Tuesday, July 15, 2025

शिवगीता - अध्याय ४- शिवप्रदुर्भावाख्य


सूत म्हणाला-

अगस्त्य ऋषी रामास असे सांगून | त्यांच्या आश्रमात गेले  निघून  | नंतर राम रामगिरीवर  जाऊन | गोदावरीच्या तटावर- ॥ अ. ४, ओ.१ ॥

शिवलिंगाची स्थापना करून | विरजा दीक्षेचा विधी यथासांग करून |  विभूतीने भूषित होऊन | धारण करून रुद्राक्षमाला - || अ.४, ओ.२ ||

गौतमी (=गोदावरी) नदीतून 🌊| आणलेल्या पवित्र जलांनी 💦 शिवलिंगास अभिषेक करून  | पूजा करून | वन्य फुलाफळांनी 🌺 🍑- || अ.४, ओ.३||

-भस्माच्छादित होऊन, भस्मात शयन करून |  व्याघ्रचर्माच्या 🐯 आसनावर  बसून | अनन्यबुद्धी होऊन | (शिवाचे) सहस्रनाम जपू लागला || अ.४, ओ.४ ||

पहिल्या महिन्यात फळांचा 🍎| दुसऱ्या महिन्यात पानांचा 🌿 | तिसऱ्या महिन्यात जलाचा 💦 आणि चौथ्या महिन्यात वायूचा 🌬️ | आहार करीत - || अ.४, ओ.५ ||

-होऊन शांत, दांत आणि प्रसन्नचित्त | उमेचा अर्धदेह धारण करणारा (=शिव), जो राहतो हृदयपंकजात ❤️ | त्याचे ध्यान सतत | राम करीत असे || अ. ४, ओ.६ ||ट

चार हात आणि तीन नेत्र 👁️ असणारा | विजेप्रमाणे ⚡ पिंगट जटा असणारा | कोटी सूर्यांप्रमाणे ☀️ तेजस्वी असणारा | तर  कोटी चंद्रांप्रमाणे 🌙  असणारा शीतल- || अ.४, ओ.७ ||

सर्व आभरणे धारण करणारा | नागरूपी यज्ञोपवित धारण करणारा | व्याघ्रचर्माचे 🐯 वस्त्र परिधान करणारा | देणारा वर आणि अभय || अ.४, ओ.८||

व्याघ्रचर्म 🐯 उत्तरीय ज्यास | सुर आणि असुर वंदिती ज्यास | शिरावर चंद्र 🌙 ज्याच्या, पाच मुखे ज्यास  | त्रिशूल 🔱 आणि डमरू जो धारण करतो || अ.४, ओ.९||

जो आहे नित्य, शाश्वत, शुद्ध खरोखर | ध्रुव (=स्थिर), अव्यय (=बदल न होणारा) ,अक्षर (=नाश न होणारा), | अशा शिवाच्या नामाचा राम जप करीत असता निरंतर | चार महिने उलटले.|| अ.४, ओ.१०||

मग अचानक झाला उत्पन्न | ध्वनी भीषण |  प्रलयकाळीच्या  मेघगर्जनेसमान | किंवा मंदारपर्वतापासून 🏔️ समुद्रमंथनात 🌊 || अ.४, ओ.११||

किंवा  त्रिपुरे जेव्हा गेली भस्म  🔥 होऊनी    | रुद्राच्या बाणांनी 🏹. | राम तेव्हा पाही गोंधळूनी | जलाशयाकडे 🌊- || अ.४, ओ.१२||

- ब्राह्मण हो,  त्या वेळी रामाला समोर | दिसले तेज प्रखर 🚨 | त्या तेजाने  भ्रमित होऊन फार  | दशदिशा त्याला दिसेनात || अ.४, ओ.१३||

अंधत्व येऊन क्षणभर |  गोंधळून गेला तो राजकुमार (=राम) | द्विजेश्वर हो, त्याने केला विचार | की ही राक्षसाची (=रावणाची ) माया असावी || अ.४, ओ. १४ ||

