Tuesday, July 29, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

श्रीभगवान म्हणाले

तू आहेस असूयाविहीन | सांगतो तुला म्हणून ||अत्यंत गूढ विज्ञानासहित ज्ञान | जे अशुभातून मुक्त करील || अ.९, ओ.१||

ते उत्तम आणि पवित्र ज्ञान I विद्या आणि गुपितांच्या राजाचे त्यास स्थान || ज्याचे प्रत्यक्ष आचरण | धर्मकारक, सुखदायक आणि अविनाशी || अ.९, ओ.२||

परंतपा, असे जन आहेत | जे या धर्मावर विश्वास ठेवीत नाहीत || ते माझ्याकडे न येता जाती परत | मृत्यू आणि संसाराच्या मार्गावर || अ.९, ओ.३||

मी व्यापले सर्व जगत | रूपाने माझ्या अव्यक्त ||सर्व भूते आहेत माझ्यात | मी त्यांच्यात नाही || अ.९, ओ.४||

भूतेही  नाहीत माझ्या अंतरी | पहा माझा योग ईश्वरी || मी भूतांस उत्पन्न करून पोषण करी | तरी भूतांत नाही मी || अ.९, ओ.५||

सर्वत्र फिरणारा वात | जसा राहतो आकाशात ||तशी सर्व भूते माझ्यात | राहती हे जाण || अ.९, ओ.६||

कल्पाचा होता अंत | भूते प्रवेशती माझ्या प्रकृतीत || कल्पाची होता सुरुवात | मी निर्मितो पुन्हा त्यांना || अ.९, ओ.७||

भूते प्रकृतीच्या अधीन | मी पुन्हा पुन्हा करतो निर्माण || माझ्या प्रकृतीतून | सर्व भूतांना || अ. ९, ओ.८||

धनंजया, कर्मे ती | मला न बांधती || कारण माझी आसक्ती | नाही त्या कर्मांत || अ.९, ओ.९||

माझ्या अध्यक्षतेत | प्रकृती उपजते चराचरासहित || म्हणूनच हे जग कार्यान्वित | राहते धनंजया  || अ.९, ओ.१०||

मी जगाचा महान ईश्वर असून | करता मनुष्यदेह धारण || माझा परम भाव न जाणता मला लेखती न्यून | मूर्ख लोक || अ. ९, ओ.११||

मोहविणाऱ्या असुरी आणि राक्षसी प्रकृतीचा आश्रय घेऊन | सर्व आशा, कर्मे आणि ज्ञान || बसतात गमावून | जन बुद्धिभ्रष्ट  || अ.९, ओ.१२||

पार्था, दैवी प्रकृतीच्या आश्रयात I जे महात्मे राहतात II ते अनन्य भावाने मला भजतात I जाणून मला भूतांचे अव्यय, आदिस्थान II अ. ९, ओ. १३ II

ते राहून प्रयत्नशील, दृढव्रत, नित्ययुक्त I सतत माझे कीर्तन करतात  II मला नमस्कार करतात I भक्तीने करतात माझी उपासना IIअ. ९, ओ.१४II

आणि दुसरे ज्ञानयज्ञात I एकत्वात आणि विभिन्नतेत II उपासना करतात I माझ्या बहुविध विश्वरूपाची II अ. ९,ओ.१५II

यज्ञ म्हणजे मीच आहे I यज्ञातील क्रतु, स्वधा, औषधी मीच  आहे II मंत्र आणि आज्य मीच आहे I आहे मीच  अग्नी आणि आहुती II अ.९, ओ.१६II 

माता-पिता, पितामह मी या जगास I करतो मी जगाच्या पोषणास II पवित्र मी, योग्य जाणण्यास I मी ॐकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद II १७ II 

मी सर्वांचा प्रभू, सर्वांची गती, पोसतो सर्वांस I साक्षी, निवास, योग्य शरण जाण्यास II स्थान, निधान, करतो उत्पत्ति-प्रलयास I आहे मी अव्यय बीज II १८ II 

मी करतो उष्णता निर्माण I माझ्यामुळे येई पाऊस, होई अवर्षण II मी मृत्यू आणि अमृत जाण I अर्जुना, मीच सत् आणि असत् II १९ II  

काही जन तीन वेदांचे ज्ञानी | सोमरस पिणारे, मुक्त पापातुनी || यज्ञाने माझ्याकडून स्वर्ग मिळवुनी | दिव्य भोग भोगती || अ.९, श्लो.२०||

असे हे कामेच्छुक, तीन वेदांचा धर्म आचरती | विशाल स्वर्गलोक उपभोगती || पुण्य संपता मृत्युलोकी येती | करती अशा येरझारा || अ.९, ओ. २१||

अनन्य भावाने करीत चिंतनास | जे करती माझ्या उपासनेस || त्या नित्य अभियुक्तांच्या योगक्षेमास | मी वाहतो || अ. ९, ओ. २२ ||

अन्य देवतांचे भक्त । श्रद्धेने जेव्हा त्या देवतांस पूजितात ।। कौंतेया, तेव्हा खरे मलाच भजतात । जरी न विधिपूर्वक ।। अ. ९, ओ. २३।।

यज्ञांचा भोक्ता आणि प्रभू मी असे । तरी या भक्तांस माझे ज्ञान नसे ।। म्हणून होत असे । पतन त्यांचे ।। अ. ९, ओ. २४।।

देवांचे पूजक देवांकडे जाती I पितरांचे पूजक पितरांकडे जाती II भूतांचे पूजक भूतांकडे जाती I माझे भक्त येती माझ्याकडे ।। अ. ९, ओ. २५।।

पान, फूल, फळ, पाणी जरी कोण । भक्तीने मला करतो अर्पण ।। मी ते करतो ग्रहण । प्रेमपूर्वक ।। अ. ९, ओ. २६ ।।

जे करतोस, खातोस । हवन करतोस, देतोस ।।

ज्याची उपासना करतोस । कौंतेया, ते कर मला अर्पण ।। अ.९, ओ. २७।।

या संन्यासयोगाने युक्त होऊन । कर्मबंधनाच्या शुभ-अशुभ फलांतून ।। विमुक्त तू होऊन । माझ्याकडे येशील ।। अ.९, ओ. २८।।

सर्व भूते समान मला । न कोणी प्रिय वा अप्रिय मला ।। भक्तीने जे भजती मला । मी त्यांच्या ठायी आणि ते माझ्या ठायी ।। अ.९, ओ. २९।।

असूनही कोणी दुराचारी । जर अनन्यभावाने माझी भक्ती करी ।।  मानावा तो साधू तरी । कारण सुनिश्चित बुद्धी त्याची ।। अ.९, ओ. ३०।।

तो लवकरच धर्मात्मा होतो । शाश्वत शांती मिळवतो ।। माझा भक्त नाश न पावतो । लक्षात ठेव कौंतेया ।। अ.९, ओ. ३१।।

माझ्या आश्रयास जे येती । जरी ते हलक्या योनीतील असती ।। तरी परम शांतीस पावती । असो स्त्री, वैश्य वा शूद्र ।। अ.९, ओ. ३२।।

ब्राह्मण, राजर्षी तसेच पुण्यवान भक्त । परम शांती मिळवतील निश्चित ।। येऊन या अनित्य, दुःखदायक मृत्युलोकात । माझी भक्ती करीत राहा ।। अ.९, ओ. ३३।।

माझा भक्त हो, माझ्या ठायी ठेव मन । नमस्कार मला कर, कर माझे पूजन ।। परायण मला हो, माझ्यात स्वतःस जोडून । माझ्याकडेच येशील ।। अ.९, ओ. ३४।।

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘राजविद्याराजगुह्ययोग’ नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.

🪔 🌺 🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु 🪔 🌺 🙏

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved.

No comments:

Post a Comment