Wednesday, July 30, 2025

शिवगीता - अध्याय ५- रामास वरप्रदान

सूत म्हणाला, 

मग तेथे प्रगटला सोन्याचा रथ भव्य | ज्यास जडविली रत्ने दिव्य, | त्या रत्नांच्या किरणांनी प्रकाशमय | झाल्या दशदिशा. || अ.५, ओ.१ || 

रथ मोत्याच्या तोरणांनी सजविला | शेकडो शुभ्र छतांनी झाकला.  | चाकांस मात्र चिखल लागला | नदीच्या काठाने आल्याने || अ.५, ओ.२ ||

सोन्याचे लगाम लावलेले |  घोडे रथास जोडले |  रथास मौक्तिकयुक्त छताने सजविले | रथावर शोभे वृषभयुक्त ध्वज || अ. ५, ओ. ३ ||

रथास गज जोडले मत्त  | रथ रेशमी आसनाने युक्त | आणि केला सुशोभित | पारिजातकाच्या फुलांनी || अ.५, ओ. ४ ||

मृगनाभीतील कस्तूरीचे रथास विलेपन  | कर्पूर आणि अगरु (चंदन)  यांच्या धूपातून | दरवळणाऱ्या सुगंधाने आकृष्ट होऊन | भ्रमर जमती रथाभोवती. || अ‌. ५, ओ. ५ || 

रथाचा ध्वनी  प्रलयकाळच्या मेघांसमान |  रथ नाना वाद्यांनी  संपन्न.  |  वीणा वेणु इत्यादि वाद्यांचे करती वादन |   गण किन्नरींचे || अ.५, ओ.६ ||

पाहून तो रथ मनोहर |  वृषभावरून उतरून शंकर | रथातील रेशमी आसनावर | पार्वतीसह बैसला || अ. ५, ओ. ७ ||

देवांगनांच्या ओवाळण्यानें |  श्वेतचामरें वारण्यानें  |  दिव्य पंख्यांच्या वार्‍याने | नीललोहित (=शंकर)   आनंदित झाला || अ. ५, ओ. ८ ||

(देवांगनांच्या) कंकणांच्या किणकिणाटाने |  नूपुरांच्या मंजुळ ध्वनीनें | वीणा, वेणु ह्यांच्या वादनानें | शुक व मयूर यांच्या शब्दांनीं- || अ. ५, ओ. ९|| 

-शुभ्र पारव्यांच्या किलबिलाटाने |  त्रैलोक्य व्यापले पूर्णपणे.  | नाग शोभती फणा उभारल्याने.  | पाहून त्यांना मयूर || अ.५, ओ.१० || 

-पिसाऱ्यावरील कोट्यवधी चंद्र दाखवून | करती नर्तन. | मग वृषभध्वजाने (=वृषभावर आरूढ झालेला, शिव) उठवून |  नमन करणाऱ्या रामाला-  || अ.५, ओ.११ ||

-प्रेमाने अतिशय | आणले रथात  दिव्य. | मग कमंडलूतील निरामय | जलाने स्वतः आचमन करून- || अ.५, ओ.१२ ||

रामाला आचमन करविले, | प्रेमाने अंकावर बसविले | आणि त्याला दिले | दिव्य धनुष्य व अक्षय बाणभाता. || अ.५, ओ.१३ ||

दिले शिवाय |  महापाशुपतास्र दिव्य. | मग प्रेमाने अतिशय |  चंद्रमौली (=शिव) म्हणाला || अ.५, ओ.१४ ||

'हे नृपा, या अस्त्राचे फार सामर्थ्य |  ते नष्ट करील  त्रैलोक्य  | म्हणून युद्धात सामान्य | ह्याचा प्रयोग करूं नको || अ. ५, ओ. १५ ||

ह्याचा त्रैलोक्यांत  प्रतीकार |  नाहीं कुणी करू शकणार | म्हणून जेव्हा बेतेल  प्राणावर | तेव्हाच प्रयोग कर याचा || अ. ५, ओ. १६ ||

अन्य कालीं वापरता यास  | ते नष्ट करील जगास.' | नंतर  देवांस आणि लोकपालांस |  महेश्वराने बोलाविले  || अ.५, ओ.१७ ||

आणि तो परमप्रीत (=शिव) म्हणाला,   |  ''देव हो, तुम्हीही आपली अस्त्रे द्या राघवाला | म्हणजे  तो मारील रावणाला |  त्या अस्त्रांनी.  || अ. ५, ओ. १८ ||

मी रावणाला वर दिला, |  "देवांकडून  मृत्यू नाहीं तुला" | म्हणून घ्या वानरजन्माला | रामासाठी युद्धात. || अ.५, ओ.१९ ||

साह्य केल्यास रामास | सुख लाभेल तुम्हास.' | देवांनी वंद्य मानले शिवाच्या आज्ञेस |  जोडून हात || अ.५, ओ.२०||

वंदून शंभूचे चरण | त्यांनी रामास केली अस्त्रे प्रदान. | दिले दैत्यारीने (=विष्णूने) नारायणास्त्र महान | तर पुरंदराने (=इंद्राने) इंद्रास्त्र || अ.५, ओ.२१||

ब्रह्मदेवाने ब्रह्मदंडास्त्र | धनंजयाने (=अर्जुनाने) आग्नेयास्त्र | यमाने याम्यास्त्र | रक्षोराजाने (=राक्षसांच्या राजाने ) मोहास्त्र दिले || अ.५, श्लो.२२ ||

वरुणाने वारुणास्त्र | प्रभंजनाने (=वायूने) वाय्वास्त्र  | कुबेराने कौबेरास्त्र | तर ईशानाने रौद्रास्त्र दिले || अ. ५, ओ.२३ ||

सूर्यानें सौरास्त्र | सोमाने सोमास्त्र | विश्वेदेवांनीं पार्वतास्त्र |  आणि वसूंनीं वासवास्त्र दिले || अ.५, ओ.२४ || 

अशी ही अस्त्रे प्राप्त करून |  दशरथात्मज राम  संतुष्ट होऊन |   नम्रतेने हात जोडून | भक्तिपूर्वक म्हणाला, || अ. ५, ओ. २५ ||

श्रीराम म्हणाला, 

'हे भगवान, ओलांडणे क्षारसमुद्रास |  शक्य नाही मनुष्यांस. | जिंकणे कठीण देवदानवांस | त्या  समुद्रातील लंकादुर्गास. || अ. ५, ओ.२६ ||

लंकेमध्ये आहेत | जितेंद्रिय आणि शिवभक्त | वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनात रत |  कोट्यवधी राक्षस || अ. ५, ओ. २७ ||

त्यांना अनेक माया अवगत | ते आहेत अग्निहोत्री आणि बुद्धिवंत | केवळ भाऊ (लक्ष्मण) माझ्यासोबत | कसा जिंकू मी राक्षसांना ? || अ.५, ओ.२८||

महादेव म्हणाला-

रामा, वधण्यास राक्षस आणि रावण |   योग्य आहे  हाच क्षण | आला आहे कारण | काळ त्यांच्या विनाशाचा || अ. ५, ओ. २९ ||

ते होऊन अधर्मास प्रवृत्त | देव-ब्राह्मणांना पीडा देतात | त्यामुळे हे सुव्रता, जवळ आला आहे अंत | त्यांच्या आयुष्य आणि वैभवाचा || अ.५, ओ.३० ||

राजस्रीच्या कामनेने आसक्त | अशा रावणास तू वधशील रणात | शत्रूस पापासक्त  | मारणे आहे सुकर || अ.५, ओ.३१ || 

शत्रू अधर्मात रत | असतो भाग्यानेच मिळत. | पारंगत धर्मशास्त्रात | किंवा वेदाध्ययनात तत्पर- || अ. ५, ओ.३२||

-होता विनाशकाल प्राप्त | होतो धर्ममार्गापासून च्युत. | जो पापी पीडतो सतत | देवतांना, ब्राह्मणांना आणि ऋषींना - || अ.५, ओ.३३||

-त्याचा नाश असे निश्चित. | रामा, किष्किंधानगरात | उत्पन्न झाले आहेत |  देवांच्या अंशापासून-  || अ. ५, ओ. ३४ ||

-शत्रूला जिंकण्यास दुष्कर | बलाढ्य असे वानर. | ओलांडण्यास सागर | ते साहाय्य तुला करतील || अ. ५, ओ. ३५ ||

वानरांकडून समुद्रावर घे सेतू बांधून | म्हणजे वानर  जातील त्यावरून  |  मग परिवारासहित रावणाचा वध करून | आपल्या प्रियेला आण || अ. ५, ओ. ३६ ||

युद्धात शस्त्रांनी जय मिळत असेल जर | वापरू नयेत अस्त्रे तर. | नि:शस्त्रांवर, अल्प शस्त्रे असणारांवर |  किंवा पलायन करणारांवर- || अ.५, ओ. ३७ ||

-जो प्रयोग करतो दिव्यास्त्रांचा | नाश होतो त्याचा.| मी आहे निर्माता जगाचा | यापलिकडे काय सांगू? || अ.५, ओ.३८ ||

मीच  रक्षणकर्ता जगाचा | मीच नाश करतो त्याचा | हे महीपते, मी मृत्यू या जगताचा  | आणि मीच मृत्यू मृत्यूचा || अ.५, ओ.३९||

व्यापले मी सर्व जगास | आणि चराचरास | हे युद्धोत्सुक राक्षस | पडलेत माझ्या मुखात || अ. ५, ओ. ४० ||

तू होऊन केवळ निमित्त | मिळव कीर्ती रणात || अ.५, ओ.४१||

अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'रामास वरप्रदान नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला.

🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏🪔 🌺 

शब्दार्थ व टीपा:

किर्मीरित" = झगमगलेला, तेजाने व्यापलेला, चमकदार लहरींनी भरलेला. (किर्मीर नामापासून नामधातू) (श्लो.१)

आढ्य (वि.)=युक्त (मूळ शब्द आध्य) संधिनियमामुळे 

आध्य" → "आढ्य" ) काही वेळा ध्वनिग्राह्यता आणि उच्चारसुलभतेसाठी काही व्यंजनांत किंवा स्वरांत बदल होतो (श्लो.२)

श्लो. ३

खलीन = घोड्यांच्या तोंडाला लावले जाणारे लोखंडी लगाम (bridle)

शुक्ता = शंख किंवा मुक्तेप्रमाणे चमकणारे (किंवा शंखमुक्तेपासून बनवलेले) 

श्लो.४

वारणिका=हत्तींचा समूह; पट्ट=रेशीम; तल्प=आसन; अभिरञ्चित= सुशोभित केलेला (अभि+ रञ्च् ( गण १, आ.प.)

स्वन (ना.पुं) = ध्वनी, आवाज (श्लो.६)

श्लो.९ ते ११

निध्वान (ना.पुं.)=ध्वनी; मञ्जीर (ना. नपुं.)=नूपुर; उन्निद्र (वि.)=उभारलेले, फणिन्= सर्प

श्लो.१२

आनिनाय =आणले (आ+नी, परोक्ष भूतकाळ)

 यत्नत: = प्रयत्नपूर्वक. परंतु येथे या शब्दाचा अर्थ "पूर्ण जागरूकतेने, मनपूर्वक, शुद्ध श्रद्धेने व शास्त्रशुद्ध रीतीने" असा घेतला पाहिजे.

श्लो.२२ 

या श्लोकातील देवतांचे अनेक प्रकारे अर्थ काढता येतील. येथे सर्वसामान्य अर्थ दिला आहे.

धनंजयाने आग्नेयास्त्र दिले = अर्जुनाने खांडववन जाळले तेव्हा अग्नीने त्यास आग्नेयास्त्र दिले होते. ते त्याने येथे दिले असा अर्थ होऊ शकतो.

रक्षोराजाने मोहास्त्र दिले = येथे रक्षोराज, म्हणजे राक्षसांचा राजा म्हणजे रावण असा अर्थ होतो. पण स्वतःच्या वधासाठी रावण अस्त्र कसा देईल, म्हणून काही ठिकाणी विभीषण असा अर्थ दिला आहे. राक्षसांचा राजा निऋती असा अर्थही काही ठिकाणी दिला आहे. निऋती हा पश्चिम दिशेचा दिक्पाल असून त्यालासुद्धा राक्षसांचा राजा मानले आहे. तो राक्षसांचा राजा असल्याने त्याने मोहास्त्र किंवा मोहनास्त्र म्हणजे मोह किंवा भ्रम उत्पन्न करणारे अस्त्र दिले.

रामानंतर होऊन गेलेला अर्जुन किंवा रामास नंतर भेटलेला विभीषण येथे कसा येऊ शकेल. याचे उत्तर असे होऊ शकते की शिवगीता हा इतिहास किंवा संदर्भग्रंथ नसून एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. तसेच रामायण , महाभारतातील व्यक्तिरेखांस सार्वकालिक किंवा प्रतीकात्मक स्वरूप आहे.

श्लो.२३

या श्लोकात ईशानाने  रौद्रास्त्र दिले असे म्हटले आहे. "ईशान" हे शिवाचे उत्तर-पूर्व दिशेचे रूप असून, ते विशेषतः ज्ञान, आग्नी तत्त्व आणि तपस्येचे प्रतिनिधी मानले जाते.

रौद्रास्त्र: रौद्र शक्ती, कोपयुक्त विध्वंसासाठी वापरले जाणारे, अग्नी तत्त्वाशी संबंधित.

अथवा किं बहूक्तेन = किंवा फार काय सांगू? (श्लो.३८)

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, July 29, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

श्रीभगवान म्हणाले

तू आहेस असूयाविहीन | सांगतो तुला म्हणून ||अत्यंत गूढ विज्ञानासहित ज्ञान | जे अशुभातून मुक्त करील || अ.९, ओ.१||

ते उत्तम आणि पवित्र ज्ञान I विद्या आणि गुपितांच्या राजाचे त्यास स्थान || ज्याचे प्रत्यक्ष आचरण | धर्मकारक, सुखदायक आणि अविनाशी || अ.९, ओ.२||

परंतपा, असे जन आहेत | जे या धर्मावर विश्वास ठेवीत नाहीत || ते माझ्याकडे न येता जाती परत | मृत्यू आणि संसाराच्या मार्गावर || अ.९, ओ.३||

मी व्यापले सर्व जगत | रूपाने माझ्या अव्यक्त ||सर्व भूते आहेत माझ्यात | मी त्यांच्यात नाही || अ.९, ओ.४||

भूतेही  नाहीत माझ्या अंतरी | पहा माझा योग ईश्वरी || मी भूतांस उत्पन्न करून पोषण करी | तरी भूतांत नाही मी || अ.९, ओ.५||

सर्वत्र फिरणारा वात | जसा राहतो आकाशात ||तशी सर्व भूते माझ्यात | राहती हे जाण || अ.९, ओ.६||

कल्पाचा होता अंत | भूते प्रवेशती माझ्या प्रकृतीत || कल्पाची होता सुरुवात | मी निर्मितो पुन्हा त्यांना || अ.९, ओ.७||

भूते प्रकृतीच्या अधीन | मी पुन्हा पुन्हा करतो निर्माण || माझ्या प्रकृतीतून | सर्व भूतांना || अ. ९, ओ.८||

धनंजया, कर्मे ती | मला न बांधती || कारण माझी आसक्ती | नाही त्या कर्मांत || अ.९, ओ.९||

माझ्या अध्यक्षतेत | प्रकृती उपजते चराचरासहित || म्हणूनच हे जग कार्यान्वित | राहते धनंजया  || अ.९, ओ.१०||

मी जगाचा महान ईश्वर असून | करता मनुष्यदेह धारण || माझा परम भाव न जाणता मला लेखती न्यून | मूर्ख लोक || अ. ९, ओ.११||

मोहविणाऱ्या असुरी आणि राक्षसी प्रकृतीचा आश्रय घेऊन | सर्व आशा, कर्मे आणि ज्ञान || बसतात गमावून | जन बुद्धिभ्रष्ट  || अ.९, ओ.१२||

पार्था, दैवी प्रकृतीच्या आश्रयात I जे महात्मे राहतात II ते अनन्य भावाने मला भजतात I जाणून मला भूतांचे अव्यय, आदिस्थान II अ. ९, ओ. १३ II

ते राहून प्रयत्नशील, दृढव्रत, नित्ययुक्त I सतत माझे कीर्तन करतात  II मला नमस्कार करतात I भक्तीने करतात माझी उपासना IIअ. ९, ओ.१४II

आणि दुसरे ज्ञानयज्ञात I एकत्वात आणि विभिन्नतेत II उपासना करतात I माझ्या बहुविध विश्वरूपाची II अ. ९,ओ.१५II

यज्ञ म्हणजे मीच आहे I यज्ञातील क्रतु, स्वधा, औषधी मीच  आहे II मंत्र आणि आज्य मीच आहे I आहे मीच  अग्नी आणि आहुती II अ.९, ओ.१६II 

माता-पिता, पितामह मी या जगास I करतो मी जगाच्या पोषणास II पवित्र मी, योग्य जाणण्यास I मी ॐकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद II १७ II 

मी सर्वांचा प्रभू, सर्वांची गती, पोसतो सर्वांस I साक्षी, निवास, योग्य शरण जाण्यास II स्थान, निधान, करतो उत्पत्ति-प्रलयास I आहे मी अव्यय बीज II १८ II 

मी करतो उष्णता निर्माण I माझ्यामुळे येई पाऊस, होई अवर्षण II मी मृत्यू आणि अमृत जाण I अर्जुना, मीच सत् आणि असत् II १९ II  

काही जन तीन वेदांचे ज्ञानी | सोमरस पिणारे, मुक्त पापातुनी || यज्ञाने माझ्याकडून स्वर्ग मिळवुनी | दिव्य भोग भोगती || अ.९, श्लो.२०||

असे हे कामेच्छुक, तीन वेदांचा धर्म आचरती | विशाल स्वर्गलोक उपभोगती || पुण्य संपता मृत्युलोकी येती | करती अशा येरझारा || अ.९, ओ. २१||

अनन्य भावाने करीत चिंतनास | जे करती माझ्या उपासनेस || त्या नित्य अभियुक्तांच्या योगक्षेमास | मी वाहतो || अ. ९, ओ. २२ ||

अन्य देवतांचे भक्त । श्रद्धेने जेव्हा त्या देवतांस पूजितात ।। कौंतेया, तेव्हा खरे मलाच भजतात । जरी न विधिपूर्वक ।। अ. ९, ओ. २३।।

यज्ञांचा भोक्ता आणि प्रभू मी असे । तरी या भक्तांस माझे ज्ञान नसे ।। म्हणून होत असे । पतन त्यांचे ।। अ. ९, ओ. २४।।

देवांचे पूजक देवांकडे जाती I पितरांचे पूजक पितरांकडे जाती II भूतांचे पूजक भूतांकडे जाती I माझे भक्त येती माझ्याकडे ।। अ. ९, ओ. २५।।

पान, फूल, फळ, पाणी जरी कोण । भक्तीने मला करतो अर्पण ।। मी ते करतो ग्रहण । प्रेमपूर्वक ।। अ. ९, ओ. २६ ।।

जे करतोस, खातोस । हवन करतोस, देतोस ।।

ज्याची उपासना करतोस । कौंतेया, ते कर मला अर्पण ।। अ.९, ओ. २७।।

या संन्यासयोगाने युक्त होऊन । कर्मबंधनाच्या शुभ-अशुभ फलांतून ।। विमुक्त तू होऊन । माझ्याकडे येशील ।। अ.९, ओ. २८।।

सर्व भूते समान मला । न कोणी प्रिय वा अप्रिय मला ।। भक्तीने जे भजती मला । मी त्यांच्या ठायी आणि ते माझ्या ठायी ।। अ.९, ओ. २९।।

असूनही कोणी दुराचारी । जर अनन्यभावाने माझी भक्ती करी ।।  मानावा तो साधू तरी । कारण सुनिश्चित बुद्धी त्याची ।। अ.९, ओ. ३०।।

तो लवकरच धर्मात्मा होतो । शाश्वत शांती मिळवतो ।। माझा भक्त नाश न पावतो । लक्षात ठेव कौंतेया ।। अ.९, ओ. ३१।।

माझ्या आश्रयास जे येती । जरी ते हलक्या योनीतील असती ।। तरी परम शांतीस पावती । असो स्त्री, वैश्य वा शूद्र ।। अ.९, ओ. ३२।।

ब्राह्मण, राजर्षी तसेच पुण्यवान भक्त । परम शांती मिळवतील निश्चित ।। येऊन या अनित्य, दुःखदायक मृत्युलोकात । माझी भक्ती करीत राहा ।। अ.९, ओ. ३३।।

माझा भक्त हो, माझ्या ठायी ठेव मन । नमस्कार मला कर, कर माझे पूजन ।। परायण मला हो, माझ्यात स्वतःस जोडून । माझ्याकडेच येशील ।। अ.९, ओ. ३४।।

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘राजविद्याराजगुह्ययोग’ नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.

🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺 🙏

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved.

Friday, July 25, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग

अर्जुन म्हणाला

काय असे ब्रह्म आणि अध्यात्म | पुरुषोत्तमा, काय असे कर्म ||  अधिभूताचे काय मर्म | अधिदैव कशास म्हणतात || अ.८, ओ.१||

अधियज्ञ काय असे | मधुसूदना, या देहात तो कसा वसे ||  नियत आत्म्यांनी तुला कसे | प्रयाणकाळी जाणावे || अ.८, ओ.२||

श्रीभगवान म्हणाले

परम अविनाशी ते ब्रह्म | स्वभाव म्हणजे अध्यात्म ||  त्या सृष्टिव्यवहारास म्हणती कर्म | ज्यातून उद्भवतो भूतांचा भाव || अ.८, ओ.३||

नश्वर भाव म्हणजे अधिभूत | स्वामी म्हणजे अधिदैवत ||  अधियज्ञ मीच देहात | हे देहधारी श्रेष्ठा || अ.८, ओ.४||

अंतकाळी मला स्मरत | देहातून जो होई मुक्त ||  त्याला माझा भाव होई प्राप्त | यात नाही संशय || अ. ८, ओ.५||

सोडत असता देहाला | जो भाव स्मरतो ज्याला ||  तोच भाव प्राप्त होतो त्याला | नेहमी कौंतेया || अ.८, ओ.६||

मन आणि बुद्धी करून मला अर्पित | सर्व काळात ||  माझे स्मरण करीत | निस्संशय मलाच मिळशील, युद्ध करतानाही || अ.८, ओ.७||

जो योगयुक्त राहून, करतो अभ्यास | दुसरीकडे जाऊ न देता चित्तास ||  परम दिव्य पुरुषाच्या करतो चिंतनास | तो त्या पुरुषासच मिळतो || अ.८, ओ.८||

सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूहून सूक्ष्म आहे | सर्वांचा पालनकर्ता, अचिंत्यरूप आहे || सूर्यासारखा तेजस्वी, अंधाराच्या पलिकडे आहे | दिव्य परम पुरुष || अ.८, ओ.९||

प्रयाणकाळी मन अचल ठेवून |भक्ती आणि योगबलाने  युक्त होऊन ||  भुवयांमध्ये प्राणाची स्थापना करून | दिव्य पुरुषाचे स्मरण करणारा त्यालाच मिळतो || अ.८, ओ.१०||

वेद जाणणारे ज्यास अक्षय म्हणतात | विरक्त यती ज्यात प्रवेशतात ||  ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरतात | ते पद थोडक्यात तुला सांगतो || अ.८, ओ.११||

सर्व द्वारांचा संयम करून | मनाचा हृदयात निरोध करून ||  मस्तकात प्राण स्थापन करून | करीत योगधारणा ||अ.८, ओ.१२||

ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत |  माझे स्मरण करीत ||  देहातून होतो मुक्त | तो जातो परम गतीस || अ.८, ओ.१३||

जो अनन्य बुद्धीने सतत | नित्य राहतो मला स्मरत ||  त्या योग्यास नित्ययुक्त | मी सहज  प्राप्त आहे || अ.८, ओ.१४||

झाल्यावर माझी प्राप्ती | पावल्याने परम गती ||  पुनर्जन्मास न जाती | पुनर्जन्म असे अशाश्वत आणि दु:खाचे आगर || अ.८, ओ.१५||

ब्रह्मभुवनापासून लोक सारे | पुन्हा पुन्हा घेती फेरे ||  येता माझ्यापाशी कौंतेया रे | होई न पुनर्जन्म || अ.८, ओ.१६||

दिवस ब्रह्मदेवाचा | म्हणजे काळ सहस्र युगांचा || तेवढाच असे काळ रात्रीचा | हे ज्ञानी जाणतात || अ.८, ओ.१७||

या दिवसाची होता सुरुवात | अव्यक्त सारे होती व्यक्त ||  रात्र होता लय पावतात | अव्यक्तात त्याच || अ. ८, ओ.१८||

भूतांचा समुदाय एकच तो | पुन्हा पुन्हा आकारास येतो ||  रात्र होता लय पावतो | प्रभवतो दिवस उगवता || अ.८, ओ. १९ ||

परंतु या अव्यक्ताहून | असे दुसरा श्रेष्ठ अव्यक्त भाव सनातन ||  सर्व भूते जरी जाती नाश पावून | तो भाव नाश न पावतो ||अ.८, ओ. २०||

ज्या अव्यक्तास अक्षय म्हणती | तीच असे परम गती ||  जेथे जाऊन परत न येती | तेच माझे परम धाम || अ.८, ओ.२१||

पार्था, श्रेष्ठ पुरुष तो | अनन्य भक्तीने प्राप्त होतो ||  सर्व भूतांस जो अंतरी सामावतो | ज्याने व्यापले हे जग सारे || अ.८, ओ.२२||

देहत्याग करता कुठल्या काळात | योगी पुन्हा जन्म न घेतात || आणि केव्हा जन्म घेतात | तो काळ सांगतो भरतर्षभा || अ.८, ओ.२३||

अग्नी, प्रकाश, शुक्ल पक्ष आणि दिवस | उत्तरायणाचे सहा मास ||  यांत जे ब्रह्मवेत्ते सोडती देहास | ते जाती ब्रह्मपदाला || अ.८, ओ. २४||

धूर, रात्र तसेच कृष्ण पक्षात | दक्षिणायनाच्या सहा महिन्यांत ||  यांत जे योगी देह सोडतात | ते चंद्रलोकास जाऊन परत येती || अ.८, ओ.२५||

शुक्ल आणि कृष्ण गती | जगी शाश्वत मानती ||  पहिल्या गतीने मिळे मुक्ती | परत येती दुसऱ्या गतीने || अ.८, ओ.२६||

जे योगी जाणती या दोन गतींना | मोह न होई त्यांना || याचसाठी अर्जुना | योगयुक्त हो सर्व काळी || अ.८, ओ.२७||

वेदांत, यज्ञांत, तपांत आणि दानांत | जी पुण्यफले सांगितली आहेत ||  त्यांपलिकडे योगी जातात | परम दिव्य अशा स्थानी || अ.८, ओ.२८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘अक्षरब्रह्मयोग’ नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला.

     🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺🙏

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Thursday, July 24, 2025

The Power of Discipline

The Power of Discipline is a book written by Daniel Walter. Everyone wants to become self-disciplined , but does not find it easy. Here this book comes to our help and explains how to master self-discipline. 


1.Self-discipline is a biological process: 

Meaning and nature of discipline: Discipline is the ability to focus on one course of action until that goal has been accomplished. Discipline is about doing what you know you've got to do even when you don't feel like it. 

According to the author self-discipline is a biological process. Self-discipline does not come on its own, but it is to be developed. Childhood is the time when the things are learnt easily , but it is never too late to learn and you can develop self-discipline at any age.

The following points are noteworthy to know about self-discipline:-
1. Self-discipline is a skill you can master if you are willing to work at it.
2. Self-discipline and focus work simultaneously.
3. Will power and self-discipline lose strength when they have been put to work and wear down.
4. The best way to build discipline is to remove yourself from temptation. For example, if you are tempted to unhealthy foods, go for shopping after dinner.
5. For self-discipline, consistency of efforts is very important. Consistency builds momentum and that's how dreams become a reality.
Remember, there is a biological process to discipline, and similarly to any other habit, the brain 🧠 is more programmed to accept it as the norm the more you practise it.

2. The benefits of self-discipline:
Self-discipline-
i. Raises your self-discipline
ii. Helps you build better relationships
iii. Enables you to handle constructive discipline
iv. Enables you to avoid risky behaviours.

3. The status quo bias-why we resist change
We want to maintain the status quo because of the following reasons:-
i. The sunk cost fallacy:- Generally this tendency is called inertia, which means people choose to do nothing and carry on as normal.
ii. Loss Aversion theory:- According to this theory, people don't like losing things.
iii. The fear of regret:- No one wants to make a change and then regret it.
iii. The mere exposure effect:- The more we experience a particular phenomenon, the more we are likely to accept and like it.
To overcome the above limitations, we can undertake a  thought evaluation exercise which is to put your rational decision-making abilities to good use and build the life you want. 

Chapter 4-A reality check-the Dunning - Kruger effect

It is important to know what you are good at and what you are not. When you know the areas in which you are not good, you have to keep developing yourself, associate with the people who are good in those areas and so on.

Chapter 5- Daily habits to improve self-discipline

Habits are routine behaviours performed without putting any conscious thoughts into them. Your habits are reflection of your character. 
Daily habits to improve self-discipline
i. Your morning routine:- Your morning routine will set the pace for the rest of your day. Your morning routine should consist of exercise, healthy breakfast and so on. Praying and meditation in the morning also helps you keep positive throughout the day.
ii. The final hour of the day:- When you end your day after work, you need enough sleep for renewing the body and resting the mind so that you can be productive the next day. If you take a nap during the day, restrict it to 30 minutes. Avoid stimulants such as caffeine and nicotine in the evening which will stimulate the brain to stay awake. Eat right food in dinner and avoid rich, heavy, fatty foods and carbonated drinks as these can cause painful heartburn in the middle of the night and interrupt your sleep. Prepare the body for sleep by establishing a relaxing bedtime routine like having a warm bath, reading a book etc. There should be right environment with comfortable mattress, pillow etc.
iii. Gratitude:- Express  gratitude, say 'thank you' for small things rather than complaining or waiting big things to happen.
iv. Set daily goals:- You can achieve long-term goals by breaking them down and setting daily goals for yourself.
v. Stay organised:- Organisation and self-discipline go hand in hand. It improves productivity, reduces stress, enhances energy and enthusiasm and creates positive image for you.

6: Tips for building better habits
The Navy SEALS are some of the most disciplined people in the world. They are trained to understand that the mind is more powerful than we can ever imagine.
The 40% Rule :-According to this rule, when the mind starts telling the body is tired, we have reached only 40% of what we are capable of. If you know this principle, you can achieve more.
Box breathing:- This is a technique used by Navy SEALS to stop stress.
The 10 X Rule:-Grant Cordone, the pioneer of this rule, suggests that we should set goals ten times higher than the desired outcomes because it will make us take ten times more action to achieve it. 









श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७- ज्ञानविज्ञानयोग

श्रीभगवान म्हणाले

मन लावून माझ्यात | माझ्या आश्रयाने योग योजीत || कसे मला जाणशील निश्चित | ते ऐक पार्था || अ.७, ओ.१||

विज्ञानासहित ते ज्ञान | पूर्णपणे तुला सांगेन || जे घेतल्यावर जाणून | जाणण्यासारखे उरते न काही || अ.७, ओ.२||

एखादा कुणी सहस्र मनुष्यांत | झटतो, सिद्धी करण्यास प्राप्त || अशा झटणाऱ्या सिद्धांत | एखादा मला तत्त्वत: जाणतो || अ.७, ओ.३||

भूमी, जल, अग्नी, पवन | आकाश, बुद्धी, अहंकार आणि मन || अशा आठ प्रकारची भिन्न | असे माझी प्रकृती || अ.७, ओ.४||

ही माझी अपर प्रकृती होता अवगत | जाण माझी पर प्रकृती, जी असे जीवभूतांत || जी हे जगत | धारण करिते महाबाहो || अ.७, ओ.५||

पर आणि अपर प्रकृतींतून | भूते होती उत्पन्न ||जग प्रभवते माझ्यातून | आणि लय पावते माझ्यात || अ.७, ओ. ६||

माझ्याहून श्रेष्ठ असे | धनंजया, दुसरे काही नसे || आहे सर्व माझ्यात जसे | मणी 🧿 ओवलेले धाग्यात 🧵 || अ.७, ओ.७||

कौंतेया, मी रस पाण्यातील 🌊 | मी प्रभा चंद्रसूर्यांतील 🌙 ☀️|| मी शब्द आकाशातील  |आणि पुरुषांतील पौरुष मी || अ.७, ओ.८||

मी पुण्यगंध पृथ्वीतील 🌎| मी तेज अग्नीतील 🔥|| मी जीवन भूतांतील | तपस्व्यांतील तप मी || अ.७, ओ.९||

भूतांचे सनातन बीज मी | लक्षात ठेव पार्था नेहमी || बुद्धिमंतांची बुद्धी मी | तेजस्व्यांचे मी तेज || अ.७, ओ.१०||

बल मी बलवानांत | काम आणि आसक्तीपासून मुक्त || भरतर्षभा भूतांत | धर्माविरुद्ध नसणारा काम मी || अ.७, ओ.११||

सात्त्विक, राजस आणि तामस हे भाव तीन | आहेत माझ्यापासून ||  ते माझ्यात असती जाण | नसे मी त्यांच्यात || अ. ७, ओ.१२||

या गुणांनी तीन | हे जग गेले मोहून || न घेते जाणून | मला, परम अव्ययाला || अ.७, ओ.१३||

या दैवी गुणांनी युक्त माया | असे दुस्तर, पार करण्या || तेच समर्थ, ती तरून जाण्या | शरण येती जे मला || अ.७, ओ.१४||

जे नर असती या भावांच्या आश्रयास | मूढ, नराधम, असुर वृत्तीचे, करती दुष्कृत्त्यांस || मायेने हरले ज्यांच्या ज्ञानास | ते न शरण येती मला || अ.७, ओ.१५||

अर्जुना, जे सत्कृत्त्य करतात | असे चार प्रकारचे भक्त || जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी आणि आर्त | मला भजतात भरतर्षभा || अ.७, ओ.१६||

विशेष आहे त्यांत | नित्ययुक्त, एकभक्ती असा ज्ञानी भक्त || मी त्यास प्रिय अत्यंत | मलाही प्रिय तो || अ.७, ओ.१७||

हे सारे भक्त जरी थोर | ज्ञानी हा आत्माच खरोखर || युक्तात्मा  तो माझ्यात स्थिर | राहतो उत्तम गतीत || अ.७, ओ.१८||

तो अनेक जन्म घेऊन | सर्व काही वासुदेव आहे, असे जाणून || शरण येतो मला ज्ञानवान | महात्मा सुदुर्लभ || अ.७, ओ.१९||

जे स्वत:च्या प्रकृतीने बद्ध होती | इच्छांमुळे ज्ञान गमावती || ते अन्य देवतांना शरण जाती | त्यासाठीच्या नियमानुसार || अ.७, ओ.२०||

जो भक्त ज्या तनूची | श्रद्धापूर्वक इच्छा करतो पूजेची || अचल श्रद्धा त्याची | मी तेथे स्थिर करतो || अ.७, ओ.२१||

श्रद्धेने युक्त तो | तिच्या पूजेची इच्छा करतो || नंतर इच्छित मिळवतो | मी ठरवून दिलेले || अ.७, ओ.२२||

हे अल्पबुद्धी फळास मिळवती | ज्याचा नाश होतो अंती || देवांचे पूजक देवांकडे जाती | माझे भक्त येती माझ्याकडे || अ.७, ओ.२३||

मी अव्यक्तातून आलो व्यक्तिरूपात | असे निर्बुद्ध लोक मानतात || ते जाणू न शकतात | श्रेष्ठ, अव्यय, उत्तम भाव माझा || अ.७, ओ.२४||

मी योगमायेने झाकला असे | त्यामुळे सर्वांस प्रगट न दिसे || मी, जन्मरहित, अव्यय असे | हे मूढ लोक न जाणती || अ.७, ओ.२५||

अतीत आणि वर्तमान | यांचे अर्जुना, मला ज्ञान || भविष्य आणि भूताची मला जाण | परंतु मला कोणी न जाणतो || अ.७, ओ.२६||

भारता, इच्छा आणि द्वेषातून | उद्भवलेल्या द्वंद्वाच्या मोहातून || सृष्टीत सर्व भूते संमोह पावून | जातात परंतपा || अ.७, ओ.२७||

जे पुण्यकर्मी जन | मुक्त होती पापातून || ते द्वंद्वाच्या मोहातून मुक्त होऊन | दृढ व्रताने मला भजती || अ.७, ओ.२८||

मोक्ष मिळवण्या वृद्धत्व आणि मरणातून | जे झटती माझा आश्रय घेऊन || येई त्यांना समजून | ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म || अ.७, ओ.३०||

अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञात | मी आहे असे जे जाणतात || ते अंतकाळीही मला स्मरतात | युक्त अशा बुद्धीने || अ.७, ओ.३०||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ज्ञानविज्ञानयोग’ नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🪔 🙏 🌺 🪔 🙏🌺 🪔 🙏 🌺 🪔 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Wednesday, July 23, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ६ -ध्यानयोग

श्रीभगवान म्हणाले

योगी आणि संन्यासी म्हणावे त्यास | जो त्यागून कर्मफळास || करतो कर्तव्य कर्मास | म्हणू नये अग्निहोत्रहीनास आणि निष्क्रियास II अ.६, ओ.१ II

म्हणती ज्यास संन्यास | पांडवा, जाण योग त्यास || सोडल्यावीण संकल्पास | योगी न होई कोणीही || अ.६, ओ.२||

योगारोहणास ज्या मुनीने आरंभ केला | कारण असे कर्म त्याला || मात्र योगारूढाला | शम हे कारण असे || अ।६, ओ.३||

जो होत नाही आसक्त | इंद्रियविषयांत किंवा कर्मांत || संकल्पांतून होतो मुक्त | म्हणती त्यास योगारूढ || अ.६, ओ.४||

आपण करावा उद्धार आपला | करू नये नाश आपला || आपण बंधू आपला | आपणच आपला शत्रू || अ.६, ओ.५||

जो स्वत:स जिंकतो | तो स्वत:चा मित्र होतो || जो स्वत:स न जिंकतो | तो होई शत्रू स्वत:चा || अ.६, ओ.६||

स्वत:स जिंकलेल्या प्रशांत | परमात्म्यास समत्व होई प्राप्त || शीतोष्ण वा सुखदु:खात | वा मानापमानात || अ.६, ओ.७||

तो आत्मा तृप्त ज्ञान-विज्ञानाने | असे निर्विकार, इंद्रियांस जिंकले ज्याने || समान ज्यास मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने | त्यास योगी म्हणतात || अ.६, ओ.८||

सुहृद, मित्र, शत्रूंशी | तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य, बंधूंशी || सज्जनांशी आणि पाप्यांशी | समबुद्धी असे त्या विशेष पुरुषाची  || अ.६, ओ.९||

राहून एकांतात | चित्त आणि आत्मा करून नियंत्रित || इच्छा आणि परिग्रहापासून मुक्त | योग्याने स्वत:स सतत योजावे || अ.६, ओ.१०||

स्वच्छ भूमीवर | स्थापन करावे आसन स्थिर || न फार उंचावर, न खाली फार | मृदू वस्त्राचे, कातड्याचे किंवा गवताचे || अ.६, ओ.११||

त्या आसनावर बसून | करून एकाग्र मन || चित्त आणि इंद्रिये नियंत्रित करून | आत्मविशुद्धीसाठी  योग योजावा || अ.६, ओ.१२||

शरीर, मस्तक आणि मान | एका रेषेत स्थिर ठेवून || नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून | न पाहता सभोवती ||अ.६, ओ.१३||

मन शांत व निर्भय ठेवून | ब्रह्मचर्यव्रतात राहून || मनावर संयम ठेवून | चित्त माझ्या ठिकाणी ठेवावे, माझ्यात परायण असावे || अ.६, ओ.१४||

याप्रमाणे स्वत:स योजून सदोदित | मनास करून संयमित || योगी पावतो माझ्यात | निर्वाणकारक परम शांतीस ||अ.६, ओ.१५||

अति खाणाऱ्यास | किंवा अगदीच न खाणाऱ्यास || फार झोपणाऱ्यास किंवा फार जागणाऱ्यास | हा योग जमत नाही अर्जुना || अ.६, ओ.१६||

आहार-विहार ज्याचा नियंत्रित | जो कर्मे करी उचित || निद्रा-जागरण ज्याचे मर्यादेत | त्यालाच दु:खनाशक ठरतो हा योग || अ.६, ओ.१७|||

जेव्हा चित्त नियंत्रित | स्थिर होते आत्म्यात || सर्व इच्छांतून होतो विरक्त | तेव्हा तो योगी म्हणवतो || अ.६, ओ.१८||

निवांत जागी ठेवता दिव्यास | स्थैर्य राहते ज्योतीस || ती उपमा त्या योग्यास | ज्याचे चित्त नियंत्रित || अ.६, ओ.१९||

योगसेवेने नियंत्रित | चित्त होता शांत || आत्म्याने आत्म्यास पाहत | आत्म्यात संतुष्ट राहतो || अ.६, ओ.२०||

जी अनुभवता न ये इंद्रियांस | परी बुद्धी समर्थ जाणावयास || पावता अशा स्थितीस | योगी न ढळतो तत्त्वत: || अ.६, ओ.२१||

जी स्थिती होता प्राप्त | दुसरा लाभ नाही मोठा वाटत || स्थिर होता त्या स्थितीत | विचलित न करी दु:ख कुठले  || अ.६, ओ.२२||

दु:खाच्या उत्पत्तीचा अंत करणाऱ्या  | जाणावे समाधिस्थितीला त्या || निश्चयाने योगास योजावे त्या | न होता विचलित || अ.६, ओ.२३||

इच्छा जन्मती संकल्पांतून | त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करून || मनानेच सर्व बाजूंनी नियमन करून | इंद्रियांच्या गावाचे || अ.६, ओ.२४||

बुद्धीने धैर्ययुक्त | हळूहळू करून नियंत्रित || मन स्थिर करून आत्म्यात | विचार दुसरा करू नये || अ.६, ओ.२५||

अस्थिर आणि चंचल मन | करील जेथे जेथे भ्रमण || तेथून त्याला आवरून | आत्म्यात वश करावे || अ.६, ओ.२६||

मन प्रशांत झालेल्या | रजोगुण निमालेल्या ||ब्रह्मरूप, पापरहित झालेल्या | अशा योग्यास उत्तम सुख लाभते || अ.६, ओ.२७||

योगी पापरहित | सदा स्वत:स योजीत ||ब्रह्मसंस्पर्शाचे अत्यंत | सुख मिळवतो || अ.६, ओ.२८||

योगयुक्त आत्मा तो | सर्वत्र समदृष्टी ठेवतो || सर्व भूतांत स्वत:स पाहतो | आणि स्वत:त सर्व भूतांस ||अ.६, ओ.२९||

जो सर्वत्र मला पाहतो | आणि माझ्यात सर्व पाहतो || त्याच्यासाठी मी न नाश पावतो | न तो पावतो नाश माझ्यासाठी || अ.६, ओ.३०||

सर्व भूतांत मी वास करतो | अशा मला जो एकत्वभावाने भजतो || तो योगी सर्व प्रकारे वर्ततो | माझ्याच ठायी || अ.१६, ओ.३१||

ठेवून समदृष्टीस | इतरांत पाहून स्वत:स || जाणतो त्यांच्या सुखदु:खांस | तो परम योगी मानावा || अ.६, ओ.३२||

अर्जुन म्हणाला

हे मधुसूदना, या योगास | कथन तू केलेस || परंतु वाटे साधारणपणे  त्यास | स्थिरता न येईल चंचलत्वामुळे || अ.६, ओ.३३||

कृष्णा, हे चंचल मन | विचलित करणारे, दृढ, बलवान || त्याचा निग्रह वायूसमान | कठीण मी मानतो || अ.६, ओ.३४||

श्रीभगवान म्हणाले

महाबाहो, निस्संशय हे मन | आहे चंचल आणि निग्रह करण्यास कठीण || परंतु कौंतेया, अभ्यास आणि वैराग्यातून | त्याचा निग्रह शक्य आहे || अ.६, ओ.३५||

ज्याचे मन नाही नियंत्रित | हा योग त्यास दुस्साध्य आहे, असे माझे मत || प्रयत्न आणि इतर उपायांनी योग होईल प्राप्त | मनास वश करणाऱ्यास || अ. ६, ओ.३६||

अर्जुन म्हणाला

योगी जो असूनही श्रद्धायुक्त | होतो योगापासून विचलित || न होता योग प्राप्त | जातो कुठल्या गतीस कृष्णा || अ.६, ओ.३७||

ब्रह्मपथापासून भ्रष्ट होऊन | प्रतिष्ठा घालवून, दोन्ही गमावून || फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश पावून | जातो का महाबाहो ? || अ.६, ओ.३८||

कृष्णा, माझ्या या संशयास | पूर्णपणे दूर करण्यास || तूच समर्थ आहेस || नसे दुसरा कुणीही || अ.६, ओ.३९||

श्रीभगवान म्हणाले

पार्था, या लोकात वा परलोकात | विनाशास तो नाही जात || बाबा रे, कल्याणकारी कार्यात | जातो न कुणी दुर्गतीला || अ.६, ओ.४०||

योगापासून जो भ्रष्ट होतो | तो पुण्यवंतांच्या लोकांत वर्षानुवर्षे राहतो || आणि नंतर जन्म घेतो | शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरी || अ.६, ओ.४१||

अथवा बुद्धिमान योग्यांच्याच कुळास | येतो तो जन्मास || असा जन्म मिळावयास | कठीण असे या लोकी || अ.६, ओ.४२||

पूर्वजन्मातील संस्कार | घेऊन येतो बरोबर ||संसिद्धीसाठी कठोर | पुन्हा झटतो कुरुनंदना || अ.६, ओ.४३||

पूर्वीचा अभ्यास | आपोआप आकर्षून घेई त्यास || इच्छुक तो  योग  जाणण्यास | शब्दब्रह्माच्या पैल जातो || अ.६, ओ.४४||

सतत प्रयत्नशील राहून | तो योगी शुद्ध होतो पापांतून || कैक जन्मांतून सिद्धी पावून | जातो परम गतीस || अ.६, ओ.४५||

योगी श्रेष्ठ तपस्व्यांहून | योगी श्रेष्ठ ज्ञानी लोकांहून || योगी श्रेष्ठ कर्म करणाऱ्याहून | म्हणून योगी हो अर्जुना || अ.६, ओ.४६||

सर्व योग्यांत | जो अंतरात्मा स्थिर करून माझ्यात || श्रद्धेने मला भजतो सतत | मला वाटतो तो योगी सर्वश्रेष्ठ || अ.६, ओ. ४७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ध्यानयोग’ नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, July 22, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ५ संन्यासयोग

अर्जुन म्हणाला

सांगून कर्मांपासून संन्यास | पुन्हा योगाची प्रशंसा करतोस || दोन्हींत   एक कुठले कारक हितास | ते निश्चित सांग कृष्णा || अ.५, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

कर्मयोग आणि संन्यास | दोन्ही कारक हितास || तरी कर्मयोगास | विशेष महत्त्व आहे || अ.५, ओ.२||

जो न द्वेष करतो, न इच्छा धरतो | जाणावा नित्य संन्यासी तो || सहज बंधनातून मुक्त होतो | द्वंद्वमुक्त तो महाबाहो || अ.५, ओ.३||

सांख्य आणि योग वेगळे दोन्ही | म्हणती अज्ञानी, न ज्ञानी || एकाचे पालन करूनी | फळे मिळती दोन्हींची || अ.५, ओ.४||

जे स्थान सांख्यांस मिळते | योगांनीही तेथे जाता येते || ज्यास दोन्ही एकच दिसते | त्यालाच खरे दिसते   ||अ.५, ओ.५||

योगावाचून संन्यास | महाबाहो, कठीण मिळवावयास || योगयुक्त मुनीस | ब्रह्म मिळते लवकर || अ.५, ओ.६||

जो योगयुक्त, ज्याने शुद्ध केले आत्म्याला | जिंकले इंद्रियांना आणि आत्म्याला || सर्व भूतांच्या आत्म्यांत पाही स्वतःच्या आत्म्याला | तो कर्मे करूनही लिप्त न होतो || अ.५, ओ.७||

तत्त्व जाणणाऱ्याने मानणे युक्त | की,' मी काही नाही करीत’ || असताना पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत | खात, जात, झोपत, श्वास घेत- || अ. ५, ओ. ८||

-बोलत, त्याग करीत, घेत | पापण्यांची उघडझाप करीत, || इंद्रिये विषयांच्या ठायी वर्ततात | असे जो मानतो, ||अ.५, ओ.९||

आसक्ती सोडून | करतो कर्मे ब्रह्मात अर्पण || तो अलिप्त राहतो पापापासून | जसे कमलपत्र पाण्यात ||अ.५, ओ.१०||

आसक्तीचा त्याग करुनी | काया, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी || आत्मशुद्धीचे ध्येय ठेवुनी | योगी कर्म करतात || अ.५, ओ.११||

योगी कर्मफळ त्यागतो | आणि दृढ शांती पावतो || योगविहीन कर्मफळात आसक्त होतो | आणि बद्ध होतो ||अ.५, ओ.१२||

वश करतो जो इंद्रियांस | तो मनाने सोडून सर्व कर्मांस || नऊ द्वारांच्या देहरूपी नगरात, सुखात करतो वास | कर्मे न करता न करविता ||अ.५, ओ.१३||

लोकांच्या कर्तृत्वाची किंवा कर्माची | तसेच कर्मफळसंयोगाची || स्वभावातून उत्पत्ती होते त्यांची | प्रभू न त्यांस निर्मितो ||अ.५, ओ.१४||

कुणाच्या पाप-पुण्यास | न घ्यावयाचे प्रभूस || अज्ञानाने झाकल्याने ज्ञानास | मोह पावतात जीव || अ.५, ओ.१५||

ज्यांचे ते अज्ञान | आत्मज्ञानाने गेले नाश पावून || 

त्यांचे ते ज्ञान सूर्यासमान | प्रकाशित करते परास ||अ.५, ओ.१६||

त्या ज्ञानात ज्यांची बुद्धी आणि आत्मे स्थिर झाले I जे त्या ज्ञानाशी निष्ठ आणि परायण झाले II त्या ज्ञानाने त्यांचे दोष जाती धुतले I पुनर्जन्मास न जाती ते II अ.१५,ओ.१७II

विद्याविनयसंपन्न ब्राह्मणास | गायीस आणि हत्तीस || कुत्र्यास आणि चांडाळास | समदृष्टीने पाहती पंडित || अ.५, ओ.१८||

ज्यांच्या मनात समभाव स्थिर झाला असे | त्यांनी येथेच जन्म-मृत्यू जिंकला असे || ब्रह्म निर्दोष आणि सम असे | त्यामुळे ब्रह्मात स्थिर ते झाले || अ.५, ओ.१९||

प्रिय वस्तू मिळता होई न आनंदित | अप्रिय घडता होई न दु:खित || ब्रह्मज्ञानी स्थिर ब्रह्मात | विवेकी आणि स्थिर बुद्धीचा || अ.१५, ओ.२०||

तो बाह्यस्पर्शांत न आसक्त | स्वत:मध्ये होते त्याला सुख प्राप्त || तो ब्रह्मयोगाने युक्त | अक्षय सुख मिळवतो || अ.५, ओ.२१||

स्पर्शातून भोग उत्पन्न होती | तेच दु:खास कारण होती || कौंतेया, ते आरंभती तसेच अंतास जाती | जाणता न रमतो त्यांत ||अ.५, ओ.२२||

वेग कामक्रोधातून उत्पन्न | येथेच जो करू शकतो सहन || करण्याआधी शरीरविमोचन | तो योग्य, तो सुखी नर || अ.५, ओ.२३||

जो असे अंतरी सुखात I आनंदात आणि प्रकाशात II तो योगी ब्रह्मभूत | ब्रह्मनिर्वाण मिळवतो || अ.५, ओ.२४||

पाप ज्यांचे क्षीण झाले | द्वंद्वमुक्त होऊन स्वतःस ज्यांनी नियंत्रित केले ||  सर्व भूतांच्या हितात जे रमले | असे हे ऋषी ब्रह्मनिर्वाण पावती ||अ.५, ओ.२५||

काम-क्रोध ज्यांचे सुटले | चित्त ज्यांनी नियंत्रित केले | स्वत:स ज्यांनी जाणले | ब्रह्मनिर्वाण अशा  यतींच्या सन्निध  असते || अ.५, ओ.२६||

बाह्यविषयांस ठेवून बाहेर | भुवयांच्या मध्यभागी दृष्टी करून स्थिर || नाकाच्या अंतर्भागात करणाऱ्या  संचार | प्राण-अपानांची सारखी ठेवून गती || अ.५, ओ.२७||

-मन, बुद्धी आणि इंद्रिये नियंत्रित करून | इच्छा, भय आणि क्रोध सोडून || राहतो जो मुनी मोक्षपरायण | तो मुक्तच सदैव || अ.५, ओ.२८||

भोक्ता सर्व यज्ञांचा आणि तपांचा | महान ईश्वर सर्व जगाचा || सुहृद सर्व भूतांचा | अशा मला जाणून, शांती पावतो ||अ.५, ओ.२९||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘संन्यासयोग’ नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...