Showing posts with label श्रीमद्भगवद्गीता. Show all posts
Showing posts with label श्रीमद्भगवद्गीता. Show all posts

Wednesday, August 20, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८-मोक्षसंन्यासयोग

अर्जुन म्हणाला

महाबाहो, मला वेगवेगळे जाणावयाचे | तत्त्व संन्यासाचे || आणि तत्त्व त्यागाचे | हे हृषीकेशा, हे केशिनिषूदना || अ.१८, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

काम्य कर्मे सोडण्यास | कवी म्हणती संन्यास ||सर्व कर्मांची फळे सोडण्यास | विवेकी म्हणती त्याग || अ.१८, ओ.२||

कर्मे असती दोषयुक्त | म्हणून ती सोडावी, असे काही ज्ञानी म्हणतात || यज्ञ, तप, दान ही कर्मे सोडणे नसे उचित | असे दुसऱ्यांचे म्हणणे || अ.१७, ओ.३||

भरतसत्तमा, त्यागाविषयी माझे मत | ऐक सांगतो निश्चित || पुरुषव्याघ्रा, सांगितला आहे शास्त्रात | तीन प्रकारचा त्याग || अ.१८, ओ.४||

यज्ञ, तप, दान या कर्मांस | सोडणे योग्य नसे, ती हवीतच करावयास || पावन करती मनुष्यांस |यज्ञ, दान आणि तप || अ.१८, ओ.५||

परंतु करावे या कर्मांस | सोडून आसक्ती आणि फळांस || असा माझा विश्वास | पक्का आहे पार्था || अ.१८, ओ.६||

नेमून दिलेल्या कर्मास | सोडणे उचित नसे खास || शास्त्रात म्हटला आहे तामस | मोहापोटी केलेला त्याग || अ.१८, ओ.७||

शरीराला कष्ट पडतील | म्हणून कर्माचा त्याग कुणी करील || तर तो त्याग राजस होईल | आणि त्यागाचे फळ मिळणार नाही || अ.१८, ओ.८||

नेमून दिलेले कर्म केल्यास | आसक्ती आणि फळाच्या करून त्यागास || म्हणतात सात्त्विक त्या त्यागास | हे माझे मत अर्जुना || अ.१८, ओ.९||

कष्टदायक कर्माच्या करी न द्वेषास | सुखदायक कर्माची आसक्ती न ज्यास || त्या सत्त्वशील, बुद्धिमान, संशय नष्ट झालेल्या मनुष्यास | म्हणावे खरा त्यागी || अ.१८, ओ.१०||

देहधारी मनुष्यास | शक्य नसे सोडणे कर्मास ||त्यामुळे जो सोडतो कर्मफळास | तोच खरा त्यागी || अ.१८, ओ.११||

जो कर्मफळांस न सोडतो | तो मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट आणि मिश्र फळे भोगतो || परंतु तो मुक्त राहतो | ज्याने सोडले कर्मफळांना || अ.१८, ओ.१२||

सर्व कर्मांच्या सिद्धीला | सांख्यतत्त्वात सांगितले ज्या पाच कारणांला || महाबाहो, ती सांगतो तुला | ऐकून घे || अ.१८, ओ.१३||

पहिला, कर्ता, दुसरे, अधिष्ठान | तिसरे, साधने भिन्न || चौथे विविध प्रयत्न | आणि पाचवे दैव || अ.१८, ओ.१४||

शरीर, वाचा आणि चित्त | यांद्वारे जेव्हा मनुष्य करतो कर्मास सुरुवात || भले ते कर्म असो न्याय्य वा विपरीत | ही पाच कारणे असती त्यापाठी || अ.१८, ओ.१५||

वस्तुस्थिती अशी असता | जो स्वत:स मानतो कर्ता || सत्य न येई हाता | त्या मूर्खाच्या || अ.१८, ओ.१६||

अहंकारमुक्त ज्याचे मन | ज्याच्या बुद्धीस नाही आसक्तीचे बंधन || तो या लोकांना मारून | न मारतो, न बद्ध होतो || अ.१८, ओ.१७||

परिज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान | ही कर्माची प्रेरके तीन || कर्म, कर्ता आणि साधन | ही तीन अंगे कर्माची || अ.१८, ओ.१८||

प्रकृतीच्या गुणांस अनुसरून | कर्म, कर्ता आणि ज्ञान || यांचेही प्रकार तीन | तेसुद्धा ऐक आता || अ.१८, ओ.१९||

ज्या ज्ञानाने सर्व भूतांत | दिसे एकच भाव अव्यय आणि अविभक्त ||  घे लक्षात | ते ज्ञान सात्त्विक || अ.१८, ओ.२०||

ज्या ज्ञानाने येई दिसून | सर्व भूतांत भाव भिन्न ||ते ज्ञान | जाण राजस || अ.१८, ओ.२१||

ज्या ज्ञानाने मनुष्य एकाच कार्यात | विनाकारण, तत्त्व न जाणता, सर्वस्व मानून होतो आसक्त | घे ध्यानात | ते अत्यल्प ज्ञान तामस || अ.१८, ओ.२२||

नेमून दिलेले, आसक्तिरहित | प्रीती आणि द्वेषापासून मुक्त || फळाची इच्छा न ज्यात | ते कर्म सात्त्विक || अ.१८, ओ.२३||

फळाची इच्छा असे ज्यात | जे आहे अहंकारयुक्त || ज्यासाठी खटाटोपच जास्त | ते कर्म राजस || अ.१८, ओ.२४||

परिणाम, हानी, हिंसा आणि क्षमता | या साऱ्याचा विचार न करता || केवळ मोहाने कर्म आरंभता | ते म्हटले जाते तामस || अ.१८, ओ.२५||

अनासक्त, अहंकारापासून मुक्त | धैर्य आणि उत्साहाने युक्त || यश आणि अपयशाविषयी विकाररहित | तो कर्ता सात्त्विक || अ.१८, ओ.२६||

लोभी, हिंसावृत्तीचा, विषयासक्त | अपवित्र, कर्मफळाने प्रेरित || हर्ष आणि शोकाने होई विचलित | तो कर्ता राजस || अ.१८, ओ.२७||

अडाणी, हट्टी, अस्थिर | कपटी, आळशी, कामचोर || सदा दु:खी, करी पिरपिर | तो कर्ता तामस || अ.१८, ओ.२८||

बुद्धी आणि धृतीचे प्रकार | तीन गुणांनुसार ||सांगतो सविस्तर | ऐक धनंजया || अ.१८, ओ.२९||

प्रवृत्ती आणि निवृत्तीचे जिला ज्ञान | कार्य-अकार्य, भय-निर्भयता यांचे भान || कळे कशात मोक्ष वा बंधन | ती बुद्धी सात्त्विक पार्था || अ.१८, ओ.३०||

धर्म काय, अधर्म काय | कुठले कार्य, कुठले अकार्य || यांचा जिला होई न निर्णय | ती राजसी बुद्धी पार्था || अ.१८, ओ.३१||

अज्ञानाने झाकून | अधर्मास धर्म मानून || सर्व बाबतींत करी विपरीत वर्तन | ती बुद्धी तामसी || अ.१८, ओ.३२||

प्राण, इंद्रिये आणि मन | यांच्या क्रिया, स्थिरता आणि योगातून || करते धारण | ती धृती सात्त्विक || अ.१८, ओ.३३||

जिच्यामुळे माणूस | धारण करतो धर्म, काम आणि अर्थास || आणि आसक्त राहतो फळास | पार्था, ती धृती राजस || अ.१८, ओ.३४||

स्वप्न, भय, शोकास | विषाद आणि मदास || जी दुर्बुद्धी तयार नसे सोडण्यास | पार्था, ती धृती तामस || अ.१८, ओ.३५||

सुखाचे प्रकार तीन | भरतर्षभा, घे ऐकून || जे अभ्यासात राहते मग्न | आणि दु:खास संपवते -|| अ.१८, ओ.३६||

-जे विषासारखे भासे सुरुवातीस | परंतु ज्याचा परिणाम अमृतापरीस || जे आत्मबुद्धीच्या प्रसन्नतेतून येते जन्मास | ते सुख सात्त्विक || अ.१८, ओ.३७||

विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून | होते जे उत्पन्न || आरंभी अमृतासारखे, परिणामी विषासमान | ते सुख राजस || अ.१८, ओ.३८||

जे आरंभापासून अखेरपर्यंत | आत्म्याला पाडते मोहात || उगम ज्याचा निद्रा, आळस आणि प्रमादात | ते सुख तामस || अ.१८, ओ.३९||

न पृथ्वीवर, न आकाशात | किंवा अगदी देवलोकात || प्राणी न कुणी अस्तित्वात | या तीन गुणांपासून मुक्त || अ.१८, ओ.४०||

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांस | वाटून दिले कर्मांस || त्यांच्या स्वभावजन्य गुणांस | अनुसरून परंतपा || अ.१८, ओ.४१||

शम, दम, शुद्धता | सरळपणा, क्षमाशीलता || ज्ञान, विज्ञान, आस्तिकता | हे ब्राह्मणांचे स्वभाव कर्म || अ.१८, ओ.४२||

शौर्य, तेज, धैर्य, दक्षतेत | युद्धात पलायन न करण्यात || दान आणि अधिकारभावात | क्षत्रियांचे स्वभावकर्म || अ.१८, ओ.४३||

शेती, गोरक्षा, व्यापारात | वैश्यांचे कर्म स्वभावजात || सेवाशुश्रुषेत | शूद्रांचे स्वभावजात कर्म || अ.१८, ओ.४४||

आता सांगतो थोडक्यात | स्वकर्म करीत || उत्तम सिद्धी प्राप्त | कशी होते || अ.१८, ओ.४५||

करता स्वकर्मास | पूजिले जाते त्यास || ज्याने व्यापले साऱ्यास | त्यातून मिळते सिद्धी || अ.१८, ओ.४६||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म  गुणविहीन ||नेमून दिलेले स्वाभाविक कर्म करून | दोष न येई माथा || अ.१८, ओ.४७||

कौंतेया, स्वाभाविक कर्म जरी दोषयुक्त | ते सोडणे न उचित || सर्व कर्मांस दोष झाकतात |धुराप्रमाणे अग्नीस ||अ.१८, ओ.४८||

ज्याने सोडले आसक्तीस | जिंकले स्वत:स, सोडले इच्छांस || तो परम नैष्कर्म्यसिद्धीस | संन्यासातून मिळवतो || अ.१८, ओ.४९||

कौंतेया, सांगतो थोडक्यात | सिद्धी केल्यावर प्राप्त || ब्रह्मावस्थेप्रत | कसा मनुष्य पोहचतो || अ.१८, ओ.५०||

बुद्धीद्वारे विशुद्ध झालेला | धृतीने स्वतःस नियंत्रित केलेला || शब्दादि विषयांचा त्याग केलेला | मुक्त आसक्ती आणि द्वेषातून - || अ.१८, ओ.५१||

-एकांतात राहणारा, मिताहार करणारा | काया, वाचा, मनास नियंत्रित करणारा || ध्यानयोगात मग्न राहणारा | वैराग्यसंपन्न- || अ.१८, ओ.५२||

अहंकार, बल, दर्पास | काम, क्रोध आणि भौतिक सुखांस || सोडून, निर्मम आणि शांत राहणारास | ब्रह्मस्थिती प्राप्त होते || अ.१८, ओ.५३||

तो प्रसन्न आत्मा ब्रह्मरूप होतो | तो न शोक करतो, न इच्छा धरतो || सर्व भूतांशी समबुद्धीने राहतो | मिळवतो माझ्या परम भक्तीस || अ.१८, ओ.५४||

मी आहे किती महान | याचे त्याला होते ज्ञान ||मला तत्त्वत: जाणून | तो प्रवेश माझ्यात करतो || अ.१८, ओ.५५||

नेहमी करतो सर्व कर्मांस | राहून माझ्या आश्रयास || मिळवतो माझ्या कृपाप्रसादास | आणि पदास अव्यय शाश्वत || अ.१८, ओ.५६||

सर्व कर्मे मनाने मला अर्पून | माझ्याशी परायण होऊन || बुद्धियोगाने माझा आश्रय घेऊन | चित्त सतत माझ्यात ठेव || अ.१८, ओ.५७||

जर चित्त माझ्यात स्थिर करशील | तर माझ्या कृपेने सर्व संकटे तरून जाशील || अहंकाराने माझे न ऐकशील | तर पावशील नाश || अ.१८, ओ.५८||

जाऊन अहंकाराच्या आश्रयास | 'युद्ध करणार नाही' असे जे म्हणतोस || तो व्यर्थ आहे तुझा प्रयास | प्रकृती तुझ्याकडून युद्ध करवील || अ.१८, ओ.५९||

स्वत:च्या स्वभावजन्य कर्मास | कौंतेया तू बांधला आहेस || मोहाने जे न करू इच्छितोस | स्वभाववश होऊन करशील || अ.१८, ओ.६०||

अर्जुना, सर्व भूते आहेत | जणू यंत्रात || आणि त्यांना योगमायेने आहे फिरवीत | सर्वांच्या हृदयात राहणारा ईश्वर || अ.१८, ओ.६१||

भारता, सर्वभावास अनुसरून | त्याला जा शरण || मिळेल परम शांती आणि शाश्वत स्थान | त्याच्या कृपेने || अ.१८, ओ.६२||

याप्रमाणे केले तुला कथन | गूढातील गूढ ज्ञान ||त्यावर पूर्ण विचार करून | तुझ्या इच्छेप्रमाणे कर || अ.१८, ओ.६३||

हे माझे श्रेष्ठ वचन, गूढ सर्वांत | पुन्हा घे ध्यानात || तू मला प्रिय अत्यंत | म्हणून तुझ्या हिताचे सांगतो || अ.१८, ओ.६४||

माझा भक्त हो, मन माझ्यात कर स्थिर | माझा उपासक हो, मला नमस्कार कर || म्हणजे तू माझ्याकडेच येणार | तू मला प्रिय म्हणून, प्रतिज्ञेवर सत्य सांगतो तुला || अ.१८, ओ.६५||

सर्व धर्मांस सोडून | मलाच ये शरण || तुला मुक्त करीन सर्व पापांतून | नको करूस शोक || अ.१८, ओ.६६||

हे ज्ञान कधीही सांगू नये तपोहीनास | किंवा अभक्तास || अथवा ऐकण्याची इच्छा नसे ज्यास | किंवा जो माझा मत्सर करतो || अ.१८, ओ.६७||

हे श्रेष्ठ गूढ ज्ञान | जो माझ्या भक्तांना करील कथन | तो माझ्यावर परम भक्ती जडून | नि:संशय माझ्याकडेच येईल || अ.१८, ओ.६८||

सर्व मनुष्यांत त्याच्याहुनी | नसे प्रिय मला दुसरा कुणी || न तसा होईल भुवनी | भविष्यात || अ.१८, ओ.६९||

आपल्या या धर्मदायी संवादाचे अध्ययन | करील जो कोण || तो ज्ञानयज्ञाने करील मला प्रसन्न | हे माझे मत || अ. १८, ओ.७०||

जो मनुष्य श्रद्धावान आणि असूयाहीन | केवळ करील हा संवाद श्रवण || तोही जाईल मुक्त होऊन | पुण्य करणाऱ्यांच्या शुभ लोकात || अ.१८, ओ.७१||

हे पार्था, लक्ष देऊन | केलेस ना हे शास्त्र श्रवण ?नष्ट झाले का संमोह आणि अज्ञान | तुझे धनंजया? || अ.१८, ओ.७२||

अर्जुन म्हणाला 

हे अच्युता, मोह दूर झाला | तुझ्या कृपेने कर्तव्याचे स्मरण झाले मला || सिद्ध मी, संदेह दूर झालेला | तुझ्या सांगण्याप्रमाणे युद्ध करीन || अ.१८, ओ.७३||

संजय म्हणाला 

याप्रमाणे मी ऐकले | वासुदेव आणि पार्थ हे महात्मे जे अद्भुत बोलले || ते ऐकून रोमांच उभे राहिले | अंगावर माझ्या || अ.१८, ओ.७४||

व्यासांनी कृपा केली म्हणून | हा योग परम गहन || केला मी श्रवण | प्रत्यक्ष योगेश्वर कृष्णांच्या मुखातून || अ.१८, ओ.७५||

हे राजा, केशव आणि अर्जुन यांनी | केलेला हा पवित्र आणि अद्भुत संवाद आठवुनी || मी हर्षित होतो मनी | पुन्हा पुन्हा || अ.१८, ओ.७६||

महाराज, हरीचे अतिशय अद्भुत रूप ते | मला एक सारखे आठवते || मन विस्मित आणि हर्षित होते | पुन्हा पुन्हा || अ.१८, ओ.७७||

जेथे कृष्ण योगेश्वर | जेथे पार्थ धनुर्धर || तेथेच श्री, विजय, शक्ती आणि नीतीचा वास निरंतर | हे माझे मत || अ.१८, ओ.७८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘मोक्षसंन्यासयोग’ नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला.

                 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, August 19, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग

अर्जुन म्हणाला

जे सोडून शास्त्रविधीस | श्रद्धेने करतात पूजनास || कृष्णा, त्यांच्या श्रद्धेस | सात्त्विक, राजस की तामस मानावे || अ.१७, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

अनुसरून स्वभावास | देहधारी धारण करतो तीन श्रद्धांस || सात्त्विक, राजस किंवा तामस | कशा ते ऐक || अ.१७, ओ.२||

स्वभावानुसार सर्व जण | भारता, करती श्रद्धेचे पालन || मनुष्य आहे श्रद्धापूर्ण | जशी श्रद्धा, तसाच तो || अ.१७, ओ.३||

सात्त्विक भजती देवांस | राजस भजती यक्षराक्षसांस || भूत आणि प्रेतगणांस | भजती तामसी लोक || अ.१७, ओ.४||

जे लोक दंभ आणि अहंकाराने युक्त | कामवासनांत आसक्त || न सांगितलेले शास्त्रात | घोर तप करून-||अ.१७, ओ.५||

-शरीरात राहणाऱ्या मला | आणि पंचमहाभूतसमूहाला || कारण होती त्रासाला, | ते अविवेकी लोक, जाण आसुर वृत्तीचे || अ.१७, ओ.६||

या तिघांच्या आहाराची | आवड तीन प्रकारची ||तीच तऱ्हा यज्ञ, तप आणि दानाची | फरक त्यांतील ऐक || अ.१७, ओ.७||

आयुष्य, सत्त्व, बल आणि आरोग्य वाढविणारा | सुख आणि प्रीती उत्पन्न करणारा || रम्य, स्निग्ध, स्थिर आणि मन प्रसन्न ठेवणारा | आहार सात्त्विकांस आवडतो || अ.१७, ओ.८||

कडू, आंबट, खारट आणि अति उष्ण असणारा | तिखट, रुक्ष आणि दाह करणारा || दु:ख, शोक आणि रोग उत्पन्न करणारा | आहार राजसांस आवडतो ||अ.१७, ओ.९||

तीन प्रहरांपूर्वी शिजविलेले | रसहीन, दुर्गंधियुक्त, नासलेले || अपवित्र उष्टे झालेले | अन्न तामसांस आवडते || अ.१७, ओ.१०||

फळाची आशा सोडून | शास्त्रविधीस अनुसरून ||यज्ञ हेच कर्तव्य मानून आणि मन शांत ठेवून | केलेला यज्ञ तो सात्त्विक || अ.१७, ओ.११||

फळाची आशा धरून | केवळ ढोंग म्हणून ||केलेला जाण | राजस यज्ञ || अ.१७, ओ.१२||

शास्त्रविधी सोडून, न करता अन्नसंतर्पण || न देता दक्षिणा, मंत्रहीन || करता श्रद्धाविहीन | तामसी यज्ञ म्हणतात || अ.१७, ओ.१३||

शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप | देव, ब्राह्मण, गुरू, विद्वानांस पुजणे | शुद्ध राहणे, सरळ वागणे || ब्रह्मचर्य आणि अहिंसा पाळणे | यास शारीरिक तप म्हणतात || अ.१७, ओ.१४||

दुसऱ्यास ज्याने न होईल त्रास | सत्य, प्रिय, साधेल हितास || होईल स्वाध्याय आणि अभ्यास | असे बोलणे म्हणजे वाचिक तप || अ.१७, ओ.१५||

मन प्रसन्न ठेवणे, सौम्य राहणे | मौन आणि आत्मनिग्रह पाळणे || शुद्ध भाव बाळगणे | यास मानसिक तप म्हणतात || अ.१७, ओ.१६||

न इच्छिता फळास | परावर ठेवून श्रद्धेस || करता या तीन प्रकारच्या तपास | म्हणती त्यास सात्त्विक तप || अ.१७, ओ.१७||

व्हावा सत्कार, मिळावा मान, व्हावे स्वत:चे पूजन | आणि ढोंग म्हणून || केलेले तप राजस जाण | ते असते अस्थिर आणि अनिश्चित || अ.१७, ओ.१८||

दुराग्रह पूर्ण करण्यास | ज्यात स्वत:सही होई त्रास || किंवा दुसऱ्याच्या नाशास | केले जाते ते तप तामस || अ.१७, ओ.१९||

दान हे कर्तव्य मानून | परतफेडीची अपेक्षा न ठेवून || स्थळ, काळ आणि पात्रता पाहून | दिलेले दान सात्त्विक || अ.१७, ओ.२०||

परतफेड व्हावी म्हणून | फळाची अपेक्षा ठेवून ||स्वत:स त्रागा करून | दिले जाते ते राजस दान || अ.१७, ओ.२१||

अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीस | करून अपमानित त्यास || दिलेल्या दानास | तामस म्हणतात || अ.१७, ओ.२२||

'ॐ तत्सत् इति' असा ब्रह्माचा | निर्देश तीन प्रकारचा || त्यांतून ब्राह्मण, वेद आणि यज्ञांचा | उद्भव पूर्वी झाला || अ.१७, ओ.२३||

त्या कारणे ब्रह्मवादी जन | ॐकार उच्चारून ||यज्ञ, तप, दान | या शास्त्रोक्त क्रिया आरंभती || अ.१७, ओ.२४||

मोक्ष इच्छिणारे जन | फळाची इच्छा सोडून || 'तत्' शब्दाचा उच्चार करून | यज्ञ, तप, दान अशा क्रिया करती || अ.१७, ओ.२५||

सद्भाव आणि साधुभाव दाखवण्यास | तसेच प्रशस्त कर्माच्या निर्देशास || येतो उपयोगास | 'सत्' हा शब्द पार्था || अ.१७, ओ.२६||

यज्ञ, तप आणि दान देणे | तसेच त्यांसाठी कर्म करणे || या सर्वांस एकत्रितपणे | 'सत्' असेच म्हणतात || अ.१७, ओ.२७||

श्रद्धेवाचून केलेले तप, कर्म, हवन | आणि दिलेले दान || पार्था, हे सारे 'असत्' जाण | इहलोकात वा परलोकात ते न उपयोगी || अ.१७, ओ.२८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘श्रद्धात्रयविभागयोग ’ नावाचा सतरावा अध्याय पूर्ण झाला.

              || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, August 18, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १६-दैवासुरसम्पद्विभागयोग

श्रीभगवान म्हणाले 

सत्त्वशुद्धी, निर्भयता | ज्ञानयोगात मग्नता || दम, यज्ञ, दानशीलता | स्वाध्याय, तप, सरळपणा-|| अ.१६, ओ.१||

-अहिंसा, शांती, क्रोधहीनता | त्याग, दोषदृष्टीचा अभाव, सत्यशीलता || भूतदया, लोभहीनता | मृदुता, चंचलतेचा अभाव-||अ.१६, ओ.२||

-तेज, धैर्य, क्षमाशीलता | द्रोह, अभिमानाचा अभाव आणि शुद्धता || हे त्याचे गुण भारता | जो दैवी संपत्तीसहित जन्मतो || अ.१६, ओ.३||

दंभ, दर्प, अभिमान | क्रोध, कठोरता आणि अज्ञान || हे आहेत त्याचे गुण | जो आसुरी संपत्तीसहित जन्मतो || अ.१६, ओ.४||

दैवी संपत्ती देते मोक्षास | आसुरी संपत्ती होते कारण बंधनास || पांडवा, तू दैवी संपत्ती घेऊन  जन्मलास | तेव्हा शोक सोडून दे || अ.६, ओ.५||

भूतांचे दोन प्रकार | एक दैवी तर दुसरे आसुर ||दैवी भूतांचा याआधी केला विस्तार | आता पार्था ऐक आसुरांबद्दल || अ.१६, ओ.६||

प्रवृत्ती आणि निवृत्ती | आसुर जन न जाणती ||नसे त्यांना क्षिती | शुद्धता, आचार किंवा सत्याची || अ.१६, ओ.७||

ईश्वर नाही जगात | जग आहे असत्य, प्रतिष्ठाविरहित || परस्परसंबंध नसे त्यात | त्यास कामपूर्तीशिवाय अन्य हेतू नाही || अ.१६, ओ.८||

असा दृष्टिकोन स्वीकारून | अहितकारी, उग्र कर्मे करून || हे अल्पबुद्धी, स्वत:चा नाश ओढवून | जगाच्या नाशास सिद्ध होती ||अ.१६, ओ.९||

तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन | दंभ, अभिमान, मद, अशुद्धता यांनी युक्त होऊन ||मोहाने अयोग्य गोष्टींचा आग्रह धरून | ते वर्तन करतात || अ.१६, ओ.१०||

वाहणे आमरणांत | चिंता अपरिमित || राहणे कामतृप्ती आणि उपभोगात रत | एवढेच त्यांनी ठरवले || अ.१६, ओ.११||

शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध होऊन | काम आणि क्रोधात होऊन परायण || काम आणि भोगांचे करण्या समाधान | अन्यायाने धनसंचय इच्छितात || अ.१६, ओ.१२||

‘मी आज मिळवले यास | पूर्ण करीन त्या मनोरथास || मिळवले या धनास | ते धनही माझे होईल || अ.१६, ओ.१३||

मी मारले या शत्रूस | मारीन त्या दुसऱ्यास || मी ईश्वर, मी भोगी खास | मी सिद्ध, बलवान आणि सुखी || अ.१६, ओ.१४||

पुष्कळ माझे गणगोत, आहे मी धनसंपन्न | नाही कोणी माझ्यासमान || यज्ञ करीन, दान देईन, ऐष करीन’ | असे म्हणणारे अज्ञानविमोहित,- || अ.१६, ओ.१५||

-अनेक विचारांनी भ्रमित झालेले, | मोहजालात गुंतलेले, || कामभोगात आसक्त झालेले | हे जन अशुद्ध नरकात पडतात || अ.१६, ओ.१६||

गर्विष्ठ आणि आत्मकेंद्रित | धन, मान, मदाने उन्मत्त || दांभिकपणे, नावासाठी यज्ञ करतात | विधीला सोडून || अ.१६, ओ.१७||

असे अहंकार, बल आणि दर्प त्यांच्यात | असती काम आणि क्रोधाने युक्त || सर्वांच्या देहात | राहणाऱ्या माझा द्वेष करती || अ.१६, ओ.१८||

ते द्वेष्टे, क्रूर | अशुभ आणि अधम नर || त्यांना संसारातील योनींत आसुर | निरंतर मी पाठवतो || अ.१६, ओ.१९||

जन्मोजन्मी आसुरी योनींस | जावे लागते त्या मूढांस || जातात अधम गतीस | माझी प्राप्ती न होता कौंतेया || अ.१६, ओ.२०|| 

काम, क्रोध, लोभ यांच्या रूपात | आहे नरकाचे त्रिविध द्वार साक्षात || करते आपला घात | म्हणून त्या तिघांस सोडावे || अ.१६, ओ.२१||

तमरूप या तीन द्वारांपासून | कौंतेया, जो नर जातो सुटून || तो करतो आत्महितकारी वर्तन | आणि जातो परम गतीस || अ.१६, ओ.२२||

जो शास्त्रविधीस सोडून | वागतो इच्छांस अनुसरून || तो बसतो सिद्धी गमावून | त्यास न मिळे सुख, न परम गती || अ.१६, ओ.२३||

म्हणून प्रमाण मानून शास्त्रास | ठरवावे कार्य किंवा अकार्यास || जाणून शास्त्रातील विधानांस | कर्म करणे योग्य आहे  || अ.१६, ओ.२४ ||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘दैवासुरसम्पद्विभागयोग’ नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला.

               || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Wednesday, August 6, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग

श्रीभगवान म्हणाले

आहे तो एक अव्यय पिंपळ | ज्याच्या शाखा खाली आणि वर मूळ || छंद हीच ज्याची पाने पुष्कळ | त्यास जो जाणतो, तो खरा जाणता || अ.१५, ओ.१||

विषयांनी पालवलेल्या, पोसलेल्या गुणांवर | शाखा त्याच्या पसरल्या खालीवर || मुळांचा झाला खाली विस्तार | कर्मापाठी बांधलेल्या मनुष्यलोकात- || अ.१५, ओ.२||

-उपलब्ध न होई या लोकात | त्याचे रूप, त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचा आदि-अंत. || छेदून असंगशस्त्राने मजबूत | हा दृढमूल पिंपळ- || अ.१५, ओ.३||

-पोहचावे त्या पदाप्रत | जेथे गेलेले न येती परत- || -त्या आद्य पुरुषापर्यंत, | ज्यापासून पुरातन प्रवृत्ती प्रसवली. || अ.१५, ओ.४||

जे आहेत आसक्ती, अभिमान आणि मोहापासून विरक्त | झाले इच्छांतून निवृत्त, सुख-दु:खांच्या द्वंद्वातून मुक्त || असती नित्य अध्यात्मात रत | ते ज्ञानी जातात त्या पदास || अ.१५, ओ.५||

सूर्य, चंद्र व अग्नीच्या तेजात | न होई जे  प्रकाशित || जेथे जाऊन न येती परत | ते माझे परम धाम || अ.१५, ओ.६||

जीवलोकातील जीवभूत | आहे माझाच अंश शाश्वत || परी तो होतो आकर्षित | प्रकृतिस्थित मनासहित सहा इंद्रियांस || अ.१५, ओ.७ ||

जीवभूत जेव्हा शरीर मिळवतो | किंवा शरीर सोडून जातो || तेव्हा मन आणि इंद्रियांस सोबत नेतो | जसा वायू गंधांस नेतो उगमापासून || अ.१५, ओ.८||

श्रोत्र, स्पर्शेंद्रिय आणि नयन | रसना, घ्राणेंद्रिय आणि मन || यांत करून अधिष्ठान | जीवभूत विषय उपभोगतो || अ.१५, ओ.९||

हा जीवभूत दिसत नाही मूढांना | तो दिसतो ज्ञानचक्षूंना || स्थितीत असताना, उपभोग घेताना | गुणांपाठी जाताना आणि शरीर सोडून जाताना || अ. १५, ओ.१०||

योगी प्रयत्नरत | पाहती अंतरातील जीवभूत ||नाही तो दिसत | आत्म्यास न जाणणाऱ्या बुद्धिहीनांस || अ.१५, ओ.११||

जे प्रकाशित करते जगत अखिल | ते तेज आदित्यातील || तसेच चंद्र आणि अग्नीतील | तेज माझेच जाण || अ.१५, ओ. १२||

भूमीत मी शिरून | माझ्या ओजाने करतो भूतांस धारण || औषधींचे करतो पोषण | होऊन सोम रसात्मक || अ.१५, ओ.१३||

मी वैश्वानर रूपात | प्राण्यांच्या देहात आश्रित ||प्राण आणि अपानाने युक्त | पचवितो चतुर्विध अन्नास || अ.१५, ओ.१४||

मी सर्वांच्या हृदयांत करतो वास | उपजवितो स्मृती, ज्ञान, विस्मृतीस || मी योग्य, वेदांनी जाणण्यास | वेदांचा कर्ता आणि वेद जाणणारा मीच || अ.१५, ओ.१५||

दोन पुरुष या लोकांत | त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात || सारी भूते क्षर आहेत | कूटस्थ आहे अक्षर || अ.१५, ओ.१६||

उत्तम पुरुष आहे याहून | जो ओळखला जातो परमात्मा म्हणून || त्रैलोक्यात शिरून करतो पोषण | तो अव्यय ईश्वर || अ.१५, ओ.१७||

अक्षरापलीकडे माझे स्थान | मी उत्तम अक्षराहून || मी ओळखला जातो पुरुषोत्तम म्हणून | लोकांत आणि वेदांत || अ.१५, ओ.१८||

मला जाणतो जो ज्ञानी | पुरुषोत्तम म्हणुनी || तो अनन्य होउनी | मला भजतो भारता || अ. १५, ओ.१९||

असे हे शास्त्र अतिगहन | अनघा, केले तुला कथन || ते जाणून बुद्धिमान | कृतकृत्त्य होवो भारता || अ.१५, ओ.२०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘पुरुषोत्तमयोग’ नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला

                 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, August 5, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग

श्रीभगवान म्हणाले

ज्ञानातील उत्तम ज्ञान | पुन्हा करतो कथन || मुनी ज्यास जाणून | गेले परम सिद्धीस || अ.१४, ओ.१||

या ज्ञानाचा आश्रय घेऊन | जे झाले माझ्या समान || उत्पत्तिसमयीही न होती उत्पन्न | प्रलयात न होती व्यथित || अ.१४, ओ.२||

भारता, हे ब्रह्म महान | माझ्यासाठी योनिस्थान ||गर्भ त्यात स्थापून | मी निर्मितो भूतांस || अ.१४, ओ. ३||

कौंतेया, सर्व योनींतून | मूर्ती ज्या होती उत्पन्न ||ब्रह्म हेच त्यांचे महान योनिस्थान | बीजदाता मी पिता || अ.१४, ओ.४||

सत्त्व, रज, तम गुण | प्रकृतीपासून होऊन उत्पन्न || देहात टाकती बांधून | अव्यय आत्म्यास महाबाहो || अ.४, ओ.५||

त्यांत निर्मळ सत्त्वगुण | प्रकाशदायी दोषहीन ||तरी सुख आणि ज्ञानाच्या ओढीतून | अनघा, तोही जीवास बांधतो || अ.१४, ओ.६||

रजोगुण जन्मतो इच्छांतून | तृष्णा आणि भोगांतून || कर्माच्या आसक्तीतून | जीवास बांधतो कौंतेया || अ.१४, ओ. ७||

तमोगुण जन्मतो अज्ञानातून | जीवांस मोहात टाकून || प्रमाद, आळस, निद्रा यांतून | जीवास बांधतो भारता || अ.१४, ओ.८||

सत्त्वगुण बांधतो सुखात | रजोगुण बांधतो कर्मात || तमोगुण बांधतो प्रमादात | झाकून ज्ञानास || अ.१४, ओ.९||

कधी सत्त्व, रज आणि तमावर | कधी रज, सत्त्व आणि तमावर || कधी तम, रज आणि सत्त्वावर | मात करती भारता || अ.१४, ओ.१०|| 

जेव्हा देहाच्या सर्व द्वारांतून | ज्ञानाचा प्रकाश येतो उजळून || तेव्हा वाढला सत्त्वगुण | असे म्हणती || अ.१४, ओ.११||

रजोगुणाची होता उत्पत्ती | अनियंत्रित कर्माकडे वळे प्रवृत्ती || लोभ सुटे, इच्छा होती | हे भरतर्षभा || अ.१४, ओ.१२||

तमोगुण वाढता | दाटे अज्ञानाचा अंधःकार, येई निष्क्रियता || घडती प्रमाद, मोह होई चित्ता | जाण कुरुनंदना || अ.१४, ओ.१३||

सत्त्वगुणाच्या प्रभावात | होतो ज्याचा देहपात ||त्यास होतो प्राप्त | ज्ञानी जनांचा निर्मल लोक || अ.१४, ओ१४||

रजोगुणात होता देहपात | जन्म मिळे कर्मासक्त लोकांत || होता देहपात तमोगुणात | मूढ योनीत होई जन्म  || अ.१४, ओ.१५||

सात्त्विक, निर्मळ - सत्कर्मास | दु:ख - राजसी कर्मास || अज्ञान - तामसी कर्मास | अशी कर्माची फळे प्राप्त होती || अ.१४, ओ.१६||

सत्त्वगुणातून ज्ञान | लोभ रजोगुणातून ||तमोगुणातून प्रमाद, मोह आणि अज्ञान | उत्पन्न होतात || अ.१४, ओ.१७||

सत्त्वस्थांस मिळे ऊर्ध्वगती | राजस मध्येच थांबती || अधोगतीस जाती | हीनवृत्तीचे तामसी || अ.१४, ओ.१८||

ज्यास होते ज्ञान | की सर्व काही करवितात गुण ||तो गुणांपलीकडील परास जाणून | माझ्या भावास पोहचतो || अ.१४, ओ.१९||

देहापासून उत्पन्न होणारे हे तीन गुण | जेव्हा देही जातो ओलांडून || तेव्हा तो जन्म, मृत्यू, म्हातारपण यांच्या दु:खातून | मुक्त होऊन अमृत मिळवतो || अ.१४, ओ.२०||

अर्जुन म्हणाला

ज्याने केले या गुणांस पार | प्रभो, काय त्याची लक्षणे, कसा त्याचा आचार || कथन मला कर | कसा तो तीन गुणांस पार करतो || अ.१४, ओ.२१||

श्रीभगवान म्हणाले

प्रवृत्ती, मोह आणि ज्ञानाचा प्रकाश | यांचा जो न धरी अभिलाष || नच करी द्वेष | ते उत्पन्न होता पांडवा- || अ.१४, ओ.२२||

-जो तटस्थ राहुनी | न विचलित होई गुणांनी || गुण वर्तती आपल्या स्थानी | हे जाणून क्षोभ न पावतो- || अ.१४, ओ.२३||

-सुख आणि दु:ख समान | एकच माती, दगड आणि कांचन || सारखे प्रिय-अप्रिय, निंदा-स्तवन | ज्या धैर्यवान पुरुषास- || अ.२४, ओ.२४||

-सारखे ज्यास मान-अपमान | मित्र-शत्रू ज्यास समान || सकाम कर्मांचा आरंभ दिला त्यागून | त्यास गुणातीत म्हणतात || अ.२४, ओ.२५||

जो निष्ठा आणि भक्तियोग अवलंबतो | आणि माझी सेवा करतो || तो गुणांस उल्लंघतो | आणि पावतो ब्रह्मपदास || अ.१४, ओ.२६||

अमृताचे, अव्ययाचे, | शाश्वत धर्माचे || आणि ब्रह्मस्वरूपाचे | अंतिम निधान आहे मी || अ.१४, ओ.२७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘गुणत्रयविभागयोग’ नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला

                || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, August 4, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १३-क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

अर्जुन म्हणाला

काय आहे पुरुष आणि प्रकृती | क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ कोणास म्हणती || ज्ञान आणि ज्ञेयात फरक कसा करती | केशवा, हे जाणू इच्छितो || अ.१३, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

क्षेत्र म्हणती या शरीरास I आणि जो जाणतो क्षेत्रास II विद्वान त्यास I क्षेत्रज्ञ म्हणती कौंतेया II अ. १३, ओ.२II

क्षेत्रांचा संपूर्ण | मी क्षेत्रज्ञ आहे जाण || क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान | खरे ज्ञान भारता || अ.१३, ओ.३||

क्षेत्र, जे आणि जसे असते | ज्यातून जसे बदलते || तो कोण ज्याच्यामुळे प्रभावित होते | ते थोडक्यात सांगतो || अ.१३, ओ.४||

हे ज्ञान निरनिराळ्या छंदांतून | ब्रह्मसूत्रपदांतून ||निश्चित कार्यकारणभावांतून | विविध ऋषींनी गाइले || अ.१३, ओ.५||

पंचमहाभूते आणि अहंकाराचा | बुद्धी आणि अव्यक्ताचा || अकरा इंद्रियांचा | आणि पाच इंद्रियविषयांचा- || अ.१३, ओ.६||

-इच्छा आणि द्वेषाचा I सुख आणि दु:खाचा II चेतना आणि धैर्याचा I समावेश क्षेत्रात II अ. १३, ओ. ७ II

विनम्रता आणि अदांभिकतेचा | अहिंसा, सहनशीलता आणि सरळपणाचा || आचार्यांची उपासना आणि शुद्धतेचा | स्थैर्य आणि आत्मनिग्रहाचा- || अ.१३, ओ.८||

-इंद्रियविषयांच्या त्यागाचा | वैराग्य आणि निरहंकाराचा || दु:खदोष जाणण्याचा | जन्म, मृत्यू, वृद्धता आणि व्याधी हाच- || अ.१३, ओ.९||

-पुत्र, पत्नी, घर इत्यादीविषयी अनासक्तीचा | आणि असंगाचा || सदैव समचित्त असण्याचा | इष्ट आणि अनिष्टाविषयी- || अ.१३, ओ.१०||

-माझ्यावर अनन्यभावाचा | आणि अढळ भक्तीचा || एकांत ठिकाणी राहण्याचा | सामान्य जनांत रुची नसण्याचा- || अ. १३, ओ.११||

-अध्यात्मज्ञान शाश्वत मानण्याचा | तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा || न इतर कशाचा | समावेश खऱ्या ज्ञानात || अ.१३, ओ.१२||

सांगतो आता ज्ञेय काय ते | ज्याच्या ज्ञानाने अमृतप्राप्ती होते || न सत् न असत् बोलले जाते | ते अनादि श्रेष्ठ ब्रह्म || अ.१३, ओ.१३||

हात, पाय आणि नेत्र | शिरे, मुखे आणि श्रोत्र ||आहेत त्यास सर्वत्र | सर्वांस व्यापून आहे ते || अ.१३, ओ.१४||

त्यात होई सर्व गुणांचा भास | जरी नाहीत इंद्रिये त्यास || अनासक्त ते पोसते सर्वांस | निर्गुण असून गुणांस भोगते || अ.१३, ओ. १५||

ते वसते भूतांच्या आत आणि बाहेर | आहे चर आणि अचर || सूक्ष्म असल्याने जाणण्यास दुस्तर | आहे जवळही आणि दूरही || अ.१३, ओ. १६||

भूतांत अविभक्तपणे असते | जरी जीवांत विभक्त भासते || जरी भूतांस पोसते | तरी त्यांस ग्रासते आणि पुन्हा निर्मिते || अ.१३, ओ.१७||

ते तेज तेजांमधील | आहे अंधाराच्या पैल || ज्ञान, ज्ञेय, ज्ञानगम्य, अखिल- | -जीवांच्या हृदयात वसते || अ.१३, ओ.१८||

असे मी तुला थोडक्यात केले कथन | काय क्षेत्र, काय ज्ञेय, काय ज्ञान || माझा भक्त हे जाणून | माझ्या भावास पोहचतो || अ.१३, ओ.१९||

पुरुष आणि प्रकृती | दोन्ही अनादि असती ||विकार आणि गुण उद्भवती | प्रकृतीपासून || अ.१३, ओ.२०||

कार्य आणि कारण | उद्भवतात प्रकृतीपासून ||पुरुष करतो निर्माण | सुख-दु:खाचा भोग || अ.१३, ओ.२१||

प्रकृतीत करून वास | पुरुष भोगतो प्रकृतीच्या गुणांस || आणि पावतो सत्-असत् योनीस | गुणसंगाकारणे || अ.१३, ओ.२२||

या देहात श्रेष्ठ पुरुष राहतो | तो महान ईश्वर आहे, परमात्मा म्हटला जातो || जो जवळून पाहतो, अनुमती देतो | करतो पोषण, घेतो भोग || अ.१३, ओ.२३||

ज्यास आहे ज्ञात | पुरुष आणि प्रकृती, त्यांच्या गुणांसहित || तो सर्वथा राहूनही कार्यान्वित | पुन्हा जन्मास न येतो || अ.१३, ओ.२४||

कुणी पाहती ध्यानाने | कुणी पाहती सांख्य-योगाने || इतर पाहती कर्म-योगाने | आत्म्याने आत्म्यास आत्म्यात || अ.१३, ओ.२५||

काही जाणते नसून | उपासना करती इतरांचे ऐकून || तेही मृत्यूस जाती ओलांडून | श्रुतिपरायण || अ.१३, ओ.२६||

स्थावर-जंगम होते निर्माण | क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगातून || हे घे जाणून | भरतर्षभा || अ.१३, ओ.२७||

सर्व विनाशी भूतांस समान | अविनाशी परमेश्वर आहे व्यापून || ज्यास येते असे दिसून | त्यास खरे दिसते || अ.१३, ओ.२८||

जो पाहतो त्या परमेश्वरास | समत्वाने व्यापणाऱ्या सर्वांस || तो न जाई अधोगतीस | परम गतीस पावतो || अ.१३, ओ.२९||

प्रकृती करविते कर्मांस | ही जाण आहे ज्यास ||तो जाणतो अकर्त्या आत्म्यास | यथार्थपणे || अ.१३, ओ.३०||

जेव्हा भूतांत भिन्न | येई एकच आत्मा दिसून ||त्याचाच हा विस्तार, हे होई ज्ञान | तेव्हा ब्रह्म प्राप्त होते || अ.१३, ओ.३१||

परमात्मा अनादि आणि निर्गुण | असल्याने अव्यय जाण || कौंतेया, तो शरीरात राहून | न काही करतो, न कशात गुंततो || अ.१३, ओ.३२||

अलिप्त राहतो, जसे राहून सर्वांत | सूक्ष्म असल्याने आकाश न होते लिप्त || तसा सर्वत्र राहून देहात | आत्मा अलिप्त राहतो || अ.१३, ओ.३३||

रवी एकच आकाशात | उजळतो सारे जगत ||तसा क्षेत्री प्रकाशित | क्षेत्रास करतो भारता || अ. १३, ओ.३४||

जे ज्ञानचक्षूंनी जाणती | क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची भिन्न स्थिती || ते भूत आणि प्रकृतीपासून मोक्ष जाणती | जाती परम गतीस || अ.१३, ओ.३५||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग’ नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला

              || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Friday, August 1, 2025

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२-भक्तियोग

अर्जुन म्हणाला

याप्रमाणे जे भक्त तुला भजतात | होऊन सतत भक्तियुक्त || आणि जे भजतात अक्षर अव्यक्त | त्यांतील योगज्ञानी कोण || अ.१२, ओ.१ ||

श्रीभगवान म्हणाले

मन स्थिर करून माझ्यात | होऊन दिव्य श्रद्धेने युक्त || जे नित्य मला भजतात | ते सर्वांत योग्य वाटतात मला || अ.१२, ओ.२||

परंतु जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्ताची | सर्वत्रगम, अचिंत्याची || कूटस्थ, अचल, ध्रुवाची | करतात  उपासना- || अ.१२, ओ.३||

-इंद्रियांचे संयमन करून | सर्वत्र समबुद्धी ठेवून ||सर्व भूतांच्या हिताशी समरस होऊन | तेही मलाच मिळतात || अ. १२, ओ.४||

अव्यक्तात ज्यांची बुद्धी आसक्त | ते अधिक क्लेश भोगतात || देहवंतास अव्यक्त | कष्टाने प्राप्त होते || अ.११, ओ.५||

परंतु जे सर्व कर्मे मला अर्पितात | माझ्याशी परायण होतात || आणि माझे ध्यान करून उपासना करतात | अनन्य योगाने- || अ.१२, ओ.६||

-त्यांना मी त्वरित नेतो उद्धरून | मृत्युसंसारसागरातून | स्थिर केले मन | ज्यांनी माझ्यात || अ.१२, ओ. ७||

माझ्यात स्थिर कर मनास | माझ्यात नियुक्त कर बुद्वीस || त्यायोगे करशील वास | माझ्यात नि:संशय || अ.१२, ओ.८||

मन स्थिर करणे माझ्यात | जर नसेल शक्य होत || तर मला कर प्राप्त | अभ्यासयोगाने धनंजया || अ. १२, ओ.९||

अभ्यासही नसेल साधत | तर परायण हो कर्मात || सिद्धी करशील प्राप्त | कर्मे करून माझ्यासाठी || अ.१२, ओ.१०||

माझ्यासाठी कर्म करण्यास | जर असमर्थ असलास || तर त्याग सर्व कर्मांच्या फळास | आणि हो आत्मवान || अ.१२, ओ.११|| 

अभ्यासापेक्षा बरे ज्ञान | ज्ञानाहून चांगले ध्यान ||कर्मफलत्याग श्रेष्ठ ध्यानाहून | त्या त्यागातून मिळे शांती || अ. १२, ओ.१२||

जो द्वेष न करी सर्व भूतांचा | आहे कृपाळू मित्र त्यांचा || आहे निर्मम, स्पर्श न ज्यास अहंकाराचा | सुखदु:खांप्रति मानतो समभाव || अ.१२, ओ.१३||

जो संतुष्ट आहे, साधतो योग सतत | जो दृढनिश्चयी आहे, आत्म्यास करतो संयमित || जो मन आणि बुद्धीने आहे मला अर्पित | तो भक्त मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१४||

लोकांना जो उद्वेग न देतो | लोकांमुळे जो न उद्विग्न होतो || हर्ष, दु:ख, भय, उद्वेग यांपासून मुक्त तो | मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१५||

निरपेक्ष, दक्ष, शुचिर्भूत | उदासीन, होई न व्यथित || सर्व प्रयासांपासून मुक्त | असा भक्त मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१६||

ज्यास न होई हर्ष, जो न करी द्वेषास | नाही ज्यास इच्छा, न होई दु:ख ज्यास || त्यागिले ज्याने शुभ आणि अशुभास | तो भक्त मला प्रिय आहे || अ.१२, ओ.१७||

शत्रू आणि मित्र ज्यास समान | त्याचप्रमाणे मान आणि अपमान || शीतता वा उष्णतामान | आणि संग ज्याने सोडिला || अ. १२, ओ.१८||

निंदा-स्तुति ज्यास समान, जो राखतो मौन | मिळेल त्यात मानतो समाधान || ज्याचे न घर, आहे स्थिरमती, भक्तिमान | तो नर प्रिय मला || अ.१२, ओ.१९||

हे धर्मामृत | सांगितल्याप्रमाणे आचरतात || ते श्रद्धावान, माझ्याशी परायण भक्त | अतिशय प्रिय मला || अ.१२, ओ.२०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘भक्तियोग ’ नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला.

                || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Thursday, July 31, 2025

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ११ – विश्वरूपदर्शनयोग

अर्जुन म्हणाला

माझ्यावर कृपा करून | केलेस तू कथन || गूढ अध्यात्मज्ञान | त्याने मोह दूर झाला || अ.११, ओ.१||

विस्ताराने केले कथनास | भूतांच्या उत्पत्ती तसेच लयास  || आणि तुझ्या अव्यय माहात्म्यास | हे कमलपत्राक्षा || अ.११, ओ.२||

परमेश्वरा, तू जसे वर्णिले स्वत:स | तसाच मला दिसतोस || परंतु तुझ्या ऐश्वर रूपास | पाहण्या मी इच्छितो  || अ. ११, ओ.३||

प्रभो, तुझे रूप पाहण्याला | जर वाटतो मी योग्य तुला || तर तुझे अव्यय रूप मला | दाखवावे योगेश्वरा || अ. ११, ओ. ४ ||

श्रीभगवान म्हणाले

शेकड्यांत आणि सहस्रांत | नानाविध प्रकारांत ||नानाविध रंगांत आणि आकारांत | पार्था, माझी दिव्य रूपे पहा || अ.१, ओ.५||

आदित्यांना, वसूंना, रुद्रांना | अश्विनीकुमारांना आणि मरुद्गणांना || तसेच पूर्वी न पाहिलेल्या आश्चर्यांना | पाहून घे भारता || अ.१, ओ.६||

गुडाकेशा, देहात माझ्या | पहा चराचर जगास साऱ्या || इच्छितोस आणखी जे पाहण्या | तेही घे पाहून || अ.१, ओ.७ ||

चक्षूंनी स्वत:च्या | समर्थ नाहीस तू पाहण्या ||माझा ऐश्वर योग पाहण्या | दिव्य चक्षू देतो तुला || अ.१, ओ.८||

संजय म्हणाला 

हे राजा, तेव्हा असे बोलुनी | महायोगेश्वर हरींनी ||पार्थास दिले दाखवुनी | परम ऐश्वर रूप || अ.११, ओ.९||

अनेक मुखे, अनेक नयनांनी युक्त | अनेक दर्शनांनी युक्त || अनेक आभरणांनी अलंकृत | अनेक दिव्य आयुधांनी सिद्ध- || अ.११, ओ.१०||

-दिव्य माळा आणि वस्त्रांनी युक्त | लावून उटणे दिव्य सुगंधित || देव आश्चर्यकारक अत्यंत | अनंत विश्वव्यापक || अ.११, ओ. ११||

प्रकटता सहस्र सूर्य आकाशात | जे तेज दिसून येत || तशा तेजाने तळपत | होता तो महात्मा || अ.११, ओ.१२||

तेव्हा पांडवाने पाहिले सारे जगत | जे विभागले अनेक भागात || त्या देवांच्या देवाच्या शरीरात | एकाच ठिकाणी || अ.११, ओ.१३||

तेव्हा धनंजय होऊन विस्मित | आणि रोमांचित ||बोलला जोडून हात | नमवून शिरास || अ.११, ओ.१४||

अर्जुन म्हणाला 

सर्व देवांचे आणि भूतांचे | कमलासनस्थ ब्रह्मदेवाचे || ऋषींचे आणि दिव्य नागांचे | देवा, तुझ्या देहात दर्शन होते || अ.११, ओ.१५||

अनेक नेत्र, मुखे, उदर आणि हात | दिसतात तुझ्या सर्वव्यापी अनंत रूपात || परी दिसे न तुझा आदि, मध्य किंवा अंत | हे विश्वेश्वरा, विश्वरूपा || अ. ११, ओ.१६||

किरीट, गदा आणि चक्र धारण करणारा |दीप्तिमान, तेजाने तळपणारा || प्रज्वलित अग्नी किंवा सूर्यासम प्रकाशणारा | तुला पाहणे कठीण || अ.११, ओ.१७ ||

तू अक्षर, श्रेष्ठ, योग्य जाणण्यास | तू श्रेष्ठ आधार या विश्वास || तू अव्यय, रक्षितोस शाश्वत धर्मास | तू सनातन पुरुष मला वाटतोस || अ. ११, ओ. १८ ||

आदि, मध्य आणि अंत नसणारा | अनंतवीर्य, अनंतबाहू, चंद्रसूर्य हेच नेत्र असणारा | प्रदीप्त अग्नीने युक्त मुख असणारा | स्वतेजाने या विश्वास तप्त करणारा दिसतोस || अ.११, ओ.१९||

व्यापलेस अंतर आकाश आणि पृथ्वीमधील | तू व्यापिल्यास दिशा सकल || महात्म्या, त्रैलोक्य झाले व्याकुल | अद्भुत, उग्र रूप तुझे पाहून || अ.११, ओ.२०||

सुरसंघ तुझ्यात प्रवेश करती | काही भीतीने हात जोडून स्तवन करती || महर्षी आणि सिद्ध 'स्वस्ति' म्हणती | आणि करती स्तुती तुझी || अ.११, ओ.२१||

रुद्र, वसू आणि भास्कर | विश्वेदेव, अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितर || गंधर्व, यक्ष, सिद्ध आणि असुर | विस्मयाने पाहती तुला || अ.११, ओ. २२||

हे महाबाहो, रूप तुझे विशाल | ज्यास आहेत मुखे, नेत्र, बाहू, मांड्या आणि पाय पुष्कळ | अनेक उदर आणि दाढांमुळे जे दिसते कराल | पाहून लोक आणि मीही झालो व्याकुळ || अ. ११, ओ. २३||

तू नभास स्पर्शतोस, तुझे तेजस्वी वर्ण बहुत | तू वासलेस मुख, तुझे विशाल नेत्र प्रदीप्त || तुला पाहून अंतरी झालो व्यथित | हे विष्णो, मला न धैर्य, न शांती || अ.११, ओ.२४||

कालाग्नीच्या समान | कराल दाढा असलेली तुमची मुखे पाहून || न वाटते सुरक्षित, न राहिले दिशांचे भान | देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न हो || अ.११, ओ.२५ ||

हे धृतराष्ट्राचे सुत | साऱ्या राजांच्या सहित | भीष्म, द्रोण, सूतपुत्र उपस्थित | आणि आमचेही मुख्य योद्धे- || अ. ११, ओ.२६ ||

-भयानक कराल दाढांनी युक्त | तुमच्या मुखांत त्वरेने शिरतात | काहींची मस्तके अडकून दाढांत | चुराडा झालेली दिसती || अ . ११, ओ. २७||

जसे नदीचे प्रवाह वेगात | समुद्राच्या दिशेने वाहतात || तसे हे नरवीर होऊन प्रज्वलित | तुझ्या मुखांत प्रवेश करतात || अ.११, ओ.२८|| 

जसे पतंग वेगात | नाश पावण्या शिरतात प्रदीप्त अग्नीत || तसे लोक तुझ्या मुखांत वेगात शिरतात | नाश पावण्या || अ.११, ओ.२९||

तुझ्या जळत्या मुखांनी | सर्व लोकांस गिळत आहेस चाटुनी || विष्णो, तुझे तेज सारे जग व्यापुनी | उग्र किरण जगास ताप देती || अ. ११, ओ. ३०||

उग्ररूप आपण कोण ते करावे कथन | देववरा, प्रसन्न व्हा, मी करतो नमन || तुम्हास जाणू इच्छितो, तुम्ही आदिकारण | प्रवृत्त कशास मी न जाणतो || अ.११, ओ.३१||

श्रीभगवान म्हणाले

लोकांचा क्षय करणारा मी काळ थोर | प्रवृत्त आहे करण्या लोकांचा संहार || नाश पावतील हे सारे वीर | केवळ तुझ्याशिवाय || अ.११, ओ.३२||

तेव्हा ऊठ, मिळव यशास | समृद्ध राज्य उपभोग, जिंकून शत्रूंस || मीच मारले पूर्वी या सर्वांस | हे सव्यसाची, तू निमित्तमात्र हो || अ.११, ओ.३३||

द्रोण, भीष्म आणि जयद्रथ यांस | कर्ण तसेच अन्य वीरांस || मी मारले आहे, तू व्यथित न होता मार त्यांस | शत्रूंवर विजय मिळवशील || अ.११, ओ.३४||

संजय म्हणाला 

केशवाचे हे वचन ऐकून | हात जोडलेला, थरथर कापणारा अर्जुन || अत्यंत भ्यालेला, सद्गदित होऊन | कृष्णास असे बोलला || अ. ११, ओ. ३५ ||

अर्जुन म्हणाला

हृषीकेशा, ऐकून तुझ्या कीर्तीस | आनंद होतो साऱ्या जगास || राक्षस भिऊन धावती सर्व दिशांस | सारे सिद्ध नमन करती || अ. ११, ओ. ३६ ||

का करू नये त्यांनी नमन तुम्हास | ब्रह्मदेवाहून श्रेष्ठ आदिकर्त्यास || तुम्ही अनंत, देवेश, जगन्निवास | अक्षर, सत् आणि असत् च्या पलीकडे || अ.११, ओ.३७||

तुम्ही पुराणपुरुष, देव आद्य | या विश्वास परम आश्रय || जाणते आणि जाणण्यास योग्य | व्यापिले विश्व अनंतरूपाने || अ.११, ओ.३८||

तुम्ही वायू, यम, अग्नी, शशांक आणि वरुण | तुम्ही प्रजापती, पितामह महान || तुम्हास सहस्रवार नमन | पुन्हा पुन्हा नमस्कार असो || अ.११, ओ.३९||

नमस्कार तुला पुढून आणि पाठून | सर्व बाजूंनी तुला नमन || अनंतवीर्य आणि अमितविक्रम असे तुझे महिमान | व्यापतोस सर्व म्हणून सर्व तूच || अ. ११, ओ.४०||

अनादराने जे बोललो तुला मित्र मानून | `हे कृष्णा, हे यादवा, हे मित्रा' असे केले संबोधन ||तुझा महिमा न जाणून | मी तुला चुकीने किंवा प्रेमाने || अ.११, ओ.४१||

अपमान केला तुझा थट्टामस्करीत | असता फिरत, निजत, बसत किंवा भोजन करीत || अच्युता, तुझ्यासमोर किंवा एकांतात | त्या सर्वांची मला क्षमा कर || अ. ११, ओ.४२||

तू पिता या चराचराचा | आहेस श्रेष्ठ गुरू त्याचा ||त्रैलोक्यात नाही कुणी तुझ्या बरोबरीचा  | मग श्रेष्ठ कसा असेल || अ.११, ओ. ४३||

तेव्हा करून साष्टांग नमन | पूजनीय तुम्हास प्रार्थितो,  ‘होऊन प्रसन्न || करावे माझे अपराध सहन | जसे पित्याने पुत्राचे, मित्राने मित्राचे आणि प्रियकराने प्रियेचे’ || अ.११, ओ.४४||

पूर्वी न पाहिलेले तुझे रूप पाहून | झालो आनंदित तरी व्यथित आहे माझे मन || तेव्हा तुझ्या नेहमीच्या रूपात दे दर्शन | देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न होऊन || अ.११, ओ.४५||

किरीट, गदा आणि चक्र धारण केलेल्या | तुझ्या रूपास इच्छितो पाहण्या || दर्शन दे चतुर्भुज रूपातच त्या | हे सहस्रबाहो, विश्वमूर्ते || अ. ११, ओ. ४६||

श्रीभगवान म्हणाले

अर्जुना, मी प्रसन्न  होऊन | आत्मयोगाने दिले माझ्या परम रूपाचे दर्शन || पूर्वी कुणी न पाहिले तुझ्यावाचून | हे तेजोमय अनंत आद्य विश्व || अ. ११, ओ. ४७||

न वेदयज्ञाने, न अध्ययनाने, न दानाने | न क्रियाकर्माने, न उग्र तपाने || मनुष्यलोकात अन्य कुणाला हे रूप पाहणे | शक्य नाही कुरुप्रवीरा || अ.११, ओ.४८||

माझे असे घोर रूप पाहून | नको  होऊस व्यथित किंवा भ्रांतमन || पहा प्रसन्न चित्ताने भयमुक्त होऊन | पूर्वीचेच माझे रूप || अ.११, ओ.४९||

संजय म्हणाला

असे बोलून अर्जुनास | भ्यालेल्या त्यास || दाखवून स्वत:च्या पूर्वीच्या सौम्य रूपास | वासुदेवाने आश्वासित केले || अ.११, ओ.५०||

अर्जुन म्हणाला 

जनार्दना, तुझ्या | सौम्य मानवी रूपास पाहुनिया || पूर्वस्थितीस येऊनिया | माझे मन स्थिर झाले || अ.११, ओ.५१||

श्रीभगवान म्हणाले 

माझ्या ज्या रूपास | आता तू पाहिलेस || इच्छा असते देवांस | रूप ते पाहण्याची || अ.११, ओ.५२||

न वेदाभ्यासाने, न तपाने | न दानाने, न यज्ञाने ||शक्य आहे माझे हे रूप पाहणे | जे पाहिलेस तू || अ.११, ओ.५३||

परंतपा, याप्रमाणे | शक्य आहे मला पाहणे ||जाणणे आणि तत्त्वतः माझ्यात प्रवेश करणे | केवळ अनन्य भक्तीने || अ. ११, ओ. ५४||

मला परमश्रेष्ठ मानणारा माझा भक्त | जो कर्मे माझ्यासाठी करतो, आहे सर्वसंगपरित्यक्त ||वैरहीन आहे सर्व भूतांप्रत | तो मलाच मिळतो पांडवा || अ.११, ओ.५५||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘विश्वरूपदर्शनयोग ’ नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला

                  || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Friday, July 25, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग

अर्जुन म्हणाला

काय असे ब्रह्म आणि अध्यात्म | पुरुषोत्तमा, काय असे कर्म ||  अधिभूताचे काय मर्म | अधिदैव कशास म्हणतात || अ.८, ओ.१||

अधियज्ञ काय असे | मधुसूदना, या देहात तो कसा वसे ||  नियत आत्म्यांनी तुला कसे | प्रयाणकाळी जाणावे || अ.८, ओ.२||

श्रीभगवान म्हणाले

परम अविनाशी ते ब्रह्म | स्वभाव म्हणजे अध्यात्म ||  त्या सृष्टिव्यवहारास म्हणती कर्म | ज्यातून उद्भवतो भूतांचा भाव || अ.८, ओ.३||

नश्वर भाव म्हणजे अधिभूत | स्वामी म्हणजे अधिदैवत ||  अधियज्ञ मीच देहात | हे देहधारी श्रेष्ठा || अ.८, ओ.४||

अंतकाळी मला स्मरत | देहातून जो होई मुक्त ||  त्याला माझा भाव होई प्राप्त | यात नाही संशय || अ. ८, ओ.५||

सोडत असता देहाला | जो भाव स्मरतो ज्याला ||  तोच भाव प्राप्त होतो त्याला | नेहमी कौंतेया || अ.८, ओ.६||

मन आणि बुद्धी करून मला अर्पित | सर्व काळात ||  माझे स्मरण करीत | निस्संशय मलाच मिळशील, युद्ध करतानाही || अ.८, ओ.७||

जो योगयुक्त राहून, करतो अभ्यास | दुसरीकडे जाऊ न देता चित्तास ||  परम दिव्य पुरुषाच्या करतो चिंतनास | तो त्या पुरुषासच मिळतो || अ.८, ओ.८||

सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूहून सूक्ष्म आहे | सर्वांचा पालनकर्ता, अचिंत्यरूप आहे || सूर्यासारखा तेजस्वी, अंधाराच्या पलिकडे आहे | दिव्य परम पुरुष || अ.८, ओ.९||

प्रयाणकाळी मन अचल ठेवून |भक्ती आणि योगबलाने  युक्त होऊन ||  भुवयांमध्ये प्राणाची स्थापना करून | दिव्य पुरुषाचे स्मरण करणारा त्यालाच मिळतो || अ.८, ओ.१०||

वेद जाणणारे ज्यास अक्षय म्हणतात | विरक्त यती ज्यात प्रवेशतात ||  ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरतात | ते पद थोडक्यात तुला सांगतो || अ.८, ओ.११||

सर्व द्वारांचा संयम करून | मनाचा हृदयात निरोध करून ||  मस्तकात प्राण स्थापन करून | करीत योगधारणा ||अ.८, ओ.१२||

ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत |  माझे स्मरण करीत ||  देहातून होतो मुक्त | तो जातो परम गतीस || अ.८, ओ.१३||

जो अनन्य बुद्धीने सतत | नित्य राहतो मला स्मरत ||  त्या योग्यास नित्ययुक्त | मी सहज  प्राप्त आहे || अ.८, ओ.१४||

झाल्यावर माझी प्राप्ती | पावल्याने परम गती ||  पुनर्जन्मास न जाती | पुनर्जन्म असे अशाश्वत आणि दु:खाचे आगर || अ.८, ओ.१५||

ब्रह्मभुवनापासून लोक सारे | पुन्हा पुन्हा घेती फेरे ||  येता माझ्यापाशी कौंतेया रे | होई न पुनर्जन्म || अ.८, ओ.१६||

दिवस ब्रह्मदेवाचा | म्हणजे काळ सहस्र युगांचा || तेवढाच असे काळ रात्रीचा | हे ज्ञानी जाणतात || अ.८, ओ.१७||

या दिवसाची होता सुरुवात | अव्यक्त सारे होती व्यक्त ||  रात्र होता लय पावतात | अव्यक्तात त्याच || अ. ८, ओ.१८||

भूतांचा समुदाय एकच तो | पुन्हा पुन्हा आकारास येतो ||  रात्र होता लय पावतो | प्रभवतो दिवस उगवता || अ.८, ओ. १९ ||

परंतु या अव्यक्ताहून | असे दुसरा श्रेष्ठ अव्यक्त भाव सनातन ||  सर्व भूते जरी जाती नाश पावून | तो भाव नाश न पावतो ||अ.८, ओ. २०||

ज्या अव्यक्तास अक्षय म्हणती | तीच असे परम गती ||  जेथे जाऊन परत न येती | तेच माझे परम धाम || अ.८, ओ.२१||

पार्था, श्रेष्ठ पुरुष तो | अनन्य भक्तीने प्राप्त होतो ||  सर्व भूतांस जो अंतरी सामावतो | ज्याने व्यापले हे जग सारे || अ.८, ओ.२२||

देहत्याग करता कुठल्या काळात | योगी पुन्हा जन्म न घेतात || आणि केव्हा जन्म घेतात | तो काळ सांगतो भरतर्षभा || अ.८, ओ.२३||

अग्नी, प्रकाश, शुक्ल पक्ष आणि दिवस | उत्तरायणाचे सहा मास ||  यांत जे ब्रह्मवेत्ते सोडती देहास | ते जाती ब्रह्मपदाला || अ.८, ओ. २४||

धूर, रात्र तसेच कृष्ण पक्षात | दक्षिणायनाच्या सहा महिन्यांत ||  यांत जे योगी देह सोडतात | ते चंद्रलोकास जाऊन परत येती || अ.८, ओ.२५||

शुक्ल आणि कृष्ण गती | जगी शाश्वत मानती ||  पहिल्या गतीने मिळे मुक्ती | परत येती दुसऱ्या गतीने || अ.८, ओ.२६||

जे योगी जाणती या दोन गतींना | मोह न होई त्यांना || याचसाठी अर्जुना | योगयुक्त हो सर्व काळी || अ.८, ओ.२७||

वेदांत, यज्ञांत, तपांत आणि दानांत | जी पुण्यफले सांगितली आहेत ||  त्यांपलिकडे योगी जातात | परम दिव्य अशा स्थानी || अ.८, ओ.२८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘अक्षरब्रह्मयोग’ नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला.

     🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺🙏

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Thursday, July 24, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७- ज्ञानविज्ञानयोग

श्रीभगवान म्हणाले

मन लावून माझ्यात | माझ्या आश्रयाने योग योजीत || कसे मला जाणशील निश्चित | ते ऐक पार्था || अ.७, ओ.१||

विज्ञानासहित ते ज्ञान | पूर्णपणे तुला सांगेन || जे घेतल्यावर जाणून | जाणण्यासारखे उरते न काही || अ.७, ओ.२||

एखादा कुणी सहस्र मनुष्यांत | झटतो, सिद्धी करण्यास प्राप्त || अशा झटणाऱ्या सिद्धांत | एखादा मला तत्त्वत: जाणतो || अ.७, ओ.३||

भूमी, जल, अग्नी, पवन | आकाश, बुद्धी, अहंकार आणि मन || अशा आठ प्रकारची भिन्न | असे माझी प्रकृती || अ.७, ओ.४||

ही माझी अपर प्रकृती होता अवगत | जाण माझी पर प्रकृती, जी असे जीवभूतांत || जी हे जगत | धारण करिते महाबाहो || अ.७, ओ.५||

पर आणि अपर प्रकृतींतून | भूते होती उत्पन्न ||जग प्रभवते माझ्यातून | आणि लय पावते माझ्यात || अ.७, ओ. ६||

माझ्याहून श्रेष्ठ असे | धनंजया, दुसरे काही नसे || आहे सर्व माझ्यात जसे | मणी 🧿 ओवलेले धाग्यात 🧵 || अ.७, ओ.७||

कौंतेया, मी रस पाण्यातील 🌊 | मी प्रभा चंद्रसूर्यांतील 🌙 ☀️|| मी शब्द आकाशातील  |आणि पुरुषांतील पौरुष मी || अ.७, ओ.८||

मी पुण्यगंध पृथ्वीतील 🌎| मी तेज अग्नीतील 🔥|| मी जीवन भूतांतील | तपस्व्यांतील तप मी || अ.७, ओ.९||

भूतांचे सनातन बीज मी | लक्षात ठेव पार्था नेहमी || बुद्धिमंतांची बुद्धी मी | तेजस्व्यांचे मी तेज || अ.७, ओ.१०||

बल मी बलवानांत | काम आणि आसक्तीपासून मुक्त || भरतर्षभा भूतांत | धर्माविरुद्ध नसणारा काम मी || अ.७, ओ.११||

सात्त्विक, राजस आणि तामस हे भाव तीन | आहेत माझ्यापासून ||  ते माझ्यात असती जाण | नसे मी त्यांच्यात || अ. ७, ओ.१२||

या गुणांनी तीन | हे जग गेले मोहून || न घेते जाणून | मला, परम अव्ययाला || अ.७, ओ.१३||

या दैवी गुणांनी युक्त माया | असे दुस्तर, पार करण्या || तेच समर्थ, ती तरून जाण्या | शरण येती जे मला || अ.७, ओ.१४||

जे नर असती या भावांच्या आश्रयास | मूढ, नराधम, असुर वृत्तीचे, करती दुष्कृत्त्यांस || मायेने हरले ज्यांच्या ज्ञानास | ते न शरण येती मला || अ.७, ओ.१५||

अर्जुना, जे सत्कृत्त्य करतात | असे चार प्रकारचे भक्त || जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी आणि आर्त | मला भजतात भरतर्षभा || अ.७, ओ.१६||

विशेष आहे त्यांत | नित्ययुक्त, एकभक्ती असा ज्ञानी भक्त || मी त्यास प्रिय अत्यंत | मलाही प्रिय तो || अ.७, ओ.१७||

हे सारे भक्त जरी थोर | ज्ञानी हा आत्माच खरोखर || युक्तात्मा  तो माझ्यात स्थिर | राहतो उत्तम गतीत || अ.७, ओ.१८||

तो अनेक जन्म घेऊन | सर्व काही वासुदेव आहे, असे जाणून || शरण येतो मला ज्ञानवान | महात्मा सुदुर्लभ || अ.७, ओ.१९||

जे स्वत:च्या प्रकृतीने बद्ध होती | इच्छांमुळे ज्ञान गमावती || ते अन्य देवतांना शरण जाती | त्यासाठीच्या नियमानुसार || अ.७, ओ.२०||

जो भक्त ज्या तनूची | श्रद्धापूर्वक इच्छा करतो पूजेची || अचल श्रद्धा त्याची | मी तेथे स्थिर करतो || अ.७, ओ.२१||

श्रद्धेने युक्त तो | तिच्या पूजेची इच्छा करतो || नंतर इच्छित मिळवतो | मी ठरवून दिलेले || अ.७, ओ.२२||

हे अल्पबुद्धी फळास मिळवती | ज्याचा नाश होतो अंती || देवांचे पूजक देवांकडे जाती | माझे भक्त येती माझ्याकडे || अ.७, ओ.२३||

मी अव्यक्तातून आलो व्यक्तिरूपात | असे निर्बुद्ध लोक मानतात || ते जाणू न शकतात | श्रेष्ठ, अव्यय, उत्तम भाव माझा || अ.७, ओ.२४||

मी योगमायेने झाकला असे | त्यामुळे सर्वांस प्रगट न दिसे || मी, जन्मरहित, अव्यय असे | हे मूढ लोक न जाणती || अ.७, ओ.२५||

अतीत आणि वर्तमान | यांचे अर्जुना, मला ज्ञान || भविष्य आणि भूताची मला जाण | परंतु मला कोणी न जाणतो || अ.७, ओ.२६||

भारता, इच्छा आणि द्वेषातून | उद्भवलेल्या द्वंद्वाच्या मोहातून || सृष्टीत सर्व भूते संमोह पावून | जातात परंतपा || अ.७, ओ.२७||

जे पुण्यकर्मी जन | मुक्त होती पापातून || ते द्वंद्वाच्या मोहातून मुक्त होऊन | दृढ व्रताने मला भजती || अ.७, ओ.२८||

मोक्ष मिळवण्या वृद्धत्व आणि मरणातून | जे झटती माझा आश्रय घेऊन || येई त्यांना समजून | ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म || अ.७, ओ.३०||

अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञात | मी आहे असे जे जाणतात || ते अंतकाळीही मला स्मरतात | युक्त अशा बुद्धीने || अ.७, ओ.३०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ज्ञानविज्ञानयोग’ नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🪔 🙏 🌺 🪔 🙏🌺 🪔 🙏 🌺 🪔 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Wednesday, July 23, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ६ -ध्यानयोग

श्रीभगवान म्हणाले

योगी आणि संन्यासी म्हणावे त्यास | जो त्यागून कर्मफळास || करतो कर्तव्य कर्मास | म्हणू नये अग्निहोत्रहीनास आणि निष्क्रियास II अ.६, ओ.१ II

म्हणती ज्यास संन्यास | पांडवा, जाण योग त्यास || सोडल्यावीण संकल्पास | योगी न होई कोणीही || अ.६, ओ.२||

योगारोहणास ज्या मुनीने आरंभ केला | कारण असे कर्म त्याला || मात्र योगारूढाला | शम हे कारण असे || अ।६, ओ.३||

जो होत नाही आसक्त | इंद्रियविषयांत किंवा कर्मांत || संकल्पांतून होतो मुक्त | म्हणती त्यास योगारूढ || अ.६, ओ.४||

आपण करावा उद्धार आपला | करू नये नाश आपला || आपण बंधू आपला | आपणच आपला शत्रू || अ.६, ओ.५||

जो स्वत:स जिंकतो | तो स्वत:चा मित्र होतो || जो स्वत:स न जिंकतो | तो होई शत्रू स्वत:चा || अ.६, ओ.६||

स्वत:स जिंकलेल्या प्रशांत | परमात्म्यास समत्व होई प्राप्त || शीतोष्ण वा सुखदु:खात | वा मानापमानात || अ.६, ओ.७||

तो आत्मा तृप्त ज्ञान-विज्ञानाने | असे निर्विकार, इंद्रियांस जिंकले ज्याने || समान ज्यास मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने | त्यास योगी म्हणतात || अ.६, ओ.८||

सुहृद, मित्र, शत्रूंशी | तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य, बंधूंशी || सज्जनांशी आणि पाप्यांशी | समबुद्धी असे त्या विशेष पुरुषाची  || अ.६, ओ.९||

राहून एकांतात | चित्त आणि आत्मा करून नियंत्रित || इच्छा आणि परिग्रहापासून मुक्त | योग्याने स्वत:स सतत योजावे || अ.६, ओ.१०||

स्वच्छ भूमीवर | स्थापन करावे आसन स्थिर || न फार उंचावर, न खाली फार | मृदू वस्त्राचे, कातड्याचे किंवा गवताचे || अ.६, ओ.११||

त्या आसनावर बसून | करून एकाग्र मन || चित्त आणि इंद्रिये नियंत्रित करून | आत्मविशुद्धीसाठी  योग योजावा || अ.६, ओ.१२||

शरीर, मस्तक आणि मान | एका रेषेत स्थिर ठेवून || नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून | न पाहता सभोवती ||अ.६, ओ.१३||

मन शांत व निर्भय ठेवून | ब्रह्मचर्यव्रतात राहून || मनावर संयम ठेवून | चित्त माझ्या ठिकाणी ठेवावे, माझ्यात परायण असावे || अ.६, ओ.१४||

याप्रमाणे स्वत:स योजून सदोदित | मनास करून संयमित || योगी पावतो माझ्यात | निर्वाणकारक परम शांतीस ||अ.६, ओ.१५||

अति खाणाऱ्यास | किंवा अगदीच न खाणाऱ्यास || फार झोपणाऱ्यास किंवा फार जागणाऱ्यास | हा योग जमत नाही अर्जुना || अ.६, ओ.१६||

आहार-विहार ज्याचा नियंत्रित | जो कर्मे करी उचित || निद्रा-जागरण ज्याचे मर्यादेत | त्यालाच दु:खनाशक ठरतो हा योग || अ.६, ओ.१७|||

जेव्हा चित्त नियंत्रित | स्थिर होते आत्म्यात || सर्व इच्छांतून होतो विरक्त | तेव्हा तो योगी म्हणवतो || अ.६, ओ.१८||

निवांत जागी ठेवता दिव्यास | स्थैर्य राहते ज्योतीस || ती उपमा त्या योग्यास | ज्याचे चित्त नियंत्रित || अ.६, ओ.१९||

योगसेवेने नियंत्रित | चित्त होता शांत || आत्म्याने आत्म्यास पाहत | आत्म्यात संतुष्ट राहतो || अ.६, ओ.२०||

जी अनुभवता न ये इंद्रियांस | परी बुद्धी समर्थ जाणावयास || पावता अशा स्थितीस | योगी न ढळतो तत्त्वत: || अ.६, ओ.२१||

जी स्थिती होता प्राप्त | दुसरा लाभ नाही मोठा वाटत || स्थिर होता त्या स्थितीत | विचलित न करी दु:ख कुठले  || अ.६, ओ.२२||

दु:खाच्या उत्पत्तीचा अंत करणाऱ्या  | जाणावे समाधिस्थितीला त्या || निश्चयाने योगास योजावे त्या | न होता विचलित || अ.६, ओ.२३||

इच्छा जन्मती संकल्पांतून | त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करून || मनानेच सर्व बाजूंनी नियमन करून | इंद्रियांच्या गावाचे || अ.६, ओ.२४||

बुद्धीने धैर्ययुक्त | हळूहळू करून नियंत्रित || मन स्थिर करून आत्म्यात | विचार दुसरा करू नये || अ.६, ओ.२५||

अस्थिर आणि चंचल मन | करील जेथे जेथे भ्रमण || तेथून त्याला आवरून | आत्म्यात वश करावे || अ.६, ओ.२६||

मन प्रशांत झालेल्या | रजोगुण निमालेल्या ||ब्रह्मरूप, पापरहित झालेल्या | अशा योग्यास उत्तम सुख लाभते || अ.६, ओ.२७||

योगी पापरहित | सदा स्वत:स योजीत ||ब्रह्मसंस्पर्शाचे अत्यंत | सुख मिळवतो || अ.६, ओ.२८||

योगयुक्त आत्मा तो | सर्वत्र समदृष्टी ठेवतो || सर्व भूतांत स्वत:स पाहतो | आणि स्वत:त सर्व भूतांस ||अ.६, ओ.२९||

जो सर्वत्र मला पाहतो | आणि माझ्यात सर्व पाहतो || त्याच्यासाठी मी न नाश पावतो | न तो पावतो नाश माझ्यासाठी || अ.६, ओ.३०||

सर्व भूतांत मी वास करतो | अशा मला जो एकत्वभावाने भजतो || तो योगी सर्व प्रकारे वर्ततो | माझ्याच ठायी || अ.१६, ओ.३१||

ठेवून समदृष्टीस | इतरांत पाहून स्वत:स || जाणतो त्यांच्या सुखदु:खांस | तो परम योगी मानावा || अ.६, ओ.३२||

अर्जुन म्हणाला

हे मधुसूदना, या योगास | कथन तू केलेस || परंतु वाटे साधारणपणे  त्यास | स्थिरता न येईल चंचलत्वामुळे || अ.६, ओ.३३||

कृष्णा, हे चंचल मन | विचलित करणारे, दृढ, बलवान || त्याचा निग्रह वायूसमान | कठीण मी मानतो || अ.६, ओ.३४||

श्रीभगवान म्हणाले

महाबाहो, निस्संशय हे मन | आहे चंचल आणि निग्रह करण्यास कठीण || परंतु कौंतेया, अभ्यास आणि वैराग्यातून | त्याचा निग्रह शक्य आहे || अ.६, ओ.३५||

ज्याचे मन नाही नियंत्रित | हा योग त्यास दुस्साध्य आहे, असे माझे मत || प्रयत्न आणि इतर उपायांनी योग होईल प्राप्त | मनास वश करणाऱ्यास || अ. ६, ओ.३६||

अर्जुन म्हणाला

योगी जो असूनही श्रद्धायुक्त | होतो योगापासून विचलित || न होता योग प्राप्त | जातो कुठल्या गतीस कृष्णा || अ.६, ओ.३७||

ब्रह्मपथापासून भ्रष्ट होऊन | प्रतिष्ठा घालवून, दोन्ही गमावून || फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश पावून | जातो का महाबाहो ? || अ.६, ओ.३८||

कृष्णा, माझ्या या संशयास | पूर्णपणे दूर करण्यास || तूच समर्थ आहेस || नसे दुसरा कुणीही || अ.६, ओ.३९||

श्रीभगवान म्हणाले

पार्था, या लोकात वा परलोकात | विनाशास तो नाही जात || बाबा रे, कल्याणकारी कार्यात | जातो न कुणी दुर्गतीला || अ.६, ओ.४०||

योगापासून जो भ्रष्ट होतो | तो पुण्यवंतांच्या लोकांत वर्षानुवर्षे राहतो || आणि नंतर जन्म घेतो | शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरी || अ.६, ओ.४१||

अथवा बुद्धिमान योग्यांच्याच कुळास | येतो तो जन्मास || असा जन्म मिळावयास | कठीण असे या लोकी || अ.६, ओ.४२||

पूर्वजन्मातील संस्कार | घेऊन येतो बरोबर ||संसिद्धीसाठी कठोर | पुन्हा झटतो कुरुनंदना || अ.६, ओ.४३||

पूर्वीचा अभ्यास | आपोआप आकर्षून घेई त्यास || इच्छुक तो  योग  जाणण्यास | शब्दब्रह्माच्या पैल जातो || अ.६, ओ.४४||

सतत प्रयत्नशील राहून | तो योगी शुद्ध होतो पापांतून || कैक जन्मांतून सिद्धी पावून | जातो परम गतीस || अ.६, ओ.४५||

योगी श्रेष्ठ तपस्व्यांहून | योगी श्रेष्ठ ज्ञानी लोकांहून || योगी श्रेष्ठ कर्म करणाऱ्याहून | म्हणून योगी हो अर्जुना || अ.६, ओ.४६||

सर्व योग्यांत | जो अंतरात्मा स्थिर करून माझ्यात || श्रद्धेने मला भजतो सतत | मला वाटतो तो योगी सर्वश्रेष्ठ || अ.६, ओ. ४७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ध्यानयोग’ नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, July 22, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ५ संन्यासयोग

अर्जुन म्हणाला

सांगून कर्मांपासून संन्यास | पुन्हा योगाची प्रशंसा करतोस || दोन्हींत   एक कुठले कारक हितास | ते निश्चित सांग कृष्णा || अ.५, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

कर्मयोग आणि संन्यास | दोन्ही कारक हितास || तरी कर्मयोगास | विशेष महत्त्व आहे || अ.५, ओ.२||

जो न द्वेष करतो, न इच्छा धरतो | जाणावा नित्य संन्यासी तो || सहज बंधनातून मुक्त होतो | द्वंद्वमुक्त तो महाबाहो || अ.५, ओ.३||

सांख्य आणि योग वेगळे दोन्ही | म्हणती अज्ञानी, न ज्ञानी || एकाचे पालन करूनी | फळे मिळती दोन्हींची || अ.५, ओ.४||

जे स्थान सांख्यांस मिळते | योगांनीही तेथे जाता येते || ज्यास दोन्ही एकच दिसते | त्यालाच खरे दिसते   ||अ.५, ओ.५||

योगावाचून संन्यास | महाबाहो, कठीण मिळवावयास || योगयुक्त मुनीस | ब्रह्म मिळते लवकर || अ.५, ओ.६||

जो योगयुक्त, ज्याने शुद्ध केले आत्म्याला | जिंकले इंद्रियांना आणि आत्म्याला || सर्व भूतांच्या आत्म्यांत पाही स्वतःच्या आत्म्याला | तो कर्मे करूनही लिप्त न होतो || अ.५, ओ.७||

तत्त्व जाणणाऱ्याने मानणे युक्त | की,' मी काही नाही करीत’ || असताना पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत | खात, जात, झोपत, श्वास घेत- || अ. ५, ओ. ८||

-बोलत, त्याग करीत, घेत | पापण्यांची उघडझाप करीत, || इंद्रिये विषयांच्या ठायी वर्ततात | असे जो मानतो, ||अ.५, ओ.९||

आसक्ती सोडून | करतो कर्मे ब्रह्मात अर्पण || तो अलिप्त राहतो पापापासून | जसे कमलपत्र पाण्यात ||अ.५, ओ.१०||

आसक्तीचा त्याग करुनी | काया, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी || आत्मशुद्धीचे ध्येय ठेवुनी | योगी कर्म करतात || अ.५, ओ.११||

योगी कर्मफळ त्यागतो | आणि दृढ शांती पावतो || योगविहीन कर्मफळात आसक्त होतो | आणि बद्ध होतो ||अ.५, ओ.१२||

वश करतो जो इंद्रियांस | तो मनाने सोडून सर्व कर्मांस || नऊ द्वारांच्या देहरूपी नगरात, सुखात करतो वास | कर्मे न करता न करविता ||अ.५, ओ.१३||

लोकांच्या कर्तृत्वाची किंवा कर्माची | तसेच कर्मफळसंयोगाची || स्वभावातून उत्पत्ती होते त्यांची | प्रभू न त्यांस निर्मितो ||अ.५, ओ.१४||

कुणाच्या पाप-पुण्यास | न घ्यावयाचे प्रभूस || अज्ञानाने झाकल्याने ज्ञानास | मोह पावतात जीव || अ.५, ओ.१५||

ज्यांचे ते अज्ञान | आत्मज्ञानाने गेले नाश पावून || 

त्यांचे ते ज्ञान सूर्यासमान | प्रकाशित करते परास ||अ.५, ओ.१६||

त्या ज्ञानात ज्यांची बुद्धी आणि आत्मे स्थिर झाले I जे त्या ज्ञानाशी निष्ठ आणि परायण झाले II त्या ज्ञानाने त्यांचे दोष जाती धुतले I पुनर्जन्मास न जाती ते II अ.१५,ओ.१७II

विद्याविनयसंपन्न ब्राह्मणास | गायीस आणि हत्तीस || कुत्र्यास आणि चांडाळास | समदृष्टीने पाहती पंडित || अ.५, ओ.१८||

ज्यांच्या मनात समभाव स्थिर झाला असे | त्यांनी येथेच जन्म-मृत्यू जिंकला असे || ब्रह्म निर्दोष आणि सम असे | त्यामुळे ब्रह्मात स्थिर ते झाले || अ.५, ओ.१९||

प्रिय वस्तू मिळता होई न आनंदित | अप्रिय घडता होई न दु:खित || ब्रह्मज्ञानी स्थिर ब्रह्मात | विवेकी आणि स्थिर बुद्धीचा || अ.१५, ओ.२०||

तो बाह्यस्पर्शांत न आसक्त | स्वत:मध्ये होते त्याला सुख प्राप्त || तो ब्रह्मयोगाने युक्त | अक्षय सुख मिळवतो || अ.५, ओ.२१||

स्पर्शातून भोग उत्पन्न होती | तेच दु:खास कारण होती || कौंतेया, ते आरंभती तसेच अंतास जाती | जाणता न रमतो त्यांत ||अ.५, ओ.२२||

वेग कामक्रोधातून उत्पन्न | येथेच जो करू शकतो सहन || करण्याआधी शरीरविमोचन | तो योग्य, तो सुखी नर || अ.५, ओ.२३||

जो असे अंतरी सुखात I आनंदात आणि प्रकाशात II तो योगी ब्रह्मभूत | ब्रह्मनिर्वाण मिळवतो || अ.५, ओ.२४||

पाप ज्यांचे क्षीण झाले | द्वंद्वमुक्त होऊन स्वतःस ज्यांनी नियंत्रित केले ||  सर्व भूतांच्या हितात जे रमले | असे हे ऋषी ब्रह्मनिर्वाण पावती ||अ.५, ओ.२५||

काम-क्रोध ज्यांचे सुटले | चित्त ज्यांनी नियंत्रित केले | स्वत:स ज्यांनी जाणले | ब्रह्मनिर्वाण अशा  यतींच्या सन्निध  असते || अ.५, ओ.२६||

बाह्यविषयांस ठेवून बाहेर | भुवयांच्या मध्यभागी दृष्टी करून स्थिर || नाकाच्या अंतर्भागात करणाऱ्या  संचार | प्राण-अपानांची सारखी ठेवून गती || अ.५, ओ.२७||

-मन, बुद्धी आणि इंद्रिये नियंत्रित करून | इच्छा, भय आणि क्रोध सोडून || राहतो जो मुनी मोक्षपरायण | तो मुक्तच सदैव || अ.५, ओ.२८||

भोक्ता सर्व यज्ञांचा आणि तपांचा | महान ईश्वर सर्व जगाचा || सुहृद सर्व भूतांचा | अशा मला जाणून, शांती पावतो ||अ.५, ओ.२९||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘संन्यासयोग’ नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, July 21, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ४ – कर्मसंन्यासयोग


श्रीभगवान म्हणाले

हा योग सांगितला | पूर्वी मी विवस्वानाला || विवस्वानाने मनूला | इक्ष्वाकूला मनूने || अ. ४, ओ.१||

असा परंपरेने प्राप्त झालेला | राजर्षींनी जाणून घेतला || कालांतराने नष्ट झाला | हा योग परंतपा ||अ.४, ओ.२||

तू माझा भक्त आणि सखा म्हणून | आज तुला केला कथन || हा योग पुरातन | आणि रहस्य उत्तम || अ.४, ओ.३||

अर्जुन म्हणाला

विवस्वानाचा जन्म पूर्वीचा | तुमचा जन्म अलिकडचा || कसा मी विश्वास ठेवायचा | की योग तू पूर्वी सांगितला ||अ.४, ओ.४||

श्रीभगवान म्हणाले

यापूर्वीही आपणास | यावे लागले आहे अनेक जन्मांस || मी जाणतो त्या सर्वांस | तू न जाणसी परंतपा || अ.४, ओ.५||

स्वत:च्या प्रकृतीत राहून | स्वत:च्या मायेने होतो उत्पन्न || मी अव्यय जन्मविहीन | भूतांचा ईश्वर || अ.४, ओ.६||

भारता, ज्या ज्या वेळेस | ग्लानी येते धर्मास ||अधर्म जातो पराकोटीस | तेव्हा मी स्वत: प्रगटतो || अ.४, ओ. ७||

सज्जनांच्या उद्धारास | दुर्जनांच्या विनाशास || धर्माच्या पुनर्स्थापनेस | युगायुगांत मी प्रगट होतो || अ.४, ओ.८||

माझे जन्म आणि कर्म दिव्य | यांचा जो करून घेई परिचय || पुनर्जन्म त्याचा न होय | तो माझ्याकडे येई अर्जुना ||अ.४, ओ. ९||

आसक्ती, भय आणि क्रोध सोडून | माझा आश्रय घेऊन || ज्ञानतपाने पावन होऊन | भावास  माझ्या आले बहुत || अ.४, ओ.१०||

जे जसे शरण येती मला | पावतो मी तसा त्यांजला || मनुष्य अनुसरती माझ्या मार्गाला | सर्व प्रकारे पार्था ||अ।४, ओ.११||

जे कर्मांची सिद्धी इच्छितात | ते देवतांना पूजितात || कारण लवकर होते मनुष्यलोकात | कर्मोत्पन्न सिद्धी ||अ.४, ओ.१२||

मी केले चातुर्वर्ण्य निर्माण | विभागून कर्म आणि गुण || अशा मला तू जाण | अकर्त्यास, अव्ययास || अ.४, ओ.१३||

मी न इच्छितो कर्माची फळे | लेपती मला न कर्मे त्यामुळे || असे माझे रूप ज्याला कळे | त्यालाही कर्मे न बांधती || अ. ४, ओ. १४ ||

पूर्वीसुद्धा असे जाणुनी | कर्मे केली मुमुक्षूंनी || पूर्वी केलेली पूर्वजांनी | कर्मे तू कर || अ.४, ओ.१५||

म्हणावे कर्म कशास, अकर्म कशास | याचा नसे निश्चय कवींस || पार करशील अशुभास | असे कर्म सांगतो तुला || अ.४, ओ. १६||

जाणावे काय कर्म | जाणावे काय विकर्म ||जाणावे काय अकर्म | कर्माची गती गहन ||अ.४ ओ.१७||

जो पाहतो अकर्म कर्मात | आणि कर्म अकर्मात || तो बुद्धिमान मनुष्यांत | जरी मग्न सर्व कर्मांत || अ.४, ओ. १८||

ज्याच्या साऱ्या क्रिया | कामसंकल्पातून मुक्त झाल्या || ज्ञानाग्नीत जळून गेल्या | त्यास म्हणती पंडित || अ. ४, ओ. १९||

कर्मफलाची आसक्ती सोडून | नित्य तृप्त, निराश्रय होऊन || जरी असे तो कर्मात मग्न | करीत नाही काहीच तो || अ. ४, ओ.२०||

इच्छा सोडून, बुद्धी आणि मन नियंत्रित करतो | परिग्रहांपासून मुक्त राहतो || कर्मे केवळ शरीरासाठी करतो | तो पापात न गुंततो || अ.४, ओ.२१||

सहज मिळेल त्यात त्यास समाधान | तो द्वंद्वांपासून मुक्त आणि मत्सरविहीन || सिद्धी आणि असिद्धी त्यास समान | तो कर्मात न बद्ध होतो || अ.४, ओ.२२||

आसक्ती त्याची सुटली | बुद्धी ज्ञानात स्थिर झाली || यज्ञास्तव सारी कर्मे केलेली | पूर्ण विरून जाती || अ. ४, ओ.२३||

ब्रह्माने ब्रह्माग्नीत | ब्रह्म हे हविर्द्रव्य ब्रह्मार्पण करीत || तो जातो ब्रह्माप्रत | ब्रह्मसमाधीने || अ.४, ओ.२४||

काही योगी करून यज्ञास | उपासिती दैवतांस || काही यज्ञ करून यज्ञास | ब्रह्माग्नीत अर्पिती ||अ.४, ओ.२५||

श्रवणादी इंद्रियांची आहुती | काही संयमाग्नीत देती || शब्दादी विषय अर्पिती | इंद्रियाग्नीत काही || अ.४, ओ.२६||

काही जण कर्मांस इंद्रियांच्या | काही जण कर्मांस प्राणाच्या || ज्ञानदीपित योगाग्नीत आत्मसंयमाच्या | करिती अर्पण || अ.४, ओ.२७||

द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ | तसेच योगयज्ञ   || आणि स्वाध्यायज्ञानाचा यज्ञ | करिती दृढ-व्रतस्थ यती || अ.४, ओ.२८||

रोखून प्राण आणि अपानाची गती | प्राण अपानात अर्पिती || अपान प्राणात अर्पिती | प्राणायमपरायण || अ.४, ओ.२९||

काही आहार 🍚 नियंत्रित करती | प्राण प्राणांत अर्पिती || हे सारे जन यज्ञ जाणती | यज्ञाने हरती पापास || अ.४, ओ.३०||

यज्ञातून उरलेल्या अमृतास  | भोगून जाती सनातन ब्रह्मलोकास || हा लोकही मिळे यज्ञ न करणाऱ्यास | दुसरा तरी कसा मिळेल कुरुसत्तमा || अ.४, ओ.३१||

असे हे यज्ञ विभिन्न | विस्तारले ब्रह्म्याच्या मुखातून || उत्पन्न कर्मापासून | जाणून मोक्ष पावशील || अ.४, ओ.३२||

तुलना करिता द्रव्ययज्ञाची | परंतपा, श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची || कारण परिसमाप्ती सर्व कर्मांची | पार्था, ज्ञानात होतसे || अ.४, ओ.३३||

प्रणिपात, परिप्रश्न | आणि सेवा करून || उपदेशती ज्ञान | ज्ञानी आणि तत्त्वदर्शी || अ.४, ओ.३४||

हे ज्ञान करून प्राप्त | पांडवा, पुन्हा न पडशील मोहात || पाहशील स्वत:त आणि माझ्यात |  सर्व भूतांस || अ.४, ओ.३५||

जरी सर्व पाप्यांमधील | सर्वांत अधिक पापी असशील || पापसमुद्र 🌊 तरून जाशील | ज्ञानाच्या नौकेने ⛵|| अ. ४ ओ.३६||

जसा अग्नी 🔥 प्रदीप्त झाल्यावरी | अर्जुना, समिधांस भस्म करी || तशीच कर्मे सारी | ज्ञानाग्नीत भस्म होती ||अ.४, ओ. ३७||

जगात कशाची बरोबरी | नसे ज्ञानाशी खरोखरी || योगसंसिद्ध प्राप्त करी | कालांतराने ते ज्ञान || अ.४, ओ.३८||

जो असे श्रद्धावान | ज्याने केले इंद्रियांचे नियमन | तो मिळवून ज्ञान | पूर्ण शांती प्राप्त करतो || अ. ४, ओ. ३९||

जो अज्ञानी, अश्रद्ध, संशयाने भरलेला | नाश त्याचा असे ठरलेला || मिळे न इहलोक, न परलोक त्याला | संशयात्म्यास मिळे न सुख || अ. ४, ओ. ४०||

योगाने ज्याने कर्मांचा त्याग केला | ज्ञानाने ज्याचा संशय नष्ट झाला || अशा आत्मवंताला | कर्मे न बांधती धनंजया || अ.४, ओ.४१||

हृदयात ❤️ उत्पन्न झालेले अज्ञान | ज्ञानाच्या खड्गाने 🗡️ छेदून || योगाचा अवलंब करून | ऊठ भारता || अ.४, ओ.४२||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मसंन्यासयोग’ नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Friday, July 18, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ३ - कर्मयोग

अर्जुन म्हणाला

बुद्धी श्रेष्ठ कर्माहून | जनार्दना, असे सांगून || या घोर कर्मात माझे नियोजन | कशास करिसी केशवा || अ.३, ओ.१||

सांगून वाक्ये मिश्रित | करसी बुद्धीस मोहित || एकच सांग निश्चित | ज्यात हित माझे || अ. ३, ओ. २||

श्रीभगवान म्हणाले

हे अनघा, मोडती या जगात | निष्ठा दोन प्रकारांत || सांख्यांची ज्ञानयोगात | कर्मयोगात योग्यांची || अ. ३, ओ.३||

न केल्याने कर्माच्या आरंभास | पुरुष न पावे नैष्कर्म्यास || किंवा सोडून कर्मास | लाभ न होई सिद्धीचा ||अ. ३, ओ.४||

क्षणभरही कोणीही न | राहू शके कर्मावाचून | सर्व कर्मे घेती करवून | गुण प्रकृतीचे ||अ. ३, ओ.५||

जो संयमित करून कर्मेंद्रियांस | मनाने करी इंद्रियांच्या स्मरणास || अशा विमूढ आत्म्यास | ढोंगी म्हणतात || अ. ३, ओ.६||

जो मनाने इंद्रियांचे नियमन करतो | आणि कर्मेंद्रियांनी कर्मयोग आरंभतो || असक्त असा तो | विशेष असे अर्जुना || अ.३, श्लो.७||

कर्म कर नेमून दिलेले | कर्म न करण्याहून ते चांगले || शरीरव्यापारही आपले | कर्मावाचून न होती ||अ.३, ओ.८||

कर्म करिता यज्ञाव्यतिरिक्त | टाकते कर्मबंधनात | आणि तरी कर्म यज्ञात | अनासक्तपणे कर, कौंतेया ||अ.३, ओ.९||

यज्ञासह करून प्रजेची निर्मिती | म्हणाले प्रजापती, || ‘यज्ञाने करून घ्या इच्छापूर्ती | यज्ञ तुमची कामधेनू || अ.३, ओ.१०||

यज्ञाने प्रसन्न करा देवांस | देव प्रसन्न करोत तुम्हास || प्रसन्न करून एकमेकांस | घ्या साधून कल्याण || अ. ३, ओ.११||

देव यज्ञाने संतुष्ट होतील | तुम्हास इच्छित वस्तू देतील || परंतु त्या देवांस न अर्पिता भोगेल | तो चोर केवळ || अ.३, ओ.१२||

अन्न उरलेले यज्ञातून | सेवन करणारे मुक्त होती पापांतून | स्वत:साठी जे शिजवती अन्न | ते भोगतात पाप ||अ.३, ओ.१३||

भूतांस  🐈 पोसते अन्न 🍚| अन्नाची  उत्पत्ती पर्जन्यातून 🌧️ || पर्जन्य उद्भवतो यज्ञातून | यज्ञ कर्माचा परिपाक || अ.३, ओ.१४||

कर्म ब्रह्मापासून उत्पन्न होते | ब्रह्म अक्षरापासून उद्भवते || म्हणजे ब्रह्म जे सर्व व्यापते | नित्य अधिष्ठित यज्ञात || अ.३, ओ.१५||

असे चक्र 🛞 प्रवर्तित | नाही पुढे चालवीत || तो पापी, इंद्रियासक्त | व्यर्थ त्याचे जीवन || अ.३, ओ.१६||

परंतु जो मनुष्य आत्म्यात रमतो | आत्म्यात तृप्त राहतो || आत्म्यातच संतोष मानतो | त्यास उरते न कार्य काही ||अ.३, ओ.१७||

काही करण्यात वा न करण्यात | लाभ न त्याच्या दृष्टीत || नसे त्याचा सर्व भूतांत | हितसंबंध काही || अ.३, ओ. १८||

म्हणून होऊन अनासक्त | कर्म करीत राहा सतत || अनासक्त कर्म करीत | पुरुष परास पावतो ||अ.३, ओ.१९||

मिळवली जनकादिकांनी | संसिद्धी कर्म करूनी ||लोकसंग्रहही पाहुनी | कर्म करणे उचित || अ.३, ओ.२०||

श्रेष्ठ जसे आचरण करीती | इतर जन तसे वागती || श्रेष्ठ जे प्रमाण ठरवती | अनुकरण करती लोक त्याचे ||अ.३, ओ.२१||

पार्था, लोकात तिन्ही | मला कर्तव्य नाही || मिळवावयाचे, न मिळवावयाचे, नसे काही | तरी कर्म करतो मी || अ.३, ओ. २२||

कारण ठेवून अवधान | जर मी कार्य न करीन ||अनुसरतील मला जन | सर्व परीने || अ.३, ओ.२३||

होईल लोकांचा ऱ्हास | जर मी न केले कर्मास ||कारण होईन संकरास | आणि घातास प्रजेच्या || अ.३, ओ. २४||

होऊन आसक्त | अज्ञानी लोक कर्म करतात ||विद्वानांनी कर्म करावे होऊन अनासक्त |लोकसंग्रहाच्या इच्छेने || अ.३, ओ.२५||

जनांचा अज्ञानी | करू नये बुद्धिभेद विद्वानांनी ||कर्मे स्वतः करूनी | इतरांकडून करवावी || अ.३, ओ.२६||

प्रकृतीचे गुण तीन | कर्मे घेती करवून || कर्मे करण्याचा अभिमान | बाळगतो अहंकारी विमूढात्मा || अ.३, ओ.२७||

हे महाबाहो, जाणून गुण आणि कर्मांची भिन्नता |  गुण गुणांच्या ठायी वर्तता || खरा तत्त्ववेत्ता | आसक्त त्यांत होत नाही || अ.३, ओ.२८||

जे आहेत प्रकृतीच्या गुणांनी मोहित | गुण आणि कर्मांत आसक्त || अशा अज्ञानी, मंदबुद्धींस करू नये विचलित | सर्वज्ञाने || अ.३, श्लो. २९||

सर्व कर्मे मला अर्पून | आध्यात्मात बुद्धी ठेवून ||युद्ध 🏹 कर निरपेक्ष, निर्मम होऊन | वैर न बाळगता || अ.३, ओ.३०||

हे माझे मत | प्रमाण मानून जे  वागतात || ते मानव श्रद्धावान, असूयारहित | होतात मुक्त कर्मातून   || अ.३, ओ. ३१||

परंतु माझे हे मत | जे अविवेकी, मूर्ख नाही अनुसरत || त्यांचा नाश निश्चित | असे जाण || अ.३, ओ.३२||

स्वतःच्या प्रकृतीस अनुसरून | वागतो ज्ञानवान ||सर्व भूतांचेही तसेच वर्तन | तेथे निग्रह काय करील || अ.३, ओ. ३३||

इंद्रिये आणि विषयांत | प्रीति-द्वेषसंबंध निश्चित ||त्यांना वश होणे न उचित | ते मार्गातील विघ्ने जणू  || अ.३, ओ.३४||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||बरे स्वधर्मात निधन |   परधर्म भयावह || अ.३, ओः३५ ||

अर्जुन म्हणाला

मग प्रयोजनाने कुठल्या | पाप होई हातून पुरुषाच्या || मनाविरुद्ध त्याच्या | इच्छा नसताना वार्ष्णेया || अ.३, ओ. ३६ ||

श्रीभगवान म्हणाले

काम किंवा क्रोध जाण | जो होतो रजोगुणातून निर्माण || तो महाखादाड, पापाची खाण | येथील वैरी आहे जणू || अ.३, ओ.३७ ||

जसा धूर  झाकतो अग्नीस 🔥 | जशी धूळ माखते आरशास 🪞|| वार वेढते गर्भास | तसा काम झाकतो ज्ञानास || अ.३, ओ.३८||

झाकतो ज्ञानी मनुष्याचे ज्ञान | काम हा नित्य वैऱ्यासमान || अग्नीप्रमाणे त्याला न समाधान | जाण कौंतेया || अ.३, ओ. ३९ ||

इंद्रिये, बुद्धी आणि मन | यांत करून अधिष्ठान ||ज्ञानास झाकून | काम आत्म्यास मोहवितो || अ.३, ओ.४०||

भरतषर्षभा, म्हणून सुरुवातीस | करून इंद्रियनियमनास || सोड पापप्रतीक कामास | ज्ञानविज्ञाननाशकास || अ.३, ओ.४१||

इंद्रिये श्रेष्ठ जाण | मन श्रेष्ठ इंद्रियांहून || बुद्धी श्रेष्ठ मनाहून | बुद्धीहून श्रेष्ठ परमात्मा || अ.३, ओ. ४२||

अशा त्या परमात्म्यास जाणून | स्वत:स स्वत: स्थिर करून || महाबाहो, घे जिंकून | दुष्कर कामरूपी शत्रूला || अ.३, ओ.४३ ||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मयोग’ नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Thursday, July 17, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ - सांख्ययोग


संजय म्हणाला

करुणापूर्ण तशा अर्जुनाला | व्याकूळ, अश्रुपूर्ण दिसणाऱ्याला || विषाद करणाऱ्याला | मधुसूदन हे वाक्य बोलले || अ.२, ओ.१|

श्रीभगवान म्हणाले

कोठून हे तर्कट अर्जुना | अशा अवेळी आले तुझ्या मना || जे नेते दूर स्वर्गापासून, न शोभते आर्यांना | आहे अपकीर्तीचे कारण ||अ.२, श्लो.२||

नकोस पडू कमकुवतपणास बळी | तुला न हा शोभतो मुळी || मन:स्थिती क्षुद्र दुबळी | सोडून ऊठ परंतपा || अ.२, श्लो.३||

अर्जुन म्हणाला

कसा मी या युद्धात पण | पूज्य आम्हाला जे भीष्म-द्रोण || त्यांच्यावर उलट सोडू बाण | सांग मधुसूदना ||अ.१, ओ.४||

महान गुरूंस मारणे | यापेक्षा बरे, भीक मागून जगणे || जरी हे गुरू पैशासाठी ओशाळवाणे | हत्येचे भोग असतात रक्तरंजित ||अ. २, ओ. ५ ||

नकळे मला दोन्हींत बरे काय | मिळवावा की न मिळवावा जय || ज्यांना मारून जगण्यात न स्वारस्य | ते धार्तराष्ट्र युद्धास सिद्ध ||अ. २, ओ.६||

गोंधळली वृत्ती, झाले कुंठित मन |   धर्माविषयी मला न ज्ञान || भले काय ते सांग समजावून | शिष्य मी तुझा, सांग मला शरणागताला || अ.१, ओ.७||

कसे दूर करू, मला न कळते | दु:ख जे इंद्रियांचे शोषण करते || जरी निष्कंटक राज्य पृथ्वीचे मिळते | आणि देवांचे आधिपत्य ||अ. २, ओ.८||

संजय म्हणाला

बोलून असे हृषीकेशास | गुडाकेश, जो ताप देई शत्रूंस || 'नाही करणार युद्धास'| असे बोलून शांत झाला ||अ.२, ओ.९||

हृषीकेश बोलला त्यास | भारता, करून जणू हास्यास || विषाद करणाऱ्या अर्जुनास | दोन्ही सैन्यांच्यामध्ये || अ.२, ओ.१०||

श्रीभगवान म्हणाले

ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस | पोकळ पांडित्य सांगतोस |I नसे दु:ख खऱ्या ज्ञानी लोकांस | आल्यागेल्यांचे  ||अ.२, ओ.११||

तुला, मला, या राजांस | वा आपणां सर्वांस ||नव्हता जन्म पूर्वी, न यावयाचे जन्मास | असे काही नाही || अ. २, ओ. १२||

आत्म्यास या देहात जशा लाभती | बालपण, तारुण्य, म्हातारपण या स्थिती |I तशीच होते त्याला नव्या देहाची प्राप्ती | त्यामुळे ज्ञानी मोह न पावतो || अ. १, ओ. १३ ||

कौंतेया, स्पर्शसंवेदना उत्पन्न होती | शीत वा उष्ण, सुख वा दु:ख देती || त्या येती तशा जाती | कर सहन त्यांना || अ.१, ओ.१४||

या संवेदना व्यथा न देती ज्या ज्ञानी पुरुषाला | पुरुषश्रेष्ठा, सांगतो तुला || सुख आणि दु:ख सारखे ज्याला | तो अमृतत्वाला पात्र होतो ||अ.२, ओ. १५||

असत् होई न भाव | सत् होई न अभाव || असा या दोन्हींचा पाहिला ठाव | तत्त्वदर्शी लोकांनी ||अ.२, ओ.१६||

जाण अविनाशी अव्ययास | ज्याने व्यापिले या सर्वास || त्याच्या विनाशास | कोणीही समर्थ नाही || अ. २, ओ.१७||

नित्य, अविनाशी, अप्रमेय आत्म्याने या | धारण केलेल्या काया | अंती जाती विलया | त्याकरिता युद्ध कर || अ. २, ओ.१८||

जो मानतो मारणारा आत्म्यास | किंवा जो मानतो  मेलेला त्यास || कळत नाही त्या दोघांस | हा न मारतो न मारला जातो || अ. २, श्लो. १९||

आत्मा नाही जन्मत, नाही मरत | नाही तो झाला, नाही होत ||  तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित | शरीर नष्ट करिता, नाही मारला जात || अ.२, श्लो. २० ||

ज्या पुरुषास ज्ञात | की आत्मा नित्य, अव्यय, जन्मरहित || तो पुरुष कसा करवील कुणाचा घात | किंवा मारील कुणास? || अ.२, श्लो. २१||

जसा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून | नवी वस्त्रे करतो परिधान || तसा आत्मा जुनी शरीरे सोडून | नव्या शरीरात जातो || अ.२, श्लो. २२||

तुटे न हा शस्त्राने | जळे न हा अग्नीने || भिजे न हा पाण्याने | न सुकवी वारा यास || अ.२, ओ.२३||

न हा तोडला वा जाळला जातो | न भिजवला वा सुकवला जातो || नित्य, स्थिर, सर्वत्र राहतो | अचल हा सनातन || अ. २, ओ. २४||

हा अचिंत्य, अव्यक्त | अविकार्य यास बोलतात || हे झाल्यावर ज्ञात | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.२५||

हा जन्मतो आणि मरतो नियमित | असे जरी असेल तुझे मत |I तरी शोक करणे न उचित | महाबाहो तुला ||अ. २, ओ. २६ ||

मृत्यू हा जन्माचा संपात | तसा जन्म हा मृत्यूचा संपात || याचे भान ठेवीत | योग्य नाही शोक करणे ||अ.२, श्लो. २७||

आरंभी ही भूते अव्यक्त असती | मध्ये व्यक्त दिसती || अखेर अव्यक्तातच विलीन होती | तिथे शोक कशासाठी || अ. २, श्लो. २८||

कुणी आत्म्यास आश्चर्यकारक म्हणून पाहती | कुणी आश्चर्यकारक बोलती || कुणी आश्चर्यकारक म्हणून ऐकती | आणि ऐकूनसुद्धा त्यास, जाणे न कुणीही || अ. २, ओ. २९ ||

भारता, आत्मा राहतो देहात | आत्मा आहे अवध्य, शाश्वत || तेव्हा सर्व भूतांप्रत | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.३०||

आणि पाहताही स्वधर्मास | वाव नसे विचलित होण्यास |I कारण यु्द्धाहून क्षत्रियास | हितकारक काही नसे || अ. २,ओ. ३१||

काही सायासांवाचून | स्वर्गाचे दार ठेविले उघडून |I क्षत्रियांस भाग्यवान | युद्ध असे लाभते || अ.२, ओ.३२||

जाणूनही धर्मास | न करशील या युद्धास || पात्र होशील पापास | स्वधर्म आणि कीर्ती गमावून || अ. २, ओ. ३३ ||

अपकीर्ती तुझी करतील | जन हे सकल ||संभावितास अपकीर्तीचा सल | मरणाहून असह्य || अ. २, ओ.३४||

महारथी म्हणतील, 'अर्जुन | पळाला  रणातून घाबरून ' |I करतील तुझे अवमूल्यन | जे तुला मानतात || अ.२, ओ.३५||

बोलू नये ते बोलतील | पुष्कळ तुझ्याबद्दल || तुझे सामर्थ्य कमी लेखतील | त्याहून काय दु:खदायक || अ.२, ओ.३६||

मारला गेल्यास मिळवशील स्वर्गास | जिंकल्यास भोगशील पृथ्वीस || म्हणून कौंतेया, ऊठ युद्धास  | दृढनिश्चय करूनी || अ.२ ओ. ३७||

समान मानून सुख-दु:खास | लाभ-हानी, जय-पराजयास || करशील जर युद्धास | लागणार नाही पाप तुला || अ.२, ओ.३८||

हे ज्ञान  सांगितले सांख्यातील | ऐक ज्ञान आता योगातील || जे जाणून मुक्त होशील | कर्मबंधातून || अ.२, ओ.३९||

योगात  आरंभिले कार्य नाश न पावते | न आरंभिल्या कार्यात विघ्न  येते || मोठ्या भयापासून रक्षण करते | या धर्माचे अल्प आचरण || अ.२, ओ.४०||

जी  व्यस्त  असे योगात  | एकत्व  राहे त्या बुद्धीत || जी नसे योगात  व्यस्त  | त्या बुद्धीला अनंत शाखा फुटती  || अ.२, ओ.४१||

अज्ञानी लोक भाषा फुलवती | आणि बोलती ||वेदांच्या वादात रंगून म्हणती, | ‘नसे दुसरे काही’ || अ.२, ओ.४२||

‘विविध विशेष क्रियांचे  फळ म्हणून | भोग आणि ऐश्वर्य देणारा  जन्म येतो चालून’, || म्हणती हे जन | इच्छा आणि स्वर्गाच्या पाठी जे असती ||अ.२, ओ.४३||

भोग आणि ऐश्वर्य ध्येय एक | मानून गमावती विवेक || त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक | होते न स्थिर || अ.२, ओ. ४४||

वेद आहेत त्रिगुणांनी युक्त | अर्जुना, तू हो त्रिगुणरहित || नेहमी सत्त्वगुणी, द्वंद्वापासून मुक्त | योगक्षेमापासून दूर, आत्मनिष्ठ || अ. २, ओ.४५||

जळाने 🌊 व्यापता सर्व बाजूंस | कोण विचारी विहीरीस  || तेवढीच किंमत वेदांस | देई ज्ञानी ब्राह्मण || अ.२, ओ. ४६ ||

अधिकार तुझा केवळ कर्मावर | नाही कधीही कर्मफलावर || कर्मफलहेतूस ठेव दूर | कर्म मात्र टाळू नको || अ.२, ओ.४७||

कर कर्मे योगात राहुनी | धनंजया, आसक्ती सोडुनी || सिद्धी-असिद्धी समान मानुनी | या समानतेस योग म्हणती || अ.२, श्लो. ४८||

कर्म फार न्यून | धनंजया, बुद्धियोगाहून || फळाचा 🍑 हेतू असणारे जन असती कृपण I म्हणून तू बुद्धीचा आधार घे || अ.२, ओ.४९||

बुद्धियुक्त त्यागतो उभय | पाप आणि पुण्य || तेव्हा योगाचा घे आश्रय | कर्मातील कौशल्य म्हणजेच योग || अ. २, ओ. ५०||

कर्मातून झालेले उत्पन्न | फळ, बुद्धियुक्त जन टाकून || मुक्त होती जन्मबंधनातून | जाती निरामय पदाला || अ. २, ओ. ५१||

जेव्हा मोहाचे जंगल 🌴 🌴🌴| बुद्धी पार करील || तुला  निरुपयोगी वाटेल | ऐकलेले आणि ऐकावे असे || अ. २, ओ.५२||

श्रुतींमुळे झालेली चंचल | होईल जेव्हा निश्चल ||बुद्धी समाधीत अचल | तेव्हा साधशील योग || अ.२, ओ.५३||

अर्जुन म्हणाला

‘स्थितप्रज्ञ, जो समाधीत स्थिर झाला | केशवा सांग मला | बोलेल काय शब्दांला | असेल कसा, वागेल कसा’ || अ.२, ओ.५४||

श्रीभगवान म्हणाले

‘हे पार्था, स्थितप्रज्ञ म्हणती त्यास | जो सोडून सर्व इच्छांस || मानतो संतोषास | स्वत:च्याच ठायी || अ.२, ओ.५५||

जो न उद्विग्न दु:खात | ज्याची इच्छा न सुखात || जो प्रेम, राग, भीतीपासून मुक्त | स्थितप्रज्ञ म्हणती त्यास ||अ.२, ओ.५६||

सर्वत्र जो अनासक्त | शुभ आणि अशुभापासून अलिप्त || हर्ष आणि द्वेषापासून मुक्त | स्थिर त्याची बुद्धी || अ.२, श्लो.५७||

जो घेतो आवरूनी | इंद्रिये इंद्रियविषयांपासुनी | कासव 🐢 जसे अवयव सर्व बाजूंनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ.२, ओ.५८||

जीवात्म्याची निराहारातुनी | निवृत्ती होई विषयांतुनी, न त्यांच्या आसक्तीतुनी || निवृत्ती आसक्तीतुनी | होई पराच्या दर्शनाने ||अ.२, ओ.५९||

पुरुषाने ज्ञानी | प्रयत्नही करूनी || मन दुसरीकडे नेती ओढुनी | त्रासदायक इंद्रिये || अ. २, ओ.६०||

तेव्हा इंद्रियांस करून संयमित | युक्त हो माझ्यात || इंद्रिये ज्याची ताब्यात | स्थिर त्याची बुद्धी || अ. २, ओ. ६१||

विषयांचे जो करी चिंतन I विषयासक्त होई त्याचे मन II काम जन्मतो विषयांतून I कामातून जन्म क्रोधाचा || अ. २, ओ. ६२||

जन्म क्रोधातून संमोहाचा I संमोहातून स्मृतिनाशाचा II स्मृतिनाशातून बुद्धिनाशाचा I बुद्धिनाशातून होई सर्वनाश || अ. २, ओ. ६३||

जो मुक्त आसक्ती आणि द्वेषापासून | इंद्रियांना ठेवून स्वाधीन || वावरतो विषयांतून || तो विधेयात्मा प्रसन्नता पावतो || अ.२, ओ.६४||

पावता प्रसन्नतेस | दु:खे जाती लयास || स्थिरता येई बुद्धीस | लगेच || अ.२, ओ.६५||

बुद्धीचा लाभ न अयुक्तास | न जाणी तो भावनेस || भावनेअभावी न शांती त्यास | नसता शांती नसे सुख त्यास || अ।२, ओ.६६||

भटकता इंद्रियांनी | त्यांच्या पाठी जाऊनी || मन बुद्धीस नेते ओढुनी | जसा वारा 🌬️ ओढतो पाण्यातील 🌊 नावेस 🚢||अ.२, श्लो. ६७||

महाबाहो म्हणूनी | इंद्रियांस विषयांपासूनी || घेतो जो आवरूनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ. २, श्लो.६८||

सर्व भूतांसाठी रात्र 🌃 होता | संयमी राखतो जागृतता || सर्व भूते जागी राहता | मुनी पाही रात्र  ती || अ.२, ओ६९||

सर्व बाजूंनी भरताही जल | समुद्र 🌊 जसा राहतो आपल्या मर्यादेत अचल || तसा जो राहतो स्थिर, इच्छांत सकल | तो पावतो शांती, न भोगेच्छू || अ.२, ओ.७०||

जो सर्व इच्छांचा त्याग करतो | आणि नि:स्पृहपणे राहतो || निर्मम निरहंकारी पुरुष तो | पावतो शांती || अ.२, ओ.७१||

पार्था, हीच ती ब्राह्मी स्थिती | प्राप्त होता न मोह पावती || अंतकाळीही स्थिर राहती | पावती ब्रह्मनिर्वाणास || अ.२, ओ.७२||

अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'सांख्ययोग' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 © Dr Hemant Junnarkar 

All rights reserved

Wednesday, July 16, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय १- अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र म्हणाला 

कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र I तेथे युद्धासाठी जमलेले एकत्र II पांडव आणि माझे पुत्र I करतात काय, सांग संजया II अ.१ ओ.१ II

संजय म्हणाला

पांडवांचे विशाल सैन्य पाहून I राजा दुर्योधन II आचार्यांजवळ  जाऊन I असे म्हणाला, II अ.१ ओ.२ II

‘पांडुपुत्रांचे हे मोठे सैन्य I बघून घ्या आचार्य II  द्रुपदपुत्र, तुमचा बुद्धिमान शिष्य, I त्याने रचलेले   II अ.१ ओ.३ II 

युद्धात येथे महाधनुर्धर I भीम आणि अर्जुन शूर II तसेच महारथी थोर I युयुधान, विराट, द्रुपद II अ.१ ओ. ४II

धृष्टकेतु आणि चेकितान I काशिराज वीर्यवान II पुरुजित्, कुंतिभोज वीर महान I तसाच शैब्य नरश्रेष्ठ II अ.१ ओ. ५II

युधामन्यू आणि विक्रांत | उत्तमौजा वीर्यवंत ||सौभद्र आणि द्रौपदीचे सुत | सारेच महारथी ||अ.१ ओ.६ ||

आता जे विशेष आमचे | नायक माझ्या सैन्याचे || ज्ञान करून देतो त्यांचे | तुम्हास हे द्विजोत्तम || अ. १ ओ.७ ||

भीष्म आणि स्वत: आपण | नेहमी जिंकणारे कृप आणि कर्ण || अश्वत्थामा, विकर्ण | तसाच सौमदत्ती || अ. १, ओ. ८ ||

आणखी आहेत पुष्कळ शूर | माझ्यासाठी जिवावर उदार || जाणती विविध शस्त्रांचा वापर | सारे निपुण युद्धात || अ. १, ओ. ९ ||

असे अमर्याद सैन्य आमचे | भीष्म करती रक्षण ज्याचे || मर्यादित परी हे सैन्य त्यांचे | रक्षिलेले भीमाने || अ.१, ओ.१०||

सर्व व्यूहद्वारस्थानी | नेमून दिलेल्या ठिकाणी राहूनी || करावे आपण सर्वांनी | भीष्मांचेच रक्षण’ || अ.१, ओ. ११||

मग कुरुवृद्ध प्रतापवान पितामहांनी | सिंहगर्जना करूनी || शंख फुंकूनी | आनंदित केले दुर्योधना || अ.१, ओ.१२ ||

तेव्हा शंख आणि भेरी | पणव, आनक, गोमुख अशी वाद्ये सारी || नाद करती भारी | एकदम वाजू लागता || अ.१ ओ.१३ ||

तेव्हा युक्त शुभ्र घोड्यांनी | रथात मोठ्या बैसुनी || करीती दिव्य शंखांचा ध्वनी | माधव आणि पांडव  || अ.१, ओ.१४||

पांचजन्य हृषीकेशाने | देवदत्त धनंजयाने || पौंड्र भीमकर्मा वृकोदराने | शंख असे वाजविले || अ. १, ओ. १५II

अनंतविजय, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने | सुघोष नकुलाने || मणिपुष्पक सहदेवाने | शंख असे वाजविले || अ. १, ओ.१६II

काशिराज धनुर्धर-शिरोमणी | शिखंडी महारथी अग्रणी ||  ध्रुष्टद्युम्न आणि विराट नृमणी | अपराजित सात्यकी || अ.१, ओ. १७||

द्रुपदराजा आणि पुत्र द्रौपदीचे | सौभद्र, बाहू मोठे ज्याचे || सर्वांनी विविध शंखांचे | नाद केले महाराज || अ.१, ओ. १८||

तो घोष पडता कानी | धार्तराष्ट्रांची हृदये गेली विदीर्ण होऊनी || त्या नादाने गेले दुमदुमुनी| पृथ्वी आणि आकाश ||अ. १, ओ. १९||

धार्तराष्ट्रांस सिद्ध पाहून | रथावरी ज्याच्या शोभे हनुमान || तो पांडव धनुष्य उचलून | शस्त्रप्रहार करण्याआधी || अ. १, ओ.२०||

वाक्य असे हृषीकेशाला | हे राजा बोलला || 

अर्जुन म्हणाला

'हे अच्युता, आण रथ आपला || दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी || अ.१, ओ.२१II

मला आहे निरीक्षण करायचे | युद्धासाठी इच्छुकांचे || कुणाविरुद्ध मला लढायचे | या रणसंग्रामात || अ.१ ओ. २२||

मला आहे अवलोकन करायचे | युद्धास एकत्र आलेल्यांचे || धार्तराष्ट्राच्या दुर्बुद्धीचे I प्रिय इच्छिणाऱ्यांचे || अ. १, ओ. २३ ||

असे सांगता त्या क्षणास | गुडाकेशाने हृषीकेशास || हृषीकेशाने आणून त्या उत्तम रथास || हे भारता, दोन्ही सैन्यांमध्ये- || अ. १ ओ २४ ||

-सर्व राजांच्या, | समोर भीष्मद्रोणांच्या ||  

श्रीभगवान म्हणाले

'समोर जमलेल्या या | कुरूंना पहा पार्था’ || अ. १, ओ. २५ ||

तेथे पार्थाने पाहिले | काका आणि आजोबा आपले || आचार्य, मामा, भाऊ उभे ठाकले | मुलां-नातवंडां-मित्रांसह || अ. १ ओ. २६ ||

सुहृद आणि श्वशुर | दोन्ही सैन्यांत समोर || बंधू सारे युद्धास तयार | पाहून तो कौंतेय || अ. १, ओ. २७II

होऊन फार करुणा-ग्रस्त | बोलला होऊन दु:खित || 

अर्जुन म्हणाला, 

‘पाहून हे उपस्थित | युद्धासाठी स्वजन || अ.१, ओ. २८||

अवयव जातात गळून | तोंडास कोरड पडून || कापरे भरून | काटा येतो अंगावर || अ. १, ओ. २९||

गांडीव धनुष्य हातातून गळते | त्वचा सारी जळते || उभे न मला राहवते | भटकते माझे मन ||अ. १, ओ. ३० ||

लक्षणे सारी निश्चित | केशवा, विपरीत दिसतात || न दिसे काही हित | स्वजनांस युद्धात मारूनीया || अ.१, श्लो. ३१||

नको मला विजय | नकोत सुखे, नको राज्य || गोविंदा, कामाचे ते काय | राज्य किंवा जीवन || अ.१, ओ.३२||

ज्यांच्यासाठी इच्छा करायची | राज्य, भोग आणि सुखांची || त्यांची तयारी युद्धाची | प्राण आणि धन सोडून || अ.१, ओ.३३||

आचार्य, पुत्र, पितर | पितामह बरोबर || मामा, नातवंडे, श्वशुर | मेहुणे आणि इतर नातलग || अ. १, ओ. ३४ ||

मी न इच्छितो यांस मारण्याला | मधुसूदना, जरी गेलो मारला || किंवा दिले जरी त्रैलोक्याचे राज्य मला | काय कथा पृथ्वीची || अ.१, ओ. ३५ ||

मारून धार्तराष्ट्रांस | जनार्दना, सुख काय आम्हास || पापच येईल आश्रयास | या आततायांस मारिता || अ.१, ओ.३६ ||

न योग्य मारणे आम्ही त्यांना | स्वबांधवांना - धार्तराष्ट्रांना || कसे मारून स्वजनांना | व्हावे सुखी माधवा || अ. १, ओ. ३७ ||

लोभामुळे झाला यांचा | नाश बुद्धीचा || दिसे न दोष कुळक्षयाचा | आणि पाप मित्रद्रोहाचे || अ.१, ओ.३८||

मला न येई उमगून | कसे निवृत्त व्हावे या पापातून || स्पष्ट दिसत असून | कुलक्षयाचा दोष जनार्दना || अ.१, ओ. ३९||

नाश होता कुळाचा | -हास होतो सनातन कुळधर्माचा || बसे पगडा अधर्माचा | कुळावरी साऱ्या || अ.१, ओ. ४०||

कृष्णा, अधर्म माजता | कुलस्त्रिया जाती अध:पाता || वार्ष्णेया, स्त्रिया दूषित होता | वर्णसंकर होतसे ||अ.१, ओ.४१||

कुलनाशकांच्या कुळात संकर घडतो | तो नरकास कारण होतो ||पितरांचेही पतन घडवतो I पिंडोदकक्रियांचा लोप होता ||अ.१, ओ.४२||

वर्णसंकरकारक या | दोषांनी कुलनाशकांच्या  || जाती लया | शाश्वत जातिधर्म, कुलधर्म || अ.१, ओ. ४३||

कुलधर्म लयास गेलेल्या | जनार्दना, अशा मनुष्यां || नरकात लागे राहावया | असे आम्ही ऐकतो || अ.१, ओ. ४४ ||

अरेरे, केवढ्या पापास | तयार झालो करावयास || मिळवण्या राज्यसुखास | उठलो स्वजन मारण्या || अ.१, ओ.४५||

मी न करताही प्रतीकार | हाती न धरताही हत्यार  || धार्तराष्ट्र करतील माझा संहार | परवडेल ते मला’ ||अ.१, ओ. ४६||

अर्जुन असे रणात बोलून | गेला रथात बसून || धनुष्यबाण टाकून | शोकाकुल मनाने ||अ.१, ओ.४७||

अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'अर्जुनविषादयोग' नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...