Thursday, March 12, 2026

श्रीसाईसच्चरित -अध्याय २१ आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २१         

अनुग्रहकरणं

(ओवीसंख्या १३०)

या अध्यायात काय आहे

एक प्रांताधिकारी सुलक्षण I दुसरे पाटणकर विचक्षण II तिसरे एक वकील विलक्षण I अनुग्रहण तिघांचे एकविंशती’ II ७० II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ - ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (-१७)

*      मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य- हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (१८-७२)

*      सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (७३-१०४)

*      'साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (१०५-१३०)

संतसंगमासाठी ईश्वरी कृपा आवश्यक   

 (अध्यायारंभ- ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (1-17)

वांद्रे गावी इनूस नावाचा मुजावर असताही श्री. दाभोळकर त्याच्या दर्शनाला गेले नाहीत, हा लेखकाचा स्वतःचा अनुभव

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम: ॥

गताध्यायांतीं कथानुसंधान । ठाकूरादिकां महापुरुषदर्शन । कैसें झालें तें करावें श्रवण । एकाग्र मन करोनि ॥१॥

काया तया वक्त्याच्या बोलें । श्रवणीं जें पडतां श्रोता न डोले । अंगींचा रोमांचही न हाले । व्यर्थ गेले ते बोल ॥२॥

जया श्रवणीं न श्रोते रिझले । बाष्पगद्नद कंठ न दाटले । नयनीं प्रेमानंदाश्रु न वाहिले । व्यर्थ गेलें तें कथन ॥३॥

वाणी बाबांची मनोहारिणी । उपदेशाची अलौकिक सरणी । जयांची प्रतिपदीं अभिनव करणी । मस्तक चरणीं तयांचे ॥४॥

येता दैव उदयासी I

गांठी न पडे  साधुसंतांशी II

तो जवळ असता उशापाशी I

पापराशीस दिसेना IIII 

या प्रमेयाच्या सिद्धतेसी । नलगे जावें देशीं विदेशीं । मीच माझिया अनुभवासी । श्रोतियांसी कथितों कीं ॥६॥

पीर मौलाना नामें प्रसिद्ध । होते वांद्रें शहरीं सिद्ध । हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध । घेती शुद्ध दर्शन तें ॥७॥

मी ते शहरचा न्यायाधीश । मुजावर (= मुस्लिम साधू, दर्ग्यामध्ये देखभाल करणारा) तयांचा नाम इनूस । पाठ पुरविली रात्रंदिवस । यावया दर्शनास तयानें ॥८॥

हजारों लोक तेथें यावे । किमर्थ आपण तेथें जावें । भीडेभाडेच्या भरीं भरावें । आंचवावें निज लौकिका ॥९॥

ऐसें कांहीं मनीं भावावें । दर्शनास कधींही न जावें । आपणचि आपल्या छायेस भ्यावें । दुर्दैव यावें आडवें ॥१०॥

ऐसीं कित्येक वर्षें गेलीं । तेथूनि पुढें बदली झाली । पुढें जेव्हां ती वेळ आली । शिरडी जोडिली अखंड ॥११॥

तात्पर्य हा संतसमागम । अभाग्यास ना तेथें रिगम । होतां ईश्वरी कृपा हा सुगम । अन्यथा दुर्गम हा योग ॥१२॥

येविषयींची गोड कथा । श्रोतां सादर परिसिजे आतां । या संतांच्या अनादि संस्था । गुह्य व्यवस्था कैशा त्या ॥१३॥

यथाकाल - वर्तमान । जया जें जें आवडे स्थान । अवतार घेती कार्याकारण । परी ते अभिन्न परस्पर ॥१४॥

देश - काल - वस्तु भिन्न । परी एकाची जी ऊणखूण । दुजा संत जाणे संपूर्ण । अंतरीं एकपण सकळिकां ॥१५॥

जैसीं सार्वभौम राजाचीं ठाणीं । वसविलीं असती ठिकठिकाणीं । तेथ तेथ अधिकारी नेमुनी । अबादानी संपादिती ॥१६॥

तैसाच हा स्वानंदसम्राट । जागोजागीं होऊनि प्रकट । चालवी हा निजराज्यशकट । सूत्रे अप्रकट हालवी ॥१७॥

कानडी सत्पुरुषांचे मार्गदर्शन

(मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य - हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (18-72)

वाचिलें ते नाही संपले I पाहिजे ते कृतीत उतरले II

या उपड्या घड्यावर तोय ओतले I तैसे जाहले ते सकळ II ७२ II

एकदा एक बीए झालेले गृहस्थ मामलेदारी मिळाल्यानंतर बेळगावातील वडगाव येथे एका कानडी सत्पुरुषांस भेटतात. त्यांच्याकडे निश्चळदासकृतविचारसागरनावाचा ग्रंथ असतो. ते सत्पुरुष सांगतात की या ग्रंथामुळे तुमचे मनोरथ पूर्ण होईल. पुढे तुम्हाला एक महापुरुष भेटतील. हे गृहस्थ पुढे शिर्डीस जातात आणि बाबा त्यांना म्हणतात, ‘ कानडी अप्पाने सांगितले तेवढे येथे सोपे नाही. येथे अनिवार्य अंग झिजवावे लागते.त्या गृहस्थांस खूण पटते की ते महापुरुष म्हणजे बाबाच.

एकदां एक आंग्लविद्याविभूषित । बी. ए. या उपपदानें युक्त । जे हळू हळू मागे क्रमत । झाले नामांकित अधिकारी ॥१८॥

मिळाली पुढें मामलत । वाढतां वाढतां झाले प्रांत । तयांसी साईबाबांचा सांगात । सुदैवें प्राप्त जाहला ॥१९॥

 मामलेदाराच्या नोकरीची वाईट परिस्थिती:

दिसाया ही मामलत बरी । डोंगरी जैसी दुरुनि साजरी । निकट जातां वेढिली काजरीं । मानें परी ती मोठीच ॥२०॥

गेले ते पूर्वील गोड दिवस । जैं होती या अधिकाराची हौस । प्रजाही मानी अधिकारियास । परस्परांस आनंद ॥२१॥

पुसूं नये आतांचे हाल । सुखाची नोकरी गेला तो काळ । आतां जबाबदारीचा सुकाळ । ओला दुकाळ पैशाचा ॥२२॥

पूर्वील मामलतीचा मान । तैसेंच पूर्वील प्रांतासमान । वैभव आतां ये ना दिसून । नोकरी कसून करतांही ॥२३॥

असो तेंही अधिकारसंपादन । अलोट पैका वेंचल्यावांचून । न करितां सतत अभ्यासशीण । इतर कोण करूं शके ॥२४॥

