सूत म्हणाला,
मग तेथे प्रगटला सोन्याचा रथ भव्य | ज्यास जडविली रत्ने दिव्य, | त्या रत्नांच्या किरणांनी प्रकाशमय | झाल्या दशदिशा. || अ.५, ओ.१ ||
रथ मोत्याच्या तोरणांनी सजविला | शेकडो शुभ्र छतांनी झाकला. | चाकांस मात्र चिखल लागला | नदीच्या काठाने आल्याने || अ.५, ओ.२ ||
सोन्याचे लगाम लावलेले | घोडे रथास जोडले | रथास मौक्तिकयुक्त छताने सजविले | रथावर शोभे वृषभयुक्त ध्वज || अ. ५, ओ. ३ ||
रथास गज जोडले मत्त | रथ रेशमी आसनाने युक्त | आणि केला सुशोभित | पारिजातकाच्या फुलांनी || अ.५, ओ. ४ ||
मृगनाभीतील कस्तूरीचे रथास विलेपन | कर्पूर आणि अगरु (चंदन) यांच्या धूपातून | दरवळणाऱ्या सुगंधाने आकृष्ट होऊन | भ्रमर जमती रथाभोवती. || अ. ५, ओ. ५ ||
रथाचा ध्वनी प्रलयकाळच्या मेघांसमान | रथ नाना वाद्यांनी संपन्न. | वीणा वेणु इत्यादि वाद्यांचे करती वादन | गण किन्नरींचे || अ.५, ओ.६ ||
पाहून तो रथ मनोहर | वृषभावरून उतरून शंकर | रथातील रेशमी आसनावर | पार्वतीसह बैसला || अ. ५, ओ. ७ ||
देवांगनांच्या ओवाळण्यानें | श्वेतचामरें वारण्यानें | दिव्य पंख्यांच्या वार्याने | नीललोहित (=शंकर) आनंदित झाला || अ. ५, ओ. ८ ||
(देवांगनांच्या) कंकणांच्या किणकिणाटाने | नूपुरांच्या मंजुळ ध्वनीनें | वीणा, वेणु ह्यांच्या वादनानें | शुक व मयूर यांच्या शब्दांनीं- || अ. ५, ओ. ९||
-शुभ्र पारव्यांच्या किलबिलाटाने | त्रैलोक्य व्यापले पूर्णपणे. | नाग शोभती फणा उभारल्याने. | पाहून त्यांना मयूर || अ.५, ओ.१० ||
-पिसाऱ्यावरील कोट्यवधी चंद्र दाखवून | करती नर्तन. | मग वृषभध्वजाने (=वृषभावर आरूढ झालेला, शिव) उठवून | नमन करणाऱ्या रामाला- || अ.५, ओ.११ ||
-प्रेमाने अतिशय | आणले रथात दिव्य. | मग कमंडलूतील निरामय | जलाने स्वतः आचमन करून- || अ.५, ओ.१२ ||
रामाला आचमन करविले, | प्रेमाने अंकावर बसविले | आणि त्याला दिले | दिव्य धनुष्य व अक्षय बाणभाता. || अ.५, ओ.१३ ||
दिले शिवाय | महापाशुपतास्र दिव्य. | मग प्रेमाने अतिशय | चंद्रमौली (=शिव) म्हणाला || अ.५, ओ.१४ ||
'हे नृपा, या अस्त्राचे फार सामर्थ्य | ते नष्ट करील त्रैलोक्य | म्हणून युद्धात सामान्य | ह्याचा प्रयोग करूं नको || अ. ५, ओ. १५ ||
ह्याचा त्रैलोक्यांत प्रतीकार | नाहीं कुणी करू शकणार | म्हणून जेव्हा बेतेल प्राणावर | तेव्हाच प्रयोग कर याचा || अ. ५, ओ. १६ ||
अन्य कालीं वापरता यास | ते नष्ट करील जगास.' | नंतर देवांस आणि लोकपालांस | महेश्वराने बोलाविले || अ.५, ओ.१७ ||
आणि तो परमप्रीत (=शिव) म्हणाला, | ''देव हो, तुम्हीही आपली अस्त्रे द्या राघवाला | म्हणजे तो मारील रावणाला | त्या अस्त्रांनी. || अ. ५, ओ. १८ ||
मी रावणाला वर दिला, | "देवांकडून मृत्यू नाहीं तुला" | म्हणून घ्या वानरजन्माला | रामासाठी युद्धात. || अ.५, ओ.१९ ||
साह्य केल्यास रामास | सुख लाभेल तुम्हास.' | देवांनी वंद्य मानले शिवाच्या आज्ञेस | जोडून हात || अ.५, ओ.२०||
वंदून शंभूचे चरण | त्यांनी रामास केली अस्त्रे प्रदान. | दिले दैत्यारीने (=विष्णूने) नारायणास्त्र महान | तर पुरंदराने (=इंद्राने) इंद्रास्त्र || अ.५, ओ.२१||
ब्रह्मदेवाने ब्रह्मदंडास्त्र | धनंजयाने (=अर्जुनाने) आग्नेयास्त्र | यमाने याम्यास्त्र | रक्षोराजाने (=राक्षसांच्या राजाने ) मोहास्त्र दिले || अ.५, श्लो.२२ ||
वरुणाने वारुणास्त्र | प्रभंजनाने (=वायूने) वाय्वास्त्र | कुबेराने कौबेरास्त्र | तर ईशानाने रौद्रास्त्र दिले || अ. ५, ओ.२३ ||
सूर्यानें सौरास्त्र | सोमाने सोमास्त्र | विश्वेदेवांनीं पार्वतास्त्र | आणि वसूंनीं वासवास्त्र दिले || अ.५, ओ.२४ ||
अशी ही अस्त्रे प्राप्त करून | दशरथात्मज राम संतुष्ट होऊन | नम्रतेने हात जोडून | भक्तिपूर्वक म्हणाला, || अ. ५, ओ. २५ ||
श्रीराम म्हणाला,
'हे भगवान, ओलांडणे क्षारसमुद्रास | शक्य नाही मनुष्यांस. | जिंकणे कठीण देवदानवांस | त्या समुद्रातील लंकादुर्गास. || अ. ५, ओ.२६ ||
लंकेमध्ये आहेत | जितेंद्रिय आणि शिवभक्त | वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनात रत | कोट्यवधी राक्षस || अ. ५, ओ. २७ ||
त्यांना अनेक माया अवगत | ते आहेत अग्निहोत्री आणि बुद्धिवंत | केवळ भाऊ (लक्ष्मण) माझ्यासोबत | कसा जिंकू मी राक्षसांना ? || अ.५, ओ.२८||
महादेव म्हणाला-
रामा, वधण्यास राक्षस आणि रावण | योग्य आहे हाच क्षण | आला आहे कारण | काळ त्यांच्या विनाशाचा || अ. ५, ओ. २९ ||
ते होऊन अधर्मास प्रवृत्त | देव-ब्राह्मणांना पीडा देतात | त्यामुळे हे सुव्रता, जवळ आला आहे अंत | त्यांच्या आयुष्य आणि वैभवाचा || अ.५, ओ.३० ||
राजस्रीच्या कामनेने आसक्त | अशा रावणास तू वधशील रणात | शत्रूस पापासक्त | मारणे आहे सुकर || अ.५, ओ.३१ ||
शत्रू अधर्मात रत | असतो भाग्यानेच मिळत. | पारंगत धर्मशास्त्रात | किंवा वेदाध्ययनात तत्पर- || अ. ५, ओ.३२||
-होता विनाशकाल प्राप्त | होतो धर्ममार्गापासून च्युत. | जो पापी पीडतो सतत | देवतांना, ब्राह्मणांना आणि ऋषींना - || अ.५, ओ.३३||
-त्याचा नाश असे निश्चित. | रामा, किष्किंधानगरात | उत्पन्न झाले आहेत | देवांच्या अंशापासून- || अ. ५, ओ. ३४ ||
-शत्रूला जिंकण्यास दुष्कर | बलाढ्य असे वानर. | ओलांडण्यास सागर | ते साहाय्य तुला करतील || अ. ५, ओ. ३५ ||
वानरांकडून समुद्रावर घे सेतू बांधून | म्हणजे वानर जातील त्यावरून | मग परिवारासहित रावणाचा वध करून | आपल्या प्रियेला आण || अ. ५, ओ. ३६ ||
युद्धात शस्त्रांनी जय मिळत असेल जर | वापरू नयेत अस्त्रे तर. | नि:शस्त्रांवर, अल्प शस्त्रे असणारांवर | किंवा पलायन करणारांवर- || अ.५, ओ. ३७ ||
-जो प्रयोग करतो दिव्यास्त्रांचा | नाश होतो त्याचा.| मी आहे निर्माता जगाचा | यापलिकडे काय सांगू? || अ.५, ओ.३८ ||
मीच रक्षणकर्ता जगाचा | मीच नाश करतो त्याचा | हे महीपते, मी मृत्यू या जगताचा | आणि मीच मृत्यू मृत्यूचा || अ.५, ओ.३९||
व्यापले मी सर्व जगास | आणि चराचरास | हे युद्धोत्सुक राक्षस | पडलेत माझ्या मुखात || अ. ५, ओ. ४० ||
तू होऊन केवळ निमित्त | मिळव कीर्ती रणात || अ.५, ओ.४१||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'रामास वरप्रदान नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला.
🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏🪔 🌺
शब्दार्थ व टीपा:
किर्मीरित" = झगमगलेला, तेजाने व्यापलेला, चमकदार लहरींनी भरलेला. (किर्मीर नामापासून नामधातू) (श्लो.१)
आढ्य (वि.)=युक्त (मूळ शब्द आध्य) संधिनियमामुळे
आध्य" → "आढ्य" ) काही वेळा ध्वनिग्राह्यता आणि उच्चारसुलभतेसाठी काही व्यंजनांत किंवा स्वरांत बदल होतो (श्लो.२)
श्लो. ३
खलीन = घोड्यांच्या तोंडाला लावले जाणारे लोखंडी लगाम (bridle)
शुक्ता = शंख किंवा मुक्तेप्रमाणे चमकणारे (किंवा शंखमुक्तेपासून बनवलेले)
श्लो.४
वारणिका=हत्तींचा समूह; पट्ट=रेशीम; तल्प=आसन; अभिरञ्चित= सुशोभित केलेला (अभि+ रञ्च् ( गण १, आ.प.)
स्वन (ना.पुं) = ध्वनी, आवाज (श्लो.६)
श्लो.९ ते ११
निध्वान (ना.पुं.)=ध्वनी; मञ्जीर (ना. नपुं.)=नूपुर; उन्निद्र (वि.)=उभारलेले, फणिन्= सर्प
श्लो.१२
आनिनाय =आणले (आ+नी, परोक्ष भूतकाळ)
यत्नत: = प्रयत्नपूर्वक. परंतु येथे या शब्दाचा अर्थ "पूर्ण जागरूकतेने, मनपूर्वक, शुद्ध श्रद्धेने व शास्त्रशुद्ध रीतीने" असा घेतला पाहिजे.
श्लो.२२
या श्लोकातील देवतांचे अनेक प्रकारे अर्थ काढता येतील. येथे सर्वसामान्य अर्थ दिला आहे.
धनंजयाने आग्नेयास्त्र दिले = अर्जुनाने खांडववन जाळले तेव्हा अग्नीने त्यास आग्नेयास्त्र दिले होते. ते त्याने येथे दिले असा अर्थ होऊ शकतो.
रक्षोराजाने मोहास्त्र दिले = येथे रक्षोराज, म्हणजे राक्षसांचा राजा म्हणजे रावण असा अर्थ होतो. पण स्वतःच्या वधासाठी रावण अस्त्र कसा देईल, म्हणून काही ठिकाणी विभीषण असा अर्थ दिला आहे. राक्षसांचा राजा निऋती असा अर्थही काही ठिकाणी दिला आहे. निऋती हा पश्चिम दिशेचा दिक्पाल असून त्यालासुद्धा राक्षसांचा राजा मानले आहे. तो राक्षसांचा राजा असल्याने त्याने मोहास्त्र किंवा मोहनास्त्र म्हणजे मोह किंवा भ्रम उत्पन्न करणारे अस्त्र दिले.
रामानंतर होऊन गेलेला अर्जुन किंवा रामास नंतर भेटलेला विभीषण येथे कसा येऊ शकेल. याचे उत्तर असे होऊ शकते की शिवगीता हा इतिहास किंवा संदर्भग्रंथ नसून एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. तसेच रामायण , महाभारतातील व्यक्तिरेखांस सार्वकालिक किंवा प्रतीकात्मक स्वरूप आहे.
श्लो.२३
या श्लोकात ईशानाने रौद्रास्त्र दिले असे म्हटले आहे. "ईशान" हे शिवाचे उत्तर-पूर्व दिशेचे रूप असून, ते विशेषतः ज्ञान, आग्नी तत्त्व आणि तपस्येचे प्रतिनिधी मानले जाते.
रौद्रास्त्र: रौद्र शक्ती, कोपयुक्त विध्वंसासाठी वापरले जाणारे, अग्नी तत्त्वाशी संबंधित.
अथवा किं बहूक्तेन = किंवा फार काय सांगू? (श्लो.३८)
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment