Monday, August 3, 2026

I love Shakespeare






अनुक्रमणिका


The Merchant of Venice
पोर्शियाचा क्लू
Tell me where is fancy bred,
Or in the heart, or in the head?
How begot, how nourished?
Reply, reply.
It is engender'd in the eyes,
With gazing fed; and fancy dies
In the cradle where it lies.
Let us all ring fancy's knell
I'll begin it,—Ding, dong, bell.

शेक्सपिअरच्या The Merchant of Venice मधील ही कविता आहे. पोर्शियाच्या वडिलांनी तिच्यासाठी वर निवडण्यासाठी मृत्युपत्रात अशी योजना केली की एक सोन्याची, एक चांदीची आणि एक शिशाची पेटी ठेवली आहे आणि एका पेटीत पोर्शियाचे चित्र ठेवले आहे. जो कुणी पोर्शियाचे चित्र असलेली  पेटी निवडेल त्याच्याशी पोर्शियाने लग्न करावे. पोर्शियाला अर्थात ही योजना पसंत नसते.

बसानिओ नावाचा एक खुशालचेंडू तरुण आपले सर्व पैसे उधळून पोर्शियाची संपत्ती मिळवण्यासाठी ॲंटोनिओ नावाच्या मित्राकडून कर्जाऊ पैसे घेऊन आपला उसना भपका दाखवीत पेटीची निवड करण्यास येतो.

पोर्शियाला बसॅनिओशी लग्न करायचे आहे आणि ती ते उघडपणे बोलून दाखवते. पण वडिलांच्या निर्णयाला बांधील असल्याने तिचा नाइलाज होतो. पण बसॅनिओ पेटीची निवड करण्यास जातो, तेव्हा ती वरील गाणे म्हणते. बऱ्याच समीक्षकांचे असे म्हणणे आहे की ती या गाण्यातून बसॅनिओला शिश्याच्या पेटीत चित्र असल्याचा क्लू देते, तो असा-

१.bred, head, nourished (उच्चार नरिशेड), fed हे शब्द lead शी rhyme होतात

२. 'डोळ्यांना जे दिसते त्यावर जाऊ नको', असे ती सांगते. हाच धागा बसॅनिओ पकडतो आणि सोन्या चांदीला महत्त्व नाही असा विचार. करून शिश्याच्या पेटीची निवड करतो. प्रत्यक्षात हे सारे fixing आहे. पण शेक्सपिअरला असे काही अभिप्रेत नसावे असे काहींना वाटते.

'मुलांसाठी शेक्सपिअर' या माझ्या पुस्तक संचाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी  मी ही कविता अशा प्रकारे बनवली आहे-

सांगेन तुम्हा  आज गड्यांनो
कल्पना कुठे जन्म घेतसे
नच मस्तकात, नच हृदयात,
डोळ्यांत उगम तिचा होतसे

पुन्हा पुन्हा वस्तूस पाहता
बहरत जाते, फुलते प्रतिक्षण 
परी अखेरिस मृत्यूघंटा
तिची वाजते-
      घण घण घण घण

घेतसे, होतसे हे शब्द शिसे सुचवतात. डोळ्यांना दिसणारे खरे नसून त्यापलिकडे पाहिले पाहिजे हा क्लू दिला आहे. शेक्स्पिअरची कविता कमीत कमी बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

The Comedy of errors
'द कॉमेडी ऑफ एरर्स' या नाटकाविषयी थोडे

अतर्क्य घटना घडण्याचे जे वातावरण या नाटकात आहे, त्यासाठी शेक्स्पिअरने त्या वेळच्या आशिया मायनरमधील एफिसस या नगराची निवड केली आहे. एफिसस पूर्वी ग्रीक साम्राज्याचा तर नंतर रोमन साम्राज्याचा भाग होते. सध्या एफिसस तुर्किये या देशात समाविष्ट म्हणून एक ऐतिहासिक महत्त्वाचे नगर म्हणून प्रसिद्ध आहे.

या नाटकात मार्क्स आणि डकॅट्स या दोन चलनांचा प्रामुख्याने उल्लेख येतो. ही दोन्ही चलने वेगवेगळी असून युरोपियन चलने आहेत. 

हे नाटक शेक्सपिअरने त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला लिहिलेल्या नाटकांपैकी असून त्याचा काळ १५९२-१५९४ हा असावा. हे नाटक तेव्हा लोकप्रिय  झाले असावे. १९६८ मधील किशोर कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 'दो दुनी चार' तर १९८२ मधील 'अंगूर' हा संजीव कुमार, देवेन वर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अंगूर' , हे चित्रपट या नाटकावर आधारित होते.


The Tempest
'द टेंपेस्ट'मधील एअरिअलचे गीत

मधमाशीच्या साथीने मी , 
फुलांतील मध गोळा करतो | 
चाफ्याच्या पाकळ्यांमध्ये , 
सुखात मी विश्रांती घेतो || 

घूत्कार करी घुबड जेव्हा, 
सुखात झोपी जातो मी | 
वसंत जाता वटवाघळास, 
विमान माझे करतो मी |

राहीन आता आनंदात, 
बांधुन मी घर माझे सुंदर |
झुलतो जेथे फांदीखाली, 
कोमल, मोहक, नाजुक मोहर | 



© Dr Hemant Junnarkar
All rights reserved











No comments:

Post a Comment

31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...