श्रीराम म्हणाला
हे भगवन् , तुझी कांती स्फटिकासमान | तुझे तीन नयन | शिरावर करसी चंद्र धारण | पुरुषरूपात तू- || अ.६, ओ.१||
-अंबा आणि प्रमथगणांसोबत | रमतोस सुखात. | | स्वतः बद्ध असताना अशा मूर्त रूपात | कसा म्हणू शकतोस -|| अ.६, ओ.२||
-की पंचभूतांस आणि सर्व जगास | निर्माण तू केलेस? | हे गिरिजाकांता, तूच निरसन करू शकतोस | माझ्या या शंकेचे. || अ.६, ओ.३ ||
श्रीभगवान म्हणाले-
चांगला केलास प्रश्न | हे सुव्रता, तुझ्या भक्तीनें व ब्रह्मचर्याने प्रसन्न होऊन | जें देवांना समजण्यास कठिण | ते तुला देतो ज्ञान- || अ.६, ओ.४ ||
-त्यायोगे करशील पार | सहजतेने संसारसागर. | पंचभूते जी दृष्टिगोचर | आणि चौदा लोक, || अ.६, ओ.५||
-समुद्र, नद्या, देव | ऋषी आणि दानव |
अचल वस्तू आणि चल जीव | जे दृष्टीस पडतात || अ.६, ओ. ६ ||
प्रमथ, नाग आणि गंधर्व | या माझ्या विभूती सर्व. |
एकदा ब्रह्मादी देव | माझे स्वरूप पाहण्याच्या इच्छेने- || अ.६, ओ.७ ||
-आले माझ्या प्रिय मंदरपर्वतावर | आणि जोडून कर | स्तुती करून माझ्यासमोर | उभे राहिले. || अ.६, ओ. ८ ||
तेव्हा माझी लीला दाखवून | मी केले अपहरण | सकल ज्ञान | ब्रह्मादी देवांचे. || अ.६, ओ. ९||
ते ज्ञानहीन होऊन | विचारती मला, 'आपण कोण?'| 'मीच देव पुरातन' | मी उत्तर दिले, || अ. ६, ओ. १० ||
'हे सुरेश्वर हो, होतो पूर्वी मी | आता आहे मी | पुढे असेन मी | माझ्यावाचून काही नसे जगी || अ.६, ओ.११||
हे सुरेश्वर हो, मी नाही ज्यात | अशी वस्तू नाही जगात | मी शाश्वत, अशाश्वत, पापरहित | ब्रह्मदेवाचाही स्वामी || अ.६, ओ.१२ ||
दक्षिणेकडे, उत्तरेकडे | पूर्वेकडे व पश्चिमेकडे | खालीं, वर, आग्नेयादी उपदिशांकडे | आहे मी सुरेश्वर हो || अ. ६, ओ. १३ ||
सावित्री अन् गायत्री मी | पुरुष, नपुंसक आणि स्त्री मी | त्रिष्टुप्, जगती, अनुष्टुप्, पंक्ति, छंद मी | तीन वेदसुद्धा मीच आहे || अ.६, ओ.१४ ||
सत्य, सर्वगामी ,शांत मी | त्रेताग्नि, गौरी (=पार्वती), गुरु मी | गौरी (=शक्ती), गह्वर(=गूढस्थान) मी | मीच स्वर्ग, मीच जग व्यापणारा || अ.६, ओ.१५ ||
मी ज्येष्ठ, श्रेष्ठ सर्व देवांत | मी पाण्याचा अधिपती, वरिष्ठ सर्वांत | मी आर्य, ईश, भगवंत | मी तेज, आदि (=आरंभ) सर्वांचा || अ.६, ओ.१६ ||
मी ऋग्वेद, यजुर्वेद | मी स्वयंभू, मी सामवेद | मी मंत्र , मी अथर्ववेद | अंगिरसांमध्ये श्रेष्ठ मी || अ. ६, ओ. १७ ||
पुराणे मी , इतिहास मी | कल्पसूत्रे मी, कल्पसूत्रांचा जाणता मी | नाराशंसी मी, गाथा मी | मी विद्या, मी उपनिषदे || अ. ६, ओ. १८ ||
श्लोक आणि सूत्रे मी | व्याख्याने आणि अनुव्याख्याने मी | परविद्या (=अध्यात्मविद्या) मी | मी इष्ट हवन आणि आहुती || अ.६, ओ.१९ ||
दत्त (=दिलेले) आणि अदत्त (=न दिलेले) यांनी व्यापलेला हा लोक मी | परलोक मी, अक्षर मी | दांति मी, शांति मी | भूते सारी क्षर (=नाशवंत) असती || अ.६, श्लो.२० ||
सर्व वेदांचे गुह्य जे आरण्यक ते मी | जन्मरहित मी | पुष्कर, पवित्र, मध्य मी | मी सर्वांच्या पुढे || अ. ६, ओ. २१ ||
बाहेर मी, आत मी | पुढे मी, अव्यय मी | तेज मी, अंधार मी | इंद्रिये मी, मी त्यांच्या पाच मात्रा (=इंद्रियांचे विषय) || अ.६, ओ.२२||
बुद्धी मी, अहंकार मी | विषयसुद्धा मी | ब्रह्मा, विष्णू, महेश मी | मी उमा, स्कंद आणि विनायक || अ.६, ओ. २३||
इंद्र मी, अग्नी मी, यम मी | निर्ऋती, वरुण, अनिल (=वारा) मी | कुबेर मी, ईशान मी | मी भू, भुव, स्व, मह, जन || अ.६, ओ.२४ ||
तप मी, सत्य मी, पृथ्वी मी | आप (=पाणी) मी, तेज मी, अनिल मी | आकाश मी, रवी मी, सोम मी | मी नक्षत्रे आणि ग्रह || अ.६, ओ.२५||
प्राण मी, काल मी | मृत्यू मी, अमृत मी, भूत (=जीव) सुद्धा मी | वर्तमान मी, भविष्य मी | सर्व विश्व मी, मी सर्वात्मक || अ.६, ओ.२६ ||
गायत्री मंत्रातील आरंभीचा ॐ मी | मधील 'भूर्भुव: स्व:' मी | नेहमी जपले जाणारे गायत्रीशीर्ष मी | असा मी विश्वरूप आहे || अ.६, ओ.२७ ||
भक्षण केलेले मी प्राशन केलेले मी | केलेले कर्म मी, न केलेले कर्म मी | पर मी , अपर मी | मी सर्वपरायण आहे || अ. ६, ओ. २८ ||
जगाचे दिव्य हित मी | अक्षर मी, सूक्ष्म मी, अव्यय मी | प्रजापती आणि सोम ज्यांचे पावित्र्य ते मी | मी अग्राह्य आणि सर्वांचा आरंभ || अ. ६, ओ. २९ ||
जगाचा संहारकर्ता मी | सर्व जगास गिळणारा मी, तेजाचा निधी (=साठा) मी | सर्वांच्या हृदयात मी | देवतारूपाने आणि प्राणरूपाने प्रतिष्ठित || अ.६, ओ. ३०||
ज्याचे शिर उत्तरेस | ज्याचे पाय दक्षिणेस | जो सर्वांत सरस | तो साक्षात त्रिमात्रक ओंकार मी || अ.६, ओ.३१||
वर नेतो मी | खालीही आणतो मी | आहे एकच मी | नित्य , सनातन ओंकार || अ.६, ओ.३२ ||
ऋचा, यजुर्मंत्र आणि साम यांचे पठण | यज्ञांत करी जो ब्राह्मण || त्याला मी करतो नमन | त्याकारणे मला प्रणव मानती || अ.६, ओ. ३३||
स्निग्धद्रव्य मांसपिंडात शिरून | राहते त्यास व्यापून || तसा लोकांस व्यापतो म्हणून | मी सर्वव्यापी आहे || अ.६, ओ.३४||
