शिवगीता - अध्याय २- वैराग्योपदेश
ऋषी म्हणाले-
कुठल्या कारणाने अगस्त्य ऋषींस | यावे लागले रामचंद्राच्या भेटीस | का विरजा दीक्षेस | दिले त्यांनी राघवास | त्यायोगे काय लाभ झाला रामास | हे सांगण्यास | तूच समर्थ आहेस || अ.२, ओ.१ ||
सूत म्हणाला -
जनककन्या सीता | रावणाने अपहरण करिता | राघव विलाप करीत होता | वियोगदुःखाने || अ.२, ओ.२||
सोबत होता धाकटा भाऊ लक्ष्मण | तरी खाईपिई ना, झोपे ना, होऊन दीन | इच्छा करी रघुनंदन | प्राणत्यागाची || अ.२, ओ.३||
लोपामुद्रेच्या पतींस (=अगस्त्य ऋषींस) हे समजले | तेव्हा ते रामाच्या भेटीस आले | आणि रामाला बोध करू लागले | संसाराच्या असारतेविषयी || अ.२, ओ.४||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
हे राजा, काय बसलास दु:खी होऊन? | अरे, हा देह बनला पंचमहाभूतांपासून | त्याला नसे काही ज्ञान | तो कसा होईल कुणाची कांता ? || अ.२, ओ.५||
आत्मा आहे निर्लेप, परिपूर्ण | तो सच्चिदानंदरूप जाण | त्याला ना जन्म ना मरण | दु:खभोग नसे त्याला || अ.२, ओ.६||
सूर्याचे ☀️ चक्षूंमध्ये 👁️ (=डोळ्यांमध्ये) आहे स्थान | साऱ्या जगाचे 🌎 चक्षुत्व (=दृष्टी) होऊन | | तथापि चक्षुदोषांनी तो न | कधी होतो लिप्त, || अ.२, ओ.७||
तसाच आत्मा राहून सर्व भूतांच्या अंतरात | दृश्यवस्तूंनी लिप्त | नाही कधी होत. | देह केवळ मलपिंड, जीवहीन, जडरूप- || अ. २, ओ.८||
-जळतो काष्ठ 🪵 आणि अग्नी 🔥 यांच्या संयोगातून | खाल्ला जातो कोल्ह्यांसारख्या 🦊 प्राण्यांकडून | तरी देहाला नसे संवेदन | मग देहाच्या वियोगाचे दु:ख कशासाठी ? || अ.२, ओ.९||
(देहधारी स्त्री) सुवर्णासारखी गौरवर्णाची | किंवा दूर्वादलासारखी श्यामलवर्णाची | वाकलेली नाजूक कंबर जिची | पुष्ट आणि उन्नत स्तनांच्या भाराने, || अ.२, ओ.१० ||
नितंब आणि जांघा विस्तीर्ण | पाय 👣 कमळासारखे 🪷 रक्तवर्ण | मुख पौर्णिमेचा चंद्र 🌕 पूर्ण | कापलेल्या पिकलेल्या तोंडल्यासारखे ओठ 👄 असणारी, || अ. २, ओ.११||
- शोभतात तिचे नयन 👁️ | निळ्या कमळांसमान | स्वर मधुर जसा कोकिळेचे 🐦⬛ कूजन | चाल तिची डौलदार मत्त गजासारखी 🐘- || अ.२, ओ.१२||
-तिचे कटाक्ष म्हणजे पंचेषुचे (=कामदेवाचे ) उत्तम शर 💘 | माझ्यावर सोडून करिते अनुग्रह फार | असे मानणारा मूर्ख नर | आहे निश्चित पंचेषुशासित (=कामदेवाने किंवा पंचमहाभूतांनी शासित). || अ.२, ओ.१३||
राजा, आता यांतील अविवेक | सांगतो नीट ऐक | न स्त्री, न पुरुष, न नपुंसक | असे हा आत्मा || अ. २, ओ.१४||
पूर्ण पुरुष द्रष्टा अमूर्त | जीवात्मा जो वसे देहात |
| मलपिंडात्मक जडदेह प्रत्यक्षात. | जरी दिसे नाजूक ललना, || अ.२, ओ.१५||
- न दिसे काही तिला, न येई ऐकता | न येई वास घेता | त्याग कर तिचा (सीतेचा) आता | ती केवळ चर्मधारी तनू || अ.२, ओ.१६||
जी प्राणांहून प्रिय तुला | अरेरे, तीच व्हावी कारण दु:खाला ! | जर आत्मा भूतांपासून उत्पन्न झाला | तर तोही पांचभौतिक (=पंचमहाभूतांपसून उत्पन्न झालेला) म्हणावा || अ. २, ओ.१७||
परंतु एकच आत्मा त्यांत (=पंचमहाभूतांत) | परिपूर्ण सनातन निश्चित. | तेव्हा कुठली कांता आणि कुठला कांत | सर्व केवळ भाऊबहीण || अ.२, ओ.१८||
घरे 🏠 बांधली तर | त्यांतील अवकाशास येतो घरांचा आकार | परंतु ती घरे जळाल्यावर | त्यांतील अवकाशाचा नाश होत नाही || अ.२, ओ.१९||
देहांत करी जो आत्मा वास | तो परिपूर्ण सनातन असे खास | मारिले जरी देहांस | तरी आत्मा मरत नाही || अ.२, ओ. २०||
मारणारा जरी इच्छितो मारण्यास | किंवा मेलेला मानतो मृत स्वतःस | कळते न त्या दोघांस | आत्मा न मारतो न मारला जातो || अ.२, ओ.२१||
तेव्हा हे नृपती, काय उपयोग दु:ख करून?| काय या खेदाचे कारण?| स्वस्वरूप जाणून | दु:ख सोडून सुखी हो || अ.२, ओ.२२||
राम म्हणाला-
हे मुने ! नसेल जर दु:ख देहाला | आणि परमात्म्याला | तर भस्म करतो कसा मला | सीतावियोगदुःखरूपी अग्नी 🔥 ? || अ.२, ओ.२३||
हे मुनिश्रेष्ठ, ज्या गोष्टीचा अनुभव येतो निरंतर | तिला अस्तित्व नाही खरोखर | या तुमच्या सांगण्यावर | माझा विश्वास कसा बसावा ? || अ.२, ओ. २४||
सुख किंवा दु:ख जो भोगतो | आहे का कुणी दुसरा तो | ज्यामुळे जीव दु:खी होतो | सांगा मला मुनिश्रेष्ठ || अ.२, ओ.२५||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
समजणे कठीण आहे शंभूच्या मायेला | तिने मोहिले या जगाला | म्हणतात प्रकृती त्याच्या मायेला | मायेचा ईश्वर तो महेश्वर. || अ.२, ओ.२६||
शंभूचे अवयव जीव बनून | राहिले जगास व्यापून. | सत्यज्ञानात्मक, अंतहीन | सर्वशक्तिमान महेश्वर - || अ.२, ओ.२७||
-त्याचाच अंश जीवलोकात | असे प्राण्यांच्या हृदयात ❤️. | ज्याप्रमाणे काष्ठ 🪵 येता अग्नीच्या 🔥 संपर्कात | उत्पन्न होतात ठिणग्या, || अ.२, ओ.२८||
-त्या ठिणग्यांप्रमाणे जीव आहेत. | त्यांना क्षेत्रज्ञ म्हणतात | ते आहेत अनादिकर्मांनी बद्ध आणि अनादिवासनांनी युक्त | | जरी ते आहेत महेशाचे अंश || अ.२, ओ.२९ ||
आता जाण अंत:करण | बुद्धी, अहंकार, चित्त आणि मन | हे चार मिळून | आकारास ते येते.|| अ.२, ओ.३०||
अंत:करणात प्रतिबिंबित | होऊन जीव कर्मफळे भोगतात. | त्यातून उत्पन्न होतात | वैषयिक सुखे वा दु:खे. ||अ.२, ओ.३१||
आहे हे शरीर | जणू जीवांचे भोग भोगण्याचे घर 🏠.|
शरीरांचे दोन प्रकार | स्थावर आणि जंगम || अ.२, ओ.३२||
सूक्ष्म वनस्पती, वेली , तरुवर 🌲 | हे सारे स्थावर | अंडज 🐦, स्वेदज 🦟, उद्भिज्ज 🌱, जरायुज 🐄 हे प्रकार | जंगमात मोडतात || अ. २, ओ.३३||