आधीं होऊं लागे बी. ए. । मग तो नगदी कारकून होये । महिना पगार तीस रुपये । मार्गें ऐसिये ती गति ॥२५॥

यथाकाळ घांटावर जावें । जमीनपाणी काम शिकावें । मोजणीदारांमध्यें रहावें । पास व्हावें परीक्षे ॥२६॥

पुढें जेव्हां एकादी असामी । स्वयें जाईल वैकुंठधामीं । करील आपुली जागा रिकामी । पडेल कामीं ती याच्या ॥२७॥

आतां असो हें चर्‍हाट । कशास पाहिजे नुसती वटवट । ऐशा एकास साईंची भेट । झाली ती गोष्ट परिसावी ॥२८॥

***

बेळगांवानिकट देख । ग्राम आहे वडगांव नामक । आलें मोजणीदारांचें पथक  । मुक्काम एक तैं केला ॥२९॥

गांवीं होते एक सत्पुरुष । गेले तयांचे दर्शनास । चरणांवरी ठेविलें शीस । प्रसाद - आशीष पावले ॥३०॥

त्या सत्पुरुषांचे हातांत । होता निश्चळदासकृत । विचारसागरनामक ग्रंथ । जो ते वाचीत तैं होते ॥३१॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

निश्चल दास:

निश्चल दास हे एक प्रसिद्ध भारतीय तत्त्ववेत्ता, संत आणि योगी होते. ते निर्गुण ब्रह्म संकल्पनेचे समर्थक होते आणि त्यांनी वेदांत व योगदर्शनाचा गहन अभ्यास केला होता. त्यांचा जन्म १७व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा १८व्या शतकाच्या प्रारंभी झाला असावा, आणि ते निर्गुण भक्ती परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. ते प्रामुख्याने हिंदी भाषेत लिहीत असत, आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान सामान्य जनांसाठी समजण्याजोग्या भाषेत मांडले.

विचार सागर ग्रंथ:

"विचार सागर" हा निश्चल दास यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो हिंदीतील एक महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानपर ग्रंथ मानला जातो. यामध्ये त्यांनी अद्वैत वेदांत आणि योगदर्शन यांचे तत्त्वज्ञान अत्यंत सुलभ आणि समन्वयी शैलीत मांडले आहे.

ग्रंथाचा विषय:

1. अद्वैत वेदांत आत्मा, ब्रह्म, मायेला दिलेले स्थान, मोक्षाचे स्वरूप.

2. विवेक-विचार आत्मा व शरीरातील फरक, वास्तव व अवास्तवाची ओळख.

3. योगसाधना मनाच्या स्थैर्यासाठी साधनेचे मार्ग.

4. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय निर्गुण उपासना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यांचा समतोल दृष्टिकोन.

5. साधकासाठी मार्गदर्शन वैराग्य, शम, दम, तितिक्षा इत्यादी साधन चातुष्टयाचा अभ्यास.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढें कांहीं वेळ जातां । येतों म्हणूनि निघूं लागतां । ते साधू जें वदले उल्हासता । तया गृहस्था तें परिसा ॥३२॥

बरे आता आपण यावे I

या ग्रंथाचे अवलोकन करावे II

तेणे तुमचे मनोरथ पुरावे I

असावे हे लक्षात  II . २१, . ३३ II

तुम्ही पुढें निजकार्योद्देशें । जातां जातां उत्तर दिशे । मार्गांत महाभाग्यवशें । महापुरुषासीं दर्शन ॥३४॥

पुढील मार्ग ते दावितील । मनासी निश्चलता ते देतील । तेच मग उपदेशितील । ठसवितील निजबोध ॥३५॥

तेथील मग तें कार्य सरलें । जुन्नरास तेथूनि बदलले । नाणेंघाट चढणें आलें । ओढवलें तें संकट ॥३६॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

नाणेंघाट:

नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. 

 

नाणेघाटाची पायथ्यापासूनची उंची दोन हजार फूट आहे. चढही बेताबेताने आहे. धाप लागत नाही. अधेमधे पायऱ्याही आहेत. नाणेघाट ही इतर घाटांप्रमाणे डोंगराच्या कडेनी किंवा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने जाणारी नैसर्गिक वाट नाही. तो डोंगर फोडून तयार केलेला रस्ता आहे. घाटाच्या चढणीची सुरुवात वैशाखरे गावापासून होते. या गावाच्या नावाची व्युत्पत्ती वैश्यगृह म्हणजे व्यापाऱ्यांचा थांबा अशी सांगितली जाते. या वाटेशी संबंधित एक दंतकथा आहे. सातवाहन राजाने, कोणता ते नाव माहीत नाही; हा रस्ता बांधण्याचे आवाहन केले ते नाणा किंवा नाना आणि गुणा ह्या दोन भावांनी स्वीकारले. दोघांनी दोन वाटांनी रस्ता बांधायला घेतला. नाणाचा आधी बांधून झाला म्हणून रस्त्याचे नाव नाणेघाट. घाट चढून गेल्यावर दिसणाऱ्या जकातीच्या रांजणामुळे नाणेघाट हे नाव पडले अशीही समजूत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

मार्ग तेथील अति बिकट । रेडयावरूनि चढती घाट । रेडा हाच तदर्थ शकट । आणिला निकट आरूढाया ॥३७॥

होतील पुढें मोठे अधिकारी । मिळतील घोडे गाडया मोटारी । आज तों घ्या रेड्याची हाजिरी । वेळ साजिरी करा कीं ॥३८॥

घाट चढणें अशक्य पायीं । रेडियावीण नाहीं सोई । ऐसी ती नाणेंघाटाची नवलाई । अपूर्वाई वाहनाची ॥३९॥

मग तयांनीं केला विचार । पालणिला रेडा केला तयार । तयावरी चढविलें खोगीर । कष्टें स्वार जाहले ॥४०॥

स्वार खरे पण होती चढण । रेडियासारिखें अपूर्व वाहन । झोंके हिसके खातां जाण । भरली कणकण पाठींत ॥४१॥

असो पुढें हा प्रवास सरला । जुन्नराचा कार्यक्रम पुरला । मग बदलीचा हुकूम झाला । मुक्काम हालला तेथूनि ॥४२॥


कल्याणास झाली बदली । चांदोरकरांची गांठ पडली । साईनाथांची कीर्ति ऐकिली । बुद्धि उदेली दर्शनाची ॥४३॥

दुसरे दिवशीं आली बारी । झाली चांदोरकरांची तयारी । म्हणती चला हो बरोबरी । करूं वारी शिरडीची ॥४४॥

घेऊं बाबांचें दर्शन । करूं उभयतां तयांसी नमन । राहूं तेथें एक दो दिन । येऊं परतोन कल्याणा ॥४५॥

परी तेच दिनीं ठाणें शहरांत । दिवाणीचे अदालतींत । मुकदमा - सुनावणी निर्णीत । त्यागिली सोबत तदर्थ ॥४६॥

नानासाहेब आग्रह करीत । चला हो आहेत बाबा समर्थ । पुरवितील तुमचा दर्शनार्थ  । किंपदार्थ  मुकदमा ॥४७॥

परी हें कैंचें तयांस पटे । तारीख चुकवितां भय वाटे । चुकतील केवीं हेलपट्टे । भालपट्टीं लिहिलेले ॥४८॥

नानासाहेब चांदोरकरें । कथिलीं पूर्वील प्रत्यंतरें । दर्शनकाम धरितां अंतरें । विघ्न तें सरे बाजूला ॥४९॥

परी येईना विश्वास जीवा । करितील काय निजस्वभावा । म्हणती आधीं घोर चुकवावा । निकाल लावावा दाव्याचा ॥५०॥

असो मग ते ठाण्यास गेले । चांदोरकर शिरडीस निघाले । दर्शन घेऊनि परत फिरले । नवल वर्तलें इकडे पैं ॥५१॥

वेळीं जरी हे हजर राहिले । दाव्याचें काम पुढें नेमिलें । चांदोरकरही हातचे गेले । खजील अंतरीं ॥५२॥

विश्वास ठेवितों बरें होतें । चांदोरकर सवें नेते । दर्शनाचें कार्य उरकतें । स्वस्थचित्तें शिरडींत ॥५३॥

दाव्यापरी दावा राहिला । साधुसमागमही अंतरला । उठाउठी निश्चय केला । जावयाला शिरडीस ॥५४॥

न जाणों मी शिरडीस जातां । समयीं नानांची भेट होतां । स्वयें निरवितील साईनाथा । आनंद चित्ता होईल ॥५५॥

शिरडीस नाहीं कोणी परिचित । तेथ मी सर्वथैव अपरिचित । नाना भेटतां होईल उचित । जरी क्वचित योग तो ॥५६॥

ऐसे विचार करीत करीत । बैसले ते अग्निरथांत । दुसरे दिवशीं पावले शिरडींत । नाना तैं अर्थात्‌ नाहींत ॥५७॥

हे जे दिनीं यावया निघाले । नाना ते दिनीं जावया गेले । तेणें हे बहु हताश झाले । अति हिरमुसले मनांत ॥५८॥

असो मग तयांस तेथें भेटले । तयांचे दुसरे स्नेही भले । तयांनीं साईंचें दर्शन करविलें । हेतु पुरविले मनाचे ॥५९॥

दर्शनें पायीं जडलें चित्त । घातला साष्टांग दंडवत । शरीर झालें पुलकांकित । नयनीं स्रवत प्रेमाश्रु ॥६०॥

मग ते होतां क्षणैक स्थित । काय तयांसी बाबा वदत । त्रिकालज्ञ मुख करोनि सस्मित । सावचित्त तें परिसा ॥६१॥

कानडी आप्पाचें तें सांगणें । जैसें रेडिया संगें घाट चढणें । ऐसें न येथील सोपें चालणें । अंग झिजविणें अनिवार्य॥६२॥

कर्णीं पडतां खुणेचीं अक्षरें । अंतरंग अधिकचि गहिंवरे । पूर्वील सत्पुरुषवचन खरें । प्रत्यंतरें ठरलें कीं ॥६३॥

मग जोडूनियां उभय हस्तां । साईपदीं ठेविला माथा । म्हणती कृपा करा साईनाथा । मज अनाथा पदरीं घ्या ॥६४॥

आपणचि माझे महापुरुष । निश्चळदासग्रंथोपदेश । आज मज कळला अशेष । निर्विशेष सुखबोध ॥६५॥

कुठें वडगांव कुठें शिरडी । काय ही सत्पुरुष - महापुरुषजोडी । किती ती स्वल्पाक्षरभाषा उघडी । उपदेश - निरवडी कैसी हे ॥६६॥

एक म्हणती ग्रंथ वाचा । पुढें संगम महापुरुषाचा । मग ते पुढील कर्तव्याचा । उपदेश साचा करतील ॥६७॥

देवयोगें तेही भेटले । तेच ते हे खुणांहीं पटविलें । परी तें एकाचें वाचिलें । दुजिया आचरिलें पाहिजे ॥६८॥

तयांसी म्हणती साईनाथ । अप्पांनीं सांगितलें तें यथार्थ । परी जेव्हां तें येईल कृतींत । पूर्ण मनोरथ तैं होती॥६९॥

निश्चलदास - विचारसागर । वडगांवीं भक्तार्थ झाला उच्चार । काळें ग्रंथपारायणानंतर । शिरडींत आचार कथियेला ॥७०॥

ग्रंथ करावा आधीं श्रवण । त्याचेंच मग करावें मनन । होतां पारायणावर्तन । निदिध्यासन होतसे ॥७१॥



वाचिलें तें नाहीं संपलें ।

पाहिजे तें कृतींत उतरलें ।

या उपड्या घडयावर तोय ओतलें ।

तैसें जाहलें तें सकळ ॥७२॥


सौदागर आणि  घोडा

(‘सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (73-104)

नको वेदशास्त्र व्युत्पत्ती नको ज्ञानी हे दिगंतकीर्ती II

नको शुष्क भजनप्रीती I प्रेमळ भक्ती पाहिजे II९८II

एकदा अनंतराव पाटणकर नावाचे गृहस्थ बाबांचे भेटीस येतात. यांनी वेदांचे वाचन केलेले असते परंतु यांच्या मनाला स्थैर्य नसते. ते बाबांना याबद्दल विचारतात. बाबा त्यांना एक गोष्ट सांगतात.एका सौदागरासमोर एक घोडा नऊ लेंड्या टाकतो. सौदागर त्या घट्ट बांधून जवळ ठेवतो.पाटणकर केळकरांना या गोष्टीचा अर्थ विचारतात. केळकर या गोष्टीचा अर्थ सांगतात की घोडा ही ईंश्वरी कृपा. नऊ लेंड्या म्हणजे नवविधा भक्ती (१. श्रवण २. कीर्तन ३. विष्णुस्मरण ४. चरणसेवन ५. अर्चन ६. वंदन ७. दास्य ८. सख्य ९. आत्मनिवेदन). यांतील एक जरी भक्ती सफल झाली तरी मनाला स्थैर्य येईल. दुस-या दिवशी जाताना बाबा त्यांना विचारतात, ‘पदरी लेंड्या बांधल्यास काय?’ पाटणकर उत्तर देतात, ‘तुमची कृपा असू द्या, म्हणजे त्या सहज बांधल्या जातील.

व्यर्थ व्यर्थ ग्रंथवाचन । हातीं न ये जों अनुभवज्ञान । ब्रह्मसंपन्न गुरुकृपेवीण । पुस्तकी ज्ञान निष्फळ ॥७३॥

ये अर्थींची अल्प कथा । दावील भक्तीची यथार्थता । पुरुषार्थाची अत्यावश्यकता । श्रोतां निजस्वार्था परिसिजे ॥७४॥

एकदां एक पुण्यपट्टणकर । नामें अनंतराव पाटणकर । साईदर्शनीं उपजला आदर । आले सत्वर शिर्डीस ॥७५॥

वेदान्त श्रवण जाहला सकळ । सटीक उपनिषदें वाचिलीं समूळ । परी तन्मानस अक्षयीं चंचळ । राहीना तळमळ तयांची ॥७६॥

घेतां साईसमर्थांचें दर्शन । निवाले पाटणकरांचे नयन । करुनि पायांचें अभिवंदन । यथोक्त पूजन संपादिलें ॥७७॥

मग होऊनि बद्धांजुळी । बैसूनि सन्मुख बाबांचे जवळी । अनंतराव प्रेमसमेळीं । करुणाबहाळीं पुसत कीं ॥७८॥

केलें विविध ग्रंथावलोकन । वेदवेदांग - उपनिषदध्ययन ॥ केलें सच्छास्त्र - पुराणश्रवण । परी हें निर्विण्ण मन कैसें ॥७९॥

वाचिलें तें व्यर्थ गेलें । ऐसेंच आतां वाटूं लागलें । अक्षरहीन भावार्थी भले । वाटती चांगले मजहून ॥८०॥

वायां गेलें ग्रंथावलोकन । वायां शास्त्रपरिसीलन । व्यर्थ हें सकळ पुस्तकी ज्ञान । अस्वस्थ मन हें जोंवरी ॥८१॥

काय ती फोल शास्त्रव्युत्पत्ती । किमर्थ महा - वाक्यानुवृत्ती । जेणें न लाधे चित्तास शांति । ब्रह्मसंवित्ति कशाची ॥८२॥

कर्णोपकर्णीं परिसिली वार्ता । साईदर्शनें निवारे चिंता । विनोद गोष्टी वार्ता करितां । सहज सत्पथा लाविती ते ॥८३॥

म्हणवून महाराज तपोराशी । पातलों आपुल्या पायांपासीं । येईल स्थैर्य माझिया मनासी । आशीर्वचनासी द्या ऐशा ॥८४॥

तंव महाराज झाले कथिते । एका विनोदपर आख्यायिकेतें । जेणें अनंतराव समाधानातें । पावले साफल्यते ज्ञानाच्या ॥८५॥

ती अल्पाक्षर परमसार । कथा कथितों व्हा श्रवणतत्पर । विनोद परी तो बोधपर । कोण अनादर करील ॥८६॥

बाबा देत प्रत्युत्तर | 'एकदा एक आला सौदागर || तेव्हा एक घोडें समोर | घाली लेंडार नवांचे || .२३, .८७|| सौदागर निजकार्यतत्पर | लेंडिया पडतां पसरिला पदर || बांधून घेता घट्ट त्या समग्र | चित्तैकाग्र्य लाधला'|| .२३, .८८ ||

हें काय वदले साईसमर्थ । काय असावा कीं मथितार्थ । लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ । कांहींही अर्थ कळेना ॥८९॥

ऐसा विचार करीत करीत । अनंतराव माघारा येत । कथिलें संभाषण इत्थंभूत । केळकरांप्रत तयानें ॥९०॥

म्हणती सौदागर तो कोण । लेंडियांचें काय प्रयोजन । नवांचेंच काय कारण । सांगा उलगडून हें मजला ॥९१॥

दादा हें काय आहे कोडें । मी अल्पबुद्धी मज तें नुलगडे । होईल बाबांचे हृदय उघडें । ऐसें रोकडें मज कथा ॥९२॥

दादा वदती मजही न कळे । ऐसेंच बाबांचें भाषण सगळें । परी तयांच्याच स्फूर्तीच्या बळें । कथितों आकळे जें मज ॥९३॥

कृपा ईश्वरी तें हें घोडें । हें तों नवविधा भक्तीचें कोडें । विनाभक्ति न परमेश्वर जोडे । ज्ञाना न आतुडे एकल्या ॥९४॥

श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण । चरणसेवन-अर्चन - वंदन । दास्य - सख्य - आत्मनिवेदन । भक्ति हे जाण नवविधा ॥९५॥

पूर्ण भाव ठेवूनि अंतरीं । यांतून एकही घडली जरी । भावाचा भुकेला श्रीहरी । प्रकटेल घरींच भक्ताच्या ॥९६॥

जपतपव्रत योगसाधन । वेदोपनिषद - परिशीलन । उदंड अध्यात्मज्ञान - निरूपण । भक्तिविहीन तें फोल ॥९७॥

नको वेदशास्त्रव्युत्पत्ती । नको ज्ञानी हे दिगंतकीर्ति । नको शुष्कभजनप्रीती । प्रेमळ भक्ति पाहिजे ॥९८॥

स्वयें आपणा सौदागर समजा । सौद्याच्या या भावार्था उमजा । फडकतां श्रवणादि भक्तीची ध्वजा । ज्ञानराजा उल्हासे ॥९९॥

घोडयानें घातल्या लेंडया नऊ । सौदागर आतुरते धांवत घेऊं । तैसाच नवविधा भक्तिभावु । धरितां विसांवु मनातें ॥१००॥

तेणेंच मनास येईल स्थैर्य । सर्वांठायीं सद्भाव गांभीर्य । त्यावीण चांचल्य हें अनिवार्य । कथिती गुरुवर्य सप्रेम ॥१०१॥

दुसरे दिवशीं अनंतराय । वंदूं जातां साईंचे पाय । पदरीं बांधिल्यास लेंडया कायपृच्छा ही होय तयांस ॥१०२॥

अनंतराव तेव्हां प्रार्थिती । कृपा असावी दीनावरती । सहज मग त्या बांधिल्या जाती । काय ती महती तयांची ॥१०३॥

तंव बाबा आशीर्वाद देती । कल्याण होईलआश्वासिती । अनंतराव आनंदले चित्तीं । सुखसंवित्ति लाधले ॥१०४॥

बाबांच्या निंदापर चर्चेमध्ये वकिलाचा सहभाग

('साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (105-130) 

आतां आणीक अल्प कथा । श्रोतां परिसिजे सादरचित्ता । कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता । सन्मार्गप्रवर्तकता तैसीच ॥१०५॥

एकदां एक वकील आले । येतांक्षणींच मशिदी गेले । साईनाथांचें दर्शन घेतलें । पाय वंदिले तयांचे ॥१०६॥

सवेंच मग देऊन दक्षिणा । बैसले बाजूस वकील तत्क्षणा । तेथें चालल्या साई - संभाषणा । आदर श्रवणा उपजला ॥१०७॥

बाबा तंव तिकडे मुख फिरविती । वकीलांस अनुलक्षून वदती । बोल ते वर्मीं जाऊन खोंचती । वकील पावती अनुताप ॥१०८॥

लोक तरी हो लबाड किती । पायां पडती दक्षिणाही अर्पिती । आणीक आंतून शिव्याही देती । काय चमत्कृती सांगावी॥१०९॥

ऐकून हें वकील स्वस्थ राहिले । कीं ते निजांतरीं पूर्ण उमजले । उद्नार अन्वर्थ हें तयां पटलें । तात्पर्य ठसलें मनासी ॥११०॥

पुढें जेव्हां ते वाडयांत गेले । दीक्षितांलागीं कथिते झाले । कीं जें बाबा लावूनि बोलले । सार्थचि वहिलें तें सर्व ॥१११॥

येतांच मजवर झाडिला ताशेरा । तो मज केवळ दिधला इशारा । कुणाची थट्टानिंदादि प्रकारा । देईं न थारा अंतरीं ॥११२॥

शरीरप्रकृति होऊनि अस्वस्थ । मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त । राहिले रजेवर येथें स्वस्थ । आपुली प्रकृती सुधरावया ॥११३॥

वकीलांच्या खोलींत असतां । मुन्सफांसंबंधें निघाल्या वार्ता । अर्थोअर्थीं संबंध नसतां । ऊहापोहता चालली ॥११४॥

औषधावीण या शरीरापदा । टळतील का लागतां साईंच्या नादा । पावले जे मुन्सफीचे पदा । तयां हा धंदा साजे कां ॥११५॥

ऐसी तयांची निंदा चालतां । चालली साईंची उपहासता । मीही तयांतचि होतों अंशता । तिची अनुचितता दर्शविली ॥११६॥

ताशेरा नव्हे हा अनुग्रह । व्यर्थ कुणाचा ऊहापोह । उपहास - निंदादि कुत्सित संग्रह । असत्परिग्रह वर्जावा ॥११७॥

आणीक एक हें प्रत्यंतर । असतां शंभर कोसाचें अंतर । साई जाणें सर्वाभ्यंतर । खरे अंतर्ज्ञानी ते ॥११८॥

आणिक एक झाला निवाड । असोत मध्यें पर्वत पहाड । कांहीं न साईंच्या दृष्टीआड । गुप्तही उघड त्यां सर्व ॥११९॥

असो पुढें तेव्हांपासुनी । केला निश्चय वकीलांनीं । अत:पर निंदा - दुरुक्तिवचनीं । खडा कानीं लाविला ॥१२०॥

आपण कांहींही कुठेंही करितां । येई न साईंची दृष्टी चुकवितां । येविषयीं जाहली निश्चितता । असत्कार्यार्थता विराली ॥१२१॥

उदेली सत्कार्य - जागरूकता । मागें पुढें साईसन्निधता । समर्थ कोण तया वंचिता । निर्धार चित्ता हा ठसला ॥१२२॥

पाहूं जातां या कथेसी । संबंध जरी त्या वकीलासी । तरी ती सर्वार्थी आणि सर्वांसीं । बोधक सर्वांसी सारिखी ॥१२३॥

वकील वक्ते श्रोते समग्र । आणिक साईंचे भक्त इतर । तयांचाही ऐसाच निर्धार । व्हावा मी साचार प्रार्थितों ॥१२४॥

साईकृपामेघ वर्षता I

होईल आपणा सर्वांची तृप्तता II

ये अर्थी काही नाही नवलता I

सकळा तृषार्ता निववील II १२५ II

अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा । अगाध साईचरित्राची सीमा । मूर्त परब्रम्हावतार ॥१२६॥

समारोप

 आतां पुढील अध्यायीं कथा । परिसावी सादर श्रद्धाळू श्रोतां । पुरवील तुमच्या मनोरथा । देईल चित्ता स्थैर्यता ॥१२७॥

भक्तांची भावी संकटावस्था । ठाऊक आधींच साईसमर्था । थट्टामस्करी विनोद वार्ता । हंसतां खेळतां टाळिती ॥१२८॥

भक्तहेमाड साईंस शरण । जाहलें हें कथानक संपूर्ण । पुढील कथेचें अनुसंधान । संकटनिवारण भक्तांचें ॥१२९॥

कैसे साई कृपासागर । भक्तांचीं भावी संकटें दुर्धर । आधीं जाणूनि करिती परिहार । इशारा वेळेवर देउनी ॥१३०॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अनुग्रहकरणंनाम एकविंशोऽध्याय: संपूर्ण" ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


श्रीसाईसच्चरित - अध्याय २० -आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २०         

ईशावास्यभावार्थबोधनं

(ओवीसंख्या १३५)

या अध्यायात काय आहे

अध्यायारंभ

ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात 

श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप

अध्यायारंभ (1-11

ईशावास्य उपनिषदातील शंकेचा मोलकरणीकडून उलगडा

ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात  (12-93)








 





































Dressing in rags when faced with deficiency 

But doing the same in spite of sufficiency

Is called ‘display of dearth with satisfaction’

For happiness or unhappiness is nothing but emotion  II Ch.20, St. 92 II

These were the lines with which Ganudas was confused

And thus the puzzle was solved  

The whole bunch of Eeshaavasya was discovered  

When  its correct meaning was uncovered 93

श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप (94-135)

'










मी अशरीर सर्वत्र एक । मजहूनि कोणी नाहीं आणिक । मीच कीं सकलांचा व्यापक । स्वरूपोन्मुख हें ज्ञान ॥१११॥

पूर्णब्रब्रह्मस्वरूपच्युत । ऐसा हा जीवात्मा पूर्ववत । कधींतरी स्वस्वरूपाप्रत । पावावा निश्चित हें ध्येय ॥११२॥

श्रुति - स्मृति आणि वेदान्त । या सर्वांचा हाचि सिद्धान्त । हेंचि अंतिम साध्य निश्चित । च्युतासी अच्युतपदप्राप्ति ॥११३॥

सम: सर्वेषु भूतेषु। जोंवरी अप्राप्त हा स्थितिविशेषु । तोंवरी न भूतात्मा  हृषीकेशु । ज्ञान प्रकाशूं समर्थ ॥११४॥

विहितकर्में चित्त शुद्ध । होतां होईल अभेदबोध । शोकमोहादि संसृतीविरुद्ध । प्रकटेल सिद्ध ज्ञान तें ॥११५॥

अखिल त्रैलोक्य सचराचर । आच्छादी जो ईश परमेश्वर । निष्क्रिय निष्कल जो परात्पर । तो अशरीर सदात्मक ॥११६॥

नामरूपात्मक हें विश्व । सबाह्य आच्छादी हा ईश । तो मीच मी भरलों अशेष । निर्विशेषरूपत्वें ॥११७॥

अस्तु वस्तुत: जें निराकार । मायागुणें भासे साकार । कामुकापाठीं हा संसार । तोचि असार निष्कामा ॥११८॥

हें यत्किंचित्‌ भूतभौतिक । जगत्‌ चेतनाचेतनात्मक । ईश्वरचि हा अद्वितीय एक । निर्धार नि:शंक करावा ॥११९॥

जगद्वुद्धीचा हा विवेक । जरी मनासी पटेना देख । तरी हें धनहिरण्यादिक । यांचा अभिलाख न करावा ॥१२०॥

हेंही जरी न घडे तरी । जाणावें आपण कर्माधिकारी । आमरणान्त शतसंवत्सरीं । कर्मचि करीत रहावें ॥१२१॥

तेंही स्ववर्णाश्रमोचित । यथोक्तानुष्ठानसहित । अग्निहोत्रादि नित्यविहित । चित्त अकलंकित होईतों ॥१२२॥

हा एक चित्तशुद्धीचा मार्ग । दुजा सर्वसंगपरित्याग । हें न आक्रमितां ज्ञानयोग । कर्मभोगचि केवळ ॥१२३॥

ही ब्रह्मविद्या हें उपनिषद । सर्वां न देती अधिकारविद । वृत्ति न जोंवरी झाली अभेद । उपनिषद्बोध शाब्दिक ॥१२४॥

तरी तोही व्हावा लागे । जिज्ञासु आधीं तोच मागे । म्हणोनि बाबांहीं पाठविलें मागें । मोलकरीण सांगेल म्हणोनि ॥१२५॥

स्वयेंच बाबा हा बोध देते । तरी हें पुढील कार्य न घडतें । एकमेवाद्वितीयनसतें । ज्ञान हें कळतें बाबांचें ॥१२६॥

मजवांचूनि आणीक कोण । आहे ती काकांची मोलकरीण । मीच ती ही दिधली खूण । ईशावास्य जाणविलें ॥१२७॥

परमेश्वरानुग्रहलेश । आचार्यानुग्रह विशेष । नसतां आत्मज्ञानीं प्रवेश । सिद्धोपदेशचि आवश्यक ॥१२८॥

आत्मप्रतिपादक जें जें शास्त्र । श्रवणीं आणावें तें तेंच मात्र । प्रतिपाद्य जें तें मीच सर्वत्र । मजवीण अन्यत्र कांहींच न ॥१२९॥

होतां आत्मतत्त्वाचें विवरण । तोच मी आत्मा नव्हे आन । हें जयासी अभेदानुसंधान । आत्माही प्रसन्न तयासीच ॥१३०॥

असो आत्मनिरूपण होतां । ऐसेंच आत्मानुसंधान राखितां । ऐसीच निश्चल धरितां आत्मता । परमात्मा हाता येईल ॥१३१॥

समारोप

पुढील अध्यायकथानुसंधान । विनायक ठाकूरादि कथा कथन । श्रोते करोत सादर श्रवण । परमार्थप्रवण होतील ॥१३२॥

त्याही कथा ऐशाच गोड । ऐकतां पुरेल श्रोतियांचें कोड । महापुरुषदर्शनाची होड । पुरेल चाड भक्तांची ॥१३३॥

जैसा उगवतां दिनमणि । अंधार जाय निरसोनी । तेवीं या कथापीय़ूषपानीं । माया हरपोनी जातसे ॥१३४॥

अतर्क्य साईंचें विंदान । त्यावीण कोण करील कथन । मी तों एक निमित्त करून । तेचि तें वदवून घेतील ॥१३५॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ईशावास्यभावार्थबोधनं नाम विंशोऽध्याय: संपूर्ण: ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

परिशिष्ट

ईशावास्य उपनिषद्

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

शांतीचा अर्थ - [पूर्णं अदः] - तें परब्रह्म पूर्ण आहे. [पूर्णं इदं] - हे सोपाधिक ब्रह्महि स्वरूपानें पूर्ण आहे. [पूर्णं पूर्णात् उदच्यते] - ते हे कार्यात्मक ब्रह्म पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवते. पण ते त्याच्यापासून जरी निराळें होत असलें तरी आपले पूर्णत्व सोडीत नाहीं. तर ते पूर्णच उद्‌भवते. [पूर्णस्य पूर्णं आदाय] - कार्यरूप ब्रह्माचे पूर्णत्व घेऊन [पूर्ण एव अवशिष्यते] - पूर्णच-केवल ब्रह्म-अवशिष्ट राहतें. म्हणजे सृष्टीच्या पूर्वीं जें अखंड एकरस सर्वव्यापी ब्रह्म होतें तेंच हे सृष्टीनंतरचें नामरूपोपाधियुक्त कार्यब्रह्म आहे. पण तेहि पूर्ण आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हें कार्यरूप ब्रह्म पृथक् आहे, असें भासू लागते. प्रलयसमयीं त्या द्वैतरूप कार्यब्रह्मांतील पूर्णत्व तेवढें घेऊन म्हणजे पूर्णत्व हा आपला धर्म त्यांतून काढून घेऊन तें पहिलें कारणरूप ब्रह्मच अवशिष्ट राहते. त्रिविध तापांची शांति होवो.

ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ १ ॥

जगत्याम् यत् किं च जगत् इदम् सर्वम् ईश आवास्यम् - अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही जड व चेतनस्वरुप जगत आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे - तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः - त्या ईश्वराचे सतत स्मरण ठेऊन (कारण सर्व त्याचे आहे) ह्या जगताचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. त्यांत आसक्त होऊं नये. कारण, - धनम् कस्य स्वित् - हे धन, हे भोग पदार्थ कुणाचे आहेत ? अर्थात कुणाच्याच मालकीचे नव्हेत. जगांतील कुठलाही पदार्थ अगदी अंशमात्राने सुद्धां परमेश्वर-रहित नाही. मनुष्य (चुकीने) ह्या सर्व पदार्थांशी ममता व आसक्ती करतो. ते सर्व परमेश्वराचे आहेत आणि त्यांचा उपयोग फक्त परमेश्वरासाठींच केला गेला पाहिजे. ॥ १ ॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः ।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥ २ ॥

कर्माणि कुर्वन् एव इह शतम् समाः जिजीविषेत् - ह्या जगात् (इह) ईश्वरपूजनार्थ भाव ठेऊनच शास्त्रनियत कर्मांचे आचरण करीत शंभर वर्षे आयुष्य कंठीत करण्याची इच्छा केली पाहिजे - एवम् कर्म त्वयि नरे न लिप्यते - हे मनुष्या, अशा प्रकारे त्यागपूर्वक ईश्वरासाठी केलेल्या कर्माने तूं लिप्त होणार नाहीस - इतः अन्यथा न आस्ति - मुक्तिसाठी ह्याप्रमाणे कर्म करीत राहाणे हा एकमेव मार्ग आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्याचा आणखी कुठलाच मार्ग नाही. ॥ २ ॥

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः ।
ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥

असुर्याः नाम लोकाः ते अन्धेन तमसा आवृता - असुरांचे जे नरकरूपी प्रसिद्ध लोक आहेत ते सर्व अज्ञान व दुखःरुप महान अंधकाराने आच्छादित आहेत - ये के च आत्महनः जनाः - जे कोणी आत्म-विरोधी आचरण करणारी माणसे असतात - ते प्रेत्य तान् अभिगच्छति - ते मेल्यावर त्या भयंकर अशा नरकांत जातात. -- मानव शरीर इतर शरीरांपेक्षा श्रेष्ठ व दुर्लभ आहे. ईश्वर कृपेने असे शरीर केवळ मुक्ति मिळवण्याच्या उद्देशाने दिले गेलेले असते. दुसर्‍या मंत्रात केलेल्या उपदेशानुसार आचरण करणे म्हणजे आत्महीत साधणे होय. ह्या उलट ईश्वर समर्पण भाव न ठेवता, विषयांचा केवळ यथेच्छ भोग घेत राहाणे म्हणजे आत्मघात करण्यासारखेच आहे. कारण अशाने केवळ जन्म व्यर्थ गेला एव्हढेच नव्हे तर आपल्याला अधिकाधिक कर्मबंधनात जखडून घेतल्यासारखे होईल. अधिकाधिक पतन झाल्यास क्षुद्र योनिंमध्ये जन्म मिळून नरकातच भटकत राहावे लागेल. ॥ ३ ॥

अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् ।
तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥ ४ ॥

अनेजत् एकं मनसः जवीयः - परमेश्वर अचल, एकरूप, मनापेक्षाही अधिक तीव्र गतिमान आहे - पूर्वम् अर्षत् - सर्वांचा आदि आणि ज्ञानस्वरूप (सर्वांचे ज्ञान ज्याला आहे असा) - एनत् देवाः न आप्नुवन् - ह्या परमेश्वराला इन्द्रादि देव देखील जाणूं शकत नाहीत. - तत् अन्यान् धावतः तिष्ठत् अत्येति - अन्य कोणी कितीही वेगाने धावले तरी स्वताः एके ठिकाणी स्थीर (जागेवरून न हालतां) राहूनही ते त्या सर्व धावणार्‍यांचे अतिक्रमण करणारे आहेत - तस्मिन् मातरीश्वा अपः दधाति - त्यांच्या सत्तेनेंच वायु जल वगैरे (सर्वमहाभूतांना) सामर्थ्य प्राप्त होते. ॥ ४ ॥

तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके ।
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥ ५ ॥

तत् एजति तत् न एजति - तो चालतोही आणि चालत नाहीही (सगुण रूपानें भक्तांसाठी कुठेही प्रकट होणे म्हणजे चालणे, आणि निर्गुण रूपाने सर्वथा अचल स्थितीत राहणे म्हणजे न चालणे. परस्पर विरोधी गुण व क्रिया करणे हे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे). - तत् दूरे तत् अन्तिके - ते अति दूर आहेत (श्रद्धा, प्रेमरहित मनुष्यांसाठी त्यांचे दर्शन दुर्लभ आहे), तसेच अत्यन्त निकटही आहेत (भक्तांच्या ह्रुदयांत ?) - तत् अस्य सर्वस्य अंतः - जगतांतील प्रत्येक वस्तूत - तत् सर्वस्य उ बाह्यतः - आणि जगताच्या पलिकडेही. [ह्या सर्व अचिंत्य शक्त्या परमेश्वरी शक्तिचा एक अंशमात्र समजले जाते. थोडक्यात त्याचे स्वरूप व सामर्थ्य हे कल्पनातीत आहे] ॥ ५ ॥

 

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ ६ ॥

तु यः सर्वणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति - परंतु जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांना परमेश्वराचे ठिकाणी पाहातो - च सर्वभूतेषु आत्मानम् - तसेंच सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराला (तेथे त्याचे अस्तित्व आहे अशा भावनेने) पाहातो - ततः न विजुगुप्सते - तो कुणाचाही द्वेष करीत नाही. ॥ ६ ॥

यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः ।
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ७ ॥

यस्मिन् विजानतः - अशा प्रकारे ज्याची मति झाली आहे - सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत - त्याला सर्व प्राणी एकमात्र परमात्मरूपच होतात - तत्र एकत्वम् अनुपश्यतः - असें सर्व प्राणीमात्रांस एकत्व (समभाव) रूपाने पाहाणार्‍या माहात्म्याला - कः मोहः कः शोकः - मग कशाचा मोह आणि कशाचे (कुणापासून) दुःख ? सर्वच आप्त, मग जें काही घडेल ती सर्व परमेश्वरी लीलाच. ॥ ७ ॥

 

स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् ।
कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूः याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ८ ॥

सः शुक्रम् अकायम् अव्रणम् अस्नाविरम् शुद्धम् अपापविद्धम् पर्यगात् - तो महापुरुष परम तेजोमय, शरीररहित, क्षत रहित (कशाचाही परिणाम होत नाही असा), सच्चिदानंदस्वरूप (शुद्ध), शुभ-अशुभ परिणाम रहित अशा परमेश्वराला प्राप्त होतो - कविः मनिषीः परिभूः स्वयंभूः - जे सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्वनियंता स्वताःच्या इच्छेनें कुठेही केव्हांही प्रकट होऊं शकणारे आहेत, आणि - शाश्वतीभ्यः समाभ्यः यथातथ्यतः अर्थान् व्यदधात् - अनादि कालापासून सर्व प्राणीमात्रांच्या कर्मानुसार सर्व पदार्थांची उत्पत्ती करत आलेले आहेत (ईश्वर बहुतेक अशा महात्म्यांना प्रजापति म्हणून नेमत असेल) ॥ ८ ॥



पुढील तीन मंत्रात विद्या व अविद्याचें तत्त्व-वर्णन - पण आधी त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे - परमेश्वर प्राप्ती हेतूनें केलेला शास्त्राभ्यास वा निष्काम कर्म म्हणजे विद्याआणि भोगांच्या प्राप्तिसाठी केलेला अभ्यास व काम्यकर्मे म्हणजे अविद्या

 

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥ ९ ॥

ये अविद्याम् उपासते ते अन्धम् तमः प्रविशन्ति - जे लोक अविद्येची (भोगांच्या प्राप्तीसाठी साधनरूप कर्मांचे अनुष्ठान) उपासना करतात त्यांचा शेवटीं अज्ञानस्वरूप घोर अन्धकारांत प्रवेश होतो - ये विद्यायाम् रताः ते ततः उ भूयः इव तमः - आणि जे नुसत्या शास्त्रांचे पठण करून मिथ्याभिमानाने मत्त होऊन आमच्यासाठी काही कर्तव्य उरलेले नाहीअशा अविर्भावात कर्तव्यकर्म न करतां, शास्त्र विपरीत कर्मात रत होतात, तेंही घोर नरकाला प्राप्त होतात. ॥ ९ ॥

अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १० ॥

धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविषयी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - विद्यया अन्यत् एव आहुः अविद्यया अन्यत् आहुः इति - की ज्ञानाच्या यथार्थ अनुष्ठानाने तसेच कर्माच्या यथार्थ अनुष्ठानाने (मागील मंत्रात सांगितलेल्या फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १० ॥

 

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह ।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥ ११ ॥

यः तत् उभयम् विद्याम् च अविद्याम् च वेद - जो मनुष्य ज्ञानतत्त्व व अज्ञान-कर्म तत्त्व ह्या दोन्हींना यथार्थपणे जाणतो - अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते - तो कर्तव्यकर्माचे अनुष्ठानाने मृत्युला पार करून ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृताची (परमेश्वराची) प्राप्ती करतो. [कर्म - अकर्म - विकर्म - नैष्कर्म्य - त्यांत आणि संचितकर्म व प्रारब्ध प्रभाव हें सर्व सोपे तर नाहीच, पण गोंधळ उडविणारे आहेत , तरीपण जाणून घेणे आवश्यक आहे. अतिशय सावधानता आणि विवेक गरजेचे आहे] ॥ ११ ॥

अन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्याँ रताः ॥ १२ ॥

ये सम्भूतिम् उपासते (ते) अन्धम् तमः प्रविशन्ति - मान, किर्ति, अधिकार, धन तसेच भोग्य वस्तूंच्या वृद्धीसाठी पितर, क्षुद्र देवता, व मनुष्यांची (नेता वगैरे) उपासना करणारे घोर नरकात जातात - ये सम्भूत्याम् रताः ते ततः उ भुयः एव तमः (प्रविशन्ति) - आणि जे इतर देव-देवींच्या उपासनेंत व्यग्र आहेत तेही अज्ञानरूपी घोर नरकांतच जातात. ॥ १२ ॥

 

अन्यदेवाहुः सम्भवात् अन्यदाहुरसम्भवात् ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १३ ॥

धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविष्यी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - सम्भवात् अन्यत् एव आहुः असम्भवात् अन्यत् आहुः इति - की ज्यांच्यासाठी पितर, देवता इत्यादींच्या उपासनेचे स्वरूप व हेतु ब्रह्मोपासना आहे त्यांच्यासाठी (मागील मंत्रांतील फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १३ ॥

सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयँ सह ।
विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥ १४ ॥

यः तत् उभयम् सम्भूतिम् च विनाशम् च सह वेद - जो मनुष्य अविनाशी परमेश्वर आणि विनाशशील क्षुद्र देवदेवता यांना यथार्थपणे जाणतो - विनाशेन मृत्युम् तीर्त्वा सम्भूत्याम् अमृतम् अश्नुते - तो विनाशशील देवादिंच्या उपासनेने मृत्युला पार करून अविनाशी परब्रह्माच्या उपासनेने अमृततत्त्वाची प्राप्ती करून घेतो (परमपद पावतो). ॥ १४ ॥

 

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ १५ ॥

पूषन् सत्यस्य मुखम् - अखिल ब्रह्माण्डाचे पोषण करणाऱ्या सत्यस्वरूप परमेश्वरा तुझे मुख तर - हिरण्मयेन पात्रेण अपिहितम् - सुर्यमण्डळाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या तेजस्वी पात्राने झाकलेले आहे - सत्यधर्माय दृष्टये तत् त्वम् अपावृणु - मी तुझ्या सत् धर्माची भक्तिभावाने उपासना करतो आणि तुझ्या दर्शनासाठी आतूर आहे. तुं माझ्यासाठी त्यांत बाधा आणणारी सर्व प्रकारची आवरणें काढून टाक. ॥ १५ ॥

पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः ।
यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६ ॥

पूषन् एकर्षे प्राजापत्य सूर्य - एकट्यानेंच सर्व भक्तांचे पोषण करणाऱ्या हे प्रजापति सूर्या, - रश्मिन् व्यूह तेजः समूहः - (तुझ्या किरणांचे तेज आमचे डोळे दिपवून टाकत असल्यामुळे) तुझ्या ह्या किरणांना एकत्र करून ते तेजस्वी किरण थोडा वेळ आवरून घे - यत् ते कल्याणतमम् रूपम् तत् ते पश्यामि - ज्या योगे तुझे जे अतिशय कल्याणमय दिव्य स्वरूप आहे ते मी आपल्या कृपेने पाहूं शकेन - यः असौ असौ पुरुषः अहम् सः अस्मि - (ज्ञानदृष्टी झाल्यावर भक्त म्हणतो) अरे हा जो सुर्याचा आत्मा आहे तो तर परम पुरुष परमात्माच आहे आणि तो तर मी स्वताःच असल्यासारखा भासतोय. ॥ १६ ॥

 

वायुरनिलममृतमथेदं भस्मांतँ शरीरम् ।
ॐ क्रतो स्मर कृतँ स्मर क्रतो स्मर कृतँ स्मर ॥ १७ ॥

अथ वायुः अमृतम् अनिलम् - आतां हा प्राण आणि इन्द्रिये वायु तत्त्वात प्रवेश करोत - इदम् शरीरम् भस्मांतम् - हे स्थूल शरीर अग्निमध्ये भस्म होऊन जावो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो. ॥ १७ ॥

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
     
विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो
    
भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ॥ १८ ॥

अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥ अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥

॥ इति ईशोपनिषत् ॥

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...