नंतर त्या महावीराने (=रामाने) उठून | धनुष्य सज्ज करून | दिव्य मंत्राने  अभिमंत्रित करून | तीक्ष्ण बाणांची  आणि अस्त्रांची वृष्टी केली || अ.४, ओ.१५||

अग्न्यस्त्र🔥 ,वरुणास्त्र 💦 || सोमास्त्र 🌙, मोहनास्त्र || सूर्यास्त्र ☀️, पर्वतास्त्र 🏔️|| महाचक्र 🛞, सुदर्शनास्त्र || कालचक्र, वैष्णवास्त्र - || अ.४, ओ.१६||

-रुद्रास्त्र, पाशुपतास्त्र | ब्रह्मास्त्र,  कुबेरास्त्र | वज्रास्त्र, वाय्वस्त्र 🌬️ आणि परशुरामास्त्र,  |  अशी अस्त्रे राघवाने योजिली || अ.४, ओ. १७ ||

परंतु त्या तेजात 🚨 |  त्या महीपतीची (=रामाची) शस्त्रे  आणि अस्त्रे झाली लुप्त | जशा होती समुद्रात 🌊| ढगांतून ☁️ पडलेल्या गारा || अ.४, ओ.१८ ||

तेव्हा त्याच्या हातून | धनुष्य 🏹 पडून गेले जळून | भाता, गोधिका, अंगुस्तान | हेही सर्व जळाले || अ.४, ओ.१९||

तेव्हा घाबरलेला लक्ष्मण | भूमीवर पडला मूर्च्छित होऊन | रामही असहाय्य आणि भयभीत होऊन | मिटून डोळे 👁️- || अ.१४, ओ.२०||

-जमिनीवर  टेकून गुडघ्यांस | जाऊन शरण शंकरास | शंभूच्या सहस्रनामास | मोठ्याने म्हणू लागला- || अ.४, ओ.२१||

-पुन्हा पुन्हा भूमीवर | शिवास करू लागला दंडवत् नमस्कार. | त्याच वेळी पुन्हा झाला ध्वनी भयंकर | दशदिशा दणाणून सोडणारा || अ.४, ओ.२२ ||

त्या ध्वनीमुळे भूस्तर हलले, |  पर्वत 🏔️ कंपित झाले. |  आणि तेज प्रगट झाले | चंद्रासारखे 🌙 शीतल. || अ.४, ओ.२३||

रामाने डोळे 👁️ उघडून पाहिले, | तेव्हा त्याला दिसले | सर्व अलंकारांनी ज्याला भूषविले | असा वृषभ 🐂 समोर आहे. || अ.४, ओ.२४ ||

वृषभ 🐂 तो शुभ्र लोण्यासमान |  वर आलेल्या घुसळलेल्या   ताकातून. | सोन्याच्या तारेत ओवलेल्या मरकत मण्यांसमान  | दोन शिंगे त्याची.  || अ.४, ओ.२५ ||

डोळे 👁️ नीलमण्यांसमान 🧿 | नाजूक गळ्यात कंठवसन 🧣 (=गळपट्टा, स्कार्फ) | पाठीवर रत्नजडित आसन | शुभ्र चामरांनी युक्त  || अ. ओ.२६||

नादाने गळ्यातील घुंगुरघंटांच्या   |  दाही दिशा भरल्या | अशा वृषभावर त्या | होता आरूढ महादेव, कांती असलेला  स्फटिकासमान, || अ.४, ओ.२७ ||

तेजस्वी कोटिसूर्यांसमान | शीतल  कोटिचंद्रांसमान | केले व्याघ्रांबर परिधान | आणि नागयज्ञोपवीत || अ.४, ओ.२८|| 

सर्व अलंकार केले परिधान |  विद्युल्लतेसारख्या पिंगट जटा करी  धारण  |  ज्याचा कंठ नील, व्याघ्रचर्म ज्याचे प्रावरण  | आणि मस्तकी शोभे चंद्र  || अ.४, ओ. २९||

ज्याच्या दहा भुजांत | अनेक आयुधे शोभतात | जो आहे त्रिलोचन, तरुण, श्रेष्ठ सर्व पुरुषांत | आणि सच्चिदानंदरूप || अ. ४, ओ.३० ||

त्या वृषभावर शिवासह पार्वती विराजमान |  मुख जिचे पूर्णचंद्रासमान  |  कांती निळ्या कमळाच्या  मालेसमान  | मरकतरत्नासमान अथवा || अ.४, ओ.३१||

अलंकृत मौक्तिकाभरणांनी 🦪 | जशी रात्र शोभते तारकांनी  ✨|  विंध्यपर्वतासारख्या 🏔️ उत्तुंग स्तनांनी | लवून गेलेली  || अ.४, ओ.३२||

आहे की नाही असा पडावा प्रश्न | अशा नाजूक मध्यभागी, अंतर्वस्त्र करून परिधान | दिव्य अलंकार लेऊन | लावून दिव्य अनुलेप || अ. ४, ओ.३३||

दिव्य माळा वस्त्रांवर | निळ्या कमळांप्रमाणे डोळे 👁️ मनोहर | कुरळ्या केसांनी दिसे चेहरा सुंदर  | तांबूलभक्षणाने मुख 👄 शोभते || अ. ४, ओ.३४||

शिवाला आलिंगन देऊन | पुलकित झाले जिचे तन | ख्यात जी सच्चिदानंदरूप म्हणून | अशी ती त्रैलोक्याची माता || अ.४, ओ.३५||

सौंदर्याचे सार काढून जिला बनविले  | अशा पार्वतीचे  रघुनंदनाला दर्शन झाले. | तसेच   

आपापल्या वाहनांवर बसलेले | धारण करून 

आपापली आयुधें || अ. ४, ओ. ३६||

बृहद्रथंतरादि सामें गात | आपापल्या स्त्रियांनी युक्त |  होते शोभत |  इंद्रादि दिक्पाल. || अ. ४, ओ.३७||

अग्रभागी गरुडावर बैसून | शंख, चक्र, गदा धारण करून | ज्याची शरीरकांति  नीलमेघासमान | विद्युत्कांति लक्ष्मीनें युक्त || अ.४, ओ.३८||

जनार्दन एकचित्त | होता रुद्राध्यायाचा जप करीत. | मागे हंसावर शोभत |   होता ब्रह्मदेव-  || अ.४, ओ.३९||

-चार मुखे, लांब दाढी  आणि जटा धारण करणारा | सोबत  देवी भारती (=सरस्वती) असणारा | वेद आणि रुद्रसूक्ते गात | महेश्वराची स्तुति करणारा. |  || अ. ४, ओ. ४०||

अथर्वोपनिषद गात |  मुनिमंडल होते देवाची (=शिवाची)  स्तुती करीत. |  गंगादि नद्यांनी युक्त |   असणारा नीलवर्ण सागर 🌊- || अ. ४, ओ. ४१||

-श्वेताश्वतर  मंत्र म्हणत |  होता गिरिजापतीची स्तुति करीत. | कैलासपर्वतासम 🏔️ असणारे अनंत | आणि इतर नाग  - || अ.४, ओ.४२||

-होते रत्नांनी विभूषित  | आणि मुखाने कैवल्योपनिषद गात. | सुवर्णाचा वेत घेऊन हातात | पुढे होता नंदी उभा. || अ. ४, ओ. ४३||

दक्षिणभागीं गणेश मूषकावर | शोभे जसा गिरिवर. |  | उत्तरभागीं  मयूरावर |  आरूढ  झालेला षण्मुख || अ.४, ओ.४४||

पाठीमागे येती दिसून | महाकाल आणि चंडेश भीषण. | जळत्या दावाग्नीसमान | कालाग्निरुद्र दूर दिसे.|| अ. ४, ओ.४५ ||

तीन पायांचा त्रिपाद, ज्याचा आकार भीषण, |  भृंगिरिटि, जो करी  नृत्य आणि भुंग्याप्रमाणे गुणगुण | असे कोट्यवधि प्रमथगण | अनेक प्रकारचे आणि अनेक चेहऱ्यांचे  || अ.४, ओ.४६ ||

