Friday, February 20, 2026

स्मृती, ज्ञान आणि अपोहन

गेल्या आठवड्यात एका नातेवाईकांच्या घरी शोकसभेला जायचा प्रसंग आला. या वेळी श्रीमद्भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठासाठी ठेवला होता. अध्याय वाचताना माझं लक्ष एका श्लोकाकडे वेधलं गेलं.

तो श्लोक १५ असा आहे:
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो 
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । 
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो 
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ॥ अ.‌१५-श्लो.१५ ॥ 
या श्लोकातील 'अपोहन' शब्दाचा अर्थ काय असावा? मी आज चाळीस वर्षांपासून अधिक काळ भगवद्गीता वाचतो आहे. पंधरावा अध्याय माझा पाठ असल्याने मी तो नियमित म्हणतो. तरी या शब्दाकडे माझं लक्ष गेलं नव्हतं. 

मी प्रथम ज्ञानेश्वरीकडे वळलो. पण त्यातही काही अर्थ आढळला नाही. मी श्रील प्रभुपादांची 'भगवद्गीता-जशी आहे तशी' मध्ये पाहिलं. त्यात 'विस्मृती' असा अर्थ दिलेला आहे.

अपोहन शब्दाचा अर्थ आपटे यांच्या संस्कृत -इंग्रजी शब्दकोषात असा दिला आहे:

अपोहनम् apohanam (p. 159)अपोहनम् apohanam 1 Removal &c. = अपाह above. -2 Reasoning faculty; मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च Bg.15.15 (Mr Telang translates अ˚ by removal; Lok. Tilak translates as नाश.) ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत्स्मृतिरपोहनम् Bhāg.11.13.6.

मग मी शब्दाच्या पृथक्करणाकडे वळलो. अपोहन शब्द असा बनला आहे:
अप+ उह्
अप हा उपसर्ग दूर, विरुद्ध अशा अर्थाने वापरला जातो
उह् धातूचा अर्थ विचार करणे, अनुमान काढणे

स्मृती:
प्रथम मला वाटले की स्मृती हा शब्द श्रुति-स्मृति मधील स्मृतिपैकी आहे का ते पहावे. परंतु तसा संदर्भ दिसत नाही. श्लोकात म्हटले आहे की 'हृदि संनिविष्ट:' म्हणजे येथील स्मृति म्हणजे 'आठवण' असाच अर्थ आहे.

आता या अर्थाने पाहिले तर स्मृती म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांनी जे ग्रहण केले आहे, त्याचे मेंदूमध्ये झालेले रेकॉर्डिंग किंवा कॉंप्युटरच्या भाषेत  मेंदूमधील डिस्कवर कॉपी झालेल्या फाइल्स.

ज्ञान:
सर्व स्मृती म्हणजे ज्ञान नाही. या फाइल्सचे एका विशिष्ट निकषावर आपण वर्गीकरण केले की आपल्याला काही निष्कर्ष काढता येतो. हा निष्कर्ष हे ज्ञान.

अपोहन:
एखाद्या गोष्टीचे ज्ञान होणे म्हणजे corresponding अज्ञान दूर होणे. हे अज्ञान दूर होणे म्हणजे अपोहन. किंबहुना हे अज्ञान दूर झाल्याशिवाय खरे ज्ञान झाले असे म्हणता येत नाही. 

अपोहन या शब्दाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा शब्द संपूर्ण भगवद्गीतेमध्ये एकदाच याच ठिकाणी आला आहे.

साप आणि दोरीचे उदाहरण:

आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये साप आणि दोरीचे उदाहरण खूप ठिकाणी आढळते. हे उदाहरण असे आहे. 

दुरून पाहिले असता दोरी सापासारखी दिसते. परंतु जवळ जाऊन पाहिले असता ती दोरी आहे हे कळते. या उदाहरणात-
ज्ञान: दोरी आहे हे कळणे
अपोहन: साप आहे हे अज्ञान दूर होणे

म्हणजे जे 'आहे' ते कळणे हे 'ज्ञान' जे 'नाही' ते कळणे ते 'अपोहन.' अपोहनास 'अविद्यानिरसन' असेही म्हणतात.

अपोहन ही दुसरी बाजू:

Statistics मधील Theory of Probability समजून घेताना mutually exclusive ही संकल्पना आधी समजून घ्यावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही एखादे नाणे हवेत फेकले तर छापा येईल किंवा काटा येईल. छापा आणि काटा दोन्ही येणार नाही किंवा दोन्हीपैकी काहीच येणार नाही, असे होणार नाही. म्हणजे छापा आणि काटा येणे या mutually exclusive events झाल्या. एक event घडली तर दुसरी घडू शकत नाही. म्हणजे येथे नाणे खाली पडल्यावर छापा आहे हे कळणे हे ज्ञान आणि तो काटा नाही हे कळणे हे अपोहन.  Mutually exclusive events असल्या की अपोहन सोपे होते. पण म्हणून त्यासाठी mutually exclusive events असल्या पाहिजेत असे नाही.

Probability theory प्रमाणे:
ज्ञान: शक्यतांचे संकुचन
अपोहन: बाद झालेल्या शक्यता.
नाण्याऐवजी फासा टाकला आणि एक आला तर दोन, तीन, चार, पाच, सहा या शक्यता बाद झाल्या. परंतु अध्यात्माप्रमाणे अंतिम ज्ञान म्हणजे शक्यता नाही तर ते परमसत्य आहे.

उपनिषदे आणि ‘अपोहन’:
उपनिषदांत अपोहन या शब्दाचा प्रत्यक्ष वापर नाही. पण यामागील संकल्पना आहे.

‘अपोहन’ (अविद्यानिरसन) ही कल्पना पुढील विधानांत दिसते:
🔹  बृहदारण्यक उपनिषद   (२.३.६)
“नेति नेति”
(नकारात्मक अपवादातून सत्यप्राप्ती)
🔹  मुंडकोपनिषद  (२.२.८)
“भिद्यते हृदयग्रन्थिः…”
(अविद्येचे निरसन)

अद्वैत तत्वज्ञानातील अपोहन:
आपण स्वतःला केवळ शरीर समजतो — ही चूक आहे.
आत्मज्ञान झाले की ही चुकीची ओळख नाहीशी होते.
ही अविद्येची निवृत्ती म्हणजेच अपोहन.
म्हणजे अपोहन हा फक्त नकार नाही;
तो चुकीच्या समजुतीचे निरसन आहे.

बौद्ध तर्कशास्त्रातील अपोहवाद:
बौद्ध तर्कशास्रातही अपोह ही कल्पना आहे, पण ती भगवद्गीतेतील अपोहनापेक्षा वेगळी आहे.
“अपोह” सर्वाधिक तांत्रिक रूपाने बौद्ध प्रमाणशास्त्रात आढळतो—विशेषतः
 दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांनी अपोह संकल्पनांचा वापर केला आहे.  अपोहवादानुसार शब्दाचा अर्थ सकारात्मक सार्वत्रिकतेने (universal) ठरत नाही. तो “इतर सर्वांचा अपोह” करून ठरतो.
उदा. “गाय” म्हणजे “अगायांचा अपोह” (non-cow चा निरास).
इथे “अपोह” ही भाषार्थनिर्णयाची केंद्रस्थानी संकल्पना आहे.
गणितातील Set theory प्रमाणे हे तत्त्व खालीलप्रमाणे मांडता येईल:
A = Universe − NonA
A=गायी
Non-A=अगायी
Universe=गायी+अगायी

१५ व्या श्लोकाचा अर्थ:
आता माझ्या दृष्टीने १५ व्या श्लोकातील या ओळीचा अर्थ असा असावा:
"आणि सर्वांच्या हृदयात माझा निवास आहे. माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि अपोहन (उद्भवतात)"

'अपोहन' संज्ञेचा  उलगडा:
शोकसभेला जाण्यापूर्वी आमची चर्चा चालू होती की भगवद्गीतेतील कुठला अध्याय असेल? आमचा तर्क होता की भगवद्गीतेचा आठवा अध्याय (अक्षरब्रह्मयोग) असेल. कारण निर्वाणकाळानंतर मिळणारी गती वगैरेविषयी चर्चा या अध्यायात आहे. पण माझे व्याही श्री. देवेंद्र पाटील यांनी भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठासाठी ठेवला आणि चाळीस वर्षे न जाणवलेल्या संज्ञेचे काही अज्ञात पैलू समजले. 

© Dr Hemant Junnarkar
All rights reserved








No comments:

Post a Comment

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...