Thursday, September 26, 2024

करी करी (Kurri Kurri) ची सफर

करी करी ची सफर

(c) Dr Hemant Junnarkar, All rights reserved

बऱ्याच दिवसांत कुठे जाणं झालं नव्हतं . करी करी येथे जाऊनही बरीच वर्षं झाली होती. त्यामुळे आम्ही मित्रांनी करी करी येथे जाण्याचा बेत केला.

शनिवार दिनांक २८/९/२०२४ ला सकाळी आठ वाजता आम्ही आमच्या पॉंड्सच्या घरून निघालो.  मी व माझी पत्नी वर्षा आमचे मित्र संजय कुलकर्णी यांच्या कारने निघालो.

मूनी मूनी (Mooney Mooney):

पहिला विश्राम मूनी मूनी येथे घेतला.
मूनी मूनी हे न्यू साऊथ वेल्स राज्यातील सेंट्रल कोस्ट भागातील छोटे वॉटर फ्रंट व्हिलेज आहे. मूनी मूनी येथे दिसणारी नदी हॉक्सबरी (Hawkesbury) नदी आहे. मूनी मूनी हे नाव कसे पडले याविषयी अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात तर्कसंगत वाटणारा अर्थ असा आहे - मूनी म्हणजे  ॲबरिजिनल भाषेत कांगारू. ॲबरिजिनल भाषेत शब्दावर जोर देण्यासाठी शब्द दोनदा वापरतात. जसे इंग्रजीमध्ये   the चा वापर. मराठीमध्ये आपण म्हणतो की  चालून चालून दमलो, वगैरे. 

उत्तरेकडे प्रवासास जाताना बहुतेक पर्यटक येथे थांबा घेतात. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ दिसते. निरनिराळ्या ठिकाणांवरून येणाऱे आम्ही मित्र मूनी मूनी येथे एकत्र जमलो. 

अल्पोपहारासाठी आम्ही एका शेडमध्ये बसलो. एक ऑसी ग्रुप बसने कॅनबेराला चालला होता. तेही तेथेच थांबले. संजयने त्यांना किट कॅटचे एक पाकीट दिले. त्यामुळे ते खूप खुश झाले.त्यांची चौकशी केली. ऑसी लोकांना गप्पा  मारायला आवडतात. नंतर त्यांची बस निघून गेली.

नंतर वर्षाने बनवलेला केक आम्ही उघडला. त्या वेळी  चँडी यांनी एक गोष्ट सांगितली. शिरडीच्या श्रीसाईबाबांच्या जन्माविषयी कुणालाच माहिती नाही. परंतु पुट्टपर्तीच्या श्री सत्यसाईबाबांनी (जे स्वतःला शिरडीच्या साईबाबांचा अवतार आहे म्हणून सांगत) शिरडीच्या साईबाबांची जन्मतारीख २८ सप्टेंबर  सांगितली. त्याप्रमाणे  काही ठिकाणी २८ सप्टेंबरला शिरडीच्या श्री साईबाबांचा वाढदिवस साजरा करतात. त्याप्रमाणे चॅंडी यांच्या मनात असे होते की वर्षाला केक बनविण्यास सांगावे. परंतु वर्षाला काम बरेच असेल त्यामुळे  त्यांनी तो बेत रहित केला. प्रत्यक्षात वर्षाने केक बनवून आणल्यामुळे या अकल्पित योगायोगामुळे त्यांना गहिवरून आले. (श्री. चँडी स्ट्रॅटफील्डच्या श्रीसाईबाबांच्या देवळात सेवा करतात.)  



आम्ही  बसलो होतो तेथे खाण्याच्या आशेने काही पक्षी  आले. इंटरनेटवर या पक्ष्यांविषयी अशी माहिती मिळाली की  या पक्ष्याचे नाव ऑस्ट्रेलियन ब्रश टर्की (Alectura lathami) असे नाव आहे. हा पक्षी त्याच्या पिसांचा काळा रंग आणि लाल डोके या त्याच्या वैशि ष्ट्यां साठी प्रसिद्ध आहे. नरामध्ये पिवळा कंठा असतो. हा पक्षी मुख्यतः पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो.  


मूनी मूनी येथे घेतलेली काही छायाचित्रे खाली दिली आहेत. 

साधारण तासाभराचा विश्राम घेऊन आम्ही टेरिगल बीच (Terrigal Beach) ला पोहोचलो.

टेरिगल बीच (Terrigal Beach)

टेरिगल हे न्यू साऊथ वेल्सच्या सेंट्रल कोस्ट वरील शहर आहे. हे गॉस्फर्डच्या पूर्वेस १२ किमी अंतरावर आहे. टेरिगल नाव कसे पडले असावे याविषयी निश्चित माहिती नाही. Terrigal चा अर्थ 'अनिश्चित' असा होतो. या ठिकाणी Tarriga जातीची अंजिरं किंवा Tarragal नावाचा पक्षी आढळत असल्याने कदाचित हे नाव पडले असावे.

येथे दिसणारा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे.
असा दिसतो टेरिगल बीचवरील समुद्र.

टेरिगल फोअरशोअर वॉर मेमोरियल (Terrigal Foreshore War Memorial)
टेरिगल बीचवर हे वॉर मेमोरियल आहे. हे स्मारक पहिल्या महायुद्धात टेरिगल भागातील प्राण गमावलेल्या सर्व्हिस पर्सनेलच्या स्मृतीप्रीत्यर्थ आहे. वॉर मेमोरियल असल्याने ठराविक काळाने बिगुल वाजविला जातो. तेथे माहिती देणारा एक फलक आहे.
बीचवर थोडा फेरफटका मारल्यानंतर आम्ही टेरिगल बीच हाऊस या हॉटेलमध्ये स्थिरावलो. या हॉटेलच्या बारीक अक्षरात लिहिलेल्या मेनूमध्ये चॅंडी यांना मुंबई स्पेशल पाव भाजीही आढळली. 
चॅंडी यांच्या तीक्ष्ण (की दैवी) दृष्टीचे आणि सर्वदूर पसरलेल्या मुंबईच्या पाव भाजीचे आम्हाला कौतुक वाटले.

टेरिगल बीचवरून निघून आम्ही करी करीला आलो.

करी करी 
परिचय:
ॲबरिजिनल भाषेत करी करी चा अर्थ 'अगदी पहिला' असा होतो. करी करी भाग न्यू साऊथ वेल्सच्या हंटर रीजनमध्ये येतो.

करी करी आणि द टाऊन्स विद हार्ट या भागामध्ये सात शहरांचा समावेश होतो. ती शहरे अशी:-ॲबरमेन (Abermain), हेडॉन ग्रेटा (Heddon Greta), करी करी (Kurri Kurri), नीथ(Neath),  पेलॉ मेन (Pelaw Main),स्टॅनफर्ड मर्टहर (Stanford Myrthyr) आणि वेस्टन. (Weston). ग्रेटा कोल सीमचा शोध आणि विकास यांमुळे ही सात शहरे नावारूपाला आली.  साऊथ मेटलॅंड कोलफील्ड्स (ज्यांना आज नुसते कोलफील्ड्स) म्हटले जाते) मधील कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी म्हणून ही शहरे विकसित करण्यात आली.

आकर्षणे:
१.मेनलॅंड ऑस्ट्रेलियामधील आऊटडोअर म्यूरल्सचे सर्वांत मोठे प्रदर्शन.
२. रोटरी पार्क, करी करी येथील बिग कुकाबरा (Kookaburra).
३. पिट हॉर्स स्टॅच्यू आणि माइनिंग मेमोरियल.
४. रिचमंड व्हेल रेल्वे म्युझियम आणि स्टीम रेल्वे.
५. एजवर्थ (Edgeworth) डेव्हिड मेमोरियल म्युझियम.
६. मार्च महिन्याच्या शेवटच्या वीक एंडला जंगलात भरणारा करी करी नॉस्टॅल्जिया फेस्टिव्हल.
७.ॲंझॅक डेला फील्ड ऑफ ऑनर.
८.ऑक्टोबरमधील टाऊन ऑफ म्यूरल्स आर्ट शो.
313 Lang Street, Kurri Kurri, 2327, Australia
अशा प्रकारे करी करी मध्ये पाहण्यालायक बरेच काही आहे. पण आमचा उद्देश विश्रांती घेण्याचा असल्याने आम्ही आमचे हॉटेल करी इन येथे आलो.
Kurry Motor Inn:
313 Lang Street, Kurri Kurri, 2327, Australia


करी इनच्या जवळच कोल्स सुपरमार्केट आहे. त्यामुळे तुम्हाला लागणाऱ्या वस्तू येथून आणता येतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मिल्फील्ड येथील न्यू गोकुळ फार्म येथे आलो. 
    
न्यू गोकुळ फार्म, मिल्फील्ड
पत्ता: 83 Lewis Road, Millfield, NSW
New Gokula Farm Australia 83 Lewis Road, Millfield, NSW, 2325, Australia.

या ठिकाणी इस्कॉनचे मंदिर आहे. येथे गाई पाळल्या आहेत. लोक येथे गायींना खायला घालतात व गायींची पूजा करतात. काही लोक गाय दत्तकही घेतात.म्हणजे तिच्यासाठी दरमहा काही रक्कम पाठवतात.
आम्ही बरोबर गाजरं घेतली होती. ती गायींना खायला घातली. नंतर आम्ही मंदिरात कीर्तनाला जाऊन बसलो. येथे राधाकृष्णाच्या फारच सुंदर प्रतिमा आहेत.
कीर्तन झाल्यानंतर प्रसाद झाला. 
बाहेर मोर बागडत होते.
थोड्या वेळाने आम्ही निघालो आणि संध्याकाळी सहा पर्यंत घरी पोहचलो.  दुसऱ्या दिवशी कामावर जायचे होते. या छोट्या ब्रेकमुळे आम्ही चार्ज अप झालो होतो.