आरूढ नाना वाहनांवर. | मातृमंडल सभोवार. | सिद्ध आणि विद्याधर | पंचाक्षरी (=ॐ नमः शिवाय) जपात मग्न || अ.४, ओ. ४७ ||

दिव्य रुद्रगीतांचे गायन |  करती किन्नरजन | जप करती द्विजगण | 'त्र्यंबकं यजामहे" मंत्राचा    || अ.४, ओ.४८||

नारद आकाशात |  होते वीणेवर गीत गात,  नृत्य करीत. |  नृत्य  नाट्ययुक्त | करती रंभादी अप्सरा. || अ. ४, ओ. ४९ ||

होते गाण्यात  | चित्ररथादी गंधर्व रत. | 

जणू भूषणे शंभूच्या कानांत | कंबल आणि अश्वतर हे नाग || अ.४, ओ. ५०||

नाग कपाल आणि कंबल | गीत गाती सुरेल. | पाहून अशी देवसभा अखिल | रघुनंदन कृतार्थ झाला || अ.४, ओ.५१ ||

हर्षाने सद्गदित होऊन | राम करी दिव्य सहस्त्रनामाने  महेश्वराचे स्तवन | आणि महेश्वरास करी नमन | पुन्हा पुन्हा || अ.४, ओ.५२||

अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'शिवप्रदुर्भावाख्य' नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला.

🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏🪔 🌺 

शब्दार्थ व टीपा:


प्रदुर्भाव: प्रकट होणे, अवतरण, अस्तित्वात येणे

आख्या (आख्य): कथन, वर्णन, अध्याय

'शिवप्रदुर्भावाख्य' = "शिवाच्या प्रकट होण्याचे वर्णन असलेला अध्याय"

श्लोक ४-

गौतमी=गोदावरी नदीचे नाव.एक कथा अशी आहे की, गौतम ऋषींनी आपल्या तपोबलाने गंगा देवीला पृथ्वीवर आणले. त्यांच्या कृपेने गंगा नदी दक्षिण भारतात गोदावरीच्या स्वरूपात प्रकट झाली.

सिंधु= येथे सिंधु हा शब्द नदी या अर्थाने वापरला आहे. 

जलै:= नदीच्या जलात अनेक पाण्यांचे प्रवाह मिसळलेले असतात. म्हणून 'जलै:' असे बहुवचन वापरले आहे.

प्रतीकाश (ना.पुं.)=सारखा, सारखा दिसणारा (श्लो.७)

अवनिभृत् (ना.पुं.) = पर्वत (श्लो.११)

श्लो.१२

पुष्कर (ना.न.पुं)=जलाशय, सरोवर 

भ्रश्यत् – धातू "भ्रंश् (१, प.प.) (पडणे, खाली पडणे, नष्ट होणे) चा वर्तमानकाळातील कृदंत रूप.

विभ्रमः (ना.पुं)– भ्रम, हालचाल, गोंधळ, उलथापालथ, गती.

त्रिपुरांची थोडक्यात कथा-

विद्युन्माली, तारण आणि कमलाक्ष असे तारकासुराचे तीन पुत्र होते. त्यांनी तपश्चर्या करून  ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचा वर मागितला. असा वर देण्यास आपण असमर्थ असल्याचे ब्रह्मदेवाने सांगताच या असुरांनी ब्रह्मदेवांकडून तीन पुरे मागून घेतली. पहिले पुर सोन्याचे, दुसरे रुप्याचे आणि तिसरे लोखंडाचे. ही तीनही पुरे सतत आकाशात फिरत राहावीत आणि एक सहस्र वर्षांनी  एका सरळ रेषेत येतील आणि फक्त त्याच वेळी  एकच बाण मारून ती नष्ट करता यावीत. ब्रह्मदेवांनी तसा वर दिला.  या वरप्राप्तीमुळे हे असुर प्रबळ झाले आणि अधर्म माजवू लागले. त्यामुळे देवांच्या विनंतीवरून शिवांनी एक विशाल रथ तयार केला तो असा, पृथ्वी हा रथ, सूर्य आणि चंद्र ही चाकं, ब्रह्मा हा सारथी आणि विष्णू हा बाण. एक सहस्र वर्षांनी ही  तीन पुरे एकाच रेषेत आल्यावर, भगवान शिवांनी एकाच बाणाने ती  नष्ट केली. विद्युन्माली, तारण आणि कमलाक्ष हे आपल्या पुरांचा नाश झाल्यावर  भगवान शिवांना शरण आले.  

श्लो.१४

अन्धीकृतेक्षण=अन्धीकृत + ईक्षण (=दृष्टी)= ज्याची दृष्टी अंध केली गेली आहे असा.

तूर्णम् (अ.)=लवकर, तत्क्षण.

श्लो. १५

स्वक (वि.)=स्वतःचे; व्यध् - विध्यति (४ प.प.)=वेध घेणे; निशित (वि.)=तीक्ष्ण;

कुलिश (ना. नपुं.)= वज्र (श्लो.१७)

प्रायुङ्क्त= प्रायोजिली (शस्त्रे आणि अस्त्रे) (प्र + युज् ७ प.प) कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. येथे भूतकाळ दर्शविण्यासाठी वापरले आहे. (श्लो.१७)

करका (ना.स्त्री)=पावसात पडणारी गार

गोधिका (ना.स्त्री.)= धनुष्याच्या दोरीचा आघात होऊं नये म्हणून मनगटावर बांधलेलें चर्म (श्लो.१९)

अकिञ्चित्कर (वि.) = निष्फळ, असहाय, काहीच करू न शकणारा (श्लो.२०)

स्वरेणाप्युच्चरन्नुच्चैः =स्वरेण + अपि + उच्चरन् (=उच्चारणारा)+उच्चै: (श्लो.२१)

श्लो.२५

मरकत (ना. नपुं)=पाचू

प्रोत (वि)=ओवलेला धातु: प्रि (प्री-प्रयति)= वाणणे, विणणे, ओवणे, गुंफणे

श्लो.२६

पल्याण (ना.नपुं.)= आसन, मखर, सवारीचा भाग

निबद्धम् (नि+बध्)= वेढलेले / बांधलेले

श्लो.२७

घर्घरी(ना.स्त्री.)=घंटिकायुक्त गळपट्टा

विग्रह (ना. पुं)= देह, मूर्ती, रूप

श्लो. ३१

निभ (वि.)= सदृश / सारखा / समान

दामा (ना. स्त्री.)= माळ / हार

उद्यत् (वि.)=प्रकाशणारा, झळकणारा

"भरालसा" → येथे "भर" हा धातू (भृ — उचलणे, वाहणे) म्हणून वापरलेला असून तो क्रियापद किंवा क्रियासूचक विशेषण तयार करतो.

म्हणजेच: "भार वहाण्याचा आळस असलेली" (श्लो.३२)

अन्तराबर (ना. नपुं.)= अंतर्वस्त्र (श्लो.३३)

"आढ्य" (वि.):

1. समृद्ध, श्रीमंत, धनाढ्य – ज्याच्याकडे खूप धन, ऐश्वर्य किंवा वैभव आहे.

2. परिपूर्ण, भरलेला – एखाद्या गुणाने परिपूर्ण असलेला. (श्लो.३५)

श्लो.४२

श्वेताश्वतर मंत्र= "श्वेताश्वतरमन्त्र" म्हणजे "श्वेताश्वतर उपनिषदातले मंत्र", जे वेदांतातील एक महत्त्वाचे उपनिषद आहे. यामध्ये शिवतत्त्वाचे वर्णन केलेले आहे, विशेषतः ब्रह्मस्वरूप शिवाचे (परमात्मा) रूप.


"अनन्तादि महा नाग" — अनंत, वासुकी, तक्षक इ. महान नाग.

श्लो.४७

“मातृमण्डल” हा शब्द “मातृका” या संकल्पनेशी संबंधित आहे. मातृका म्हणजे देवतेच्या रूपातील शक्ती – विशेषतः शक्तिच्या विविध रूपांतील देवीमूर्ती. हिंदू तांत्रिक परंपरेत “मातृका” म्हणजे सप्तमातृका (सप्तदेवी) — ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी, चामुंडा अशा देवींचा समूह.

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved