Sharing knowledge, experiences etc. on all subjects such as travel, literature, spiritualism
Monday, June 15, 2026
Ni Hao Beijing , Ni Hao Shanghai
Thursday, June 11, 2026
ની હાઉ બેઇજિંગ, ની હાઉ શાંધાય
Wednesday, June 10, 2026
नी हाऊ बैजिंग, नी हाऊ शांघाय
बारा दिवस इकडून तिकडे फिरायचं होतं. कपडे धुण्यास कोठे संधी नव्हती. त्यामुळे बारा दिवसांचे स्पेअर कपडे घेतले. चायनामध्ये पाली, विंचू खावे लागतील या भीतीने शाकाहारी मंडळीने बरेच पदार्थ पॅक करून घेतले.
अशी तयारी करून २२ मे २०२६ ला आम्ही सिडनीहून निघालो आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या फ्लाइटने शांघायच्या पुदॉंग इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरून दुसऱ्या फ्लाइटने रात्री बैजिंगला पोहोचलो.
(विमान उतरताना होणारे बैजिंगचे दर्शन)बैजिंग एअरपोर्टवर आमची बैजिंगमधील गाइड व्हिकी हिने आमचे स्वागत केले.
बसने हॉटेलमध्ये नेताना तिने दोन महत्त्वाचे चायनीज शब्दसमूह शिकवले —
‘नी हाऊ’ = कसे काय?
‘स्ये स्ये’ = धन्यवाद.
दुसऱ्या दिवशी आम्ही तियान आन मेन चौकात आलो — चीनच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण. इथेच पीपल्स रिपब्लिकची घोषणा झाली आणि हो, इथेच लोकशाही हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवले गेले.
व्हिकीने आधीच सांगितलं होतं, “ या चौकात आल्यावर राजकीय प्रश्न विचारू नका.”
४४० हेक्टर विस्तार असलेल्या या मैदानात चालताना पायांचे तुकडे पडतील की काय अशी वेळ आली.
तेथून आम्ही एम्परर पॅलेसमध्ये गेलो — चिनी सम्राटांचे शाही निवासस्थान. (पूर्वी येथे सामान्य लोकांना प्रवेश नव्हता, म्हणून याला फर्बिडन सिटी असेही म्हणतात). दहा हजार खोल्यांचा अलिशान राजवाडा. राजवाड्याचे पावित्र्य राखण्यासाठी आत शौचालय नव्हते. इथे सम्राटाचा तीन हजार स्त्रियांचा जनाना — पण सम्राटाकडून निवड होण्याचं भाग्य फार थोड्यांना.
(Emperor's Dressing room)दुसऱ्या दिवशी आम्ही जगातील आश्चर्यांपैकी एक, जे पाहण्याचं स्वप्न आयुष्यभर बाळगलं होतं, ते ठिकाण पाहण्यास गेलो- चीनची भिंत. येलो सी ते गोबी डेझर्टपर्यंत डोंगराळ भागात मंगोलियन आक्रमकांपासून रक्षण होण्यासाठी बांधलेली ५,६०० किलोमीटर्स लांबीची भिंत. आम्हाला जुयॉंग पास या ठिकाणी भिंतीवर नेलं होतं. त्या दिवशी पावसाळी हवा होती, पण पाऊस नव्हता. व्हिकीने आम्हाला आधीच कल्पना दिली की वॉल चढण्यापेक्षा ती उतरणं जास्त कठीण आहे. त्यामुळे वॉल चढताना विचार करा. वेडीवाकडी वळणं आणि कठीण चढण पायऱ्यांनी चढून गेल्यावर उत्तुंग पर्वतरांगांमध्ये नागमोडी वळणं घेत धुक्याची दुलई घेऊन पहुडलेल्या भिंतीचं अभूतपूर्व दर्शन होतं. असं ओरडून सांगावंसं वाटत होतं,'पाहिली ! मी चीनची भिंत पाहिली.' इतक्या प्राचीन काळी , इतक्या उंचावर ही भिंत कशी बांधली असेल, कल्पनाच करवत नाही.
शियान-टेरा कोटा वॉरियर्स
बैजिंगमधील स्थळदर्शनानंतर आम्ही ताशी ३०० किमी वेगाने जाणाऱ्या बुलेट ट्रेनने शियानला आलो.
(आमचा शियानमधील गाइड ब्रूस)शियान प्रसिद्ध आहे तेथील टेरा कोटा वॉरियर्स साठी. टेरा कोटा वॉरियर्स हे चिन शी हुआंग (Qin Shi Huang) या चिनी सम्राटाच्या मृत्युपश्चात् संरक्षणासाठी उभे असलेले मातीचे सैनिक. ८,००० सैनिक, ५०० घोडे, १०० रथ असा फौजफाटा संरक्षणासाठी घेऊन महाराज समाधीत पहुडले आहेत, पण दुसऱ्या ठिकाणी. सजीवाला मृत्यूची भीती, मग मृत्यूनंतर कुठल्या मृत्यूची भीती? मृत्यू हेच एक आश्चर्य आहे ना?
