अर्जुन म्हणाला
काय असे ब्रह्म आणि अध्यात्म | पुरुषोत्तमा, काय असे कर्म || अधिभूताचे काय मर्म | अधिदैव कशास म्हणतात || अ.८, ओ.१||
अधियज्ञ काय असे | मधुसूदना, या देहात तो कसा वसे || नियत आत्म्यांनी तुला कसे | प्रयाणकाळी जाणावे || अ.८, ओ.२||
श्रीभगवान म्हणाले
परम अविनाशी ते ब्रह्म | स्वभाव म्हणजे अध्यात्म || त्या सृष्टिव्यवहारास म्हणती कर्म | ज्यातून उद्भवतो भूतांचा भाव || अ.८, ओ.३||
नश्वर भाव म्हणजे अधिभूत | स्वामी म्हणजे अधिदैवत || अधियज्ञ मीच देहात | हे देहधारी श्रेष्ठा || अ.८, ओ.४||
अंतकाळी मला स्मरत | देहातून जो होई मुक्त || त्याला माझा भाव होई प्राप्त | यात नाही संशय || अ. ८, ओ.५||
सोडत असता देहाला | जो भाव स्मरतो ज्याला || तोच भाव प्राप्त होतो त्याला | नेहमी कौंतेया || अ.८, ओ.६||
मन आणि बुद्धी करून मला अर्पित | सर्व काळात || माझे स्मरण करीत | निस्संशय मलाच मिळशील, युद्ध करतानाही || अ.८, ओ.७||
जो योगयुक्त राहून, करतो अभ्यास | दुसरीकडे जाऊ न देता चित्तास || परम दिव्य पुरुषाच्या करतो चिंतनास | तो त्या पुरुषासच मिळतो || अ.८, ओ.८||
सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूहून सूक्ष्म आहे | सर्वांचा पालनकर्ता, अचिंत्यरूप आहे || सूर्यासारखा तेजस्वी, अंधाराच्या पलिकडे आहे | दिव्य परम पुरुष || अ.८, ओ.९||
प्रयाणकाळी मन अचल ठेवून |भक्ती आणि योगबलाने युक्त होऊन || भुवयांमध्ये प्राणाची स्थापना करून | दिव्य पुरुषाचे स्मरण करणारा त्यालाच मिळतो || अ.८, ओ.१०||
वेद जाणणारे ज्यास अक्षय म्हणतात | विरक्त यती ज्यात प्रवेशतात || ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरतात | ते पद थोडक्यात तुला सांगतो || अ.८, ओ.११||
सर्व द्वारांचा संयम करून | मनाचा हृदयात निरोध करून || मस्तकात प्राण स्थापन करून | करीत योगधारणा ||अ.८, ओ.१२||
ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत | माझे स्मरण करीत || देहातून होतो मुक्त | तो जातो परम गतीस || अ.८, ओ.१३||
जो अनन्य बुद्धीने सतत | नित्य राहतो मला स्मरत || त्या योग्यास नित्ययुक्त | मी सहज प्राप्त आहे || अ.८, ओ.१४||
झाल्यावर माझी प्राप्ती | पावल्याने परम गती || पुनर्जन्मास न जाती | पुनर्जन्म असे अशाश्वत आणि दु:खाचे आगर || अ.८, ओ.१५||
ब्रह्मभुवनापासून लोक सारे | पुन्हा पुन्हा घेती फेरे || येता माझ्यापाशी कौंतेया रे | होई न पुनर्जन्म || अ.८, ओ.१६||
दिवस ब्रह्मदेवाचा | म्हणजे काळ सहस्र युगांचा || तेवढाच असे काळ रात्रीचा | हे ज्ञानी जाणतात || अ.८, ओ.१७||
या दिवसाची होता सुरुवात | अव्यक्त सारे होती व्यक्त || रात्र होता लय पावतात | अव्यक्तात त्याच || अ. ८, ओ.१८||
भूतांचा समुदाय एकच तो | पुन्हा पुन्हा आकारास येतो || रात्र होता लय पावतो | प्रभवतो दिवस उगवता || अ.८, ओ. १९ ||
परंतु या अव्यक्ताहून | असे दुसरा श्रेष्ठ अव्यक्त भाव सनातन || सर्व भूते जरी जाती नाश पावून | तो भाव नाश न पावतो ||अ.८, ओ. २०||
ज्या अव्यक्तास अक्षय म्हणती | तीच असे परम गती || जेथे जाऊन परत न येती | तेच माझे परम धाम || अ.८, ओ.२१||
पार्था, श्रेष्ठ पुरुष तो | अनन्य भक्तीने प्राप्त होतो || सर्व भूतांस जो अंतरी सामावतो | ज्याने व्यापले हे जग सारे || अ.८, ओ.२२||
देहत्याग करता कुठल्या काळात | योगी पुन्हा जन्म न घेतात || आणि केव्हा जन्म घेतात | तो काळ सांगतो भरतर्षभा || अ.८, ओ.२३||
अग्नी, प्रकाश, शुक्ल पक्ष आणि दिवस | उत्तरायणाचे सहा मास || यांत जे ब्रह्मवेत्ते सोडती देहास | ते जाती ब्रह्मपदाला || अ.८, ओ. २४||
धूर, रात्र तसेच कृष्ण पक्षात | दक्षिणायनाच्या सहा महिन्यांत || यांत जे योगी देह सोडतात | ते चंद्रलोकास जाऊन परत येती || अ.८, ओ.२५||
शुक्ल आणि कृष्ण गती | जगी शाश्वत मानती || पहिल्या गतीने मिळे मुक्ती | परत येती दुसऱ्या गतीने || अ.८, ओ.२६||
जे योगी जाणती या दोन गतींना | मोह न होई त्यांना || याचसाठी अर्जुना | योगयुक्त हो सर्व काळी || अ.८, ओ.२७||
वेदांत, यज्ञांत, तपांत आणि दानांत | जी पुण्यफले सांगितली आहेत || त्यांपलिकडे योगी जातात | परम दिव्य अशा स्थानी || अ.८, ओ.२८||
असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘अक्षरब्रह्मयोग’ नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला.
🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺🙏
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment