Wednesday, January 15, 2025

३० दिवसांत चिंतामुक्त व्हा

 ३० दिवसांत चिंतामुक्त व्हा  

आज आपण सारे निरनिराळ्या प्रकारच्या चिंतेने ग्रस्त आहोत. या चिंतेवर मार्ग कसा काढावा हे कुणालाच कळत नाही. अशा वेळी बेव्ह एझ्बेत यांनी लिहिलेले 'थर्टी डेज थर्टी वेज टू रिड्युस ॲंङ्झायटी' हे पुस्तक तुम्हाला मदत करील. हे पुस्तक म्हणजे ३० दिवसांचा किंवा महिनाभराचा एक प्रोग्राम आहे. प्रत्येक दिवसासाठी एक प्लॅन दिला आहे. तुम्ही फक्त रोज दिलेल्या सूचनांचे मनापासून पालन करीत जायचे. ३० दिवसांनंतर नक्कीच तुम्हाला तुमच्यात फरक जाणवेल. चला, आता ३० दिवसांत चिंतेवर कशी मात करता येईल ते पाहू या. 

दिवस १ 🌅 
तुम्हाला खूप चिंता वाटते आहे याचा अर्थ तुम्हाला कुठे फ्रॅक्चर झाले नाही की कुठली शिक्षा झाली नाही.
चिंता म्हणजे आहे तरी काय? ती एक नॉर्मल गोष्ट आहे. यशस्वी लोकांनाही चिंता ग्रासते. चिंतेने ग्रासले आहे म्हणून घाबरून जाऊ नका. 

दिवस २ 🌅 

तुम्हाला चिंतेने ग्रासले की चिंता म्हणजे कुणी नको असलेला पाहुणा तुमच्या घरी आला आहे, असे समजा. मग काय करा, या पाहुण्यास घरातील एक वेगळी खोली देऊन सांगा की ,'ही तुझी खोली आहे. इथे बसून काय हवं ते कर. माझ्या कामात मला डिस्टर्ब करू नकोस.' 

दिवस ३ 🌅 
तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केलात तर ती गोष्ट अधिक प्रबळ आणि त्रासदायक होते. तेव्हा चिंतेला विरोध करण्याऐवजी दुसरीकडे मन वळवा. वाचन करा, चित्रपट पहा, काहीतरी विरंगुळा शोधा. 

दिवस ४ 🌅 
तुम्हाला खूप कामं करायची असतील तर चिंता वाटते. कामाचा पहाड एका रात्रीत फोडायचा प्रयत्न करू नका. तुमच्या कामांची एक यादी बनवा आणि टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करीत राहा. कामे जसजशी पूर्ण होत जातील, तसतशी तुमची चिंता कमी होत जाईल. 

दिवस ५ 🌅 

तुमच्या चिंतेकडे त्रयस्थाप्रमाणे पहा. असं समजा, कुणी एलियन परग्रहावरून आला आहे आणि तुमची चिंता हा त्याच्यासाठी केस स्टडी आहे. तुमच्या चिंतेवर एक रिपोर्ट बनवून त्याला त्याच्या परग्रहावरील हेड ऑफीसला पाठवायचा आहे. या एलियनला लागेल ती माहिती द्या. तुमच्या चिंतेबद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि त्यांतून मार्ग कसा काढायचा तेही कळेल. 

दिवस ६ 🌅 

तुमचे मन म्हणजे एक खोडकर माकड किंवा 'माइंड मंकी' आहे, हे तुम्ही ऐकले असेल. या माइंड मंकीला ताळ्यावर आणण्यासाठी ध्यानधारणेचा उपयोग होऊ शकतो. 

दिवस ७ 🌅 
तुमचा भूतकाळ तुम्हाला सतत छळत असतो. भूतकाळातील गोष्टींचा विचार न करता सध्याच्या परिस्थितीत तुमच्या सभोवती घडणाऱ्या गोष्टींचा विचार करायची सवय लावलीत तर तुम्हाला भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानात जगणे शक्य होईल. 

दिवस ८ 🌅 
या दिवशी स्वतःवरच करुणा करीत आहात असे समजा. स्वत:वरचा राग काढून टाका, स्वत:शी निष्ठूर वागणे बंद करा, स्वतःची 'इमोशन डिटॉक्स' ट्रीटमेंट करा. 

दिवस ९ 🌅 
काही गोष्टींमध्ये तुम्हीच स्वतःवर बंधने घातलेली असता. म्हणजे 'अमुक गोष्ट केलीच पाहिजे, अमुक गोष्ट झालीच पाहिजे.' प्रत्येक गोष्ट करावी की न करावी,' याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तेव्हा असे विचार आणि अशी भाषा बंद करा. 

