काही विशिष्ट कारणांनी चहा न घेणारे लोक सोडले तर चहा बहुतेक सर्वांच्या जीवनाचा आवश्यक भाग झाला आहे. पण या चहाविषयी माहिती आपल्यापैकी किती जणांना आहे? या चहाविषयी रंजक माहिती श्री. पारितोष तिरोडकर त्यांच्या ChaiGPT - Gossip. Pause. Tea या पुस्तकात सांगत आहेत.
ChatGPT या AI आधारित tool चे नाव देऊन लेखक आधी आपली उत्सुकता वाढवतात, पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करतात आणि मग चहा विषयी माहिती अशा शैलीत सांगतात की पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवून शकत नाही .
चहाचा इतिहास:
चहाला सुमारे ५००० वर्षांचा इतिहास आहे. पण भारतात चहा लोकप्रिय करण्याचे श्रेय ब्रिटिशांकडे जाते. ब्रिटिश राजवटीत १९ व्या शतकात चहा भारतात आला आणि रुजला.
चहाचे प्रकार:
चहाचे असंख्य प्रकार आहेत. मसाला चहा, आल्याचा चहा, वेलचीचा चहा ही त्याची काही उदाहरणे. चहा दूध घालून आणि दुधाशिवायही लोकांच्या पसंतीला उतरतो. सुलेमानी चहात दूध घालत नाही आणि त्यात लिंबू, पुदिना आणि काही मसाले घालतात.
चहाचे प्रादेशिक प्रकार:
चहाचे विविध प्रदेशांत लोकप्रिय असे प्रकार आहेत. मुंबईमधील कटिंग चहा, हैदराबादचा इराणी चहा, काश्मीरचा नून चहा यांचा स्वाद त्या त्या प्रदेशात गेल्यावर आवर्जून घेण्यासारखे आहेत.
चहा आणि आयुर्वेद:
आयुर्वेदाने मनुष्याच्या प्रकृतीचे कफ, वात आणि पित्त असे तीन घटक असून आणि आरोग्याच्या समस्या या घटकांतील असंतुलनामुळे होते असे प्रतिपादन केले आहे. या तिन्ही दोषांवर वेगवेगळ्या प्रकारे बनवलेला चहा उपयुक्त आहे.
चहा आणि भारत:
भारतात दिवसाला लक्षावधी कप चहा प्यायला जातो. भारतात ज्यांनी चहा व्यवसायाने सुरुवात करून पुढे आपली यशस्वी कारकीर्द घडवली असे बरेच लोक आहेत. यांमध्ये भारताचे सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा आवर्जून उल्लेख केला जातो.
चहाचा विश्वविजय:
चहाची जागतिक उलाढाल २०० बिलियन डॉलर्स आहे. उत्तर अमेरिकेत चाय लाटे लोकप्रिय आहे. कॅनडामध्ये सुपर मार्केट्मसध्ये चहाचे निरनिराळे इन्फ्युजन्स विक्रीसाठी ठेवलेले असतात. यू के मध्ये चहाला प्रतिष्ठेचे स्थान आहे. अशा प्रकारे चहाने सारे विश्व व्यापले आहे.
लेखक निरनिराळ्या चहाच्या कृतीसुद्धा सांगतात आणि आपल्या जीवनातील भावनिक प्रसंग, राजकारणी लोकांच्या राजकीय बैठकी चहाशी कशा निगडित आहेत , त्यांचे वर्णन करतात.
५५ पानांचे हे चिमुकले पुस्तक आपल्या आवडत्या पेयाविषयी, चहाविषयी अशी रंजक माहिती देते. तेव्हा पुस्तक जरुर वाचा आणि चहाविषयी आपल्या आठवणींमध्ये रमून जा.
लेखकाविषयी:
श्री. पारितोष तिरोडकर
या पुस्तकाचे लेखक श्री. पारितोष तिरोडकर यांनी ऑस्ट्रेलियामधून फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.
श्री. तिरोडकर यांना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यू के आणि भारत या देशांमध्ये फायनान्स आणि ऑडिट या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा १२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.श्री. तिरोडकर यांनी टीडी बँक, रॉयल बँक ऑफ कॅनडा, यूबीएस, ड्यूश बँक आणि मॉर्गन स्टॅनली अशा नामांकित संस्थांसोबत काम केले आहे.
डिस्क्लेमर:
श्री. पारितोष तिरोडकर यांनी लिहिलेल्या ChaiGPT -Gossip, Pause, Tea या पुस्तकावर लिहिलेली ही ब्लॉग पोस्ट आहे. ब्लॉगचा लेखक पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशकाकडे आहे. पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील आशयाची चर्चा केवळ शिक्षण आणि मनोरंजनासाठी आहे.
-Blog post by Dr Hemant Junnarkar
Blog post © Dr Hemant Junnarkar,
All rights reserved