ब्रह्मा, भगवान हरी यांना | तसेच अन्य देवांना | माझा आरंभ आणि अंत कळेना | म्हणून मला अनंत म्हणती || अ. ६, ओ.३५ ||
गर्भवास, जन्म, जरा, मरण | संसारभवसागरापासून || भक्ताचे करतों रक्षण| म्हणून मला तार म्हणती || अ. ६, ओ. ३६ ||
चार प्रकारच्या जीवांत | राहतो जीवरूपात || आणि सूक्ष्मत्वाने त्यांच्या हृदयांत | म्हणून मला सूक्ष्म म्हणती || अ. ६, ओ. ३७ ||
जे ग्रस्त घोर अंधाराने | त्यांना उजळतो मी प्रकाशाने | माझ्या विजेसमान रूपाने | म्हणून मी विद्युत आहे || अ. ६, ओ. ३८ ||
मी लोकांस प्रसवतो | मी त्यांचा लय करतो | मी त्यांना वसवितो, त्यांचे पोषण करतो | म्हणून मी एकच ईश्वर आहे || अ. ६, ओ. ३९ ||
मी स्वतः ब्रह्म तुरीय | दुसरे काही नसे माझ्याशिवाय | स्वतःत सर्व भूतांचा करून लय | मी एकच रुद्र वास करतो || अ. ६, ओ. ४० ||
मी राहतो तिन्ही लोकांस नियंत्रित करुनी | माझ्या ईशानी शक्तींनी | मी चक्षू या जगाचा म्हणुनी | ईशानरूप, ईश्वरी, स्वर्गदर्शक || अ.६, ओ.४१||
श्लो.१
सङ्काश (ना.पुं)=सारखा दिसणारा
चंद्रशेखर = (शेखर=शिराचे भूषण, अलंकार) चंद्र ज्याच्या शिराचे भूषण आहे असा, शिव.
परिच्छिन्न (वि.)=विभाजित, मर्यादित (श्लो.२)
यास्यस्यनायासाद्येन= संधिविग्रह= यास्यसि+अनायासात्+येन (श्लो.५)
श्लो. ६ मध्ये उल्लेख केलेले चौदा लोक:
हे लोक दोन भागांत विभागले जातात:
सप्त उर्ध्व लोक:
1. सत्यलोक – ब्रह्मदेवाचे निवासस्थान;
2. तपोलोक
3. जनलोक
4. महर्लोक
5. स्वर्लोक – इंद्राचे राज्य
6. भुवर्लोक – ऋषी व गंधर्व यांचे निवासस्थान
7. भूलोक – आपला पृथ्वीवरील मानवांचा लोक
सप्त अधोलोक:
8. अतल
9. वितल
10. सुतल – बळीराजाचे निवासस्थान
11. तालातल
12. महातल
13. रसातल
14. पाताळ – सर्वात खालचा लोक
श्लो.९
लीलाकुलितचेतसः (लीला + आकुलित + चेतसः)
लीला = ईश्वराची दिव्य क्रीडा; आकुलित = व्याकुळ, गोंधळलेले, भ्रमित झालेले; चेतसः = मन, चेतना, विचार.
दिवौकसाम् (दिवि + औकसाम्)
दिवि = स्वर्ग; औकसाम् = राहणारे (औकस = वास करणारा): दिवौकस म्हणजे स्वर्गात राहणारे, म्हणजेच देवता.
मत्तः = "माझ्यापासून", "माझ्याव्यतिरिक्त", "माझ्या वगळता" (श्लो.११)
श्लो.१३
ही सर्व शब्दरूपे "अञ्" प्रत्ययाने बनलेली विशेषणे आहेत, जी दिशा दर्शवणारी आहेत:
दक्षिण= दक्षिण दिशा; दक्षिणाञ्च =दक्षिण दिशेला असलेला; उदक = उत्तरेस ; उदञ्चः =उत्तर दिशेला असलेला; प्र =पूर्वेस; प्राञ्चः = पूर्व दिशेला असलेला; प्रत्य= पश्चिमेस; प्रत्यञ्चः =पश्चिम दिशेला असलेला.
विदिशः = कोनदिशा, म्हणजे मुख्य चार दिशांच्या मधल्या दिशाही (जसे की आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान).
दिशः = मुख्य दिशांचा उल्लेख – पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण.
श्लो.१४
सावित्री=वेदांचे दुसरे रूप
त्रिष्टुब् – वेदांमधील एक छंद (metre) — प्रायः ऋग्वेदात वापरला जातो (११ अक्षरी पंक्ती).
जगती – दुसरा वेदछंद — १२ अक्षरी पंक्ती.
अनुष्टुप् – सर्वसामान्य ८+८ अक्षरी पंक्ती असलेला छंद (जसा की श्रीरामरक्षेतील श्लोक).
पंक्तिः – पंक्ति नावाचा १० अक्षरी छंद.
छन्दः – म्हणजे छंद/छन्दःशास्त्र, म्हणजे वाचन/पठणातील लयबद्धता.
त्रयीमयः – वेदत्रयींमधून निर्माण झालेला — म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांचा मूर्त स्वरूप.
श्लो.१५
गह्वर=गुहागृह, गुहा, खोल जागा; अंधाराचे स्थान, अरण्य किंवा डोंगरातील दुर्गम जागा; एखादी खोल, गंभीर किंवा गूढ जागा.
त्रेताग्निः – त्रेतायुगातील यज्ञातला अग्नि. तीन प्रकारचे अग्नि – गार्हपत्य, आहवनीय, दक्षिणाग्नि
गौर्यः अहं – मी गौरी आहे (म्हणजे पार्वतीस्वरूप किंवा ती शक्ती).
गौर्यः अहं – मी पुनः गौरी आहे (पुनरुक्ती; यात शक्तीस्वरूप दाखवले आहे).
श्लो.१६
अपां पतिः — पाण्यांचा अधिपती (वरुण किंवा जलतत्त्वाचा स्वामी).अप्" (अर्थ: पाणी)
"अप्" हा शब्द प्रायः फक्त बहुवचनी (plural only) रूपातच वापरला जातो. एकवचन किंवा द्विवचन प्रायः वापरात नाहीत.
श्लो.१७
अङ्गिरस ऋषींबद्दल माहिती:
अङ्गिरा (किंवा अङ्गिरस) हे वेदकाळातील एक प्रसिद्ध सप्तर्षी होते. ते एक महत्त्वाचे ब्रह्मर्षी मानले जातात.
अथर्ववेद आणि काही ऋग्वेद सूक्त अङ्गिरस ऋषी किंवा त्यांच्या वंशजांनी रचले आहेत.
ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी अङ्गिरा हे एक होते.
अग्नि, बृहस्पति, उतथ्य, आणि शंख हे त्यांच्या पुत्रांपैकी मानले जातात (काही मतांनुसार).
अङ्गिरस ऋषी अनेक मंत्रद्रष्टा ऋषींचे वंशजही आहेत. म्हणूनच "अङ्गिरस" हा शब्द कधी कधी संपूर्ण ऋषिवंशासाठी वापरला जातो.
मूलतः "अङ्गिरा" हा एक ऋषी होता, पण "अङ्गिरस" हा शब्द बहुवचनी अर्थाने देखील वापरला जातो.
वेदकाळात अङ्गिरस ऋषींचा एक वंश होता, आणि त्यात अनेक ऋषी होत. म्हणून "अङ्गिरस" म्हणजे अङ्गिरा ऋषी व त्यांच्या वंशजांचे समुदाय.
ऋग्वेदातील अनेक सूक्ते अङ्गिरस ऋषी किंवा त्यांच्या वंशजांनी रचली आहेत.
श्लो.४१
सर्वांल्लोकान्यदीशेहमीशिनीभिश्च शक्तिभिः ।ईशानमस्य जगतः स्वर्दृशं चक्षुरीश्वरम् ॥ ४१ ॥