(टेरा कोटा वॉरियर्स)शियानमधील आमचा गाईड ब्रूस याने आमच्यातील काहींना एक एक पद देऊन ही संरक्षणव्यवस्था समजावून सांगितली.
टेरा कोटा वॉरियर्सना बाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्लाइटने आम्ही शांघायला आलो.
शांघाय - चीनचा आधुनिक चेहरा
शांघाय ! एके काळचं मासेमारीचं निवांत खेडेगाव- आज चीनचा आधुनिक चेहरा आणि आर्थिक प्रगतीचं सुपरफास्ट इंजिन.
शांघाय मधील आमच्या गाइडचं नाव लिली होतं. शांघायमधील जिन माव टॉवरच्या ८८ व्या मजल्यावर लिफ्ट फक्त ४५ सेकंदात पोहोचते आणि वरून सर्व शांघायचं मोहक दर्शन होतं.
(जिन माव टॉवरवरून दिसणारे शांघाय)( जिन माव टॉवच्या आतील बाजूने थेट जमीनीपर्यंत दर्शन. टॉवरचे सर्व मजले दिसत आहेत)संध्याकाळी हुआंगपू नदीतील क्रूझने सफर केली असता झगमगत्या शांघायचं दर्शन डोळ्यांचं पारणं फेडणारं. शांघायमध्ये एक ॲक्रोबॅटिक शो पाहिला. मृत्युगोलात एकावेळी मी एक बायकर बाइक चालवताना पाहिला होता . पण येथे आठ बायकर्स -त्यांत एक मुलगीसुद्धा- सुसाट वेगाने बाइक्स चालवतात. केवळ चित्तथरारक !
चायनाची भेट खरेदीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निरनिराळ्या सेंटर्सना भेट देऊन पर्ल, जेड, सिल्क, ग्रीन टी आणि पुण्यातील तुळशीबागेची आठवण करून देणारी चिमुकल्या दुकानांत विविध वस्तूंची खरेदी. शियान येथे चायनीज हेल्थ सेंटरमध्ये बरीच औषधं घेतल्यानंतर अजय म्हणाले, या औषधांनी बॉडी डिटॉक्स होईल तेव्हा होईल पण आता खिसा तरी चांगलाच डिटॉक्स झाला आहे. चीनमध्ये घासाघीस करणे अत्यावश्यक — प्रिंटेड प्राइसच्या निम्म्याहून खाली सौदा होतो. एक अडचण मात्र आहे. इंग्लिश कुणालाच समजत नाही. आम्हाला सर्व ठिकाणी गुगल ट्रान्स्लेशनचा उपयोग करावा लागला.
('आवारा हूं' गाणं ऐकणारा चिनी ऑटो रिक्षा ड्रायव्हर. याला पाय नव्हते. संजय कुलकर्णींनी याला शोधून काढले. त्याला काही पैसे देऊ केले. पण त्याने ते घेतले नाहीत. 'ऑटो राइड करायची असेल तर या' म्हणून त्याने सांगितलं)चुकवू नये अशा इतर अनुभवांमध्ये बैजिंग झू मध्ये पांडा पाहणे, चाकं नसलेल्या मॅग्लेव्ह ट्रेनचा ३०० किलोमीटर्स वेगाने प्रवास, ओल्ड सिटीमधील ग्रॅन्ड कनॅल क्रूझ, हुटॉंग मधील सायकल रिक्षा राइड, पारंपरिक घरांतील चायनीज भोजन — सगळंच वेगळं.
(स्टेशनमध्ये मॅग्लेव्ह ट्रेनची वाट पाहताना)(मॅग्लेव्ह ट्रेनचा ट्रॅक)सुरुवातीला व्हिकी आम्हाला म्हणाली होती,
“चीनला येण्यापूर्वी तुम्ही चीनबद्दल काय बोलत होता आणि चीनहून जाताना काय बोलत असाल याची तुलना करा.”
तिचं वाक्य अगदी खरं ठरलं.२ जूनला आम्ही “स्ये स्ये बैजिंग, स्ये स्ये शांघाय” म्हणत सिडनीला परतलो — मनात भरपूर आठवणी घेऊन.
(या सफरीवरील माझे पुस्तक लवकरच 'स्नेहल प्रकाशन, पुणे' यांच्यातर्फे प्रकाशित होत आहे.)
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower
31/5/2026 (Sun) Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...
-
Ni Hao Beijing, Ni Hao Shanghai ----------------------------------------- Travelogue of a Journey through Beijing and Shanghai (22 May 2026 ...
-
ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसचे वातावरण सुरू होते. आमची सून मनाली हिने हंटर्स व्हॅली गार्डनमध्ये ख्रिसमस ला...
-
थायलंड (पूर्वीचे नाव : सयाम) हा आग्नेय आशियातील सुंदर देश आहे. येथे आधुनिक प्रगती आणि प्राचीन संस्कृती यांचा सुंदर संगम ...