Monday, November 24, 2025

शिवशाही ते पेशवाई- संक्रमणाचा मागोवा


मराठ्यांचा इतिहास शिकताना शिवाजी महाराजांच्या वंशाकडून पेशवाईकडे  संक्रमण    कसे  आणि कधी झाले,   हा प्रश्न  अभ्यासकांस नेहमी पडतो आणि त्याचे उत्तर निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे दिले आहे. मी येथे या विषयावर काही माहिती संकलित केली आहे‌. 

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) औरंगजेब मोठे सैन्य आणि संपत्ती घेऊन महाराष्ट्रात उतरला (१६८१). संभाजीमहाराजांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने औरंगजेबाशी लढा दिला. परंतु दुर्दैवाने संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती सापडले आणि औरंगजेबाने हाल हाल करून त्यांना ठार मारले (१६८९).

संभाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना मराठे स्वस्थ राहिले, असा एक समज आहे. परंतु तो खरा नसावा. संभाजीमहाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडल्याचे कळताच रायगडावर घबराट उडाली.  संभाजीमहाराजांना सोडविणे आपल्याला शक्य नाही हे ओळखून स्वराज्य वाचवण्यासाठी  काय करता येईल याचा विचार सुरू झाला असावा. संभाजी महाराजांनंतर मराठी राज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांना  सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. आपसातील मतभेद विसरून  मराठ्यांनी  स्वराज्याच्या हिताचा निर्णय घेतला.     .

राजाराम महाराज त्या वेळी  रायगडावर होते आणि  त्यांचे वय    जेमतेम १९ वर्षांचे होते. औरंगजेबाचे पुढील लक्ष्य रायगड असेल हे ओळखून राजाराम महाराजांना पन्हाळ्याला पाठवण्याचा निर्णय झाला. आता येथे पुन्हा प्रश्न असा येईल की या वेळी महाराणी येसूबाई आणि शाहूमहाराज यांना का सुरक्षित स्थळी हलविण्यात आले नाही? त्याचे उत्तर असे असावे की स्त्रिया आणि मुलांचा प्रवास धोकादायक होता. शाहूमहाराज तेव्हा जेमतेम सात वर्षांचे होते.   मोंगल सैन्य सर्वत्र पसरले होते. त्यामुळे त्यांना रायगडावरच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

राजाराम महाराज सुरक्षितपणे पन्हाळ्यावर आले. पन्हाळा जिंकण्यास  अवघड असला तरी तो मोगलांच्या आक्रमणानंतर दीर्घ काळ लढविता येण्यासारखा नव्हता. त्यामुळे राजाराम महाराजांना जिंजीला हलविण्याचा निर्णय झाला.

तमिळनाडू (जिल्हा: विलुपुरम/अरियालूर परिसर) मध्ये असलेला  जिंजीचा किल्ला दक्षिण भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो. शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडील मोहिमेत शिवाजी महाराजांनी दूर दृष्टीने हा किल्ला स्वराज्यात आणला होता.

पन्हाळा → कोल्हापूर → बेलगाव → गोवा सीमेवरच्या घाटांतून → कर्नाटकातील मल्लार, श्रीरंगपट्टण → नंतर तंजावर प्रदेशातून → जिंजी असा प्रवास करीत राजाराम महाराज जिंजीला पोहचले. हा प्रवास ४-५ महिने चालला.    राजाराम महाराज सुरक्षितपणे जाऊ शकले कारण  मोगलांची मुख्य फौज त्या वेळी रायगड–काळ्याण–सातारा प्रदेशात होती, त्यामुळे दक्षिणेकडे थेट पाठलाग कमी होता.

राजाराम महाराज जिंजीला गेल्याचे कळताच औरंगजेबाने जिंजीला वेढा देण्याचा निर्णय घेतला. औरंगजेबाने जिंजी जिंकण्यासाठी अब्दुल करीम खान, झुल्फिकार खान, कमरुद्दीन खान अशा मोठ्या सरदारांना पाठवले. हा वेढा १६९० ते १६९८ असा आठ वर्षे  चालला होता.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने रायगडास वेढा दिला. मराठ्यांनी मोगलांशी वाटाघाटी करून महाराणी येसूबाई आणि शाहू यांच्या जिवाची हमी घेऊन रायगड मोगलांच्या हवाली केला.  संभाजीमहाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना  कैद केले (१६८९). 
राजाराम  महाराज जिंजीहून  मराठ्यांच्या    लढ्याचे नेतृत्व करीत राहिले. त्यांच्या पदरी असणाऱ्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सरदारांनी अभूतपूर्व पराक्रम गाजवून औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. मोंगल बेसावध असताना मोगलांच्या छावणीवर छापे मारणे, त्यांची कत्तल करणे, त्यांची साधनसंपत्ती लुटणे व मोंगल सावध होण्याच्या आत निसटून जाणे या मराठ्यांच्या गनीमी युद्धतंत्रामुळे मोंगल अतिशय  धास्तावले.‌औरंगजेबाला सत्तावीस वर्षांच्या लढ्यानंतरही विजय दुरापास्त वाटू लागला आणि अतिशय हताश अवस्थेत त्याचा मृत्यू झाला (१७०७).

              छत्रपती राजाराम महाराज
राजाराम महाराज १६९८ मध्ये जिंजीच्या वेढ्यातून निसटून  महाराष्ट्रात आले. त्यांनी आपली राजधानी कोल्हापूर येथे वसवली. राजाराम महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आणि मराठ्यांनी आपले गेलेले बहुतेक किल्ले परत मिळवले.

येसूबाई आणि शाहू यांना औरंगजेबाने राजकीय डावपेचाचा भाग  म्हणून कैदेत ठेवले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजमशहा याने शाहूमहाराजांना सोडण्याचा निर्णय घेतला (१७०७).

शाहूमहाराजांच्या  सुटकेनंतर  काही प्रश्नांची चर्चा आवश्यक ठरते.
१. मराठे गनीमी काव्याने हल्ले  करीत असताना महाराणी येसूबाई व शाहूमहाराज यांना औरंगजेबाकडून मारले जाऊ शकते, अशी भीती मराठ्यांना वाटली नाही का? 
-मराठ्यांना ही भीती सुरुवातीला असावी. परंतु  राजकीय डावपेचाचा भाग म्हणून शाहू महाराजांना जिवंत ठेवणे औरंगजेबाला  आवश्यक  वाटते होते. शाहू महाराजांना किंवा महाराणी येसूबाईंना मारून त्याचा काहीच फायदा नव्हता.  शाहूमहाराज त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे प्रसिद्ध होते. औरंगजेबाने शाहूमहाराजांच्या हत्येस प्रवृत्त होण्यासारखे   वर्तन शाहूमहाराजांकडून घडले नसावे. शाहू महाराजांची हत्या केली असती तर मराठे अधिक आक्रमक झाले असते. त्यामुळे जसजसे दिवस उलटत गेले तसतशी मराठ्यांना खात्री पटत गेली की औरंगजेब शाहू महाराज आणि महाराणी येसूबाईंना मारत नाही. त्यामुळे मराठ्यांनी आपले हल्ले निर्वेधपणे चालू ठेवले.

२. मराठे महाराणी येसूबाई आणि शाहूमहाराजांना सोडवू का शकले नाहीत?
-याचे कारण एकच असावे आणि ते म्हणजे औरंगजेबाने शाहूमहाराज आणि महाराणी येसूबाई यांना अतिशय कडक बंदोबस्तात ठेवले होते. त्याचा जेथे तळ असे  तेथे येसूबाई आणि शाहू यांना हलवण्यात येई.

३. येसूबाई आणि शाहू यांना कैदेत ठेवण्याचा औरंगजेबाला फायदा झाला का?

                         औरंगजेब

- औरंगजेबाला म्हणावा तसा फायदा झाला नाही. याचा खरा फायदा      औरंगजेबाच्या मुलाने आझमशहाने करून घेतला. आपण मराठ्यांचा पराभव करू शकत नाही हे लक्षात आल्यावर आझमशहाने  शाहू महाराजांची सुटका करून मराठी रियासतीत दुफळी माजवली

शाहू महाराजांच्या सुटकेच्या वेळीही महाराणी       येसूबाईंना सोडण्यात आले नाही. त्या मागील हेतू शाहूवर दबाव ठेवण्याचा होता. पुढे शाहू महाराजांनी आईच्या सुटकेसाठी  केलेल्या अथक प्रयत्नांमुळे येसूबाईंची सुटका १७१९ मध्ये झाली. या कामी शाहू  महाराजांना पेशवे बाळाजी विश्वनाथ व नौदलप्रमुख कान्होजी आंग्रे यांची खूप मदत झाली.

                   छत्रपती शाहू महाराज
शाहू महाराजांनी सुटकेनंतर आपली राजधानी सातारा येथे वसवली. सातारा डोंगरांनी वेढला असल्याने त्यास नैसर्गिक संरक्षण होते. शिवाय अजिंक्यतारा हा दुर्गम किल्ला साताऱ्यामध्ये होता.

राजाराम महाराजांचा  १७०० मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी मृत्यू झाला. त्या वेळी त्यांचा पुत्र शिवाजी (दुसरा ) हा दहा वर्षांचा होता. परंतु राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई हिने राजारामांचा पुत्र शिवाजी (दुसरा) यास राजा घोषित करून त्याच्या नावाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मोरोपंत पिंगळे  हे प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनी नियुक्त केलेले अष्टप्रधानांपैकी पेशवे होते‌.      (१६७४-१६८३) होते.  शिवाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी मोरोपंताचे पुत्र      निश्शंकराज पिंगळे (१६८३-१६८९) यांची पेशवे म्हणून नेमणूक केली. नि:शंकराज पिंगळे राजाराम महाराजांच्या आणि नंतर ताराबाईच्या पक्षात होते.

पिंगळे घराण्याचा पेशवा पंढरीनाथ पिंगळे १७१३ मध्ये शाहू समर्थक आणि ताराबाई समर्थक यांच्यातील चकमकीमध्ये  सिंहगडावर  मृत्युमुखी  पडला. त्याबरोबरच पिंगळे घराण्याकडील पेशवेपद संपुष्टात आले.

शाहूंना पेशवे पदावरील नेमणुकीसाठी दिल्ली दरबाराशी करार, दक्खनेत प्रभाव, सरदारांशी समन्वय यासाठी कुशल मुत्सद्दी हवा होता.

त्यामुळे त्यांनी १७१३ मध्ये भट-भोसले घराण्यातील बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे म्हणून नेमणूक केली (१७१३-१७२०). (या भट-भोसले घराण्याचा भोसले घराण्याशी संबंध नव्हता. “भोसले-पेशवे” हा शब्द पेशव्यांचे मूळ गाव भोसले → भोसले-गाव → भोसले अशा स्थानिक संदर्भातून आला आहे, पण औपचारिक राजवंश नाही.)

बाळाजी विश्वनाथ यांनी शाहूमहाराज यांचा विश्वास सार्थ ठरवून खूप महत्त्वाची कामे केली.    त्यांनी  राज्याची वित्तव्यवस्था सावरली, सेनापती, सरदार, जमीनदार यांना शाहूपक्षाकडे आणले, मोगलांशी कूटनीती केली, ताराबाईंच्या गटातील सरदारांना शाहूंच्या बाजूस जोडले. यामुळे सत्तेचे केंद्र साताऱ्यावरून पुण्याकडे वळू लागले.

राजाराम महाराजांनंतर   ताराबाईने स्वराज्य सांभाळले होते‌. संपूर्ण कृष्णा–कोयना–वारणा प्रदेशावर ताराबाईंची सत्ता होती. 

परंतु शाहू महाराज आल्यानंतर शाहूमहाराज शिवाजी महाराजांचे नातू असल्याने ताराबाईच्या बाजूचे बरेच सरदार शाहू महाराजांच्या बाजूला आले. शाहू - ताराबाई संघर्षात मोंगलांनी धूर्तपणे शाहूला पाठिंबा दिला. शाहूंच्या पक्षात आलेल्या सरदारांमध्ये  राजाराम महाराजांच्या काळात मोठा पराक्रम गाजवलेले धनाजी जाधव यांचा समावेश होता. यामुळेच शाहू - ताराबाई संघर्षाला मुख्य कलाटणी मिळाली.

१६९९-१७०० मध्ये शाहू महाराजांचे सैन्य व ताराबाईचे सैन्य यांची कोल्हापूरजवळ कागल येथे निर्णायक लढाई झाली. यात ताराबाईच्या सैन्याचा पराभव झाला आणि  नंतर झालेल्या तहानुसार ताराबाईचे राज्य केवळ कोल्हापूर–गोवा सीमेपुरते मर्यादित राहिले.

अशा प्रकारे साताऱ्यात शाहूचा वंश तर कोल्हापूरमध्ये  राजारामांचा वंश चालू राहिला. परंतु आपल्या अतुलनीय पराक्रमाने सारा भारत गाजवणारा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचा मुलगा   पहिला बाजीराव  व पुढील पेशव्यांच्या कर्तृत्वामुळे पेशवाईची ओळख म्हणजे  मराठेशाहीची ओळख  झाली. 

सातारा संस्थानाचे पुढे काय झाले

छत्रपती शाहू महाराज (सातारा) यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांचे पुतणे आणि संभाजी महाराजांचे नातू छत्रपती प्रतापसिंह गादीवर आले. काही वर्षांनी ब्रिटिशांनी त्यांना पदच्युत करून त्यांचा भाऊ शाहू महाराज (दुसरे) यांना  गादीवर बसवले (१८३९). शाहू महाराज (दुसरे) १८४८ ला वारले आणि त्यांना पुरुष वारस नव्हता.

ब्रिटिशांनी Doctrine of Lapse (लॅप्सचा सिद्धांत – प्रभुत्वशून्यता सिद्धांत) वापरून सातारा संस्थान १८४८ मध्ये ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले. यामुळे सातारा हे स्वतंत्र संस्थान म्हणून संपले.

सातारा संस्थानाचे आणि पेशवाईचे आर्थिक संबंध:

१७०७ नंतर शाहूमहाराज गादीवर आल्यानंतर   छत्रपती 'नामधारी'    असले तरी आर्थिक मान चालू होता.  साताऱ्याच्या छत्रपतींना छत्रपती-मान, दरबारखर्च, वेतने, जागीर यांद्वारे नियमित आर्थिक मान  दिला जात असे.  अनेक सुभ्यांकडून येणाऱ्या महसुलाचा काही हिस्सा छत्रपती दरबाराला पाठवला जात असे.

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१७४९ नंतर) बालाजी बाजीराव (नानासाहेब) आणि नंतर राघोबा दादा यांच्या काळातही आर्थिक मान चालू होता.

पण शाहूंच्या मृत्यूनंतर साताऱ्याचे नवीन छत्रपती राजाराम द्वितीय (१७४९–१७७७) पूर्णपणे नामधारी झाले. त्यावेळी    उत्पन्न क्रमाक्रमाने खूप कमी झाले. छत्रपती केवळ पेशव्यांकडून मिळणाऱ्या देणगीवर अवलंबून राहिले.

१७७०–१८००  या काळात पेशवाई बळकट व छत्रपती आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले. या काळात पुणे दरबाराने आर्थिक हक्क कमी केले.

१८०० ते १८१८ मध्ये   दुसऱ्या  बाजीरावाच्या  काळात   वाईकडून साताऱ्याच्या छत्रपतींना मिळणारे उत्पन्न जवळजवळ बंदच झाले. कारण  दुसरा बाजीराव आणि साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह  यांच्यामध्ये  सतत संघर्ष होता. मराठा साम्राज्यातील उत्पन्नसुद्धा मोठ्या युद्धांमुळे कोसळले होते.

त्यामुळे या काळात सातारा दरबार आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुबळा झाला.

१८१८ मध्ये पेशवाई  संपुष्टात आली.  ब्रिटिश सत्ता आल्यामुळे साताऱ्याचे छत्रपती ब्रिटिशांच्या आश्रयाखाली आले. ब्रिटिशांनी छत्रपतींना "जागीर म्हणून" वार्षिक पगार ठरवून दिला. पुढे ब्रिटिशांनी सातारा संस्थानच खालसा केले.

कोल्हापूर संस्थानाचे पुढे काय झाले

कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज (प्रसिद्ध समाजसुधारक) १९२२ ला वारले. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी छत्रपती राजाराम (तिसरे), मग छत्रपती शाहू (तिसरे) गादीवर आले.

१९४७–४९ च्या संस्थान विलिनीकरण प्रक्रियेत कोल्हापूर संस्थानाने १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात विलीन होण्याची प्राथमिक संमती दिली होती. पूर्ण प्रशासकीय विलिनीकरण प्रक्रिया १ मार्च १९४९ ला पूर्ण झाली. त्यानंतर कोल्हापूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट झाले.

पेशवाईचे पुढे काय झाले
.                 पहिले बाजीराव पेशवे
पहिला बाजीराव (१७२०–१७४०) :बाळाजी विश्वनाथांनंतर त्यांचा मुलगा  पहिला बाजीराव पेशवा झाला. याच्याच अतुलनीय पराक्रमाने मराठ्यांचा दबदबा भारतभर पसरला. हा इतिहासातील सर्वात महान सेनापती म्हणून प्रसिद्ध असून  एकही लढाई हरला नाही. 

बाळाजी बाजीराव ऊर्फ “नाना साहेब पेशवा:  (१७४०–१७६१): हे पहिल्या बाजीरावांचे जेष्ठ चिरंजीव होते. यांच्या कारकीर्दीत १७५१–६१ मध्ये मराठी साम्राज्य सर्वोच्च परंतु होते. परंतु १७६१ च्या  पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. त्यांचा पुत्र विश्वासराव या युद्धात  मारला गेला.

या पराभवानंतर पेशवाईचे साम्राज्य डळमळले.

माधवराव  (माधवराव बल्लाळ):  (१७६१–१७७२) हे नाना साहेबांचे धाकटे पुत्र होते.
हे अत्यंत कुशल प्रशासक असून पानिपतच्या धक्क्यातून त्यांनी   मराठा साम्राज्य पुन्हा उभे केले.

नारायणराव पेशवा (१७७२–१७७३) हे माधवरावांचे धाकटे बंधू होते. १७७३ मध्ये त्यांची  हत्या झाली. 

रघुनाथराव (राघोबा दादा):   यांना  प्रत्यक्ष सत्ता  मिळाली नाही, पण ते  पेशवे पदावर दावा करीत राहिले (१७७३-१७७४). यांनी इंग्रजांकडे मदत मागितल्याने  पहिले  इंग्रज–मराठा युद्ध झाले.

माधवराव (सवाई माधवराव) (१७७४–१७९५)
 हे नारायणरावांचे मरणोत्तर पुत्र (पेशवाईत याला “सवाई” म्हणतात).  या वेळी प्रत्यक्ष सत्ता नाना फडणीस, महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांच्या “बारभाई मंडळा”कडे होती. याच काळात मराठा साम्राज्य पुन्हा बळावर आले.

बाजी राव  (बाजी राव बल्लाळ ) (१७९६–१८१८) :हा रघुनाथराव यांचा मुलगा असून दुसरा बाजीराव म्हणून प्रसिद्ध आहे. भारत काबीज करू पाहणाऱ्या इंग्रजांशी यांचा संघर्ष झाला. अखेरच्या कोरेगाव भीमा  येथील युद्धात (१ जानेवारी १८१८)  त्याचा पराभव होऊन इंग्रजांनी पुणे काबीज केले आणि शनिवारवाड्यावर इंग्रजी ध्वज फडकवला.

पेशवे - सातारा संस्थान -कोल्हापूर संस्थान यांच्यातील परस्पर संबंध कसे होते

पेशवे सत्तेच्या शिखरावर असताना   आणि नवीन प्रदेश काबीज करीत असताना सातारा आणि कोल्हापूर या संस्थानांशी संघर्ष टाळला. यामागील भूमिका राजनैतिक आणि मुत्सद्देगिरीची होती ती अशी:-

१. छत्रपती गादीचा ‘धर्माधिकार’ पवित्र मानला जात होता

शिवाजी महाराजांच्या गादीला हिंदवी स्वराज्याचे केवळ राजकीय नव्हे तर धार्मिक–संस्कृतिक प्रतीक मानले जात होते.

पेशव्यांची सत्ता प्रतिनिधी सत्ता (delegated authority) मानली जात असे.

स्वतः बाजीराव पेशवे म्हणत:
"स्वराज्य हे छत्रपतींचे, आम्ही केवळ सेवक."

त्यामुळे छत्रपतींना हटवणे म्हणजे स्वराज्याच्या मूळ तत्त्वांवर प्रहार मानला जाई.

२. पेशव्यांच्या वैधतेचा आधारच छत्रपती होते

पेशवे पद, सन्मान, भरतसारखा अधिकार — हे सर्व छत्रपतींच्या सनदा/फर्मानांवर आधारलेले होते. छत्रपतींचे अस्तित्वच पेशवे सत्तेच्या वैधतेसाठी आवश्यक होते. म्हणूनच पेशव्यांना छत्रपती काढून टाकणे किंवा युद्ध करणे राजकीयदृष्ट्या धोकादायक होते.

३. सातारा व कोल्हापूर गाद्यांचे अंतर्गत विभाजन पेशव्यांना फायद्याचेच होते
शाहू आणि ताराबाई या विभाजनातून स्वतः पेशव्यांची सत्ता वाढली. पेशव्यांनी    दोन्ही गाद्यांना प्रतीकात्मक सत्ता दिली

पण वास्तविक सत्ता पुण्यात केंद्रित केली
यामुळे पेशव्यांची चालना कुणाला उघडपणे दिसली नाही आणि छत्रपतींचा मानही अबाधित राहिला.

४. पेशवे ‘गादी उलथवणारे’ दिसले असते तर प्रांतीय सरदारांनी पाठिंबा काढला असता

भोसले, शिंदे, होळकर, गायकवाड, पवार या साऱ्या कुटुंबांचा   भावनिक ओढा  छत्रपतींकडे होता. जर पेशव्यांनी सातारा/कोल्हापूर गादीवर हल्ला केला असता तर अनेक सरदार दुरावले असते. मराठा संघटनाच फुटली असती. हे पेशव्यांना परवडणारे नव्हते

५. पेशव्यांची महत्वाकांक्षा हिंदुस्थानात सत्ता वाढवण्याची होती,  त्यांना महाराष्ट्रात गृहयुद्ध नको होते.

बाजीराव, माधवराव, नानासाहेब — यांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थान, दोआब, बंगाल, तंजावर, कर्नाटक इथपर्यंत विस्तारले.
अशा परिस्थितीत सातारा किंवा कोल्हापूरशी युद्ध म्हणजे संसाधनांचा अपव्यय ठरला असता आणि हिंदुस्थानातील मराठा मोहिमांवर परिणाम परिणाम झाला असता. म्हणून पेशवे गृहकलह टाळत बाहेरच्या मोहिमांवर लक्ष देत.

६. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या  ऋणाची पेशवे जाणीव ठेवून होते. बाजीराव पेशवे शिवाजी महाराजांचा उल्लेख राजे शिवछत्रपती अशा सन्मानाने करत. नाना फडणीस “गादीचा मान अबाधित राहावा” अशी भूमिका घेत. दरबारातील विधी, हिशेब, शाही मान-सन्मान — छत्रपतींच्या नावानेच केले जात. अगदी इंग्रजांशी तह करतानाही पेशवे म्हणत- “आम्ही छत्रपतींचे सेवक आहोत.”

जरी प्रत्यक्ष सत्ता पेशव्यांकडे होती, तरी छत्रपती गादीची पवित्रता हा पेशवे प्रशासनाचा पाया होता.

वरील विवेचनावरून लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या वंशाकडून पेशव्यांकडे सत्तांतर झाले का, या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे आहे. यामुळेच बहुतेक अभ्यासकांचा गोंधळ उडतो. 

पेशव्यांच्या कर्तबगारीमुळे  पेशवाई आणि मराठेशाही  समानार्थी शब्द  झाले. ज्या शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्य स्थापन केले,  ज्यांच्या पुत्रांनी प्राणपणाने मराठी राज्य  टिकवले , त्यांचा वंश मात्र पुढे नावापुरता राहिला. काळ प्रत्येक व्यक्तीला भूमिका ठरवून देतो आणि ती प्रामाणिकपणे  बजावणे एवढेच तिचे काम असते.
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
(हा सारा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. परंतु मुख्य विषयास धरून ठळक मुद्दे येथे मांडले आहेत. इतिहासात, विशेषतः मराठा इतिहासात रस असणारे माझा थोरला भाऊ श्री. नितीन जुन्नरकर याने  ब्लॉग पोस्ट काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये दुरुस्त्या सुचविल्या. त्याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे.)









31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...