महेशाचा अनुग्रह ज्यावरी || जे आहे शुद्ध, कैवल्यदायी, मुक्तिकारी | भवदु:खावरील औषध गुणकारी | सांगेन आता || अ.१, ओ.१||
न कर्माने, न अनुष्ठानाने | न दानाने वा तपाने || परंतु केवळ ज्ञानाने | मनुष्याला लाभते कैवल्य || अ.१, ओ.२||
'शिवगीता' नावाने ज्ञात || आहे ती गुह्यतम गुह्यात | रामास दंडकारण्यात | पूर्वी पार्वतिपतीने जी सांगितली || अ.१, ओ.३||
जिचा श्रवणमात्र जरी ऐकला | तरी मुक्तीचा ध्रुव मिळे मनुष्याला | ती सांगितली सनत्कुमाराला | पूर्वी स्कंदाने || अ.१, ओ.४||
ही शिवगीता, हे मुनिवर | सांगती व्यासांना सनत्कुमार | बादरायण (=व्यासमुनी) नंतर | कृपाळूपणे ती देती मला || अ. १, ओ.५ ||
त्यांनी सांगितले मला, | 'सूतपुत्रा, ही गीता तू न द्यावी कोणाला | नाहीतर देव तुला | रागावून शाप देतील' || अ.१, ओ.६ ||
'ब्राह्मण हो ! मग मी विचारला प्रश्न, | 'हे बादरायण भगवान, | सर्व देवता रागावून | शाप का देतील ? || अ.१, ओ.७ ||
ह्यांत देवतांची काय हानी, | की रागवावे त्यांनी?' | तेव्हा मला सांगितले पाराशरांनी (=व्यासांनी),| 'वत्सा, ऐक तर मग || अ.१, ओ.८||
जे ब्राह्मण गृहस्थाश्रमात | असून नेहमी अग्निहोत्र करतात | ते कामधेनूंप्रमाणे असतात | देवांना सर्व फळे देणाऱ्या || अ.१, श्लो.९||
देवांचे जे जे असे इच्छित | ते हवीतून देवांना होई प्राप्त | हवन करिता अग्नीत | भक्ष्य, भोज्य आणि पेय || अ.१, ओ.१०||
हवन करिता यज्ञात | देवांना इष्ट सिद्धी होई प्राप्त. ||
गृहस्थ होतो जसा दु:खित | दुभती गाय नेली असता-|| अ.१, ओ.११||
-तसे दु:ख होते देवांस | पाहून ज्ञानवान ब्राह्मणास | म्हणून देव निर्मिती विघ्नांस | विषयांत प्रवेश करून || अ.१, ओ.१२||
शिवाची भक्ती न होई उत्पन्न | कोणा मनुष्यात म्हणून | | अज्ञानी त्यातून | मुळी न भजती शूलपाणि || अ.१, ओ.१३ ||
जरी मनुष्यांत भक्ती झाली उत्पन्न | मध्येच होई छिन्न | झाले मनुष्यास जरी शिवज्ञान | त्याचा विश्वास न बसे पुरेसा || अ. १, ओ.१४||
ऋषी म्हणाले-
देव जर मनुष्यांस | आणती विघ्नांस | तिथे मुक्ती होण्यास | पुरुषार्थ कोणाचा चालेल ? || अ.१, ओ.१५||
सूतात्मजा सांग सत्य | येथे आहे की नाही उपाय? |
सूत म्हणाले-
कोटिजन्मांत मिळविता पुण्य | शिवाची भक्ती उपजते || अ.१, ओ.१६||
त्या भक्तीच्या योगाने | इच्छा त्यागून शिवार्पणबुद्धीने | इष्टापूर्त कर्मे योग्य विधीने | आचरितो मानव || अ.१, ओ.१७||
अनुग्रह होता शंभूचा | नरास लाभ होई शक्तीचा | मग त्याग करून विघ्नांचा | देव घाबरून पलायन करती || अ.१, ओ.१८||
त्यामुळे इच्छा होते मनुष्यास | चंद्रमौळीचे चरित्र ऐकण्यास | ते ऐकून तो मिळवतो ज्ञानास | ज्ञानातून मुक्त होतो || अ.१, ओ.१९ ||
पुष्कळांनी जो त्यागला | तो मनुष्य जर शिवभक्तीत दृढ झाला | तो जरी कोट्यवधी महापापे, उपपापे यांच्या ओघात असे बुडाला | तरी मुक्त होतो || अ.१, ओ.२०||
अनादराने, कपटाने | उपहासाने किंवा भ्रमाने | जो युक्त शिवभक्तीने | तो अंत्यज असला तरी मुक्त होतो || अ.१, ओ.२१||
