आणि अहंकाराचा | बुद्धी आणि अव्यक्ताचा || अकरा इंद्रियांचा | आणि पाच इंद्रियविषयांचा- || अ.१३, ओ.६||

-इच्छा आणि द्वेषाचा I सुख आणि दु:खाचा II चेतना आणि धैर्याचा I समावेश क्षेत्रात II अ. १३, ओ. ७ II

विनम्रता आणि अदांभिकतेचा | अहिंसा, सहनशीलता आणि सरळपणाचा || आचार्यांची उपासना आणि शुद्धतेचा | स्थैर्य आणि आत्मनिग्रहाचा- || अ.१३, ओ.८||

-इंद्रियविषयांच्या त्यागाचा | वैराग्य आणि निरहंकाराचा || दु:खदोष जाणण्याचा | जन्म, मृत्यू, वृद्धता आणि व्याधी हाच- || अ.१३, ओ.९||

-पुत्र, पत्नी, घर इत्यादीविषयी अनासक्तीचा | आणि असंगाचा || सदैव समचित्त असण्याचा | इष्ट आणि अनिष्टाविषयी- || अ.१३, ओ.१०||

-माझ्यावर अनन्यभावाचा | आणि अढळ भक्तीचा || एकांत ठिकाणी राहण्याचा | सामान्य जनांत रुची नसण्याचा- || अ. १३, ओ.११||

-अध्यात्मज्ञान शाश्वत मानण्याचा | तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा || न इतर कशाचा | समावेश खऱ्या ज्ञानात || अ.१३, ओ.१२||

सांगतो आता ज्ञेय काय ते | ज्याच्या ज्ञानाने अमृतप्राप्ती होते || न सत् न असत् बोलले जाते | ते अनादि श्रेष्ठ ब्रह्म || अ.१३, ओ.१३||

हात, पाय आणि नेत्र | शिरे, मुखे आणि श्रोत्र ||आहेत त्यास सर्वत्र | सर्वांस व्यापून आहे ते || अ.१३, ओ.१४||

त्यात होई सर्व गुणांचा भास | जरी नाहीत इंद्रिये त्यास || अनासक्त ते पोसते सर्वांस | निर्गुण असून गुणांस भोगते || अ.१३, ओ. १५||

ते वसते भूतांच्या आत आणि बाहेर | आहे चर आणि अचर || सूक्ष्म असल्याने जाणण्यास दुस्तर | आहे जवळही आणि दूरही || अ.१३, ओ. १६||

भूतांत अविभक्तपणे असते | जरी जीवांत विभक्त भासते || जरी भूतांस पोसते | तरी त्यांस ग्रासते आणि पुन्हा निर्मिते || अ.१३, ओ.१७||

ते तेज तेजांमधील | आहे अंधाराच्या पैल || ज्ञान, ज्ञेय, ज्ञानगम्य, अखिल- | -जीवांच्या हृदयात वसते || अ.१३, ओ.१८||

असे मी तुला थोडक्यात केले कथन | काय क्षेत्र, काय ज्ञेय, काय ज्ञान || माझा भक्त हे जाणून | माझ्या भावास पोहचतो || अ.१३, ओ.१९||

पुरुष आणि प्रकृती | दोन्ही अनादि असती ||विकार आणि गुण उद्भवती | प्रकृतीपासून || अ.१३, ओ.२०||

कार्य आणि कारण | उद्भवतात प्रकृतीपासून ||पुरुष करतो निर्माण | सुख-दु:खाचा भोग || अ.१३, ओ.२१||

प्रकृतीत करून वास | पुरुष भोगतो प्रकृतीच्या गुणांस || आणि पावतो सत्-असत् योनीस | गुणसंगाकारणे || अ.१३, ओ.२२||

या देहात श्रेष्ठ पुरुष राहतो | तो महान ईश्वर आहे, परमात्मा म्हटला जातो || जो जवळून पाहतो, अनुमती देतो | करतो पोषण, घेतो भोग || अ.१३, ओ.२३||

ज्यास आहे ज्ञात | पुरुष आणि प्रकृती, त्यांच्या गुणांसहित || तो सर्वथा राहूनही कार्यान्वित | पुन्हा जन्मास न येतो || अ.१३, ओ.२४||

कुणी पाहती ध्यानाने | कुणी पाहती सांख्य-योगाने || इतर पाहती कर्म-योगाने | आत्म्याने आत्म्यास आत्म्यात || अ.१३, ओ.२५||

काही जाणते नसून | उपासना करती इतरांचे ऐकून || तेही मृत्यूस जाती ओलांडून | श्रुतिपरायण || अ.१३, ओ.२६||

स्थावर-जंगम होते निर्माण | क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगातून || हे घे जाणून | भरतर्षभा || अ.१३, ओ.२७||

सर्व विनाशी भूतांस समान | अविनाशी परमेश्वर आहे व्यापून || ज्यास येते असे दिसून | त्यास खरे दिसते || अ.१३, ओ.२८||

जो पाहतो त्या परमेश्वरास | समत्वाने व्यापणाऱ्या सर्वांस || तो न जाई अधोगतीस | परम गतीस पावतो || अ.१३, ओ.२९||

प्रकृती करविते कर्मांस | ही जाण आहे ज्यास ||तो जाणतो अकर्त्या आत्म्यास | यथार्थपणे || अ.१३, ओ.३०||

जेव्हा भूतांत भिन्न | येई एकच आत्मा दिसून ||त्याचाच हा विस्तार, हे होई ज्ञान | तेव्हा ब्रह्म प्राप्त होते || अ.१३, ओ.३१||

परमात्मा अनादि आणि निर्गुण | असल्याने अव्यय जाण || कौंतेया, तो शरीरात राहून | न काही करतो, न कशात गुंततो || अ.१३, ओ.३२||

अलिप्त राहतो, जसे राहून सर्वांत | सूक्ष्म असल्याने आकाश न होते लिप्त || तसा सर्वत्र राहून देहात | आत्मा अलिप्त राहतो || अ.१३, ओ.३३||

रवी एकच आकाशात | उजळतो सारे जगत ||तसा क्षेत्री प्रकाशित | क्षेत्रास करतो भारता || अ. १३, ओ.३४||

जे ज्ञानचक्षूंनी जाणती | क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची भिन्न स्थिती || ते भूत आणि प्रकृतीपासून मोक्ष जाणती | जाती परम गतीस || अ.१३, ओ.३५||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग’ नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला

              || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved