Tuesday, August 5, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग

श्रीभगवान म्हणाले

ज्ञानातील उत्तम ज्ञान | पुन्हा करतो कथन || मुनी ज्यास जाणून | गेले परम सिद्धीस || अ.१४, ओ.१||

या ज्ञानाचा आश्रय घेऊन | जे झाले माझ्या समान || उत्पत्तिसमयीही न होती उत्पन्न | प्रलयात न होती व्यथित || अ.१४, ओ.२||

भारता, हे ब्रह्म महान | माझ्यासाठी योनिस्थान ||गर्भ त्यात स्थापून | मी निर्मितो भूतांस || अ.१४, ओ. ३||

कौंतेया, सर्व योनींतून | मूर्ती ज्या होती उत्पन्न ||ब्रह्म हेच त्यांचे महान योनिस्थान | बीजदाता मी पिता || अ.१४, ओ.४||

सत्त्व, रज, तम गुण | प्रकृतीपासून होऊन उत्पन्न || देहात टाकती बांधून | अव्यय आत्म्यास महाबाहो || अ.४, ओ.५||

त्यांत निर्मळ सत्त्वगुण | प्रकाशदायी दोषहीन ||तरी सुख आणि ज्ञानाच्या ओढीतून | अनघा, तोही जीवास बांधतो || अ.१४, ओ.६||

रजोगुण जन्मतो इच्छांतून | तृष्णा आणि भोगांतून || कर्माच्या आसक्तीतून | जीवास बांधतो कौंतेया || अ.१४, ओ. ७||

तमोगुण जन्मतो अज्ञानातून | जीवांस मोहात टाकून || प्रमाद, आळस, निद्रा यांतून | जीवास बांधतो भारता || अ.१४, ओ.८||

सत्त्वगुण बांधतो सुखात | रजोगुण बांधतो कर्मात || तमोगुण बांधतो प्रमादात | झाकून ज्ञानास || अ.१४, ओ.९||

कधी सत्त्व, रज आणि तमावर | कधी रज, सत्त्व आणि तमावर || कधी तम, रज आणि सत्त्वावर | मात करती भारता || अ.१४, ओ.१०|| 

जेव्हा देहाच्या सर्व द्वारांतून | ज्ञानाचा प्रकाश येतो उजळून || तेव्हा वाढला सत्त्वगुण | असे म्हणती || अ.१४, ओ.११||

रजोगुणाची होता उत्पत्ती | अनियंत्रित कर्माकडे वळे प्रवृत्ती || लोभ सुटे, इच्छा होती | हे भरतर्षभा || अ.१४, ओ.१२||

तमोगुण वाढता | दाटे अज्ञानाचा अंधःकार, येई निष्क्रियता || घडती प्रमाद, मोह होई चित्ता | जाण कुरुनंदना || अ.१४, ओ.१३||

सत्त्वगुणाच्या प्रभावात | होतो ज्याचा देहपात ||त्यास होतो प्राप्त | ज्ञानी जनांचा निर्मल लोक || अ.१४, ओ१४||

रजोगुणात होता देहपात | जन्म मिळे कर्मासक्त लोकांत || होता देहपात तमोगुणात | मूढ योनीत होई जन्म  || अ.१४, ओ.१५||

सात्त्विक, निर्मळ - सत्कर्मास | दु:ख - राजसी कर्मास || अज्ञान - तामसी कर्मास | अशी कर्माची फळे प्राप्त होती || अ.१४, ओ.१६||

सत्त्वगुणातून ज्ञान | लोभ रजोगुणातून ||तमोगुणातून प्रमाद, मोह आणि अज्ञान | उत्पन्न होतात || अ.१४, ओ.१७||

सत्त्वस्थांस मिळे ऊर्ध्वगती | राजस मध्येच थांबती || अधोगतीस जाती | हीनवृत्तीचे तामसी || अ.१४, ओ.१८||

ज्यास होते ज्ञान | की सर्व काही करवितात गुण ||तो गुणांपलीकडील परास जाणून | माझ्या भावास पोहचतो || अ.१४, ओ.१९||

देहापासून उत्पन्न होणारे हे तीन गुण | जेव्हा देही जातो ओलांडून || तेव्हा तो जन्म, मृत्यू, म्हातारपण यांच्या दु:खातून | मुक्त होऊन अमृत मिळवतो || अ.१४, ओ.२०||

अर्जुन म्हणाला

ज्याने केले या गुणांस पार | प्रभो, काय त्याची लक्षणे, कसा त्याचा आचार || कथन मला कर | कसा तो तीन गुणांस पार करतो || अ.१४, ओ.२१||

श्रीभगवान म्हणाले

प्रवृत्ती, मोह आणि ज्ञानाचा प्रकाश | यांचा जो न धरी अभिलाष || नच करी द्वेष | ते उत्पन्न होता पांडवा- || अ.१४, ओ.२२||

-जो तटस्थ राहुनी | न विचलित होई गुणांनी || गुण वर्तती आपल्या स्थानी | हे जाणून क्षोभ न पावतो- || अ.१४, ओ.२३||

-सुख आणि दु:ख समान | एकच माती, दगड आणि कांचन || सारखे प्रिय-अप्रिय, निंदा-स्तवन | ज्या धैर्यवान पुरुषास- || अ.२४, ओ.२४||

-सारखे ज्यास मान-अपमान | मित्र-शत्रू ज्यास समान || सकाम कर्मांचा आरंभ दिला त्यागून | त्यास गुणातीत म्हणतात || अ.२४, ओ.२५||

जो निष्ठा आणि भक्तियोग अवलंबतो | आणि माझी सेवा करतो || तो गुणांस उल्लंघतो | आणि पावतो ब्रह्मपदास || अ.१४, ओ.२६||

अमृताचे, अव्ययाचे, | शाश्वत धर्माचे || आणि ब्रह्मस्वरूपाचे | अंतिम निधान आहे मी || अ.१४, ओ.२७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘गुणत्रयविभागयोग’ नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला

                || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved