अर्जुन म्हणाला
माझ्यावर कृपा करून | केलेस तू कथन || गूढ अध्यात्मज्ञान | त्याने मोह दूर झाला || अ.११, ओ.१||
विस्ताराने केले कथनास | भूतांच्या उत्पत्ती तसेच लयास || आणि तुझ्या अव्यय माहात्म्यास | हे कमलपत्राक्षा || अ.११, ओ.२||
परमेश्वरा, तू जसे वर्णिले स्वत:स | तसाच मला दिसतोस || परंतु तुझ्या ऐश्वर रूपास | पाहण्या मी इच्छितो || अ. ११, ओ.३||
प्रभो, तुझे रूप पाहण्याला | जर वाटतो मी योग्य तुला || तर तुझे अव्यय रूप मला | दाखवावे योगेश्वरा || अ. ११, ओ. ४ ||
श्रीभगवान म्हणाले
शेकड्यांत आणि सहस्रांत | नानाविध प्रकारांत ||नानाविध रंगांत आणि आकारांत | पार्था, माझी दिव्य रूपे पहा || अ.१, ओ.५||
आदित्यांना, वसूंना, रुद्रांना | अश्विनीकुमारांना आणि मरुद्गणांना || तसेच पूर्वी न पाहिलेल्या आश्चर्यांना | पाहून घे भारता || अ.१, ओ.६||
गुडाकेशा, देहात माझ्या | पहा चराचर जगास साऱ्या || इच्छितोस आणखी जे पाहण्या | तेही घे पाहून || अ.१, ओ.७ ||
चक्षूंनी स्वत:च्या | समर्थ नाहीस तू पाहण्या ||माझा ऐश्वर योग पाहण्या | दिव्य चक्षू देतो तुला || अ.१, ओ.८||
संजय म्हणाला
हे राजा, तेव्हा असे बोलुनी | महायोगेश्वर हरींनी ||पार्थास दिले दाखवुनी | परम ऐश्वर रूप || अ.११, ओ.९||
अनेक मुखे, अनेक नयनांनी युक्त | अनेक दर्शनांनी युक्त || अनेक आभरणांनी अलंकृत | अनेक दिव्य आयुधांनी सिद्ध- || अ.११, ओ.१०||
-दिव्य माळा आणि वस्त्रांनी युक्त | लावून उटणे दिव्य सुगंधित || देव आश्चर्यकारक अत्यंत | अनंत विश्वव्यापक || अ.११, ओ. ११||
प्रकटता सहस्र सूर्य आकाशात | जे तेज दिसून येत || तशा तेजाने तळपत | होता तो महात्मा || अ.११, ओ.१२||
तेव्हा पांडवाने पाहिले सारे जगत | जे विभागले अनेक भागात || त्या देवांच्या देवाच्या शरीरात | एकाच ठिकाणी || अ.११, ओ.१३||
तेव्हा धनंजय होऊन विस्मित | आणि रोमांचित ||बोलला जोडून हात | नमवून शिरास || अ.११, ओ.१४||
अर्जुन म्हणाला
सर्व देवांचे आणि भूतांचे | कमलासनस्थ ब्रह्मदेवाचे || ऋषींचे आणि दिव्य नागांचे | देवा, तुझ्या देहात दर्शन होते || अ.११, ओ.१५||
अनेक नेत्र, मुखे, उदर आणि हात | दिसतात तुझ्या सर्वव्यापी अनंत रूपात || परी दिसे न तुझा आदि, मध्य किंवा अंत | हे विश्वेश्वरा, विश्वरूपा || अ. ११, ओ.१६||
किरीट, गदा आणि चक्र धारण करणारा |दीप्तिमान, तेजाने तळपणारा || प्रज्वलित अग्नी किंवा सूर्यासम प्रकाशणारा | तुला पाहणे कठीण || अ.११, ओ.१७ ||
तू अक्षर, श्रेष्ठ, योग्य जाणण्यास | तू श्रेष्ठ आधार या विश्वास || तू अव्यय, रक्षितोस शाश्वत धर्मास | तू सनातन पुरुष मला वाटतोस || अ. ११, ओ. १८ ||
आदि, मध्य आणि अंत नसणारा | अनंतवीर्य, अनंतबाहू, चंद्रसूर्य हेच नेत्र असणारा | प्रदीप्त अग्नीने युक्त मुख असणारा | स्वतेजाने या विश्वास तप्त करणारा दिसतोस || अ.११, ओ.१९||
व्यापलेस अंतर आकाश आणि पृथ्वीमधील | तू व्यापिल्यास दिशा सकल || महात्म्या, त्रैलोक्य झाले व्याकुल | अद्भुत, उग्र रूप तुझे पाहून || अ.११, ओ.२०||
सुरसंघ तुझ्यात प्रवेश करती | काही भीतीने हात जोडून स्तवन करती || महर्षी आणि सिद्ध 'स्वस्ति' म्हणती | आणि करती स्तुती तुझी || अ.११, ओ.२१||
रुद्र, वसू आणि भास्कर | विश्वेदेव, अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितर || गंधर्व, यक्ष, सिद्ध आणि असुर | विस्मयाने पाहती तुला || अ.११, ओ. २२||
हे महाबाहो, रूप तुझे विशाल | ज्यास आहेत मुखे, नेत्र, बाहू, मांड्या आणि पाय पुष्कळ | अनेक उदर आणि दाढांमुळे जे दिसते कराल | पाहून लोक आणि मीही झालो व्याकुळ || अ. ११, ओ. २३||
तू नभास स्पर्शतोस, तुझे तेजस्वी वर्ण बहुत | तू वासलेस मुख, तुझे विशाल नेत्र प्रदीप्त || तुला पाहून अंतरी झालो व्यथित | हे विष्णो, मला न धैर्य, न शांती || अ.११, ओ.२४||
कालाग्नीच्या समान | कराल दाढा असलेली तुमची मुखे पाहून || न वाटते सुरक्षित, न राहिले दिशांचे भान | देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न हो || अ.११, ओ.२५ ||
हे धृतराष्ट्राचे सुत | साऱ्या राजांच्या सहित | भीष्म, द्रोण, सूतपुत्र उपस्थित | आणि आमचेही मुख्य योद्धे- || अ. ११, ओ.२६ ||
-भयानक कराल दाढांनी युक्त | तुमच्या मुखांत त्वरेने शिरतात | काहींची मस्तके अडकून दाढांत | चुराडा झालेली दिसती || अ . ११, ओ. २७||
जसे नदीचे प्रवाह वेगात | समुद्राच्या दिशेने वाहतात || तसे हे नरवीर होऊन प्रज्वलित | तुझ्या मुखांत प्रवेश करतात || अ.११, ओ.२८||
जसे पतंग वेगात | नाश पावण्या शिरतात प्रदीप्त अग्नीत || तसे लोक तुझ्या मुखांत वेगात शिरतात | नाश पावण्या || अ.११, ओ.२९||
तुझ्या जळत्या मुखांनी | सर्व लोकांस गिळत आहेस चाटुनी || विष्णो, तुझे तेज सारे जग व्यापुनी | उग्र किरण जगास ताप देती || अ. ११, ओ. ३०||
उग्ररूप आपण कोण ते करावे कथन | देववरा, प्रसन्न व्हा, मी करतो नमन || तुम्हास जाणू इच्छितो, तुम्ही आदिकारण | प्रवृत्त कशास मी न जाणतो || अ.११, ओ.३१||
श्रीभगवान म्हणाले
लोकांचा क्षय करणारा मी काळ थोर | प्रवृत्त आहे करण्या लोकांचा संहार || नाश पावतील हे सारे वीर | केवळ तुझ्याशिवाय || अ.११, ओ.३२||
तेव्हा ऊठ, मिळव यशास | समृद्ध राज्य उपभोग, जिंकून शत्रूंस || मीच मारले पूर्वी या सर्वांस | हे सव्यसाची, तू निमित्तमात्र हो || अ.११, ओ.३३||
द्रोण, भीष्म आणि जयद्रथ यांस | कर्ण तसेच अन्य वीरांस || मी मारले आहे, तू व्यथित न होता मार त्यांस | शत्रूंवर विजय मिळवशील || अ.११, ओ.३४||
संजय म्हणाला
केशवाचे हे वचन ऐकून | हात जोडलेला, थरथर कापणारा अर्जुन || अत्यंत भ्यालेला, सद्गदित होऊन | कृष्णास असे बोलला || अ. ११, ओ. ३५ ||
अर्जुन म्हणाला
हृषीकेशा, ऐकून तुझ्या कीर्तीस | आनंद होतो साऱ्या जगास || राक्षस भिऊन धावती सर्व दिशांस | सारे सिद्ध नमन करती || अ. ११, ओ. ३६ ||
का करू नये त्यांनी नमन तुम्हास | ब्रह्मदेवाहून श्रेष्ठ आदिकर्त्यास || तुम्ही अनंत, देवेश, जगन्निवास | अक्षर, सत् आणि असत् च्या पलीकडे || अ.११, ओ.३७||
तुम्ही पुराणपुरुष, देव आद्य | या विश्वास परम आश्रय || जाणते आणि जाणण्यास योग्य | व्यापिले विश्व अनंतरूपाने || अ.११, ओ.३८||
तुम्ही वायू, यम, अग्नी, शशांक आणि वरुण | तुम्ही प्रजापती, पितामह महान || तुम्हास सहस्रवार नमन | पुन्हा पुन्हा नमस्कार असो || अ.११, ओ.३९||
नमस्कार तुला पुढून आणि पाठून | सर्व बाजूंनी तुला नमन || अनंतवीर्य आणि अमितविक्रम असे तुझे महिमान | व्यापतोस सर्व म्हणून सर्व तूच || अ. ११, ओ.४०||
अनादराने जे बोललो तुला मित्र मानून | `हे कृष्णा, हे यादवा, हे मित्रा' असे केले संबोधन ||तुझा महिमा न जाणून | मी तुला चुकीने किंवा प्रेमाने || अ.११, ओ.४१||
अपमान केला तुझा थट्टामस्करीत | असता फिरत, निजत, बसत किंवा भोजन करीत || अच्युता, तुझ्यासमोर किंवा एकांतात | त्या सर्वांची मला क्षमा कर || अ. ११, ओ.४२||
तू पिता या चराचराचा | आहेस श्रेष्ठ गुरू त्याचा ||त्रैलोक्यात नाही कुणी तुझ्या बरोबरीचा | मग श्रेष्ठ कसा असेल || अ.११, ओ. ४३||
तेव्हा करून साष्टांग नमन | पूजनीय तुम्हास प्रार्थितो, ‘होऊन प्रसन्न || करावे माझे अपराध सहन | जसे पित्याने पुत्राचे, मित्राने मित्राचे आणि प्रियकराने प्रियेचे’ || अ.११, ओ.४४||
पूर्वी न पाहिलेले तुझे रूप पाहून | झालो आनंदित तरी व्यथित आहे माझे मन || तेव्हा तुझ्या नेहमीच्या रूपात दे दर्शन | देवेशा, जगन्निवासा, प्रसन्न होऊन || अ.११, ओ.४५||
किरीट, गदा आणि चक्र धारण केलेल्या | तुझ्या रूपास इच्छितो पाहण्या || दर्शन दे चतुर्भुज रूपातच त्या | हे सहस्रबाहो, विश्वमूर्ते || अ. ११, ओ. ४६||
श्रीभगवान म्हणाले
अर्जुना, मी प्रसन्न होऊन | आत्मयोगाने दिले माझ्या परम रूपाचे दर्शन || पूर्वी कुणी न पाहिले तुझ्यावाचून | हे तेजोमय अनंत आद्य विश्व || अ. ११, ओ. ४७||
न वेदयज्ञाने, न अध्ययनाने, न दानाने | न क्रियाकर्माने, न उग्र तपाने || मनुष्यलोकात अन्य कुणाला हे रूप पाहणे | शक्य नाही कुरुप्रवीरा || अ.११, ओ.४८||
माझे असे घोर रूप पाहून | नको होऊस व्यथित किंवा भ्रांतमन || पहा प्रसन्न चित्ताने भयमुक्त होऊन | पूर्वीचेच माझे रूप || अ.११, ओ.४९||
संजय म्हणाला
असे बोलून अर्जुनास | भ्यालेल्या त्यास || दाखवून स्वत:च्या पूर्वीच्या सौम्य रूपास | वासुदेवाने आश्वासित केले || अ.११, ओ.५०||
अर्जुन म्हणाला
जनार्दना, तुझ्या | सौम्य मानवी रूपास पाहुनिया || पूर्वस्थितीस येऊनिया | माझे मन स्थिर झाले || अ.११, ओ.५१||
श्रीभगवान म्हणाले
माझ्या ज्या रूपास | आता तू पाहिलेस || इच्छा असते देवांस | रूप ते पाहण्याची || अ.११, ओ.५२||
न वेदाभ्यासाने, न तपाने | न दानाने, न यज्ञाने ||शक्य आहे माझे हे रूप पाहणे | जे पाहिलेस तू || अ.११, ओ.५३||
परंतपा, याप्रमाणे | शक्य आहे मला पाहणे ||जाणणे आणि तत्त्वतः माझ्यात प्रवेश करणे | केवळ अनन्य भक्तीने || अ. ११, ओ. ५४||
मला परमश्रेष्ठ मानणारा माझा भक्त | जो कर्मे माझ्यासाठी करतो, आहे सर्वसंगपरित्यक्त ||वैरहीन आहे सर्व भूतांप्रत | तो मलाच मिळतो पांडवा || अ.११, ओ.५५||
असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘विश्वरूपदर्शनयोग ’ नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved