गणपत वाणी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी,
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी
गि~हाईकाची कदर राखणे
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा,
मिणमिण जळत्या आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते,
आडोशाला वास तुपाचा
असे झोपणे माहित होते
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली,
दुकानातल्या जमीनीत ती
सदैव रुतली आणिक रुतली
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला,
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!
केशवसुत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. कारण त्या़ंनी इंग्रजी कवितेच्या संपर्कातून मराठी कविता भक्तिकाव्यातून बाहेर काढली. या मराठी कवितेमध्ये पुढे प्रतीकांचा तोच तो पणा येऊ लागले. मग आले बाळ सीताराम मर्ढेकर. त्यांनी निराळीच प्रतीके वापरून मराठी कवितेला नवी दिशा दिली.
बाळ सीताराम मर्ढेकरांची एक अतिशय लोकप्रिय कविता आहे - गणपत वाणी. या कवितेमध्ये उल्लेख आहे की गणपत वाणी माडी बांधण्याची स्वप्ने पाहता पाहता, माडी न बांधताच निवर्ततो. पुढे कवी नारायण सुर्वे यांनी याच कवितेचा संदर्भ घेऊन त्यांच्या एका कवितेत मर्ढेकरांना उद्देशून म्हटले आहे की, ' तुम्ही आज असता तर तुमच्या गणपत वाण्याने माडी बांधलेली तुम्ही पाहिली असती.'
गणपत वाण्यावरील ही कविता दहावी एस. एस.सी. ला अभ्यासासाठी होती. गणपत वाण्याचे वर्णन करताना मर्ढेकरांनी डोळे मिचकावणे, भुवया उडवणे, अशा गणपत वाण्याच्या शारीरिक व्यंगांना लक्ष केले आहे. कवितेचा शेवट करताना
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला,
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला
अशी कोटी करून हेटाळणीची पराकोटी केली आहे. रसग्रहणात याचा अर्थ काढला जातो की गणपत वाण्याकडे स्वप्नपूर्तीची क्षमताच नव्हती, म्हणजे तो जन्मांध होता. माडी बांधण्याचे स्वप्न पाहून तो देवाकडे एक डोळा मागत होता. पण त्याचा मृत्यू झाल्यामुळे तो माडी बांधण्याच्या त्रासातून सुटला किंवा वर गेला म्हणजे माडी बांधण्याच्या स्वप्नाच्याही वर गेला.
या कवितेचे सर्वसंमत रसग्रहण असे आहे की कवीने गणपत वाण्याच्या रूपात एक कर्तृत्वशून्य आणि निष्क्रिय व्यक्तिरेखेचा उपहास केला आहे.
वाणी हा तसा निरुपद्रवी प्राणी. या समाजाच्या भावना दुखावल्या आणि ही कविता अभ्याक्रमातून काढून टाकली, असे होत नाही. नाही म्हणायला मला एक प्रसंग आठवतो. एका अंदाजपत्रकाची नानी पालखीवाला यांनी 'वाण्याचे अंदाजपत्रक' अशी संभावना केली होती. त्यावेळी पुण्यातील प्रसिद्ध घाऊक व्यापारी नारायणदास गोविंददास यांनी सकाळ वृत्तपत्रात वाचकपत्र पाठवून नानी पालखीवालांवर टीका केली होती.
गणपत वाणी कविता गणपत वाण्याच्या मृत्यूने संपते. मर्ढेकरांनी ही कविता गणपत वाण्याला दाखवली असती, तर त्याला ती कितपत कळली असती, शंका आहे. कदाचित तो म्हणाला असता,' काय साहेब, मी कुणी मोठा माणूस नाही, तरी पण तुम्ही माझ्यावर कविता लिहिली. बाळू, साहेबांना एक चहा घेऊन ये. बोला साहेब, काय पाहिजे आज? आंबेमोहोर तांदूळ चांगला आला आहे.' 'गि-हाइकाची कदर करणे', हेच त्याला माहीत.
आजच्या झगमगत्या मॉल्सच्या युगात गणपत वाणी बापडा कधीच भरून गेला आहे.
स्टीफन लीकॉक या इंग्रजी लेखकाची My Taylor नावाची आपलल्या शिंप्यावर लिहिलेली सुंदर कथा आहे. लेखक आपल्या शिंप्याकडे ठराविक कपडे शिवण्यासाठी जातो. शिंप्याकडे कपडे शिवायला गेल्यावर ठराविक संभाषण होते.
एक दिवस लेखक या शिंप्याकडे कपडे शिवायला गेला असताना त्याला कळते की हा शिंपी निवर्तला आहे. कुणीतरी त्याला सांगते की ध़ंद्यातील काळजीने तो खचत चालला होता. लेखकाला आश्चर्य वाटते की या शिंप्याला कसली काळजी होती? त्याला तर तो कधी काळजीमध्ये दिसला नाही. मग लेखकाला जाणवते की त्याने त्याच्या शिंप्याकडे केवळ शिंपी म्हणून पाहिले, कधी माणूस म्हणून पाहिलेच नाही.
'जे न देखे रवी, ते देखे कवी' , अशी कवींची ख्याती असूनसुद्धा बाळ सीताराम मर्ढेकर किंवा नारायण सुर्वेंना गणपत वाण्यामधील माणूस का बरे दिसला नाही?
वाचकांना माझे मत कितपत पटते माहीत नाही, पण त्यांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्या.
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
बाळ सीताराम मर्ढेकर
(जन्म १९०९, मृत्यू १९५६)
No comments:
Post a Comment