Sunday, May 12, 2024

रफीसाहेब, एक दंतकथा

रफीसाहेब, एक दंतकथा:

रफीसाहेब आणि सोनिक ओमी:

रफीसाहेब  आणि सोनिक ओमी  हे  काका पुतण्या असणारे संगीतकार, अविभक्त भारतातील  पंजाबचे. सोनिक ओमींकडे गाणी गाताना रफीसाहेब म्हणत , ' ऐसा लगता है मैं अपने घर आया हूं.' रफीसाहेबांनी सोनिक  ओमींच्या ' दिल ने फिर याद किया' (१९६६) या पहिल्या चित्रपटातील गीते गाण्यासाठी  केवळ एक रुपया मानधन घेतले.     

जेव्हा रफीसाहेबांनी रेकॉर्डिंग अर्धवट सोडले

रफीसाहेबांनी रेकॉर्डिंग अर्धे सोडले असे कधी घडले नाही. परंतु याला एक गाणे अपवाद आहे.
 'माया' चित्रपटातील 'तसवीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी है' या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. गाण्याचे रेकॉर्डिंग तर चांगले होत होते. परंतु संगीतकार सलिल चौधरी पुन्हा पुन्हा रिटेक्स घेत होते. तेव्हा रफीसाहेबांनी न राहवून त्याबद्दल विचारले. तेव्हा सलिलजींनी सांगितले की लताबाईंना हवा तसा परिणाम येत नाही. त्यामुळे त्या रिटेक्स घ्यायला सांगत आहेत. रफीसाहेबांना ते आवडलं नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग अर्धवट सोडून ते निघून गेले.

रफीसाहेबांमुळे 'सूरज' चित्रपट राजेंद्रकुमारला मिळाला

सूरज चित्रपटासाठी नायकाची निवड करायची होती. संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडे 'बहारों फूल बरसाओ' या गाण्याची चाल होती. ताराचंद बडजात्यांनी रफी साहेबांना ही चाल तुम्ही निरनिराळ्या नटांसाठी कशी म्हणाल असे विचारले. रफीसाहेबांनी जेव्हा ही चाल राजेंद्रकुमारसाठी गाऊन दाखवली, ती ताराचंद बडजात्यांना पसंत पडली आणि 'सूरज' चित्रपट राजेंद्रकुमारला मिळाला.

दिल की आवाज़:
१९६० च्या दशकामध्ये जॉय मुखर्जी हा नट रुपेरी पडद्यावर झळकला.  अशोककुमार, किशोरकुमार आणि अनुप कुमार ही भावंडे जॉय मुखर्जीचे काका लागत. जॉय मुखर्जी अभिनयामध्ये सुमार होता. परंतु ६ फूट २ इंच उंची आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व या त्याच्या जमेच्या बाजू. यांच्या जोरावर त्याने मोठमोठे नट रुपेरी पडदा गाजवत असताना आपले अस्तित्व टिकवून ठेवले. प्रसिद्ध सिनेतारकांनी त्याच्याबरोबर नायिकेच्या भूमिका केल्या.

लव्ह इन सिमला (१९६०) या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एक मुसाफिर एक हसीना (१९६२), फिर वही दिल लाया हूं (१९६३), ज़िद्दी (१९६४), लव्ह इन टोकियो (१९६६) हे जॉय मुखर्जीचे गाजलेले चित्रपट.

जॉय मुखर्जीच्या यशामध्ये  चित्रपटांचे  सुमधुर संगीत आणि रफी साहेबांचा आवाज यांचा मोठा वाटा होता. 'फिर वोही दिल लाया हूं', 'लाखों हैं निगाह में', 'तुम हे ओ हसीना', ही रफी साहेबांनी जॉय मुखर्जी साठी गायिलेली गाणी गाजली. रफींच्या आवाजानेच जॉय मुखर्जीची रोमँटिक प्रतिमा अधिक लोकप्रिय झाली.

जॉय मुखर्जीला चित्रपट मिळेनासे झाल्यावर तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरला. १९६८ मध्ये त्याने 'हमसाया' या स्वतःची दुहेरी भूमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती केली - एका भूमिकेत  भारतीय वायुदलातील अधिकारी तर दुसऱ्या भूमिकेत  चिनी गुप्तहेर.  चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याचेच होते.  संगीत ओ. पी. नैयर यांचे होते. 

जॉय मुखर्जीचे डोळे फुगीर होते आणि काही समीक्षक याबद्दल त्याची टवाळकीही करीत. पण या चित्रपटात याचा त्याने चांगला वापर करून घेतला आणि चिनी गुप्तहेराची भूमिका त्याला चांगली शोभून दिसली. माला सिन्हाचे लांबट डोळे आणि निमुळता चेहरा यांमुळे चिनी गुप्तहेराची चिनी नायिका म्हणून भूमिका तिने सफाईदारपणे केली.

सारख्या चेहऱ्यामुळे  दोन्ही नायिकांचे  नाटकाबद्दल  गैरसमज होत राहतात. भारतीय गुप्तहेराची नायिका लीना (शर्मिला टागोर) नायकावर रुष्ट होते तेव्हा तिचा रोष दूर होण्यासाठी नायक रफीसाहेबांच्या आवाजात 'दिल की आवाज़ भी सुन' हे गीत गाऊन आळवणी करतो. रफीसाहेबांच्या भावपूर्ण गायकीमुळे जॉय मुखर्जी यांच्या अभिनयातील वेदना आणि प्रामाणिकता अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी जॉय मुखर्जीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि रफीसाहेबांना त्याने तसे सांगताच रफीसाहेबांनी या गाण्यासाठी मोबदला घेतला नाही.






No comments:

Post a Comment

31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...