Friday, October 23, 2026

श्रीसाईसच्चरित-अध्याय३८-हंडीवर्णनम्

श्रीसाईसच्चरित -अध्याय‌ ३८- हंडीवर्णनम्
बाबांची पाकनिष्पत्ती

या अध्यायात काय आहे:
१. बाबांची पाकनिष्पत्ती
२. दत्तदर्शन टाळू नये-बाबांचा नानासाहेब चांदोरकर आईंना बोध

बाबांची पाकनिष्पत्ती:
बाबांना निरनिराळ्या पाककृती बनवण्याचा उत्साह असे. ते कशा प्रकारे निरनिराळ्या पाककृती बनवून भक्तांना वाढत असत त्याचे तपशीलवार वर्णन श्री. दाभोळकरांनी केले आहे. पुढे बाबांचे महत्त्व वाढल्यावर बाबांना प्रसादाची ताटे पुष्कळ येऊ लागली आणि मग बाबांना या पाककृतींची गरज राहिली नाही.

कथा: - दादा केळकर यांना बाबा मांस मिश्रित पुलाव ताटात घ्यायला लावतात 

बाबांचे भक्त  गणेश दामोदर ऊर्फ दादा केळकर सोवळं पाळणारे शुद्ध शाकाहारी होते. 

एकदा बाबांनी खारा पुलाव म्हणजे मांस मिश्रित भात बनवला. बाबांनी दादांना विचारले, ' खारा पुलाव कसा झाला आहे?' 

दादा केळकर तोंडदेखले म्हणाले, 'चांगला झाला आहे.' 

बाबांनी पुन्हा विचारले, 'तू खाल्ला नाहीस तर तुला कसे कळले की पुलाव चांगला झाला आहे?' बाबांनी दादांचा हात धरून पुलावात घातला आणि पुलाव ताटात घ्यावयास लावला.

बाबांनी हा पुलाव दादांना खावयास लावला की नाही याविषयी श्री. दाभोळकरांनी काही लिहिले नाही. दाभोळकरांनी याच अध्यायात म्हटले आहे की जे मांसाहार करणारे नव्हते, त्यांना बाबांनी कधीही मांसाहार करायला लावला नाही. त्यास अनुसरून बाबांनी दादांना पुलाव फक्त ताटात घ्यावयास लावला, खायला लावला नाही, असे समजू या.

याचे तात्पर्य एवढेच आहे  बाबांना दादांना बोध द्यायचा होता की गुरुने काहीही आज्ञा  केली तरी शिष्याने ती पाळण्यास तत्पर असले पाहिजे. शिरसावंद्य मानली पाहिजे.

श्री. दादा केळकर

श्री गणेश दामोदर केळकर ऊर्फ दादा केळकर हे श्रीसाईबाबांच्या जुन्या आणि निष्ठावान भक्तांपैकी एक होते. ते सनातनी ब्राह्मण असून धार्मिक आचारविचारांचे कटाक्षाने पालन करीत असत. त्यांना वेदशास्त्रांचेही ज्ञान होते.

दादा केळकर हे सुरुवातीला साईबाबांकडे जाण्याबाबत साशंक होते. मात्र, बाबांच्या सहवासातून त्यांच्या मनात बाबांविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि ते बाबांचे निष्ठावान भक्त बनले.

दादा केळकर हे रावबहादूर हरि विनायक साठे यांचे सासरे होते. साठे यांनी शिर्डीत बांधलेल्या वाड्यात दादा केळकर यांचे कुटुंब काही वर्षे वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांना बाबांच्या सहवासात राहण्याची आणि इतर भक्तांशी सान्निध्य साधण्याची संधी मिळाली.

श्रीसाईबाबांच्या गुरुपूजनाच्या परंपरेशीही दादा केळकर यांचे नाव जोडलेले आहे. बाबांच्या प्रेरणेने शिर्डीत गुरुपूजनाची प्रथा सुरू झाली आणि दादा केळकर यांनीही या पूजेत महत्त्वाची भूमिका बजावली.

श्रीसाईसच्चरिताच्या अध्याय ३८ मध्ये दादा केळकर यांच्याशी संबंधित पुलावाचा प्रसंग वर्णन केला आहे. दादा केळकर हे सनातनी आचारांचे पालन करणारे असल्यामुळे या प्रसंगात बाबांनी त्यांची गुरुनिष्ठा आणि आज्ञापालनाची तयारी तपासल्याचे दिसते.

दादा केळकर यांचे निधन १९२८ मध्ये झाले. श्रीसाईबाबांच्या आरंभीच्या भक्तांमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

संदर्भ: श्रीसाईसच्चरित, अध्याय ३८; श्री साईबाबा संस्थान, शिर्डी यांच्या संकेतस्थळावरील दादा केळकर यांच्याविषयीची चरित्रात्मक माहिती.

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved






श्रीसाईसच्चरित-अध्याय३८-हंडीवर्णनम्

श्रीसाईसच्चरित -अध्याय‌ ३८- हंडीवर्णनम् बाबांची पाकनिष्पत्ती या अध्यायात काय आहे: १. बाबांची पाकनिष्पत्ती २. दत्तदर्शन टाळू नये-बाबांचा नाना...