दिवस १० 🌅 
तुम्हाला दिसणारी प्रत्येक गोष्ट आहे तशीच आहे. तुम्ही तिच्याबद्दल चांगला विचार केला तर ती चांगली आहे असे तुम्हाला वाटते, तुम्ही तिच्याबद्दल वाईट विचार केला तर ती वाईट आहे असे तुम्हाला वाटते. तेव्हा तुमचे नकारात्मक विचार आणि नकारात्मक भाषा बदला की प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली दिसू लागेल. 

दिवस ११ 🌅 
काही समजूती अशा असतात की त्या वस्तुस्थिती नसतात, पण त्या वस्तुस्थिती आहेत असा तुम्ही ग्रह करून घेतलेला असतो. समजूतींचे सौंदर्य हे आहे की या समजूती बदलल्या की तुमचा अनुभवही बदलतो. अशा काही समजूतींची यादी तयार करा. पहा, त्या समजूती आहेत की वस्तुस्थिती आहेत याचा विचार करा. या समजूती वस्तुस्थिती नसतील तर त्या बदला की तुमचा अनुभवही बदलेल. 

दिवस १२ 🌅 
तुम्ही सतत असा विचार करता का की 'अमुक गोष्ट झाली तर काय होईल' किंवा 'तमुक गोष्ट झाली नाही तर काय होईल?' अशा गोष्टी लिहून काढा. आता त्यांची उत्तरे लिहा. तुमच्या लक्षात येईल की यांतील बऱ्याच गोष्टी घडतच नाहीत. तरी तुम्ही विनाकारण चिंता करीत असता. 

दिवस १३ 🌅 
तुम्हाला एखादी अडचण येते तेव्हा लक्षात घ्या, ते एक कठीण काम आहे, विनाश नाही. कुठलेही काम पूर्ण करण्याची एक पद्धत आहे. कामाची पहिली पायरी 'सुरुवात' म्हणून लिहा आणि तुम्हाला हवा असलेला परिणाम 'शेवट' म्हणून लिहा. आता एखादी शिडी चढता त्याप्रमाणे सुरुवातीपासून शेवटापर्यंत मधल्या पायऱ्या भरत जा. हा आहे अडचणींवर उपाय !
तुमची वृत्ती उल्हसित कशी होईल, ते पहा. नसेल जमत, तर साध्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. फिरायला जा, झोप घ्या. 

दिवस १४ 🌅 
आज तुम्हाला चित्रकार व्हायचे आहे. ही 'आर्ट थेरपी' आहे.अगदी साधी वही आणि बेताचे रंगसाहित्य पुरेसे आहे. लहान मुलगा चित्र कसे दिसेल, कुणाला आवडेल याची पर्वा करीत नाही, तर आपल्या मनातील भावना कागदावर उतरवतो. तुम्ही अशा लहान मुलाप्रमाणे चित्र काढा. 

दिवस १५ 🌅 
तुम्हाला माहीत आहे का की तुमच्यामध्ये एक शिशु किंवा लहान मुलगा आहे. या लहान मुलाला तुम्ही आजवर बंदिस्त करून ठेवले आहे. तुम्हाला या लहान मुलाची सुटका करावयाची आहे, एक जबाबदार पालक होऊन. लहान असताना तुम्ही कसे निरागस, मोकळ्या मनाचे, खेळकर होता ते आठवा आणि भेटा तुमच्यातील लहान मुलाला. 

दिवस १६ 🌅 
तुमच्यातील लहान मुलाला भेटल्यावर तुमची प्रतिक्रिया कशी होईल ? ती मिश्र प्रतिक्रिया असेल. कदाचित रडूसुद्धा येईल. पण हरकत नाही. तेसुद्धा नैसर्गिक आहे. या लहान मुलाच्या संपर्कात रहा, त्याच्यासाठी वेळ द्या, तुम्हाला लहानपणी ज्या गोष्टी आवडत होत्या त्या करा. 

दिवस १७ 🌅 
तुमच्यातील लहान मुलाशी संपर्क तर साधला. पण एवढ्याने त्याची खात्री पटणार नाही. या लहान मुलाच्या मनात विश्वास उत्पन्न करा की, मी तुझ्या पाठीशी आहे. आजवर मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता माझ्या व्यापातून मी तुझ्यासाठी वेळ काढीन. 

दिवस १८ 🌅 
आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्यातील लहानग्यासाठी मजा करण्याचा आहे. तुमची कल्पनाशक्ती लढवा आणि आणि मजा करा. रजा काढता येत असेल तर रजा काढा. सकाळी आरामात उठा. छानपैकी नास्ता करा. संगीतवाद्य वाजवा. आइस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आइस्क्रीम खा. आजचा दिवस तुमचा आहे. 

दिवस १९ 🌅 
आजचा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, धन्यवाद देण्याचा आहे. तुम्ही म्हणाल, हे काय भलतंच? माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. मी कशाला आणि कुणाला धन्यवाद देऊ? असं कसं म्हणता? आता आरामात बसून पुस्तक वाचता आहात. म्हणजे पुस्तक घेण्याइतकी तुमची ऐपत आहे. खरं की नाही? आठवत चला, खूप चांगल्या गोष्टी आठवत जातील. 

दिवस २० 🌅 
तुम्ही आयुष्य फार गंभीरपणे घेता का? मग आज भरपूर हसा. ही आहे 'लाफ्टर थेरपी'. कुणाला तरी एखादा विनोद सांगा. विनोदी चित्रपट पहा. 

दिवस २१ 🌅 
तुम्ही जे काही खाता त्याचा तुमच्या भावभावनांवर खूप परिणाम होतो आणि यामध्ये सर्वांत वाईट आहे साखर, जी तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा वाईट आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या आहारात संपूर्ण धान्ये, ताज्या भाज्या, फळे, प्रथिने यांचा समावेश असू द्या. पाणी भरपूर प्या. 

दिवस २२ 🌅 
आता तुम्हाला एका दोन अक्षरी शब्दाचे महत्त्व समजून घ्यायचे आहे आणि तो शब्द म्हणजे - 'नाही'. कारण तुम्हाला नाही म्हणायचे असताना तुम्ही म्हणू शकला नाहीत तर लोक तुम्हाला गृहीत धरतात आणि मग नको असलेली कामे करून तुमची उद्विग्नता वाढते. 

दिवस २३ 🌅 
तुम्ही सर्वांना खूष करण्याचा प्रयत्न करता का? करत असाल तर ही सवय सोडा. कारण यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या कामात एवढे व्यस्त राहता की तुम्ही स्वत:साठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. 

दिवस २४ 🌅 
तुम्ही कसे आहात ते समजून घेण्याचा एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे तुमच्या सहवासातील लोक. या लोकांचा चेहरा म्हणजे एक आरसाच आहे, ज्यात तुम्ही स्वत:चा चेहरा पाहू शकता. या आरश्यात पाहा आणि स्वत:मध्ये बदल करीत राहा. 

दिवस २५ 🌅 
तुम्हाला असं वाटतं का की इतर लोक तुमच्याहून अधिक हुशार, चांगले, बुद्धिमान आहेत? पण वस्तुस्थिती तशी नाही. तुम्हीसुद्धा तितकेच हुशार, चांगले, बुद्धिमान आहात. तुमच्यासारखे कुणीच नाही. तुम्ही म्हणजे फक्त तुम्हीच आहात. 

दिवस २६ 🌅 
आज तुम्ही शिकणार आहात एका नव्या संकल्पनेबद्दल जिचं नाव आहे 'सिंक्रनिसिटी'. या संकल्पनेचे जनक आहेत आधुनिक मानसशास्त्राचे निर्माते कार्ल जंग. या संकल्पनेप्रमाणे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, तिच्या वेव्ह लेंग्थमध्ये तुम्ही राहिले पाहिजे. म्हणजे ती गोष्ट आपोआप तुमच्याकडे आकर्षित होते. 'आजचा दिवस चांगला असणार आहे,' म्हणा की तो चांगला होईल. 

दिवस २७ 🌅 
दुसऱ्याची मर्जी राखण्यासाठी किंवा दुसऱ्याचा रोष ओढवू नये, म्हणून काही गोष्टी रोज तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध करता, त्या साऱ्या गोष्टींना आज फाटा द्या. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्या साऱ्या गोष्टी आज करा. 

दिवस २८ 🌅 
तुमचा अंतरात्मा तुम्हाला काहीतरी सांगत असतो. केव्हातरी हा आवाज ऐकणं तुम्ही बंद केलं आहे. तुमचं मन तुम्हाला अतिविचार करायला लावतं आणि तुमची अवस्था गाठींमध्ये बांधल्यासारखी झाली आहे. कुठेतरी दूर फिरायला जा किंवा एखादं विशिष्ट ठिकाण मनात न ठेवता टूरवर जा. तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुम्हाला ऐकू येऊ लागेल. 

दिवस २९ 🌅 
तुम्ही स्वत:ला भूतकाळातील दु:ख आणि वेदनांबद्दल सांगत असता, तेव्हा स्वत:ला तुमच्या भूतकाळाविषयी एक कथा सांगत असता, जी आता घडत नाही. तुमच्या आयुष्यातील कथेचा तो पहिला ड्राफ्ट होता, तो आता टाकून द्या आणि आजपासून अधिक चांगली कथा लिहावयास घ्या. 

दिवस ३० 🌅 
श्रद्धा म्हणजे सामान्यत: धार्मिक कल्पना मानली जाते. पण तुमच्या आवडत्या व्यक्ती, प्रेमाचे सामर्थ्य, जीवन अशा धर्माशी संबंधित नसणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही श्रद्धा बाळगू शकता. तेव्हा थोडी श्रद्धा असू द्या. निसर्गावर श्रद्धा असू द्या. निसर्गात कितीही अनर्थ झाला तरी निसर्ग स्वत:ला बदलतो, पुन्हा समतोल होतो. लोकांच्या मूलभूत चांगुलपणामध्ये श्रद्धा असू द्या. तुम्ही स्वत: एक अद्भुत, आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्व आहात. स्वत:मध्ये श्रद्धा असू द्या. 

समीक्षा 🔬:- 
तर अशी आहे बेव्ह एझ्बेत यांनी लिहिलेल्या पुस्तकाची ही थोडक्यात ओळख. पुस्तक इतक्या सोप्या भाषेत लिहिले आहे की त्यामध्ये दडलेली फार मोठी तत्त्वे आपल्या लक्षात येत नाहीत. ३० दिवसांत चिंतानिवारण ही आपल्याला वरवर अशक्य कल्पना वाटते. पण या पुस्तकाचा जो सारांश वर दिला आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ते अशक्य नाही. तुम्हाला त्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे. लेखिकेने ठिकठिकाणी निरनिराळ्या पुस्तकांतील जी उद्धरणे दिली आहेत, त्यावरून तिचा अभ्यास दिसून येतो. लेखिका एक उत्तम व्यंगचित्रकार असल्यामुळे प्रत्येक प्रकरणाचा विषय स्पष्ट करण्यासाठी लेखिकेने समर्पक व्यंगचित्र काढले आहे. थोडक्यात हे पुस्तक संग्रहात ठेवण्याचे नाही तर जवळ बाळगून सतत वाचत राहण्याचे, अंमलात आणण्याचे आहे. माझे या पुस्तकाचे मूल्यांकन पूर्ण 5 स्टार आहे. 

पुस्तकाविषयी माहिती:
Name of the book: 30 Days 30 Ways to overcome anxiety 
Author: Bev Aisbett Pages:206 
Contents- -Introduction -Chapters - Day 1 to Day 30 -Other books by Bev Aisbett 
 Published by Harper Collins
पुस्तकाचे नाव: 30 days 30 ways to overcome anxiety
लेखिका: Bev Aisbett

पुस्तकाची रूपरेषा:- 
पुस्तकात ३० दिवसांसाठी ३० प्रकरणे आहेत. प्रकरणाचे नाव म्हणजे एक संदेश आहे. प्रकरणाच्या सुरुवातीला सूचक व्यंगचित्र आहे. नंतर लेखिका अतिशय सोप्या भाषेत विषयाची चर्चा करते. यानंतर लेखिका या दिवशी अंमलात आणण्यासाठी कृती सांगते. शेवटी या दिवसासाठी मंत्र दिला आहे. 

लेखिकेचा परिचय:


(पुस्तकाची लेखिका बेव्ह एझ्बेत) 
बेव्ह एझ्बेत या फ्री लान्स इलस्ट्रेटर आणि व्यंगचित्रकार आहेत. १९९३ मध्ये त्यांना तीव्र चिंता आणि मानसिक तणावाचा त्रास झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी त्यांचे Living with IT- A Survivor's Guide to Panic Attacks हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. बेव्ह यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. त्यांमध्ये चिंतानिवारणावर अधिक पुस्तकांचा समावेश आहे. 

डिस्क्लेमर: 
बेन एझ्बेत यांनी लिहिलेल्या 'थर्टी डेज थर्टी वेज टू रिड्युस ॲंङ्झायटी' या पुस्तकाची ही संक्षिप्त समीक्षा आहे. ही केवळ समीक्षा आहे. समीक्षक पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशकाकडे आहे. पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील आशयाची चर्चा केवळ शिक्षण आणि मनोरंजनासाठी आहे. 

-Book review by Dr Hemant Junnarkar © Dr Hemant Junnarkar, All rights reserved