Sunday, July 21, 2024

मोनाचा डॉगी


सिडनीमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी कालिदास जयंती चा कार्यक्रम साजरा केला जातो. या वर्षीचा  कार्यक्रम २०/७/२०२४ ला साजरा झाला. कार्यक्रमामध्ये मी माझी 'मोनाचा डॉगी' ही कथा सादर केली. मला ही कथा सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळ, सिडनी, यांचा खूप आभारी आहे.

कै. चिं.वि. जोशी यांची अजरामर व्यक्तिरेखा चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत, अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. चिमणराव आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत ही कल्पनाच भन्नाट असल्याचे, तसेच कथा आवडल्याचे सर्वांनी सांगितले . सदर कथा येथे   दिली  आहे. 

मोनाचा डॉगी

-डॉ. हेमंत जुन्नरकर 

©Dr Hemant Junnarkar, All rights reserved


(मराठीतील अजरामर विनोदी लेखक कै. चिं.वि. जोशी  यांचे कथानायक चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. कै. चिं.वि. जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे  'मोनाचा डॉगी')

मी नुकताच ऑफीसमधून घरी येऊन सोफ्यावर आराम करीत होतो. काऊचा स्वयंपाक तयार झाला होता आणि ती मोबाइलवर मेसेजेस चेक करीत होती.

'अहो, ऐकलंत का?' काऊ म्हणाली,' महाराष्ट्रात म्हणे  'लाडकी बहीण, लाडका भाऊ' योजना सुरू केल्या आहेत. इथे का नाही अशी काही योजना करीत?'

मी काही उत्तर देणार एवढ्यात मोरू दुसऱ्या खोलीतून येऊन सोफ्यावर चढून माझ्या गळ्यात हात टाकून म्हणाला,

'लाडका डॉग अशी योजना का नाही?'

'का रे बाबा?' मी विचारलं.

'आपण डॉगी पाळू या का? मी एक डॉगी पाहून ठेवला आहे,' मोरू म्हणाला.

मोरूची लाडीगोडी माझ्या लक्षात आली. मोरूचा हात गळ्यातून काढून मी  उत्तर दिलं, 'हे पहा, कुत्रं वगैरे काही पाळायचं नाही.'

ते ऐकताच मोबाइल बाजूला ठेवून काऊ म्हणाली, 'अहो, इतरांच्या घरी पाहून मुलांनाही वाटतं, आपल्याकडे सुद्धा डॉगी असावा. आणि हे पहा, कुत्रं वगैरे असे गावठी शब्द वापरू नका, डॉगी म्हणा. इथे कुत्र्याबद्दल  आदराने बोलतात.'

'हे पहा,   डॉगी खूप महाग आहेत. पुन्हा त्यांचं खाणंपिणं, ट्रेनिंग, आजारपण या सर्वांवर अफाट खर्च होतो. आणि त्या डॉगीचं शी शू, अंघोळ-पांघोळ, त्याला फिरवून आणणं, हे सारं कोण करणार?'

'अप्पा तुम्ही,' मोरू आणि मैना  एका सुरात म्हणाले.

'मैना, ऑफीसमधल्या कामामुळे मला रोज घरी यायला उशीर होतो. मी डॉगचं  काही करू शकणार  नाही,' मी स्पष्ट सांगितलं.

'तुमची म्हणजे  प्रत्येक बाबतीत रडकथा.  बाला पहा, जानकीने सांगितलं,  डॉगी हवा  तर लगेच  आणला. डी आय वाय कोर्स करून डॉग ट्रेनिंग स्वतःच केलं. आता बालांचा डॉग त्यांच्याबरोबर योगासुद्धा करतो,' काऊ म्हणाली.

'हे पहा, बालांचा डॉगी योगा करो नाहीतर भरत नाट्यम करो, आपल्याकडे डॉगी नको,' मी कधी नव्हे ते ठामपणे सांगितले. कुणी काही बोललं नाही. काऊनं पानं मांडली. सारेजण चुपचाप जेवण करून झोपी गेलो.

दुस-या दिवशी कामावर गेलो तो आमच्या ऑफीसमधील  रिसेप्शनिस्ट मोनाने माझ्याजवळ येऊन सांगितलं की तिला ताबडतोब लंडनला जावं लागणार आहे, कारण तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. मोना एकटी राहत होती. तिने पोगो नावाचा कुत्रा पाळला होता. मोनाने ती परत येईपर्यंत पोगोला घरी घेऊन जाण्याची मला विनंती केली.  

लंच टाइममध्ये   रुस्तमजी  नावाचे पारशी कलीग बरोबर होते.  मी त्यांना म्हणालो ,

'रुस्तमजी, कालच मला घरच्यांनी कुत्रा आणण्याबद्दल विचारलं आणि मी सरळ नाही सांगितलं. आज मी कुत्रा घरी घेऊन आलो आणि तोही एका मुलीचा, तर माझी बायको मला सोलून काढील,' मी म्हणालो.

रुस्तमजी म्हणाले, 'अरे चिमण, तमने तो बहुज सरस चान्स मळ्यो छे.'

'सरस चान्स? तो कसा काय रुस्तमजी?' मी विचारलं.

'हे बघ, माझी बैरी- आमी गुजराती लोग वाइफला बैरी म्हणते बरं का- तर माझी बैरी एकसारखी  माझ्या पाठी भुणभुण करायची - कूतरा पाहिजे, कूतरा पाहिजे. मी आणला कूतरा. कूतराला वॉक करताना  एक दिवस मला माझी कॉलेजमधली गर्ल फ्रेंड भेटली. मग काय, दिला बैरीला डायव्होर्स. मी सांगते, तुला बी असाच कुणी भेटेल. मग हे खडूस बैरीला देऊन टाक डायव्होर्स. दे टाळी.'

मी रुस्तमजींना निमूटपणे टाळी दिली.

संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर मी मोनाबरोबर तिच्या घरी गेलो. मोनाने पोगोला  बरोबर घेतलं. महिनाभर ती परत येईपर्यंत माझ्याकडे शहाण्यासारखं राहायला पोगोला सांगितलं. पोगोने सुद्धा जणू काही सर्व समजल्यासारखं दाखवून माझ्याकडे पाहिलं. मोनाने मला घरी सोडलं. माझ्या गालाला गाल लावून मला निरोप दिला आणि  निघून गेली.

मी माझ्या गालाला हात लावून पाहत, सर्वांना तोंड कसं दाखवावं या विचारात दरवाज्यावरील बेल वाजवली.  माझ्याबरोबर पोगोला पाहताच सारी मुले आनंदाने पिटीत म्हणाली,' आई आई, अप्पांनी डॉगी आणला.'

ते ऐकून काऊ बाहेर आली आणि गरजली ,' अगं बाई, कुत्रं आणलं? कुणाचं हे कुत्रं?'

'कुत्रा ना? तो - तो आपल्या गुंड्याचा,' मी चाचरत म्हटलं.

'गुंड्याभाऊजींचा? गुंड्याभाऊजी कधीपासून कुत्रा पाळायला लागले?' काऊ संशयाने माझ्याकडे पाहत म्हणाली.

'हो, पण मला घरात तर येऊ देशील की नाही? ' मी घरात येऊन सोफ्यावर बसलो‌. पोगो माझ्या पाठी येऊन माझ्या पायाशी बसला.

'अगं त्याचं असं झालं, गुंड्या आला खरा आपल्याबरोबर सिडनीला, पण गेला आहे कंटाळून. बरं हा ब्रह्मचारी. इथे पाहिलं, सिंगल लोक सोबतीसाठी कुत्रा पाळतात, म्हणून आला कुत्रा घेऊन. पण कुत्र्याची सारी व्यवस्था तर करायला पाहिजे ना? म्हणाला, घेऊन जा तुझ्याकडे महिनाभर, मुलंसुद्धा खूष होतील,' मी एवढी थाप मारू शकतो यावर माझाच विश्वास बसेना.

एवढ्यात दारावरची बेल वाजली‌. काऊने जाऊन दार उघडलं, तर गुंड्याचाच आवाज,' काय वहिनी, आला आहे का चिमण घरी?'

अरे बाप रे, माझ्या छातीत धडकीच भरली. हा आताच कसा तडमडला?

'हो आले आहेत नं. कुत्रा छान आहे हं तुमचा,' काऊ म्हणाली.

'कुत्रा? आणि माझा?' बोलत बोलत गुंड्या आत आला आणि पोगोकडे पाहत म्हणाला,' अरे चिमण, तुझ्या ऑफीसमध्ये कुणी मोना आहे  म्हणत होतास, तिचा तर आणला नाहीस ना कुत्रा?'

झालं. या गुंड्याच्या एक थोतरीत मारावी असा मला राग आला.  मी थाप मारली, त्याचा गुंड्याने पुरेपूर वचपा काढला.

'वहिनी, मी आलो होतो, चहा घ्यायला, पण आता  येईन पुन्हा कधीतरी. हे कुत्रे दु:शासनाप्रमाणे माझ्या धोतराच्या पाठी लागतात,' असं म्हणून गुंड्या धोतरावरील पकड ठेवूनच निघून गेला.

गुंड्या गेल्यानंतर काऊ दरवाजा बंद करून आली आणि तावातावात म्हणाली,' आता खरं सांगा पाहू, कोण ही मोना?'

'आई, मला माहीत आहे, मोना कोण आहे. 'यादों की बारात' मध्ये अजित नाही का म्हणतो, 'मोना डार्लिंग,' मोरू म्हणाला.

'आता मोना डार्लिंगचा कुत्रा सांभाळायला वेळच वेळ असेल,'काऊ खोचकपणे म्हणाली.

'आई, मी सांभाळेन मोनाचा कुत्रा. किती छान आहे !' राघू म्हणाला.

'राघू, आपल्याला आजीने काय शिकवल़ंय, मोठ्या माणसांना नावाने हाक मारू नये. मोना आंटी म्हणावं,' मैनानं राघूला उपदेश केला.

'मैना, खबरदार त्या सटवीला आंटी म्हणशील तर,'  काऊने बजावलं .

'आई, पण असं पहा, अप्पांनी मोना आंटीला जर आमची सेकंड मदर म्हणून घरी आणली तर आम्हाला तिला रिस्पेक्ट द्यावा लागेल नं. माझी मैत्रीण ज्युली तिच्या सेकंड मदरला खूप रिस्पेक्ट देते,' मैना म्हणाली.

'अगं मैना, काय ही बाष्कळ बडबड चालवली आहे?' मी म्हणालो. 

आमचं बोलणं चालू असताना पोगो घरातील सर्वांकडे आळीपाळीने पाहत सर्वांना जज करीत होता.

'बाष्कळ  नाही, मैना बरोबर बोलते आहे. मीताच्या घरी तिच्या नव-याच्या ऑफीसमधील रिसेप्शनिस्ट कुत्रा घेऊन यायची. होता होता एक दिवस नव-यानं मीताला डायव्होर्स की दिला आणि रिसेप्शनिस्ट बरोबर लग्न केलं,' काऊ म्हणाली.

'तू काय सुतावरून स्वर्ग गाठते आहेस? मी  डायव्होर्स वगैरे काही  देणार नाही,' मी म्हणालो.

'नाही ना? मग जा आणि आताच्या आता त्या भवानीचा कुत्रा परत देऊन या,' काऊ म्हणाली.

'आता कसा परत करणार? ती बिचारी पॅकिंगच्या गडबडीत असेल,' मी म्हणालो.

'बिचारी? वा ! इतकी वर्षं  राबराबून बायकोच्या नशिबाला नाही कधी हा शब्द आला?' काऊ म्हणाली.

'ऑफीसमध्ये काम खूप असतं म्हणे. हेच काम असतं वाटतं, मोनाची कुत्री सांभाळण्याचं?' काऊचा तोंडाचा पट्टा चालूच होता.

'ऑफीसमध्ये मोना कशी आणेल कुत्रा? तुला कळतंय का काही?' मी म्हणालो.

'हो बाई, मला बापडीला काय कळतंय? मी आपली घर सांभाळते, नवरा कुणा मोनाची कुत्री सांभाळतो,' काऊ म्हणाली.

आमचं हे सारं बोलणं चालू असताना पोगोला बहुतेक कळत होतं की आपल्यामुळे आपल्या मालकावर ही आफत ओढवली आहे. तरीसुद्धा आपला मालक काही मार्ग काढेल या  विश्वासानं तो माझ्याकडे पाहत माझ्या पायाशी बसून होता.

इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. मैनानं दरवाजा उघडला तर चक्क मोना आत आली आणि म्हणाली,

'हाय चिम, माय प्लॅन इज कॅन्सल्ड. माय ब्रदर टोल्ड मी मॉम इज ओके अँड देअर इज नो नीड टू रश. आय ॲम टेकिंग पोगो विद मी. थँक्यू सो मच. सून वी विल कॅच अप गाइज. बाय,' मोना म्हणाली.

मोनानं हात करताच पोगो शेपूट हलवीत आणि माझ्याकडे कृतज्ञपणे पाहत मोनाकडे गेला. मोना पोगोला घेऊन निघून गेली.

मी 'हुश्श' म्हणून सुस्कारा सोडला आणि मोरूला म्हणालो,' मोरू, तू जो डॉगी पाहिला आहेस तो घेऊन ये.'

सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. 

'आणि डॉगीचं सारं करणार कोण?' काऊनं विचारलं.

'मी करीन,' मी म्हणालो.

'का? एकदम असा निर्णयात बदल?' काऊनं विचारलं.

'माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नाही तर डॉगी निश्चित विश्वास ठेवील,' मी म्हणालो.

काऊ माझ्याकडे पाहतच राहिली.

******

Whats app वर आलेल्या प्रतिक्रिया:

गोष्ट खुप छान आहे.-देवेंद्र पाटील २२/७/२०२४

मस्त कथा वाचताना मजा आली. 👌-अविनाश ताम्हाणे २२/७/२०२४

Khupch sunder Jijaji, mast maja Ali - वैशाली चित्रे २४/७/२०२४

Fantastic write up!! Comfort read. -अपर्णा रामटेके २३/७/२०२४

😃😃😀   great  I enjoyed it. The memories of C V J sir were fresh.-सतीश चित्रे - २२/७/२०२४

गोष्ट छान आहे. 👍👍👌👌😃😃😃😃-उमा गुप्ते २२/७/२०२४

Aprateem Kalpana ahe. 

चि वि जोशी सिडनी हि सिरीज फार पुढे जाईल. त्यांच्या प्राचीन आणि प्रगतशील विविधतेचा गंध नसलेल्या चिमणरावांच्या नजरेतून सिडनी बघायला आवडेल.

वरील कथा अजून वाचली नाही पण तुमच्या आवाजात असेल तर ऐकायला आवडेल. 

असेच लिहीत, सादर करीत राहा. लोकरंजन आणि अंजन दोन्ही फार गरजेचे आहे.

तुमची कल्पकता तुमच्या शांत स्वभावाला आणि अचूक निरीक्षणात आहे .

संगीता रॉड्रिग्ज २२/७/२०२४

छानच - सचिन चिटणीस २२/७/२०२४

Wow this is great👌🏻👏🏻👏🏻👏🏻 गौरी भिवंडकर २१/७/२०२४

फ़ारच छान -शेखर केतकर २१/७/२०२४

Ohh. Wow congratulations Sir.. Nuntan Vahini vachala..khup chan ahe.. उल्का गावकर २१/७/२०२४

A re masta 👏👏 -रेखा पेडलीकर २१/७/२०२४

कथा खूप छान 👌👌👏👏-कौस्तुभच्या आई

👌🙂 Abhinandan Hemant khup chan Katha Kathan..👏🏻 -राजेश












 



















 






















No comments:

Post a Comment