Monday, February 9, 2026

महाराजांचा प्रसाद न घेता गेल्याने भाऊ राजाराम कवर रस्ता चुकतो

(श्री गजानन विजय 
अध्याय २० 
ओवी १११ ते १४३)

श्री गजानन विजय ग्रंथातील ही कथा महाराजांच्या भक्तांना महाराजांच्या समाधीनंतर आलेल्या अनुभवाची आहे. 

महाराजांचे  एक भक्त  भाऊ राजाराम कवर हे खामगावमध्ये डॉक्टर होते. त्यांची  तेल्हाऱ्याला बदली झाली म्हणून ते जाण्यापूर्वी  सहकुटुंब  शेगावी मठात श्रींचे दर्शन घेण्यासाठी आले.

वेळ  संध्याकाळची होती.  त्या वेळी  मठाधिपती असणाऱ्या  बाळाभाऊंनी  कवरांना विनंती केली की मठात आला आहात तर प्रसाद घेऊन जा.  शिवाय  आज व्यतिपात (= ज्योतिषशास्त्रानुसार एक अशुभ योग) आहे.  परंतु जरुरीचे काम असल्याने कवर  गाडीवानास दमणी (=घोडागाडी)  जुंपण्यास सांगून  तेल्हाऱ्याला जाण्यास  निघाले. 

खूप वेळ गाडी चालवल्यानंतर  गाडी एका अज्ञात ठिकाणी येऊन पोहचली. कवर  गाडीतून उतरून पाहतात तर या ठिकाणाचा काहीच पत्ता लागत नाही . तेथे  समोर एक तलाव  दिसत होता.  

कवर  चिडून गाडीवानाला म्हणाले, ' तू हे कुठे आणलेस?' 

गाडीवान हात जोडून सांगू लागला की,'  मी तर नेहमीच्या रस्त्याने आलो.' 

अंधार पडू लागला होता.   कवर स्तब्ध झाले आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की हे समर्थांचे कृत्य आहे. ते म्हणाले , ' तलावाच्या दुसऱ्या बाजूला      घागरमाळांचा (= बैलांच्या गळ्यांत बांधण्यात येणाऱ्या घंटांचा )  आवाज येतो आहे. त्या आवाजाच्या रोखाने गाडी ने.' 

गाडीवानाने  गाडी आवाजाच्या रोखाने  नेली  आणि गाडी   शेगावला  आली. कवर ती रात्र शेगावात राहिले आणि  सकाळी पुन्हा मठात आले.

बाळाभाऊ म्हणाले , 'पहा, महाराजांनी तुम्हाला व्यतिपाताच्या दिवशी जाऊ दिले नाही.'

कवरांनी त्या दिवशी प्रसाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी ते तेल्हाऱ्याला गेले.

घागरमाळा : येथील घागरमाळा या शब्दाचा अर्थ गजानन विजय पोथीचे नित्य वाचन करणारी माझी बहीण शामला हिने सांगितला आहे.

व्यतिपात योग : व्यतिपात योग  तेव्हा होतो जेव्हा सूर्य व चंद्र यांच्या गतीचा विशिष्ट कोनीय संबंध (योग) बनतो. हा योग पंचांगात अमंगल मानला जातो.

© Dr Hemant Junnarkar
All rights reserved

No comments:

Post a Comment

31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...