अशी शिवभक्ती ही | सर्वदा सर्वतोमुखी राही | आणि तरीही | संसारबंधनातून - || अ.१, ओ.२२||
-नाही जो मर्त्य मुक्त होणार, | त्याच्याहून दुसरा, असेल का मूर्ख खरोखर? | नेमाने शिवभक्ती वा तिरस्कार | जो करील शिवाचा-|| अ.१, ओ.२३||
-त्यावरही होऊन प्रसन्नचित्त | शिव देतो फल इच्छित. | घेऊन द्रव्य किंचित | किंवा पाणी क्षुल्लक -|| अ.१, ओ.२४||
-नियमाने जो देतो | त्यास शिव त्रैलोक्य बहाल करतो. | तेही देण्यास जो असमर्थ असेल तो, | नियमाने नमस्कार वा प्रदक्षिणा -|| अ.१, ओ.२५||
-महेशास करता, | मिळवितो शिवाची संतुष्टता. |
ज्याची त्यासही असमर्थता | तो मनात शिवाचे -||अ.१, ओ.२६||
- उठता-बसता करील चिंतन | त्यासही शिव करतो अभीष्ट प्रदान. | बेलाच्या काष्ठाचे चंदन | किंवा रानातील फुले-फळे- || अ.१, ओ.२७||
- अशा गोष्टी सामान्य | ज्यास असती प्रिय | त्याच्या सेवेस त्रिभुवनात काय | न मिळणारे आहे? || अ.१, ओ.२८||
प्रीती परमेश्वरी (=शिवाची) | जशी असे वनातील वस्तूंवरी | तशी नसे गावातील वस्तूंवरी | जरी त्या अधिक चांगल्या असती || अ. १, ओ.२९||
देवाला सोडून अशा त्या | सेवितो जो देवता दुसऱ्या | तो भागीरथीला सोडूनीया | मृगजळाची इच्छा धरतो || अ.१, ओ.३०||
परंतु कोट्यवधी जन्मांतून | ज्याने ठेविले पाप साठवून | त्याला हा अर्थ न येई दिसून | मोहाने अंध झालेल्याला || अ.१, ओ.३१||
न नियम काळाचा येथे | न देशाचा न स्थळाचा नियम येथे || चित्त याचे (=आपले) रमते येथे | केवळ त्याच्या (=शिवाच्या) ध्यानाने- || अ.१, ओ.३२||
- (मग) योजावे शिवाशी आत्मत्व (=शिवरूपाच्या जवळ जाऊन)| त्यातून साधावे शिवाशी सायुज्यत्व (=शिवाशी एकरूपता). | आहे ज्याच्यात अल्पायुष्याचे न्यूनत्व | परंतु भूतेशाच्या (=शिवाच्या) अंशातील अंशाने जो युक्त आहे-||अ.१, ओ.३३||
-तो गणगोतासह नाश करी त्याचा | ज्यास अभिमान आहे राजा असण्याचा. | शिव कर्ता असे सर्व लोकांचा | अक्षय आणि ऐश्वर्यवान असा- || अ.१, ओ.३४||
- नि:संशय तरी | स्वतःच्या रूपापरी | त्यालाही करी 'मी शिव आहे' म्हणणार्याला ||अ. १, ओ.३५||
हे ऋषिहो ! आतां धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांप्रत | ज्या व्रतायोगे जातात | ते 'पाशुपत' नावाचे व्रत | मी तुम्हांला सांगतो || अ. १, ओ.३६ ||
'विरजा' नावाची दीक्षा स्वीकारून | विभूति आणि रुद्राक्ष धारण करून | शिवसहस्त्रनाम जपून | (शिवसहस्रनाम वेदांचे सार आहे)-|| अ.१, ओ.३७||
-त्याग करून मर्त्यत्व | प्राप्त होईल तनू शैव | आणि पावून प्रसन्नत्व | लोकशंकर भगवान शंकर- ||
-दर्शन देऊन तुम्हास | प्रदान करील कैवल्यास || अ.१, ओ.३८||
दंडकारण्यात रामाला | कुंभसंभव (=अगस्त्य ऋषी) जसा वदता झाला | ते सर्व सांगेन तुम्हाला | भक्तियुक्त होऊन ऐका || अ.१, ओ.३९||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'शिवभक्त्युत्कर्षनिरूपण' नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.
🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment