श्रीमद्भगवद्गीता
अध्याय २ - सांख्ययोग
संजय म्हणाला
करुणापूर्ण तशा अर्जुनाला | व्याकूळ, अश्रुपूर्ण दिसणाऱ्याला ||
विषाद करणाऱ्याला | मधुसूदन हे वाक्य बोलले || अ.२, ओ.१|
श्रीभगवान म्हणाले
कोठून हे तर्कट अर्जुना |
अशा अवेळी आले तुझ्या मना ||
जे नेते दूर स्वर्गापासून, न शोभते आर्यांना |
आहे अपकीर्तीचे कारण ||अ.२, श्लो.२||
नकोस पडू कमकुवतपणास बळी | तुला न हा शोभतो मुळी ||
मन:स्थिती क्षुद्र दुबळी | सोडून ऊठ परंतपा || अ.२, श्लो.३||
अर्जुन म्हणाला
कसा मी या युद्धात पण | पूज्य आम्हाला जे भीष्म-द्रोण ||
त्यांच्यावर उलट सोडू बाण | सांग मधुसूदना ||अ.१, ओ.४||
महान गुरूंस मारणे | यापेक्षा बरे, भीक मागून जगणे ||
जरी हे गुरू पैशासाठी ओशाळवाणे | हत्येचे भोग असतात रक्तरंजित ||अ. २, ओ. ५ ||
नकळे मला दोन्हींत बरे काय | मिळवावा की न मिळवावा जय ||
ज्यांना मारून जगण्यात न स्वारस्य | ते धार्तराष्ट्र युद्धास सिद्ध ||अ. २, ओ.६||
गोंधळली वृत्ती, झाले कुंठित मन | धर्माविषयी मला न ज्ञान ||
भले काय ते सांग समजावून | शिष्य मी तुझा, सांग मला शरणागताला || अ.१, ओ.७||
कसे दूर करू, मला न कळते | दु:ख जे इंद्रियांचे शोषण करते ||
जरी निष्कंटक राज्य पृथ्वीचे मिळते | आणि देवांचे आधिपत्य ||अ. २, ओ.८||
संजय म्हणाला
बोलून असे हृषीकेशास | गुडाकेश, जो ताप देई शत्रूंस ||
'नाही करणार युद्धास'| असे बोलून शांत झाला ||अ.२, ओ.९||
हृषीकेश बोलला त्यास | भारता, करून जणू हास्यास ||
विषाद करणाऱ्या अर्जुनास | दोन्ही सैन्यांच्यामध्ये || अ.२, ओ.१०||
श्रीभगवान म्हणाले
ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस | पोकळ पांडित्य सांगतोस |I
नसे दु:ख खऱ्या ज्ञानी लोकांस | आल्यागेल्यांचे ||अ.२, ओ.११||
तुला, मला, या राजांस | वा आपणां सर्वांस ||
नव्हता जन्म पूर्वी, न यावयाचे जन्मास | असे काही नाही || अ. २, ओ. १२||
आत्म्यास या देहात जशा लाभती |
बालपण, तारुण्य, म्हातारपण या स्थिती |I
तशीच होते त्याला नव्या देहाची प्राप्ती |
त्यामुळे ज्ञानी मोह न पावतो || अ. १, ओ. १३ ||
कौंतेया, स्पर्शसंवेदना उत्पन्न होती |
शीत वा उष्ण, सुख वा दु:ख देती ||
त्या येती तशा जाती |
कर सहन त्यांना || अ.१, ओ.१४||
या संवेदना व्यथा न देती ज्या ज्ञानी पुरुषाला | पुरुषश्रेष्ठा, सांगतो तुला ||
सुख आणि दु:ख सारखे ज्याला | तो अमृतत्वाला पात्र होतो ||अ.२, ओ. १५||
असत् होई न भाव | सत् होई न अभाव ||
असा या दोन्हींचा पाहिला ठाव | तत्त्वदर्शी लोकांनी ||अ.२, ओ.१६||
जाण अविनाशी अव्ययास | ज्याने व्यापिले या सर्वास ||
त्याच्या विनाशास | कोणीही समर्थ नाही || अ. २, ओ.१७||
नित्य, अविनाशी, अप्रमेय आत्म्याने या | धारण केलेल्या काया |
अंती जाती विलया | त्याकरिता युद्ध कर || अ. २, ओ.१८||
जो मानतो मारणारा आत्म्यास | किंवा जो मानतो मेलेला त्यास ||
कळत नाही त्या दोघांस | हा न मारतो न मारला जातो || अ. २, श्लो. १९||
आत्मा नाही जन्मत, नाही मरत | नाही तो झाला, नाही होत ||
तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित | शरीर नष्ट करिता, नाही मारला जात || अ.२, श्लो. २० ||
ज्या पुरुषास ज्ञात | की आत्मा नित्य, अव्यय, जन्मरहित ||
तो पुरुष कसा करवील कुणाचा घात | किंवा मारील कुणास? || अ.२, श्लो. २१||
जसा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून |
नवी वस्त्रे करतो परिधान ||
तसा आत्मा जुनी शरीरे सोडून |
नव्या शरीरात जातो || अ.२, श्लो. २२||
तुटे न हा शस्त्राने | जळे न हा अग्नीने ||
भिजे न हा पाण्याने | न सुकवी वारा यास || अ.२, ओ.२३||
न हा तोडला वा जाळला जातो | न भिजवला वा सुकवला जातो ||
नित्य, स्थिर, सर्वत्र राहतो | अचल हा सनातन || अ. २, ओ. २४||
हा अचिंत्य, अव्यक्त | अविकार्य यास बोलतात ||
हे झाल्यावर ज्ञात | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.२५||
हा जन्मतो आणि मरतो नियमित | असे जरी असेल तुझे मत |I
तरी शोक करणे न उचित | महाबाहो तुला ||अ. २, ओ. २६ ||
मृत्यू हा जन्माचा संपात |
तसा जन्म हा मृत्यूचा संपात ||
याचे भान ठेवीत |
योग्य नाही शोक करणे ||अ.२, श्लो. २७||
आरंभी ही भूते अव्यक्त असती | मध्ये व्यक्त दिसती ||
अखेर अव्यक्तातच विलीन होती | तिथे शोक कशासाठी || अ. २, श्लो. २८||
कुणी आत्म्यास आश्चर्यकारक म्हणून पाहती | कुणी आश्चर्यकारक बोलती ||
कुणी आश्चर्यकारक म्हणून ऐकती | आणि ऐकूनसुद्धा त्यास, जाणे न कुणीही || अ. २, ओ. २९ ||
भारता, आत्मा राहतो देहात | आत्मा आहे अवध्य, शाश्वत ||
तेव्हा सर्व भूतांप्रत | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.३०||
आणि पाहताही स्वधर्मास | वाव नसे विचलित होण्यास |I
कारण यु्द्धाहून क्षत्रियास | हितकारक काही नसे || अ. २,ओ. ३१||
काही सायासांवाचून | स्वर्गाचे दार ठेविले उघडून |I
क्षत्रियांस भाग्यवान | युद्ध असे लाभते || अ.२, ओ.३२||
जाणूनही धर्मास | न करशील या युद्धास ||
पात्र होशील पापास | स्वधर्म आणि कीर्ती गमावून || अ. २, ओ. ३३ ||
अपकीर्ती तुझी करतील | जन हे सकल ||
संभावितास अपकीर्तीचा सल | मरणाहून असह्य || अ. २, ओ.३४||
महारथी म्हणतील, 'अर्जुन | पळाला रणातून घाबरून ' |I
करतील तुझे अवमूल्यन | जे तुला मानतात || अ.२, ओ.३५||
बोलू नये ते बोलतील | पुष्कळ तुझ्याबद्दल ||
तुझे सामर्थ्य कमी लेखतील | त्याहून काय दु:खदायक || अ.२, ओ.३६||
मारला गेल्यास मिळवशील स्वर्गास | जिंकल्यास भोगशील पृथ्वीस ||
म्हणून कौंतेया, ऊठ युद्धास | दृढनिश्चय करूनी || अ.२ ओ. ३७||
समान मानून सुख-दु:खास | लाभ-हानी, जय-पराजयास ||
करशील जर युद्धास | लागणार नाही पाप तुला || अ.२, ओ.३८||
हे ज्ञान सांगितले सांख्यातील | ऐक ज्ञान आता योगातील ||
जे जाणून मुक्त होशील | कर्मबंधातून || अ.२, ओ.३९||
योगात आरंभिले कार्य नाश न पावते | न आरंभिल्या कार्यात विघ्न येते ||
मोठ्या भयापासून रक्षण करते | या धर्माचे अल्प आचरण || अ.२, ओ.४०||
जी व्यस्त असे योगात | एकत्व राहे त्या बुद्धीत ||
जी नसे योगात व्यस्त | त्या बुद्धीला अनंत शाखा फुटती || अ.२, ओ.४१||
अज्ञानी लोक भाषा फुलवती | आणि बोलती ||
वेदांच्या वादात रंगून म्हणती, | ‘नसे दुसरे काही’ || अ.२, ओ.४२||
‘विविध विशेष क्रियांचे फळ म्हणून | भोग आणि ऐश्वर्य देणारा जन्म येतो चालून’, ||
म्हणती हे जन | इच्छा आणि स्वर्गाच्या पाठी जे असती ||अ.२, ओ.४३||
भोग आणि ऐश्वर्य ध्येय एक | मानून गमावती विवेक ||
त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक | होते न स्थिर || अ.२, ओ. ४४||
वेद आहेत त्रिगुणांनी युक्त | अर्जुना, तू हो त्रिगुणरहित ||
नेहमी सत्त्वगुणी, द्वंद्वापासून मुक्त | योगक्षेमापासून दूर, आत्मनिष्ठ || अ. २, ओ.४५||
जळाने व्यापता सर्व बाजूंस |
कोण विचारी विहीरीस ||
तेवढीच किंमत वेदांस |
देई ज्ञानी ब्राह्मण || अ.२, ओ. ४६ ||
अधिकार तुझा केवळ कर्मावर | नाही कधीही कर्मफलावर ||
कर्मफलहेतूस ठेव दूर | कर्म मात्र टाळू नको || अ.२, ओ.४७||
कर कर्मे योगात राहुनी | धनंजया, आसक्ती सोडुनी ||
सिद्धी-असिद्धी समान मानुनी | या समानतेस योग म्हणती || अ.२, श्लो. ४८||
कर्म फार न्यून | धनंजया, बुद्धियोगाहून ||
फळाचा हेतू असणारे जन असती कृपण I म्हणून तू बुद्धीचा आधार घे || अ.२, ओ.४९||
बुद्धियुक्त त्यागतो उभय | पाप आणि पुण्य ||
तेव्हा योगाचा घे आश्रय | कर्मातील कौशल्य म्हणजेच योग || अ. २, ओ. ५०||
कर्मातून झालेले उत्पन्न | फळ, बुद्धियुक्त जन टाकून ||
मुक्त होती जन्मबंधनातून | जाती निरामय पदाला || अ. २, ओ. ५१||
जेव्हा मोहाचे जंगल | बुद्धी पार करील ||
तुला निरुपयोगी वाटेल | ऐकलेले आणि ऐकावे असे || अ. २, ओ.५२||
श्रुतींमुळे झालेली चंचल | होईल जेव्हा निश्चल ||
बुद्धी समाधीत अचल | तेव्हा साधशील योग || अ.२, ओ.५३||
अर्जुन म्हणाला
‘स्थितप्रज्ञ, जो समाधीत स्थिर झाला | केशवा सांग मला |
बोलेल काय शब्दांला | असेल कसा, वागेल कसा’ || अ.२, ओ.५४||
श्रीभगवान म्हणाले
‘हे पार्था, स्थितप्रज्ञ म्हणती त्यास | जो सोडून सर्व इच्छांस ||
मानतो संतोषास | स्वत:च्याच ठायी || अ.२, ओ.५५||
जो न उद्विग्न दु:खात | ज्याची इच्छा न सुखात ||
जो प्रेम, राग, भीतीपासून मुक्त | स्थितप्रज्ञ म्हणती त्यास ||अ.२, ओ.५६||
सर्वत्र जो अनासक्त | शुभ आणि अशुभापासून अलिप्त ||
हर्ष आणि द्वेषापासून मुक्त | स्थिर त्याची बुद्धी || अ.२, श्लो.५७||
जो घेतो आवरूनी |
इंद्रिये इंद्रियविषयांपासुनी |
कासव जसे अवयव सर्व बाजूंनी |
स्थिर त्याची बुद्धी ||अ.२, ओ.५८||
जीवात्म्याची निराहारातुनी | निवृत्ती होई विषयांतुनी, न त्यांच्या आसक्तीतुनी ||
निवृत्ती आसक्तीतुनी | होई पराच्या दर्शनाने ||अ.२, ओ.५९||
पुरुषाने ज्ञानी | प्रयत्नही करूनी ||
मन दुसरीकडे नेती ओढुनी | त्रासदायक इंद्रिये || अ. २, ओ.६०||
तेव्हा इंद्रियांस करून संयमित | युक्त हो माझ्यात ||
इंद्रिये ज्याची ताब्यात | स्थिर त्याची बुद्धी || अ. २, ओ. ६१||
विषयांचे जो करी चिंतन I
विषयासक्त होई त्याचे मन II
काम जन्मतो विषयांतून I
कामातून जन्म क्रोधाचा || अ. २, ओ. ६२||
जन्म क्रोधातून संमोहाचा I
संमोहातून स्मृतिनाशाचा II
स्मृतिनाशातून बुद्धिनाशाचा I
बुद्धिनाशातून होई सर्वनाश || अ. २, ओ. ६३||
जो मुक्त आसक्ती आणि द्वेषापासून | इंद्रियांना ठेवून स्वाधीन ||
वावरतो विषयांतून || तो विधेयात्मा प्रसन्नता पावतो || अ.२, ओ.६४||
पावता प्रसन्नतेस | दु:खे जाती लयास ||
स्थिरता येई बुद्धीस | लगेच || अ.२, ओ.६५||
बुद्धीचा लाभ न अयुक्तास | न जाणी तो भावनेस ||
भावनेअभावी न शांती त्यास | नसता शांती नसे सुख त्यास || अ।२, ओ.६६||
भटकता इंद्रियांनी |
त्यांच्या पाठी जाऊनी ||
मन बुद्धीस नेते ओढुनी |
जसा वारा ओढतो पाण्यातील नावेस ||अ.२, श्लो. ६७||
महाबाहो म्हणूनी | इंद्रियांस विषयांपासूनी ||
घेतो जो आवरूनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ. २, श्लो.६८||
सर्व भूतांसाठी रात्र होता | संयमी राखतो जागृतता ||
सर्व भूते जागी राहता | मुनी पाही रात्र ती || अ.२, ओ६९||
सर्व बाजूंनी भरताही जल |
समुद्र जसा राहतो आपल्या मर्यादेत अचल ||
तसा जो राहतो स्थिर, इच्छांत सकल |
तो पावतो शांती, न भोगेच्छू || अ.२, ओ.७०||
जो सर्व इच्छांचा त्याग करतो | आणि नि:स्पृहपणे राहतो ||
निर्मम निरहंकारी पुरुष तो | पावतो शांती || अ.२, ओ.७१||
पार्था, हीच ती ब्राह्मी स्थिती | प्राप्त होता न मोह पावती ||
अंतकाळीही स्थिर राहती | पावती ब्रह्मनिर्वाणास || अ.२, ओ.७२||
अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'सांख्ययोग' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
No comments:
Post a Comment