Thursday, May 9, 2024

स्वतः लिहिलेल्या आरत्या

 

स्वतः लिहिलेल्या आरत्या 


© Dr Hemant Junnarkar, All rights reserved

आरती, करते भक्तीची पूर्ती

आपल्या उपासनेमध्ये आरतीला विशेष महत्त्व आहे. घरी गणपती बसवला, सत्यनारायणाची पूजा असली की पूजा झाल्यावर हातात आरतीचे तबक घेऊन 'चला आरतीला' असा पुकारा होतो. मग घरातील लहान-मोठे सारेजण आरतीसाठी गोळा होतात. पूजेमध्ये फक्त घरातील यजमान सहभागी असतात, आरतीमध्ये सर्वांचा सहभाग असतो. अगदी स्वयंपाकघरातील स्त्रियासुद्धा हातातील काम बाजूला ठेवून पदराला हात पुसत आरतीसाठी येतात. मग नेहमीच्या आरत्या म्हणून झाल्या की, विचारणा होते की 'कुणाला काही आरती म्हणायची आहे का?' मग संधी मिळते आपले वेगळेपण दाखवायला. कुणीतरी पुढे येतो आणि कुणालाच माहीत नसलेली आरती म्हणतो. मग एकच खणखणीत आवाज येत राहतो. बाकी सारे चिडीचूप. पण आरती येत नसली तरी बिघडत नाही. तुम्ही पाहिले आहे का की काही जण तोंडाने नुसते आरतीच्या चालीवर 'ऊं ऊं' असा सूर काढत असतात आणि 'जयदेव, जयदेव' मोठ्याने म्हणतात. पण देवाला विद्वत्ता जितकी आवडते, तितकेच मनापासून म्हटलेले 'ऊं ऊं' सुद्धा आवडते. आपण अशा व्यक्तीकडे बघून हसतो, देव कुणालाच हसत नाही.

पूर्वी आरती सुरू झाली की, आरती संग्रहाची पुस्तके वाटली जात. काही यजमान ज्या म्हणायच्या आरत्या आहेत, त्यांच्याच प्रती काढून वाटतात. हल्ली लोक मोबाइलमध्ये आरती वाचतात.

मी एका घरी जात असे, तेथे आरती म्हणताना म्हणताना, बेंबीच्या देठापासून ओरडत 'येई हो विठ्ठले ' ही आरती म्हटली जाई. मग मला कळले की या लोकांचे पूर्वी भजनी मंडळ होते आणि ज्याचा आवाज मोठा त्याला जास्त गुण मिळत. त्यामुळे त्यांना ओरडण्याची सवय लागली.

या ओरडण्यावरून आणखी एक गोष्ट आठवली. पूज्य साने गुरुजींच्या 'श्यामची आई' पुस्तकात एक गोष्ट आहे. श्याम आणि त्याचे मित्र मोठमोठ्याने ओरडत , पत्र्याचे डबे वाजवत भजन, आरत्या म्हणत असतात. शेजाऱ्यांना त्रास होऊ लागतो आणि ते श्यामच्या आईकडे तक्रार करतात. श्यामची आई सर्वांना समजावून सांगते, भजनं , आरत्या ओरडून कशाला म्हणायला हव्या आहेत? हळू आवाजात म्हणा. हळू हळू टाळ्या वाजवून ताल धरा. श्यामला आईचे म्हणणे पटते आणि तो मित्रांना त्याप्रमाणे करण्यास सांगतो. पण मित्रांना हा सल्ला पसंत पडत नाही. त्यांना गोंगाटच करायचा असतो. ते रागारागाने निघून जातात. 

मुघल काळातील एक संत रहिमदास छान प्रश्न विचारतात,
"साहेब क्या बहरा है, बांस के बहुत न्हांव।  
खबरदार जो बोले, से बांसुरी बजांव।।"
'बाबांनो, देव काय बहिरा आहे का? पुष्कळ झाला हा गोंगाट. आता चूप बसा पाहू, देव बासरी वाजवीत आहे.'

मुंबईच्या लोकल्समधून ज्यांनी प्रवास केला आहे, त्यांना या लोकल्समधील भजनांचाही अनुभव असतो. हे भजन झाले की आरती होते आणि शेंगदाणे आणि साखरफुटाण्यांचा प्रसाद फिरवला जातो.

साईभक्त प.पू. माधव अडकरांनी साईबाबांची 'आरती साईबाबा' ही आरती बाबांच्या हयातीतच लिहिली होती. साईभक्त श्री. नानासाहेब चांदोरकरांच्या कन्येला बाळंतपणात वेदना होऊ लागल्या तेव्हा हीच आरती आणि विभूती पाठवली होती, ज्यामुळे कन्येची  बाळंतवेदनांतून सुटका झाली.

बाबांचे निर्वाण झाले होते , परंतु अंत्यसंस्कार झाले नव्हते. बाबा लक्ष्मणमामांच्या स्वप्नात आले आणि नेहमीप्रमाणे आरती करण्यास सांगितले.

जागे करण्यासाठी मंगलारती , दुपारी प्रसादापूर्वी मध्याह्न आरती , संध्याकाळी धूपारती, निजविण्यासाठी शेजारती, अशा प्रकारे देवाला तिन्ही त्रिकाळ आरती आवडते.

काही देवांच्या आरत्या एकाच भाषेत आहेत. मी एकदा सिडनीतील लिव्हरपूल येथे कन्नड लोकांच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमास गेलो होते. कार्यक्रमाची सुरुवात आरतीने होईल म्हणून सांगितले. मी उत्सुकतेने पाहत होतो की कन्नड भाषेतील आरती कशी असेल? पण मराठीत 'सुखकर्ता दु:खहर्ता' आरती सुरू झाली आणि मला सुखद धक्का बसला. एक व्हॉट्स ॲप पोस्ट माझ्या वाचनात आली होती. त्यात म्हटले होते की जगात सर्वांत जास्त म्हटले जाणारे गीत 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती आहे.

साईबाबांचे सर्व प्रांतात भक्त आहेत, पण 'आरती साईबाबा' ही आरती मराठीतच. श्रीस्वामिनारायणांची आरती गुजरातीतच. पण श्रीस्वामिनारायणांचे मी गुजराती भक्तच पाहिले आहेत.

आरती हे खास मराठी भाषेचेच वैशिष्ट्य आहे का? गुजराती, हिंदी भाषेत मोजक्या आरत्या आहेत. संस्कृत भाषेत निरनिराळ्या सहस्रनामांपासून असंख्य स्तोत्रे आहेत. पण कुठली आरती आहे का? असेल तर सांगा. मला sanskritdocuments.org या संकेतस्थळावर काही आरत्या मिळाल्या, पण त्या आधुनिक कवींनीच लिहिल्या होत्या. मराठीत मात्र निरनिराळ्या देवतांच्या, निरनिराळ्या चालींत म्हणावयाच्या असंख्य आरत्या आहेत. 'त्रिगुणात्मक त्रैमूर्ती' ही श्रीदत्तात्रेयांची आरती सर्वांना माहीत आहे. परंतु माझी आई 'आरती दत्तात्रयप्रभुची, करावी सद्भावे त्यांची' ही आरती वेगळ्याच चालीत सुरेल आवाजात म्हणत असे. ज्यांनी दैवतांच्या आरत्या लिहिल्या, त्या संतांच्याही, आरत्या आहेत., उदा. संत रामदास स्वामी. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी श्रीशिवरायांची आरती लिहिली आहे. १९७१ साली भारताने जेव्हा पाकिस्तानचा पराभव करून बांगला देशची निर्मिती केली, तेव्हा मार्मिक साप्ताहिकात आपल्या सेनापतींच्या गौरवपर एक आरती आली होती. राजकीय स्थितीवर किंवा राजकारणी लोकांवर विडंबनपर कविताही लिहिल्या आहेत

पूर्वीच्या काळात दृश्य माध्यमे कमी होती. त्यामुळे वर्णन करताना कवीस यथार्थ चित्र डोळ्यांपुढे उभे करण्यासाठी सारे शब्दसामर्थ्य वापरावे लागत असत असे. म्हणून या आरत्यांमधील देवतांचे वर्णन खरोखरच त्या देवतेचे रूप आपल्या डोळ्यांसमोर उभे करते. उदा. 'सुखकर्ता दु:खहर्ता' या आरतीमधीलच गणरायाचे 'सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची, रत्नखचित फरा' वगैरे वर्णन किती यथार्थ वाटते.

कुठलेही स्तोत्राचे पुस्तक घेतले की शेवटी त्या दैवताची आरती असते. आरती म्हटली की स्तोत्र पूर्ण झाल्यासारखे वाटते. नाहीतर काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखे वाटत राहते. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, 'आरती, करते भक्तीची पूर्ती.'

सोमवारच्या आरत्या 

बारा ज्योतिर्लिंगांची आरती
(चाल:आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा)

आरती गातो भक्तीने तुज कर्पूरगौरा
द्वादशज्योतिर्लिंगनिवासी रुद्रा विश्वंभरा || ध्रु.||

श्रेष्ठत्वाचा गर्व हराया ब्रह्मा-विष्णूचा
शंभू प्रगटे बनुनी अनंत स्तंभ प्रकाशाचा
प्रकाश पडला त्या स्तंभाचा ज्या ज्या स्थानांत
ज्योतिर्लिंग म्हणुनि स्थाने झाली प्रख्यात || १ ||

प्रभासक्षेत्री जिथे त्रिवेणी संगम मनोहर
सोम सत्ययुगि, त्रेतायुगात रावण लंकेश्वर
द्वापारयुगी श्रीकृष्ण करी मंदिर निर्माण
'सोमनाथ' क्षेत्रात निरंतर वसे उमारमण || २ ||

कार्तिकेयरोषास हराया महेश अन् पार्वती
मल्लिकासुमे अर्पण करुनी गिरिस्थानी राहती
म्हणून झाले ज्योतिर्लिंग अन् शक्तीचे स्थान
आंध्र प्रदेशी श्रीशैलावर वसे 'मल्लिकार्जुन' || ३ ||

अवंतिनगरी वास करीती शिवभक्त ब्राह्मण
छळण्या त्यांना मत्त जाहला राक्षस दूषण
वधून त्याला वास करीती जेथे मदनहर
उज्जैनमधिल पावन स्थळ  'महाकालेश्वर' || ४ ||

नर्मदेत मांधाता द्वीप ओंकाराकार
भव्य मंदिरी वास करीती 'ओंकारेश्वर'
विंध्यपर्वताच्या भक्तीने प्रसन्न होऊन
भक्तरक्षणा राहती तिथे उदार पंचानन || ५ ||

पांडव निघती शिवा शोधण्या पापक्षालना
हिमालयामधि मिळती महेश वृषरूपे त्यांना
भक्तरक्षणा तेच जाहले अक्षय शिवतीर्थ
पवित्र मंदिर हिमालयात  'केदारनाथ' || ६ ||

ब्रह्मदेव देता वर त्रिपुरासुर झाला मत्त
जिंकुनिया देवांना केले सकल जनां त्रस्त
त्रिनेत्रधारी संहारितसे जेथे त्रिपुरासुर
भीमेसन्निध सह्यगिरीवर स्थळ 'भीमाशंकर'  || ७ ||

लिंग बनुनि शिव रावणासवे निघती लंकेस
वदती लिंग तयाला भूमीवर न ठेवण्यास
युक्तीने परि लिंग भूवरी ठेवी गजानन
'बैद्यनाथ' ज्योतिर्लिंग  दिव्य तेच स्थान || ८ ||

दारुक दानव मातला करी सर्वांना त्रस्त
शिवमंत्रास जपाया सांगे सुप्रिया शिवभक्त
भक्तरक्षणा जिथे राहिले नागेश गंगाधर
क्षेत्र शिवाचे तेच जाहले मंगल 'नागेश्वर' || ९ ||

शिव नि पार्वती तप करण्याला  क्षेत्र निर्मितात
मणिकर्णिका आणिक पीठे जिथे असंख्यात
मोक्ष लाभतो जीवा करिता जिथे देहत्याग
'काशी विश्वेश्वर' गंगातीरी ते ज्योतिर्लिंग || १० ||

दक्षिणगंगा गोदावरिचा होइ ज्यात उगम
त्या ब्रह्मगिरीतळी विलसते मंदिर मनोरम
ब्रह्मा, विष्णू, शंकररूपे मंदिरी उमापती
म्हणुनि 'त्र्यंबकेश्वर' नावाने क्षेत्राची ख्याती || ११ ||

दक्षिणेस श्रीराम पातले मुक्तिस सीतेच्या
युद्धामध्ये दशाननावर विजय प्राप्त करण्या
स्थापुनि पार्थिव लिंग करीती पूजन शिवाचे
प्रसिद्ध झाले ते 'रामेश्वर' गृह चूडामणिचे || १२ ||

घुष्मेच्या भक्तीला मृत्युंजय शिव पावून
मृत पुत्राला तिचिया जेथे देऊनी जीवन
भक्तमनोरथ पुरविण्या राहति जेथे निरंतर
वेरुळजवळी दयानिधीचे 'घृष्णेश्वर' मंदिर || १३ ||

करीतसे जो यात्रा बारा ज्योतिर्लिंगांची
हृदयी दृढ होऊनी भक्ती कारुण्यसिंधुची
भवभयातुनी, जन्ममृत्युतुनि  होउनिया मुक्ती
सुखदायी अक्षय शिवधामाची  होइ त्यास प्राप्ती || १४ ||


श्रीकृष्णाची आरती

आरती श्रीकृष्णा | गोकुळीच्या यदुराणा ||
परब्रह्म सगुणा | करी भक्तावर करुणा || धृ.||

माजला अधर्म | भूदेवी गांजली ||
होऊनीया दीन | आली  तुझ्या शरणा || १ ||

अवतार थोर तुझा | संहारिले दुर्जना ||
स्थापियले स्वधर्मा | रक्षुनीया सज्जना || २ ||

सखा तू  गोपाळांचा | त्राता तू  पांडवांचा ||
सांगूनिया गीता | बोध केला अर्जुना || ३ ||

देवांचा तू देव | भावाचा तू भुकेला ||
उद्धार करी माझा | सोडी माझी भवतृष्णा || ४ || © डॉ. हेमंत जुन्नरकर


गुरुवारच्या आरत्या

श्रीपादवल्लभांची आरती

जय देव जय देव श्रीपादवल्लभा
उजळतसे विश्वाला तव तेजप्रभा || ध्रु.||

पिठापूर ग्रामाचे भाग्य उदेले 
अप्पलराज-सुमतीला पुत्ररत्न झाले
ब्रह्मा-विष्णु-शिवांचे रूप मनोहर
श्रीदत्तांचा झाला आदिम अवतार || १||

दूर करुनि निज बंधूंचे व्यंग
मातापित्यांचे फेडियले पांग
वृद्ध ब्राह्मण पोटदुखीने त्रस्त
तव कृपेने झाला पीडेतुनि मुक्त || २ ||

वास्तव्याने कुरवपुर केले पावन
दिधले भक्तांलागी दत्तदर्शन
'श्रीपाद' नामाचा करिता नित्य जप
काळाचे भय नुरते नको दुजे तप || ३  ||

(श्रीपादवल्लभांच्या आरतीची गोष्ट 

माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी श्रीपादवल्लभचरितामृत वाचायला घेतले होते. दर गुरुवारी एक एक अध्याय वाचत असे. पण अध्याय वाचून झाल्यावर श्रीपादवल्लभांची आरती म्हटल्याशिवाय मला अध्याय पूर्ण झाल्यासारखा वाटत नव्हता. चरितामृतात काही आरती नव्हती. त्यामुळे मी इंटरनेटवर शोध घेतला. एखादी आरती मिळाली. पण ती अगदीच जनरल वाटली. म्हणजे 'सोनियाचे ताट, रत्नाचे दिवे' वगैरे वर्णन कुठल्याही दैवताच्या आरतीमध्ये करता येईल. त्या दैवताची आरती म्हणजे स्पेसिफिक त्या दैवताचीच वाटली पाहिजे, म्हणून मी हा प्रयत्न केला.

आरती लिहिल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व मित्र मिळून शिरीष नावाच्या एका मित्राच्या घरी गेलो, कारण या मित्राच्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यांना पाहायचे होते. बरोबर संजय म्हणून दुसरे मित्र आणि त्यांच्या मिसेस होत्या. सुशिल-माधवीसुद्धा आले होते. शिरीशच्या घरासमोर मनोज म्हणून त्यांचे एक मित्र राहतात. ते कार सर्व्हिसिंगचं काम करतात. वर्षानं एकदा तिच्या गाडीचं काम मनोजकडून केलं होतं.

शिरीश म्हणाले की मनोजच्या कडे स्वामी समर्थांची पूजा आहे. म्हटलं जाताना आपण दर्शन घेऊ या. शिरीश, मी,  वर्षा, संजय , माधुरी, सुशिल, माधवी एवढे जण त्यांच्या घरी गेलो. पाहतो तर स्वामी समर्थांची पूजा वगैरे काहीच नाही. देव्हाऱ्यात श्रीपादश्रीवल्लभांचा फोटो होता. भिंतींवर जिकडे तिकडे बहुधा श्रीपादश्रीवल्लभांची वचने लावली होती. त्यांचा श्रीपादश्रीवल्लभांचा कार्यक्रम झाला होता. शिरीशना बहुतेक श्रीपादश्रीवल्लभ माहीत नसल्यामुळे ते स्वामी समर्थ म्हणाले.

मला वाटलं हे श्रीपादश्रीवल्लभांचे एवढे भक्त आहेत तर यांना आरती दाखवण्यास हरकत नाही. मी त्यांना आरतीबद्दल सांगितलं. ते म्हणाले, म्हणून दाखवा, आम्ही ऐकतो. मग मी सर्वांसमोर आरती म्हणून दाखवली. त्यांना आवडली. ते म्हणाले, मला फॉर्वर्ड करा. मी त्यांना आरती फॉर्वर्ड केली.

आमच्या ग्रुप मध्ये एक तेलगू मित्र आहेत. संजय म्हणाले, मी त्यांना फॉर्वर्ड करतो. मी म्हटलं, आरती मराठी आहे, त्यांना कशी समजेल? ते म्हणाले, त्यांना मराठी समजतं. एक ऑडिओसुद्धा द्या, म्हणजे त्यांना चालही कळेल. ते रोज पूजेमध्ये ऑडिओ लावतील. म्हणून ऑडिओ बनवला.

आता योगायोग किती पहा. मी आदल्या दिवशी आरती बनवली होती. आम्ही शिरीशच्या मिसेसना पाहायला गेलो होतो. शिरीशना श्रीपादश्रीवल्लभ माहीत नव्हते. ते स्वामी समर्थ म्हणाले. आम्ही दर्शनाला गेलो स्वामी समर्थांच्या, पण दर्शन दिले श्रीपादश्रीवल्लभांनी आणि आरतीसुद्धा म्हणवून घेतली, त्यांच्या भक्तांना ऐकवली.

सिडनी, २३ जुलै २०२३)

 शुक्रवारच्या आरत्या 

श्रीएकवीरा देवीची आरती 

आरती एकवीरा | तूचि मायेचा झरा || 

वारुनी संकटांना | देसी भक्तां निवारा || ध्रु.||

पांडवांनी बांधियेले | तुझे मंदिर प्रशस्त | 

अज्ञातवासामध्ये | त्यांना ठेवियले गुप्त ||  ||

संत एकनाथांची | तू कुलदेवता || 

कार्लागडी तुझा वास | तू रेणुकामाता ||  ||

वंद्य तू कोळियांना | तू शिवाची शक्ती || 

शुक्रवार साधूनीया | भक्त  ओटी भरती ||  ||

गुण तुझे गावयाला | नसे पामरा शक्ती || 

विनंती एक पायी | देई अनन्य भक्ती ||  ||

 

श्री महालक्ष्मीची आरती  


येई  महालक्ष्मी माते माझे माऊली ये

माझे माऊली ये

दोन्ही कर जोडुनीदोन्ही कर जोडुनी

तुझी वाट मी पाहे || ध्रु.||

आलिया गेलिया हाती धाडी निरोप

धाडी निरोप

कोल्हापूरी आहे कोल्हापूरी आहे 

माझी महालक्ष्मी माय || ||

साडी तांबडी कैसी गगनी झळकली

गगनी झळकली

ऐरावतावरी  S ऐरावतावरी बैसूनी

माझी लक्ष्मीमाता आली || ||

लक्ष्मीमातेचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी

नित्य दिपवाळी 

लक्ष्मीमातेला  भक्त S लक्ष्मीमातेला भक्त

जीवेभावे ओवाळी || ||

असो नसो भाव आलो तुझिया ठाये

तुझिया ठाये

कृपादृष्टी पाहे कृपादृष्टी पाहे 

मजकडे श्री लक्ष्मीमाये || ||

 

श्रीजीवदानी देवीची आरती


जय देवी जय देवी जय जीवदानी |

आधार सर्वां तू विश्वाची जननी || ध्रु. ||

 

विरारनगरी दुर्गम गिरिस्थान |

शोधून पांडव करिती स्थापन |

एकवीरा योगलिंग नामे 'जीवधनी' |

झाली तू भक्तांची पुढे जीवदानी || ||

 

त्या स्थानी आदि शंकराचार्य आले |

माहात्म्य तुझे महारास कथिले ||

भक्तिभावे त्याने करिता सेवेस |

संतोषोनी अतिशय दिला मोक्ष त्यास || २ ||

 

पुत्रहीन स्त्री शरण  येता तुला |

तव कृपेने तिजला पुत्रलाभ झाला ||

करिता तुजला तांबूल दान |

प्रसन्न होऊनि  करिसी वंशवर्धन || ||

 

नवरात्री होई उत्सव थोर |

लोटे मंदिरी भक्तसागर ||

होवो तव भक्तीत मन माझे लीन

विनती करितो दे चरणांशी स्थान || ४ ||


श्री यल्लम्मा देवीची आरती

जय देवी जय देवी यल्लम्मा आई

अनन्य भावे आलो शरण तुझ्या पायी || ध्रु.||


पिता जमदग्नींनी करिता आज्ञेस

परशुरामे वधिले माता रेणुकेस

परि मागुनि वर जीवन देता मातेला

यल्लम्मा तुझा अवतार  झाला || १ ||


सौंदत्तीजवळी सिद्धाचलशिखरी

अक्षय वास तुझा विशाल मंदिरी

सरिता मलप्रभा पदकमली लीन

भक्त येती द्वारी घेण्या दर्शन || २ ||


सप्तमातांमध्ये स्थान तुझे थोर 

तुझ्या कृपेने फुलतो संततितरुवर

तृतीयपंथीयांचा तूचि  आधार 

तव कृपेने होवो भवसागर पार || ३ ||

 

शनिवारच्या आरत्या 

श्री हनुमानाची आरती 

 


आरती हनुमाना | सकलशक्तिनिधाना || ध्रु.||

होताच तुझा जन्म | केला महापराक्रम ||

उड्डाण नभी केले | आणि सूर्यास ग्रासिले ||  ||

सीतेचे रावण | जेव्हा करी हरण ||

सीतेला तू शोधून | केले लंकादहन ||  ||

मारुनी महिरावण | रक्षी रामलक्ष्मण ||

संजीवनी आणून | लक्ष्मणा देई जीवन ||  ||

चिरंजीव तू भुवनी | येसी संकटी धावुनी ||

तुझ्यासम रामभक्ती | घडो हीच विनंती ||  ||

  






 

 


       

 

 

    

      

 

   

  


No comments:

Post a Comment