Wednesday, July 30, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०-विभूतियोग

श्रीभगवान म्हणाले

हे महाबाहो, पुन्हा कर श्रवण । माझे हे परम वचन ।। साधण्या तुझे कल्याण । सांगतो मी तुला ।। १ ।।

माझी उत्पत्ती झाली कोठून । जाणती न महर्षी, न सुरगण ।। कारण उत्पत्ती माझ्यापासून I झाली त्यांची ।। अ. १०, श्लो.२।।

मी अनादि, जन्मविहीन । मी लोकांचा ईश्वर महान ।। आहे ज्या मनुष्यास ज्ञान । तो पापांतून मुक्त होतो ।। अ.१०, श्लो. ३।

संमोहाचा अभाव, बुद्धी आणि ज्ञान । क्षमा, सत्य, शांती आणि दमन ।। सुख, दुःख, जन्म आणि मरण । भय आणि निर्भयता- ।। अ.१०, श्लो. ४ ।।

-अहिंसा, समता, समाधान । तप, यश-अपयश, दान ।। असे भूतांचे भाव विभिन्न । माझ्यापासून उद्भवती ।। अ. १० श्लो. ५ ।।

सप्तर्षी माझ्या मनातून । त्याआधीचे चार ऋषी (सनकादिक) आणि मनू (स्वायंभुव) झाले उत्पन्न ।। आणि त्यांच्यापासून । पुढे प्रसवली प्रजा ।। अ.१०, श्लो. ६।।

(सप्तर्षी ७, सनकादिक ४, स्वायंभुव ३=एकूण १४)

माझा योग आणि विभूती । तत्वतः जे जाणती ।।ते निस्संशय जोडले जाती । स्थिर योगात ।। अ.१०, ओ. ७ ।।

माझ्यापासून सर्वांची उत्पत्ती । माझ्यामुळे सर्वांना गती ।। भावसमन्वित ज्ञानी हे जाणती । आणि भजती मला ।। अ. १०, श्लो. ८।।

चित्त आणि प्राण माझ्यात ठेवून । परस्परांस माझा बोध करून ।। माझ्याविषयी कथन करून । माझ्या ठायी ते संतोषती आणि रमती ।। अ.१०, श्लो. ९ ।।

ते माझ्यात सतत युक्त होती । प्रीतिपूर्वक मला भजती ।। आणि माझ्याकडे येती । माझ्याच बुद्धियोगाने ।। अ.१०, श्लो.१०।।

त्यांच्या आत्मभावात राहून । ज्ञानदीप उजळून ।।अज्ञानतमाचा नाश करून । मी कृपा त्यांच्यावर करतो ।। अ. १०, श्लो. ११।।

अर्जुन म्हणाला

तू दिव्य पुरुष, शाश्वत, । आदिदेव प्रभू, जन्मरहित ।। परम, पुनीत । परब्रह्म, परधाम- ।। अ. १०, श्लो. १२ ।।

-असे म्हणती सारे ऋषी । थोर नारद देवर्षी- ।। -असित, देवल आणि व्यास महर्षी । तूही तेच सांगतोस ।। अ. १०, ओ. १३।।

केशवा, तू जे सांगतोस । मी ठेवतो त्यावर विश्वास ।। भगवंता, तुझ्या स्वरूपास । जाणती देव न दानव ।। अ. १०, ओ. १४।।

तू भूतभावन, ईश भूतांचा । तू देवांचा देव, स्वामी जगाचा ।। थांग तुझ्या स्वरूपाचा । पुरुषोत्तमा, तुलाच आहे ।। अ. १०, ओ. १५।।

हा लोक तू व्यापला आहेस । घेऊन विविध विभूतींच्या स्वरूपास ।। त्या सर्व सांगण्यास । तूच आहे समर्थ ।। अ. १०, ओ. १६।।

हे योगेश्वरा, सदैव करीत तुझे चिंतन । कसे घेऊ तुला जाणून ।। भगवंता, तुझ्या कुठल्या भावांतून । चिंतनीय आहेस तू ।। अ. १०, ओ. १७।।

तुझे अमृतासारखे भाषण ऐकून I होत नाही समाधान II जनार्दना, विस्ताराने कर कथन I तुझा योग  आणि तुझ्या विभूती II अ. १०, ओ. १८ II

श्रीभगवान म्हणाले

माझ्या दिव्य विभूती फार विस्तृत । नाही त्यांना अंत ।। तरी तुला थोडक्यात । सांगतो कुरुश्रेष्ठा ।। अ. १०, ओ. १९।।

मी भूतांच्या हृदयात | आहे आत्म्याच्या रूपात ||भूतांचा आदि, मध्य आणि अंत | मीच आहे गुडाकेशा || अ. १०, ओ.२०||

आदित्यांमध्ये विष्णू मी | ज्योतींमध्ये तेजस्वी सूर्य मी || मरुतांमध्ये मरीची मी | मी चंद्र नक्षत्रांत || अ. १०, ओ.२१||

मी सामवेद वेदांमध्ये | मी वासव देवांमध्ये || मी मन इंद्रियांमध्ये | भूतांतील चेतना मी || अ.१०, ओ.२२|| (वासव= इंद्र)

रुद्रांमध्ये शंकर मी | यक्षराक्षसांमध्ये वित्तेश मी ||वसूंमध्ये अग्नी मी | पर्वतांमध्ये मी मेरुपर्वत || अ.१०, ओ.२३||

(वित्तेश=कुबेर)

मी बृहस्पती, पुरोहितांत I पार्था, घे ध्यानात II स्कंद मी सेनानींत I जलाशयांत मी सागर || अ.१०, ओ.२४||

महर्षींमध्ये भृगू ऋषी मी | वाणीत ॐकार मी ||यज्ञांत जपयज्ञ मी | स्थावरांत मी हिमालय || अ. १०, ओ.२५||

वृक्षांमध्ये पिंपळ मी | देवर्षींमध्ये नारद मी ||गंधर्वांमध्ये चित्ररथ मी | सिद्धांमध्ये कपिल मुनी || अ. १०, ओ. २६||

उच्चै:श्रवा मी अश्वांत | जो उद्भवला समुद्रमंथनात || गजेन्द्रांमध्ये मी ऐरावत | मनुष्यांमध्ये मी राजा || अ.१०, ओ.२७||

आयुधांमध्ये वज्र मी | धेनूंमध्ये कामधेनू मी ||

प्रजनन करणारा काम मी | सर्पांमध्ये मी वासुकी || अ.१०, ओ.२८||

नागांमध्ये मी अनंत | वरुण मी जलचरांत || अर्यमा मी पितरांत | संयम करणाऱ्यांत मी यम || अ.१०, ओ. २९||

प्रह्लाद मी दैत्यांमध्ये | काल मी नियमन करणाऱ्यांमध्ये || सिंह मी पशूंमध्ये | पक्ष्यांमध्ये गरुड मी || अ.१०, ओ.३०||

पावन करणाऱ्यांत पवन मी | शस्त्रधारकांत राम मी || मत्स्यांमध्ये मकर मी | स्रोतांमध्ये मी जाह्नवी || अ.१०, ओ.३१||

सृष्टीची मी सुरुवात | तसेच मध्य आणि अंत ||अध्यात्मविद्या मी विद्यांत | वादांचा मी निष्कर्ष || अ.१०, ओ.३२||

अक्षरांत ‘अ’ हे अक्षर मी | समासांमध्ये द्वंद्व समास मी || अक्षय काल मी | सृष्टिकर्ता मी ब्रह्मदेव || अ.१०, ओ.३३||

मी मृत्यू, ज्याने सारे नाश पावती | भविष्यातील गोष्टींची मी उत्पत्ती || नारींमध्ये मी श्री, वाणी, कीर्ती | स्मृती, मेधा, श्रुती आणि क्षमा || अ. १०, ओ.३४||

बृहत्साम मी  सामांमध्ये | गायत्री मी छंदांमध्ये ||मार्गशीर्ष मी महिन्यांमध्ये | ऋतूंमध्ये मी वसंत || अ.१०, ओ.३५||

कपट करणाऱ्यांचे द्यूत मी | तेजस्वी लोकांचे तेज मी || जय मी, साहस मी | सात्त्विकांचे मी सत्त्व || अ.१०, ओ.३६||

वासुदेव मी वृष्णींमध्ये | धनंजय मी पांडवांमध्ये ||व्यास मी मुनींमध्ये | कवींमध्ये मी उशना कवी || अ.१०, ओ.३७||

शासक देतात ती शिक्षा मी | जय इच्छिणाऱ्यांची नीती मी || गुह्यांपैकी मौन मी | ज्ञानवानांचे मी ज्ञान || अ.१०, ओ.३८ ||

बीज जे सर्व भूतांत | ते मीच अर्जुना, घे ध्यानात || माझे अस्तित्व नाही ज्यात | असा चराचर कुणी नाही || अ. १०, ओ.३९||

परंतपा, तुला सांगितल्या | अशा अंत नसणाऱ्या   || दिव्य विभूती माझ्या | त्यांचा विस्तार कळण्यास || अ. १०, ओ.४०||

ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी | श्री आणि ऊर्जा येते दिसुनी || त्या  त्या  उपजल्या माझ्या तेजाच्या अंशातुनी | ध्यानात घे तू || अ. १०, ओ.४१||

अर्जुना, हे ज्ञान जरी मिळवले | तरी त्याने काय साधले? || संपूर्ण जग मी व्यापले | माझ्या एका अंशाने  || अ.१०, ओ.४२||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘विभूतियोग’ नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला.

               || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

No comments:

Post a Comment