जशी कर्मे व जसे ज्ञान | तसा देह करण्या धारण | स्थावर किंवा योनींत स्थान | आत्मा प्राप्त करतो || अ.२, ओ.३४||
निर्लेप आणि ज्योतिर्मय असून । शंभूच्या मायेने मोह पावून । जीव धरतो अभिमान । मी सुखी किंवा मी दु:खी आहे ॥ ३५ ॥
ठेव याची जाण । की अहंकारापासून । होतात उत्पन्न । काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य आणि मोह हे षड्रिपु. ॥ ३६ ॥
स्वप्न आणि जागृती या अवस्थांत | जीव पडे बंधनात ⛓️💥 | अहंकाराचा अभाव असे सुषुप्तीत | म्हणून सुषुप्तीत जीव शंकरता प्राप्त करतो. || अ.२, ओ.३७||
माया जीवास जेव्हा स्पर्शते | तेव्हा ते कारण होते सुख-दु:खांचे. | मायेमुळे शिवामध्ये दर्शन होते विश्वाचे 🌎 | जसे शिंपल्यावर 🦪 दिसे रुपे. || अ.२, ओ.३८||
तेव्हा पहा विवेकबुद्धीने | कुणीही नाही पीडित दु:खाने | थांबव हे दु:ख करणे | कशाला त्रास करून घेतोस? || अ.२, ओ.३९||
श्रीराम म्हणाला-
मुनिवर, तुम्ही जे सारे सांगितले मला | अर्थ आहे निश्चित त्याला | तथापि हा प्रारब्धभोग मला | सोडतच नाही || अ.२, ओ.४०||
ज्या ब्राह्मणाचे नष्ट झाले अज्ञान | तोसुद्धा जसा उन्मत्त होईल मद्यपान 🍷 करून | तसा प्रारब्धभोग कठीण | विचारी मनुष्यास सोडत नाही || अ.२, ओ.४१||
तेव्हां काय उपयोग फार बोलून ! । मदन, प्रारब्धाचा सचिव होऊन । मला पीडा देत आहे रात्रंदिन | तसाच पीडतो अहंकार || अ.२, ओ. ४२ ||
पीडा होता जीवास | जीव त्यागतो स्थूल देहास | तेव्हा माझे प्राण वाचविण्यास | काही उपाय कर हे द्विजश्रेष्ठा || अ.२, ओ. ४३ ||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'वैराग्योपदेश' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
शब्दार्थ व टीपा:
रदच्छद (ना.पुं)=ओठ, वलग्न (ना. पुं. नपुं.)=कटिप्रदेश, राका (ना.स्त्री.)=पौर्णिमेची देवता,नीकाश (वि.)=सारखा, शिव (ना. पुं)=कोल्हा, बिम्ब (ना.नपुं.)=तोंडले
पंचेषु=कामदेवाला पंचेषु म्हणजे ज्याच्या भात्यात पाच बाण (पंच=पाच, इषु=बाण) आहेत असा, म्हणतात. कामदेवाचे धनुष्य ऊसापासून बनवलेले असते. त्याच्या भात्यात लाल कमळ, अशोक, आम्रपुष्प, जाई आणि निळे कमळ असे पाच बाण असतात.
जंगम(जन्+गम्= जन्म घेणारा, हलू शकणारा)
जंगम जीवांचे प्रकार:
अंडज = अंड्यातून उत्पन्न होणारे, पक्षि, सर्प इत्यादि. स्वेदज= स्वेदातून (=घामातून, ओलसर , दमट ठिकाणांतून) उत्पन्न होणारे, कृमि, मशक इत्यादि
उद्भिज्ज (=उद्भवणारे) कोंब वगैरे
जरायुज (=गर्भातून उत्पन्न होणारे, जरायु= गर्भाशय) =मनुष्य, गाई इत्यादि.
शुक्ति (ना.पुं)=शिंपला
मुधा (अव्यय)=उगीचच
प्रारब्धादृष्टमुल्बणम्=प्रारब्ध+अदृष्टम्+उल्बणम्
उल्बण (वि.)=अनावश्यक
किं बहुनोक्तेन = फार बोलून काय उपयोग
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment