अर्जुन म्हणाला
बुद्धी श्रेष्ठ कर्माहून | जनार्दना, असे सांगून || या घोर कर्मात माझे नियोजन | कशास करिसी केशवा || अ.३, ओ.१||
सांगून वाक्ये मिश्रित | करसी बुद्धीस मोहित || एकच सांग निश्चित | ज्यात हित माझे || अ. ३, ओ. २||
श्रीभगवान म्हणाले
हे अनघा, मोडती या जगात | निष्ठा दोन प्रकारांत || सांख्यांची ज्ञानयोगात | कर्मयोगात योग्यांची || अ. ३, ओ.३||
न केल्याने कर्माच्या आरंभास | पुरुष न पावे नैष्कर्म्यास || किंवा सोडून कर्मास | लाभ न होई सिद्धीचा ||अ. ३, ओ.४||
क्षणभरही कोणीही न | राहू शके कर्मावाचून | सर्व कर्मे घेती करवून | गुण प्रकृतीचे ||अ. ३, ओ.५||
जो संयमित करून कर्मेंद्रियांस | मनाने करी इंद्रियांच्या स्मरणास || अशा विमूढ आत्म्यास | ढोंगी म्हणतात || अ. ३, ओ.६||
जो मनाने इंद्रियांचे नियमन करतो | आणि कर्मेंद्रियांनी कर्मयोग आरंभतो || असक्त असा तो | विशेष असे अर्जुना || अ.३, श्लो.७||
कर्म कर नेमून दिलेले | कर्म न करण्याहून ते चांगले || शरीरव्यापारही आपले | कर्मावाचून न होती ||अ.३, ओ.८||
कर्म करिता यज्ञाव्यतिरिक्त | टाकते कर्मबंधनात | आणि तरी कर्म यज्ञात | अनासक्तपणे कर, कौंतेया ||अ.३, ओ.९||
यज्ञासह करून प्रजेची निर्मिती | म्हणाले प्रजापती, || ‘यज्ञाने करून घ्या इच्छापूर्ती | यज्ञ तुमची कामधेनू || अ.३, ओ.१०||
यज्ञाने प्रसन्न करा देवांस | देव प्रसन्न करोत तुम्हास || प्रसन्न करून एकमेकांस | घ्या साधून कल्याण || अ. ३, ओ.११||
देव यज्ञाने संतुष्ट होतील | तुम्हास इच्छित वस्तू देतील || परंतु त्या देवांस न अर्पिता भोगेल | तो चोर केवळ || अ.३, ओ.१२||
अन्न उरलेले यज्ञातून | सेवन करणारे मुक्त होती पापांतून | स्वत:साठी जे शिजवती अन्न | ते भोगतात पाप ||अ.३, ओ.१३||
भूतांस 🐈 पोसते अन्न 🍚| अन्नाची उत्पत्ती पर्जन्यातून 🌧️ || पर्जन्य उद्भवतो यज्ञातून | यज्ञ कर्माचा परिपाक || अ.३, ओ.१४||
कर्म ब्रह्मापासून उत्पन्न होते | ब्रह्म अक्षरापासून उद्भवते || म्हणजे ब्रह्म जे सर्व व्यापते | नित्य अधिष्ठित यज्ञात || अ.३, ओ.१५||
असे चक्र 🛞 प्रवर्तित | नाही पुढे चालवीत || तो पापी, इंद्रियासक्त | व्यर्थ त्याचे जीवन || अ.३, ओ.१६||
परंतु जो मनुष्य आत्म्यात रमतो | आत्म्यात तृप्त राहतो || आत्म्यातच संतोष मानतो | त्यास उरते न कार्य काही ||अ.३, ओ.१७||
काही करण्यात वा न करण्यात | लाभ न त्याच्या दृष्टीत || नसे त्याचा सर्व भूतांत | हितसंबंध काही || अ.३, ओ. १८||
म्हणून होऊन अनासक्त | कर्म करीत राहा सतत || अनासक्त कर्म करीत | पुरुष परास पावतो ||अ.३, ओ.१९||
मिळवली जनकादिकांनी | संसिद्धी कर्म करूनी ||लोकसंग्रहही पाहुनी | कर्म करणे उचित || अ.३, ओ.२०||
श्रेष्ठ जसे आचरण करीती | इतर जन तसे वागती || श्रेष्ठ जे प्रमाण ठरवती | अनुकरण करती लोक त्याचे ||अ.३, ओ.२१||
पार्था, लोकात तिन्ही | मला कर्तव्य नाही || मिळवावयाचे, न मिळवावयाचे, नसे काही | तरी कर्म करतो मी || अ.३, ओ. २२||
कारण ठेवून अवधान | जर मी कार्य न करीन ||अनुसरतील मला जन | सर्व परीने || अ.३, ओ.२३||
होईल लोकांचा ऱ्हास | जर मी न केले कर्मास ||कारण होईन संकरास | आणि घातास प्रजेच्या || अ.३, ओ. २४||
होऊन आसक्त | अज्ञानी लोक कर्म करतात ||विद्वानांनी कर्म करावे होऊन अनासक्त |लोकसंग्रहाच्या इच्छेने || अ.३, ओ.२५||
जनांचा अज्ञानी | करू नये बुद्धिभेद विद्वानांनी ||कर्मे स्वतः करूनी | इतरांकडून करवावी || अ.३, ओ.२६||
प्रकृतीचे गुण तीन | कर्मे घेती करवून || कर्मे करण्याचा अभिमान | बाळगतो अहंकारी विमूढात्मा || अ.३, ओ.२७||
हे महाबाहो, जाणून गुण आणि कर्मांची भिन्नता | गुण गुणांच्या ठायी वर्तता || खरा तत्त्ववेत्ता | आसक्त त्यांत होत नाही || अ.३, ओ.२८||
जे आहेत प्रकृतीच्या गुणांनी मोहित | गुण आणि कर्मांत आसक्त || अशा अज्ञानी, मंदबुद्धींस करू नये विचलित | सर्वज्ञाने || अ.३, श्लो. २९||
सर्व कर्मे मला अर्पून | आध्यात्मात बुद्धी ठेवून ||युद्ध 🏹 कर निरपेक्ष, निर्मम होऊन | वैर न बाळगता || अ.३, ओ.३०||
हे माझे मत | प्रमाण मानून जे वागतात || ते मानव श्रद्धावान, असूयारहित | होतात मुक्त कर्मातून || अ.३, ओ. ३१||
परंतु माझे हे मत | जे अविवेकी, मूर्ख नाही अनुसरत || त्यांचा नाश निश्चित | असे जाण || अ.३, ओ.३२||
स्वतःच्या प्रकृतीस अनुसरून | वागतो ज्ञानवान ||सर्व भूतांचेही तसेच वर्तन | तेथे निग्रह काय करील || अ.३, ओ. ३३||
इंद्रिये आणि विषयांत | प्रीति-द्वेषसंबंध निश्चित ||त्यांना वश होणे न उचित | ते मार्गातील विघ्ने जणू || अ.३, ओ.३४||
गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||बरे स्वधर्मात निधन | परधर्म भयावह || अ.३, ओः३५ ||
अर्जुन म्हणाला
मग प्रयोजनाने कुठल्या | पाप होई हातून पुरुषाच्या || मनाविरुद्ध त्याच्या | इच्छा नसताना वार्ष्णेया || अ.३, ओ. ३६ ||
श्रीभगवान म्हणाले
काम किंवा क्रोध जाण | जो होतो रजोगुणातून निर्माण || तो महाखादाड, पापाची खाण | येथील वैरी आहे जणू || अ.३, ओ.३७ ||
जसा धूर झाकतो अग्नीस 🔥 | जशी धूळ माखते आरशास 🪞|| वार वेढते गर्भास | तसा काम झाकतो ज्ञानास || अ.३, ओ.३८||
झाकतो ज्ञानी मनुष्याचे ज्ञान | काम हा नित्य वैऱ्यासमान || अग्नीप्रमाणे त्याला न समाधान | जाण कौंतेया || अ.३, ओ. ३९ ||
इंद्रिये, बुद्धी आणि मन | यांत करून अधिष्ठान ||ज्ञानास झाकून | काम आत्म्यास मोहवितो || अ.३, ओ.४०||
भरतषर्षभा, म्हणून सुरुवातीस | करून इंद्रियनियमनास || सोड पापप्रतीक कामास | ज्ञानविज्ञाननाशकास || अ.३, ओ.४१||
इंद्रिये श्रेष्ठ जाण | मन श्रेष्ठ इंद्रियांहून || बुद्धी श्रेष्ठ मनाहून | बुद्धीहून श्रेष्ठ परमात्मा || अ.३, ओ. ४२||
अशा त्या परमात्म्यास जाणून | स्वत:स स्वत: स्थिर करून || महाबाहो, घे जिंकून | दुष्कर कामरूपी शत्रूला || अ.३, ओ.४३ ||
असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मयोग’ नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved