Wednesday, July 23, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ६ -ध्यानयोग

श्रीभगवान म्हणाले

योगी आणि संन्यासी म्हणावे त्यास | जो त्यागून कर्मफळास || करतो कर्तव्य कर्मास | म्हणू नये अग्निहोत्रहीनास आणि निष्क्रियास II अ.६, ओ.१ II

म्हणती ज्यास संन्यास | पांडवा, जाण योग त्यास || सोडल्यावीण संकल्पास | योगी न होई कोणीही || अ.६, ओ.२||

योगारोहणास ज्या मुनीने आरंभ केला | कारण असे कर्म त्याला || मात्र योगारूढाला | शम हे कारण असे || अ।६, ओ.३||

जो होत नाही आसक्त | इंद्रियविषयांत किंवा कर्मांत || संकल्पांतून होतो मुक्त | म्हणती त्यास योगारूढ || अ.६, ओ.४||

आपण करावा उद्धार आपला | करू नये नाश आपला || आपण बंधू आपला | आपणच आपला शत्रू || अ.६, ओ.५||

जो स्वत:स जिंकतो | तो स्वत:चा मित्र होतो || जो स्वत:स न जिंकतो | तो होई शत्रू स्वत:चा || अ.६, ओ.६||

स्वत:स जिंकलेल्या प्रशांत | परमात्म्यास समत्व होई प्राप्त || शीतोष्ण वा सुखदु:खात | वा मानापमानात || अ.६, ओ.७||

तो आत्मा तृप्त ज्ञान-विज्ञानाने | असे निर्विकार, इंद्रियांस जिंकले ज्याने || समान ज्यास मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने | त्यास योगी म्हणतात || अ.६, ओ.८||

सुहृद, मित्र, शत्रूंशी | तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य, बंधूंशी || सज्जनांशी आणि पाप्यांशी | समबुद्धी असे त्या विशेष पुरुषाची  || अ.६, ओ.९||

राहून एकांतात | चित्त आणि आत्मा करून नियंत्रित || इच्छा आणि परिग्रहापासून मुक्त | योग्याने स्वत:स सतत योजावे || अ.६, ओ.१०||

स्वच्छ भूमीवर | स्थापन करावे आसन स्थिर || न फार उंचावर, न खाली फार | मृदू वस्त्राचे, कातड्याचे किंवा गवताचे || अ.६, ओ.११||

त्या आसनावर बसून | करून एकाग्र मन || चित्त आणि इंद्रिये नियंत्रित करून | आत्मविशुद्धीसाठी  योग योजावा || अ.६, ओ.१२||

शरीर, मस्तक आणि मान | एका रेषेत स्थिर ठेवून || नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून | न पाहता सभोवती ||अ.६, ओ.१३||

मन शांत व निर्भय ठेवून | ब्रह्मचर्यव्रतात राहून || मनावर संयम ठेवून | चित्त माझ्या ठिकाणी ठेवावे, माझ्यात परायण असावे || अ.६, ओ.१४||

याप्रमाणे स्वत:स योजून सदोदित | मनास करून संयमित || योगी पावतो माझ्यात | निर्वाणकारक परम शांतीस ||अ.६, ओ.१५||

अति खाणाऱ्यास | किंवा अगदीच न खाणाऱ्यास || फार झोपणाऱ्यास किंवा फार जागणाऱ्यास | हा योग जमत नाही अर्जुना || अ.६, ओ.१६||

आहार-विहार ज्याचा नियंत्रित | जो कर्मे करी उचित || निद्रा-जागरण ज्याचे मर्यादेत | त्यालाच दु:खनाशक ठरतो हा योग || अ.६, ओ.१७|||

जेव्हा चित्त नियंत्रित | स्थिर होते आत्म्यात || सर्व इच्छांतून होतो विरक्त | तेव्हा तो योगी म्हणवतो || अ.६, ओ.१८||

निवांत जागी ठेवता दिव्यास | स्थैर्य राहते ज्योतीस || ती उपमा त्या योग्यास | ज्याचे चित्त नियंत्रित || अ.६, ओ.१९||

योगसेवेने नियंत्रित | चित्त होता शांत || आत्म्याने आत्म्यास पाहत | आत्म्यात संतुष्ट राहतो || अ.६, ओ.२०||

जी अनुभवता न ये इंद्रियांस | परी बुद्धी समर्थ जाणावयास || पावता अशा स्थितीस | योगी न ढळतो तत्त्वत: || अ.६, ओ.२१||

जी स्थिती होता प्राप्त | दुसरा लाभ नाही मोठा वाटत || स्थिर होता त्या स्थितीत | विचलित न करी दु:ख कुठले  || अ.६, ओ.२२||

दु:खाच्या उत्पत्तीचा अंत करणाऱ्या  | जाणावे समाधिस्थितीला त्या || निश्चयाने योगास योजावे त्या | न होता विचलित || अ.६, ओ.२३||

इच्छा जन्मती संकल्पांतून | त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करून || मनानेच सर्व बाजूंनी नियमन करून | इंद्रियांच्या गावाचे || अ.६, ओ.२४||

बुद्धीने धैर्ययुक्त | हळूहळू करून नियंत्रित || मन स्थिर करून आत्म्यात | विचार दुसरा करू नये || अ.६, ओ.२५||

अस्थिर आणि चंचल मन | करील जेथे जेथे भ्रमण || तेथून त्याला आवरून | आत्म्यात वश करावे || अ.६, ओ.२६||

मन प्रशांत झालेल्या | रजोगुण निमालेल्या ||ब्रह्मरूप, पापरहित झालेल्या | अशा योग्यास उत्तम सुख लाभते || अ.६, ओ.२७||

योगी पापरहित | सदा स्वत:स योजीत ||ब्रह्मसंस्पर्शाचे अत्यंत | सुख मिळवतो || अ.६, ओ.२८||

योगयुक्त आत्मा तो | सर्वत्र समदृष्टी ठेवतो || सर्व भूतांत स्वत:स पाहतो | आणि स्वत:त सर्व भूतांस ||अ.६, ओ.२९||

जो सर्वत्र मला पाहतो | आणि माझ्यात सर्व पाहतो || त्याच्यासाठी मी न नाश पावतो | न तो पावतो नाश माझ्यासाठी || अ.६, ओ.३०||

सर्व भूतांत मी वास करतो | अशा मला जो एकत्वभावाने भजतो || तो योगी सर्व प्रकारे वर्ततो | माझ्याच ठायी || अ.१६, ओ.३१||

ठेवून समदृष्टीस | इतरांत पाहून स्वत:स || जाणतो त्यांच्या सुखदु:खांस | तो परम योगी मानावा || अ.६, ओ.३२||

अर्जुन म्हणाला

हे मधुसूदना, या योगास | कथन तू केलेस || परंतु वाटे साधारणपणे  त्यास | स्थिरता न येईल चंचलत्वामुळे || अ.६, ओ.३३||

कृष्णा, हे चंचल मन | विचलित करणारे, दृढ, बलवान || त्याचा निग्रह वायूसमान | कठीण मी मानतो || अ.६, ओ.३४||

श्रीभगवान म्हणाले

महाबाहो, निस्संशय हे मन | आहे चंचल आणि निग्रह करण्यास कठीण || परंतु कौंतेया, अभ्यास आणि वैराग्यातून | त्याचा निग्रह शक्य आहे || अ.६, ओ.३५||

ज्याचे मन नाही नियंत्रित | हा योग त्यास दुस्साध्य आहे, असे माझे मत || प्रयत्न आणि इतर उपायांनी योग होईल प्राप्त | मनास वश करणाऱ्यास || अ. ६, ओ.३६||

अर्जुन म्हणाला

योगी जो असूनही श्रद्धायुक्त | होतो योगापासून विचलित || न होता योग प्राप्त | जातो कुठल्या गतीस कृष्णा || अ.६, ओ.३७||

ब्रह्मपथापासून भ्रष्ट होऊन | प्रतिष्ठा घालवून, दोन्ही गमावून || फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश पावून | जातो का महाबाहो ? || अ.६, ओ.३८||

कृष्णा, माझ्या या संशयास | पूर्णपणे दूर करण्यास || तूच समर्थ आहेस || नसे दुसरा कुणीही || अ.६, ओ.३९||

श्रीभगवान म्हणाले

पार्था, या लोकात वा परलोकात | विनाशास तो नाही जात || बाबा रे, कल्याणकारी कार्यात | जातो न कुणी दुर्गतीला || अ.६, ओ.४०||

योगापासून जो भ्रष्ट होतो | तो पुण्यवंतांच्या लोकांत वर्षानुवर्षे राहतो || आणि नंतर जन्म घेतो | शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरी || अ.६, ओ.४१||

अथवा बुद्धिमान योग्यांच्याच कुळास | येतो तो जन्मास || असा जन्म मिळावयास | कठीण असे या लोकी || अ.६, ओ.४२||

पूर्वजन्मातील संस्कार | घेऊन येतो बरोबर ||संसिद्धीसाठी कठोर | पुन्हा झटतो कुरुनंदना || अ.६, ओ.४३||

पूर्वीचा अभ्यास | आपोआप आकर्षून घेई त्यास || इच्छुक तो  योग  जाणण्यास | शब्दब्रह्माच्या पैल जातो || अ.६, ओ.४४||

सतत प्रयत्नशील राहून | तो योगी शुद्ध होतो पापांतून || कैक जन्मांतून सिद्धी पावून | जातो परम गतीस || अ.६, ओ.४५||

योगी श्रेष्ठ तपस्व्यांहून | योगी श्रेष्ठ ज्ञानी लोकांहून || योगी श्रेष्ठ कर्म करणाऱ्याहून | म्हणून योगी हो अर्जुना || अ.६, ओ.४६||

सर्व योग्यांत | जो अंतरात्मा स्थिर करून माझ्यात || श्रद्धेने मला भजतो सतत | मला वाटतो तो योगी सर्वश्रेष्ठ || अ.६, ओ. ४७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ध्यानयोग’ नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

No comments:

Post a Comment